Sunday, 13 March 2022

रात्र सरता सरत नाही...

रात्र सरता सरत नाही… 
[मूळ इंग्रजी लेखिका : जिंजर ह्यूझ] 
[स्वैर अनुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 
९४२२८७०२९४] 

प्रसूतीगृहातून सकाळी घरी आणता इवल्याशा गोड बाळाला, 
त्या रात्री ते बाळ जेंव्हा रडत असतं, तुम्ही होता पुरते हवालदिल.
सुचेल ते सगळं करून झालं तरी रडं काही थांबत नाही.
सकाळच्या आनंदाश्रूंच्या जागी आता 
असहायतेचं पाणी वाहत असतं.

ती रात्र सरता सरत नाही…
 
बाळाला खांद्यावर घेऊन थोपटत, अंगाई म्हणत, 
रात्रभर येरझाऱ्या घालत राहता, डोळ्याला डोळा लागत नाही. 
तापानं अंग फणफणलेलं, नेहमी लुकलुकणारे डोळे निस्तेज, चेहरा मलूल, 
काय झालं असेल म्हणून तुम्ही इंटरनेट धुंडाळत बसता,
अवेळी डॉक्टरांना फोन करताना अवघडूनही जाता…

रात्र सरता सरत नाही…

बाळं जेंव्हा शाळेत जायला लागतात,
तुम्ही रात्री विचार करत बसता, 
मुलं शाळेत रुळतील नां? चांगले मित्र जोडतील नां?
मोठेपणी काय होतील? आपण त्यांना सगळं काही देऊ शकू नां? 
शरीर थकलेलं असलं तरी भुंगा मनाला पोखरतच राहतो…

रात्र सरता सरत नाही…

गाडीत मागच्या सीटवर नाचत, गाणी म्हणत, चिवचिवाट करणारी मुलं,
स्मार्टफोनमध्ये डोकं खुपसून बसतात. 
पूर्वी साध्या साध्या गोष्टींसाठी प्रश्न विचारून भंडावून सोडणारी मुलं,
आजकाल आपल्या प्रश्नांना उत्तरंही देत नाहीत. 
‘त्यांचं सगळं ठीक चाललं असेल नां? काही प्रॉब्लेम तर नसेल नां?’ 
तुमची झोप पार उडते, विचार पिच्छा सोडत नाहीत…
 
रात्र काही केल्या सरत नाही…

ती म्हणते, ‘मैत्रिणीकडे चाललेय, उद्या सकाळी येईन’. 
तो सांगून जातो, “रात्री यायला उशीर होईल, जेवायला वाट पाहू नका”. 
तुमचं विचारचक्र चालूच असतं, 
ती नक्की मैत्रिणीकडेच गेली असेल नां? 
तो इतक्या उशीरापर्यंत बाहेर काय करतोय?

रात्र सरतच नाही…


खरंय नां? अक्षरशः अनंत असतात या रात्री…
 
मग वर्षं? वर्षांचं काय? 

दुपट्यात गुरफटलेल्या छकुलीला 
पाळणाही अपुरा कधी पडायला लागला ते कळतच नाही…

वर्षं भुर्रकन उडून जातात…


तुमचं घट्ट पकडलेलं बोट सोडून चिमुकला 
जेंव्हा शाळेकडे पावलं टाकत निघतो तेंव्हा कळतं,

वर्षं भुर्रकन उडून जातात…

बोबडे बोल बोलत, आणि तुमचे केस ओढत कुशीत पहुडलेली मुलं,
स्वतःच्या केसांच्या स्टायली केंव्हा करायला लागतात ते कळतही नाही…
 
वर्षं कशी भुर्रकन उडून जातात…

नेमका सुट्टीच्या दिवशी पहाटेच उठून तुमची साखरझोप मोडणारा बाब्या, 
सकाळचे दहा वाजले तरी उठता उठत नाही तेंव्हा जाणवतं…

वर्षं किती भुर्रकन उडून जातात…

जिचा हात पकडून तुम्ही तिला टाटा करायला शिकवलंत,
ती जेंव्हा तुम्हालाच टाटा करून नवर्‍यासोबत निघून जाते तेंव्हा प्रकर्षानं जाणवतं…

वर्षं फारच भुर्रकन उडून जातात…

जेंव्हा आपली बाळं आपल्याच पालकांसारखे वागायला लागतात, 
ज्या रस्त्यांवर आपण चाचपडत, अडखळत चाललो त्याच रस्त्यांवर ती आज धावत निघालेली असतात,
जेंव्हा आपलं हळवं प्रेम आपल्याच काळजात कळ आणतं…
तेंव्हा आपल्याला पक्कं समजलेलं असतं की…

रात्री सरता सरत नाहीत, 

पण वर्षं मात्र भुर्रकन उडून जातात.

__________________________________________

मूळ इंग्रजी लेखिका : जिंजर ह्यूझ
स्वैर अनुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 
९४२२८७०२९४

Sunday, 20 February 2022

१९४२: एका 'असीम' मैत्रीची कथा

व्हॉट्सअप हे एक विलक्षण माध्यम आहे. त्यावर कधी-कधी अशी काही माहिती मिळून जाते ज्याबद्दल आपण कधी स्वप्नातही विचार केलेला नसतो. गेल्या आठवड्यात माझं काहीसं तसंच झालं. 

ही गोष्ट एका वेगळ्याच काळातली नव्हे, तर एखाद्या निराळ्याच विश्वातली वाटावी अशी आहे. मला मिळालेली माहिती दोन-दोनदा तपासून, खात्री केल्यानंतरच मी ती सत्यकथा लिहिण्याचा निर्णय घेतला. ती वाचून झाल्यावर वाचकांच्या चेहऱ्यावर, कदाचित थोडी विषादाची किनार असलेल्या, पण निर्मळ अशा स्मितहास्याची एक लकेर उत्स्फूर्तपणे उमटेल अशी अशा मला आहे.

१९४२ साली, उत्तर आफ्रिकेतील गझालाच्या युद्धभूमीवर, फील्ड मार्शल एर्विन रोमेलच्या जर्मन फौजांनी दोस्त राष्ट्रांतर्फे लढणाऱ्या ब्रिटिश सेनेच्या 'तिसऱ्या भारतीय मोटर ब्रिगेड' या तुकडीचा पराभव केला. एकूण १७ भारतीय अधिकाऱ्यांना जर्मनांनी कैद केले आणि इटलीच्या अव्हर्सा शहरातील युद्धकैदी शिबिरात डांबले. ते सर्व अधिकारी तत्कालीन भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातले, निरनिराळ्या वंशाचे आणि भिन्न धर्मांचे होते. 

त्या युद्धकैद्यांपैकी काही नावे अशी होती ... 

मेजर पी. पी. कुमारमंगलम, कॅप्टन आगा मुहम्मद याह्याखान, कॅप्टन ए. एस. नरवणे, लेफ्टनंट टिक्काखान, आणि लेफ्टनंट साहबझादा याकूब खान.

तत्कालीन कॅप्टन ए. एस. नरवणे पुढे मेजर जनरल पदावरून १९७०च्या दशकात निवृत्त झाले. त्यांनी "A Soldier's Life in War and Peace" या आपल्या पुस्तकात, अव्हर्साच्या  युद्धकैदी शिबिरातील आठवणी नमूद करून ठेवल्या आहेत. त्यातील संदर्भानुसार, युद्धकैदी अधिकाऱ्यांपैकी मेजर कुमारमंगलम हे सर्वात वरिष्ठ असल्याने त्यांना कॅम्प प्रमुख नेमले गेले होते. कॅप्टन याह्याखान हे कॅम्प अडज्युटन्ट होते, तर लेफ्टनंट टिक्काखान हे कॅम्प क्वार्टरमास्टरचे काम पाहत होते. 

वर नमूद केलेली थोडीशीच माहिती मला व्हॉट्सअपवर मिळाली होती. परंतु, जर्मनांच्या कैदेत असलेल्या या भारतीय अधिकाऱ्यांचे पुढे काय झाले याचा मागोवा मला घ्यावासा वाटला. पाकिस्तानी सेनेचे मेजर जनरल सय्यद अली हमीद यांनी लिहिलेले एक वृत्त 'फ्रायडे टाइम्स' नावाच्या पाकिस्तानमधील साप्ताहिकात फेब्रुवारी २०१९मध्ये प्रसिद्ध झाले होते. मी त्या वृत्ताचाही अभ्यास केला. त्यातून जी कथा समोर आली ती अशी...  

१९४३ साली युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने फिरले. मुसोलिनीच्या अधिपत्याखाली जर्मनीला साथ देणाऱ्या इटलीचा पाडाव झाला. तेथे चाललेल्या धुमश्चक्रीचा फायदा उठवत, कुमारमंगलम, याह्याखान, याकूबखान आणि इतर अधिकारी कैदेतून पळून जाण्यात यशस्वी झाले. जर्मन गस्ती तुकड्यांच्या हाती सापडू नये यासाठी, इटलीचा समुद्रकिनारा आणि अपेनाइन पर्वतराजी यादरम्यानच्या भागात बरेच दिवस ते अक्षरशः रानोमाळ पायी भटकत राहिले. लेफ्टनंट याकूबखानला इटालियन भाषा अवगत असल्याने, काही स्थानिक शेतकऱ्यांच्या वस्तीवर त्यांना आसरा मिळवता आला. 

काही दिवसांनंतर कॅप्टन याह्याखानची मात्र इतरांपासून ताटातूट झाली. जवळजवळ ४०० किलोमीटर पायी भटकल्यानंतर, अखेर सुदैवाने तो एका भारतीय पलटणीजवळ पोहोचला. मात्र त्यावेळी त्याच्या फक्त एकाच पायातला बूट शाबूत होता!

दरम्यान, मेजर कुमारमंगलम, लेफ्टनंट याकूब खान आणि इतर अधिकारी त्या शेतकऱ्यांच्या वस्त्यांवर काही महिने लपून राहू शकले. तेथून निघण्याचा निर्णय त्यांनी घेतला तेंव्हा मेजर कुमारमंगलम यांच्यावर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केलेल्या एका इटालियन माउलीने स्वतःच्या गळ्यात घातलेला कंठा कुमारमंगलम यांना भेट दिला - वर 'इडापिडा टळो' असा भरघोस आशीर्वादही दिला! 

पण विधिलिखितच असे होते की, ते शुभचिन्ह आणि त्या माउलीचे आशीर्वाद मेजर कुमारमंगलमना फळणार नव्हते!

एका काळोख्या रात्री चालत असताना, अचानक पाय घसरून पडल्याने, कुमारमंगलम यांच्या पायाचा घोटा फ्रॅक्चर झाला. त्यांनी लेफ्टनंट याकूबखानला पदोपदी सांगितले की, "तू मला इथेच सोडून पळून जा, माझे मी बघेन". पण याकूब खानाने त्यांचे अजिबात ऐकले नाही. 

साहजिकच, ते दोघेही एका जर्मन गस्ती पथकाच्या तावडीत सापडले आणि 'स्टॅलाग लुफ्ट ३' नावाच्या तुरुंगात त्यांची रवानगी झाली. हाच तुरुंग पुढे "Great Escape" नावाच्या हॉलिवूड सिनेमामुळे प्रकाशझोतात आला. 

भारतीय सेनेचे हे शिलेदार भविष्यकाळात अमाप प्रसिद्धी पावतील अशी सुतराम कल्पनादेखील त्यांच्यापैकी कोणालाच तेंव्हा असण्याची शक्यता नव्हती.

पी. पी. कुमारमंगलम भारताचे सेनाध्यक्ष झाले (१९६६-६९), याह्याखान पाकिस्तानचे सेनाध्यक्ष आणि लष्करी हुकूमशहा झाले (१९६६-१९७१), टिक्काखानदेखील पाकिस्तानचे सेनाध्यक्ष होते (१९७२-१९७६) आणि साहबजादा याकूब खान यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्रीपद भूषवले (१९९६-१९९७).

सर्वात वर डावीकडून: कुमारमंगलम, नरवणे, याह्याखान व याकूबखान 

पाकिस्तानचे सेनाध्यक्ष बनण्यापूर्वी १९६६ साली जेंव्हा जनरल याह्याखान दिल्ली भेटीवर आले तेंव्हा विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी तत्कालीन भारतीय सेनाध्यक्ष जनरल कुमारमंगलम हजर होते!

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री असताना जेंव्हा साहबझादा याकूब खान इटली दौऱ्यावर गेले तेंव्हा त्यांनी त्या कुटुंबाला आवर्जून भेट दिली ज्यांच्या घरी त्यांच्यासह इतर भारतीय अधिकाऱ्यांनी काही महिने आश्रय घेतला होता!

तसे पाहता, ही गोष्ट वाचून "त्यात काय मोठेसे?" असा प्रश्न काही वाचकांना पडू शकेल. तरीदेखील ही गोष्ट लिहावी असे मला का वाटले असेल?

ही गोष्ट त्या काळातली आहे जेंव्हा हे सर्व सेनाधिकारी केवळ भारतीय किंवा पाकिस्तानी, हिंदू वा मुसलमान, पठाण किंवा तामिळी नव्हते. ते फक्त एकमेकांचे मित्रच नव्हे, तर जीवाला जीव द्यायला मागे-पुढे न पाहणारे आणि एकसारखाच गणवेश घालून लढणारे सैनिक होते!

भारताच्या फाळणीने या मैत्रीभावाची, परस्परप्रेमाची आणि एकोप्याची अक्षरशः राख केली. या राखेवर वेळोवेळी फुंकर मारून त्याखालची आग धगधगत ठेवण्याचे काम सीमेच्या अल्याड-पल्याडची राजकारणी मंडळी चोख बजावत असतात. आणि त्याहूनही मोठे दुर्दैव असे की, दोन्हीकडच्या काही पिढ्या एकमेकांसंबंधी नुसत्या अनभिज्ञ राहिल्या असे नव्हे, तर त्यांना पद्धतशीरपणे एकमेकांचा द्वेष करायला शिकवले गेले आणि आजही शिकवले जाते. 

पण एक काळ असा निश्चितच होता जेंव्हा दोन्हीकडचे सैनिक खांद्याला खांदा लावून एकत्र लढले होते आणि त्यांनी आपला सैनिकधर्म जपला होता!

'ते हि नो दिवसा गतः' इतकेच आज विषण्णपणे म्हणावे लागते.

___________________________________________________________________________________

मूळ इंग्रजी लेखात नसलेली काही माहिती

१. १९७१ साली जेंव्हा भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभूत करून बांगलादेशाची निर्मिती केली तेंव्हा हेच याह्याखान पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा होते. 

२. लेखात उल्लेखलेले मेजर जनरल ए. एस. नरवणे हे सध्याचे भारतीय सेनाध्यक्ष जनरल मनोज नरवणे यांचे काका होते. जनरल मनोज नरवणे इटली भेटीवर गेले असता, मुद्दाम त्या गावी जाऊन आले जेथे त्यांचे काका व इतर अधिकारी आश्रयाला राहिले होते. 

___________________________________________________________________________

मूळ इंग्रजी लेखक : श्री. करण थापर  

स्वैर मराठी रूपांतर: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

Wednesday, 2 February 2022

२६ जानेवारी २०२२ आणि बदललेले काश्मीर

यंदा प्रजासत्ताक दिनी काश्मीर जरासे वेगळे भासले. दोन लक्षवेधी व्हिडिओमध्ये काश्मीर खोऱ्यातील बदललेले वातावरण दिसून आले.

मेहबूबा मुफ्ती, फारूक आणि ओमर अब्दुल्ला यांची निवासस्थाने असलेल्या, श्रीनगरमधील गुपकर रस्त्यावर ३० फूट तिरंगा हातांत घेऊन अभिमानाने चालणारा तरुणांचा गट एका व्हिडिओमध्ये दिसला. 

मेहबूबा यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये सांगितले होते की कलम ३७० पुन्हा लागू केल्याशिवाय काश्मीरमध्ये तिरंगा फडकवला जाणार नाही. मेहबूबा यांच्या या विधानामुळे त्यांच्या पक्षातील अनेक सदस्यांनी राजीनामाही दिला होता. तेव्हापासून सातत्याने मेहबूबा केंद्र सरकारला धमक्या देत आहेत. 

स्थानिक तरुणांनी मेहबूबा यांना दिलेला हा जणू एक संदेशच होता की, काश्मीरी तरुण भारताचा राष्ट्रीय ध्वज घेऊन प्रगतीपथावर निघाले आहेत, आणि काश्मीर राज्याची लूट करणाऱ्या जुन्या कारभाऱ्यांची हुकूमशाही आता चालणार नाही.

साजिद युसूफ शाह, साहिल बशीर भट हे कार्यकर्ते त्यांच्या डझनभर समर्थकांसह श्रीनगरच्या क्लॉक टॉवरवर ध्वजारोहणाचे आयोजन करताना दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसले. त्यासाठी त्यांना हायड्रॉलिक लिफ्टची मदत घ्यावी लागली. राष्ट्रगीत गायन, आणि काश्मीर मार्शल आर्ट्स अकादमीच्या प्रात्यक्षिकांसह स्थानिक लोकांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण समारंभ साजरा झाला. यापूर्वी क्लॉक टॉवरवर तिरंगा फडकला होता १९९५ मध्ये!

क्लॉक टॉवरचे छत कमकुवत असल्याने, क्लॉक टॉवरवर सूर्यास्तानंतर चढणे धोकादायक ठरले असते. त्यामुळे, संध्याकाळ होण्याआधीच ध्वज क्लॉकटॉवरवरून उरवण्यात आला. यावरही, ओमर अब्दुल्ला यांनी उपरोधिक टिप्पणी करण्याची संधी सोडली नाही. ते म्हणाले, “झेंडा संध्याकाळपर्यंत तरी फडकत ठेवायला हवा होता”.

काश्मीरमधून आलेल्या अधिकृत अहवालात असेही म्हटले आहे की राज्यातील सार्वजनिक उद्यानांसह अनेक ठिकाणी, हजारो राष्ट्रध्वज फडकताना दिसले. श्रीनगरमध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रध्वज फडकण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
 
शोपियाँ येथील आर्मी गुडविल स्कूलच्या आवारात १५० फुटी ध्वजस्तंभाचे उद्घाटन करण्यात आले. काही काळापूर्वी दहशतवाद्यांचे प्रमुख केंद्र असलेले शोपियान गाव आता काश्मीर खोऱ्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले आहे.
 
कोव्हिडच्या साथीमुळे शैक्षणिक संस्थांनी मात्र हा कार्यक्रम गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाप्रमाणेच कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित ठेवला.

सुरक्षा दलांनी ठार केलेल्या बुरहान वानी या दहशतवाद्याचे वडील, मुझफ्फर वानी यांनी, पुलवामा जिल्ह्यातील त्राल गावामध्ये, मुलींच्या उच्च माध्यमिक सरकारी विद्यालयात  ध्वजारोहण केले.

कुपवाडा येथे मार्शल आर्ट्सच्या प्रदर्शनाचा समावेश असलेल्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. पुंछ आणि राजौरी सेक्टरमधूनही असेच वृत्त आले. 

एकूणच राज्यभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. खोऱ्यात शांतता होती, कोणतीही अनुचित घटना घडली नाही किंवा बहिष्काराचे कोणतेही आवाहन करण्यात आले नाही. राज्यात कुठेही पाकिस्तानचे झेंडे फडकले नाहीत.

खबरदारीची उपाययोजना म्हणून २६ जानेवारी रोजी सकाळी मोबाईल इंटरनेट सेवा काही तासांसाठी बंद करण्यात आली होती.  मात्र, फोन सेवा आणि लँड लाईनद्वारे इंटरनेट सेवा सुरू ठेवली गेली.

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि राजकीय कार्यकर्त्यांचाही त्यात सहभाग होता. आंदोलकांनी स्वयंनिर्णयाच्या अधिकाराची मागणी केली आणि पाक सरकारकडून सातत्याने होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा निषेध केला. यावेळी काही स्थानिक राजकारण्यांची भाषणेदेखील झाली.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विघ्न आणण्यासाठी पाकिस्तानने Sikhs for Justice (SFJ) च्या सदस्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. प्रजासत्ताक दिनापूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये, SFJ चे संस्थापक, गुरपतवंत सिंग पन्नू आणि एका महिला वक्त्यांनी काश्मीरमधील तरुणांना हिंसाचारासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला होता. पन्नू म्हणाले, "काश्मीरच्या लोकांनो, दिल्ली गाठा. पंतप्रधान मोदींना तिरंगा फडकवण्यापासून रोखा. बारामुल्ला,शोपियाँ, अनंतनाग येथे दररोज खोट्या चकमकीत तुमचे भाऊबंद मारले जात आहेत. जगात कोणालाच त्याची माहितीही नाही. २६ जानेवारीला तुम्ही दिल्लीला पोहोचलात तर संपूर्ण जगाला हे समजेल की काश्मीरी आणि शीख लोकांना भारतपासून स्वातंत्र्य हवे आहे."

या चिथावणीला हिजबुल मुजाहिदीनचाही पाठिंबा होता. या चिथावणीवर काश्मीरमधून उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. पण प्रत्यक्षात काहीच घडले नाही.

काश्मीरच्या कोणत्याही राजकीय नेत्यांनी मात्र त्यांच्या पक्षांच्या कार्यालयात ध्वजारोहणाचे आयोजन केले नाही. त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्राला शुभेच्छाही दिल्या नाहीत. उलट, कलम ३७० हटवल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला. ज्या संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेऊन हे राजकीय पुढारी आपापल्या पदांवर विराजमान आहेत ते संविधान लागू होण्याचा दिवस म्हणजेच हा प्रजासत्ताक दिन आहे याचा त्या राजकीय नेत्यांना सोयीस्करपणे विसर पडलेला दिसतो. तथापि, त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी खोऱ्यातील विविध भागात आयोजित झालेल्या कार्यक्रमात भाग घेतला. 

पाकिस्तानला काश्मीरात शांतता नकोच आहे. काश्मीरच्या मुद्द्याला प्रसिद्धीझोतात ठेवण्यासाठी त्यांनी यंदाही हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न केला. पण ज्या उत्साहाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यामुळे पाकिस्तानला चांगलीच चपराक बसली. ‘बंद’ किंवा बहिष्काराचे आवाहन कोणीच न केल्यामुळे भारतातील पाकसमर्थक लॉबीने या प्रदेशावरील पकड गमावली असल्याचे दिसून आले आहे.

हे तेच काश्मीर आहे जिथे काही वर्षांपूर्वी भारताचा झेंडा पायदळी तुडवण्यात आला होता. यंदा मात्र तो सर्वत्र दिमाखात फडकला.

हे सत्य नक्कीच पाकिस्तानच्या जिव्हारी झोंबणार आहे. काश्मीरच्या जनतेने दाखवलेले हे सकारात्मक चित्र जगापुढे आलेले पाकला खपणार नाही. नजीकच्या भविष्यात अधिक संख्येने दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न पाक  नक्कीच करणार.

या पार्श्वभूमीवर, भारतीय सुरक्षा दलांना अजिबात गाफील राहून चालणार नाही. पाकच्या नापाक कारवायांना आळा घालण्यासाठी आणि स्थानिक जनतेसोबत आपुलकी जपण्यासाठी त्यांनी सदैव कटिबद्ध राहणे अत्यावश्यक आहे.
_________________________

मूळ इंग्रजी लेखक : मेजर जनरल हर्ष कक्कर (सेवानिवृत्त) 

स्वैर मराठी रूपांतर: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

Monday, 20 December 2021

१९७१: लोंगेवालाचा 'खयाली पुलाव'!

१९७१ मध्ये पाकिस्तान शिजवीत असलेला 'खयाली पुलाव' किती 'खमंग' होता याचा विचार आज केला की खूपच करमणूक होते. काही नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एक पाकिस्तानी जनरलसाहेब असे म्हणाले होते की, "आम्ही लोंगेवालामध्ये नाश्ता करू, दुपारचे भोजन रामगढमध्ये घेऊ, आणि रात्रीचा खाना जैसलमेरमध्ये!"

लोंगेवालामध्ये नाश्ता, भोजन रामगढमध्ये, आणि रात्रीचा खाना जैसलमेरमध्ये! 

पाकिस्तानने ३ डिसेंबर १९७१ संध्याकाळच्या हवाई हल्ल्यांसाठी निवडलेल्या ठिकाणांमध्ये जोधपूरचा समावेश होता पण जैसलमेरच्या हवाई तळाकडे पाकिस्तानने लक्षही दिले नव्हते. कदाचित पाकिस्तानी हवाईदलाचा असा कयास असावा की, जैसलमेरला भारताचे एकही फायटर विमान नसणार, आणि म्हणूनच त्यावर शक्ती खर्चण्यात अर्थच नाही. त्यांच्या पायदळाचाही कदाचित तोच अंदाज होता.

पण असे अंदाज बांधताना, हवाई शक्तीचे एक महत्वाचे बलस्थान लक्षात घ्यायला पाकिस्तान विसरला, आणि ते म्हणजे 'वेग'!

कोणत्याही हवाईतळावरून आकाशात झेप घ्यायला आणि इच्छित ठिकाणी पोहोचायला विमानांना कितीसा वेळ लागतो? फक्त काही तास! 

पाकिस्तानी हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे ठाऊकच नव्हते असे कसे म्हणायचे? तरीही त्यांनी त्यांच्या पायदळाला योग्य सल्ला का दिला नसावा, हे एक कोडेच आहे.

कदाचित, त्यांच्या योजनेप्रमाणे -नव्हे, स्वप्नरंजनाप्रमाणे- त्यांची फौज एका दिवसातच जैसलमेर काबीज करणार असल्याने, तेथील धावपट्टी त्यांना स्वतःला आयती वापरायला मिळावी म्हणून त्यावर हल्ला केला नसेल!

त्यांच्या विचारांची दिशा काहीही असली तरी वस्तुस्थिती अशी होती की, ४ डिसेंबरच्या रात्री लोंगेवालावर हल्ला करणार असल्याची खबर पाकिस्तानी पायदळाने स्वतःच्याच  हवाईदलाला २ डिसेंबरपर्यंत दिली नव्हती!

अर्थातच, २ डिसेंबरला पाकिस्तानी हवाईदलाने कानावर हात ठेवत सांगितले की, तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याने, ४ डिसेंबरच्या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी पायदळाला हवाई सुरक्षा मिळू शकणार नाही!

नोकरशाहीच्या लाल फितीचे यापेक्षा समर्पक उदाहरण आणखी कुठे सापडेल?

पश्चिमेकडची अधिकाधिक जमीन बळकावायची पाक युद्धनीती होती. त्यामागचा हेतू असा, की युद्धानंतर होणाऱ्या तहाच्या वाटाघाटींमध्ये हवी तशी घासाघीस करून, पूर्वेकडे भारताने जिंकलेला भूभाग तो परत मिळवू शकला असता. अशी आक्रमक नीती अवलंबायचे जर ठरलेले होते, तर दोन दिवसांची पूर्वसूचना मिळूनही, पायदळाच्या आक्रमणादरम्यान "हवाई सुरक्षा पुरवण्यास आम्ही असमर्थ आहोत", असे त्यांचे हवाईदल खुशाल कसे सांगते? 

आणि इतके सगळे होऊनदेखील, पायदळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठरवलेली योजना - किंवा पाहिलेली स्वप्नसृष्टी - त्यांना इतकी महत्वाची वाटली की त्यांनी चक्क हवाई सुरक्षेविनाच या युद्धात उतरायचे ठरवले! 

असे करताना पुन्हा युद्धनीतीचे तेच महत्वाचे सूत्र पाकिस्तानी विसरले, 

'हवाई क्षमता ज्याची खरी, तोच पृथ्वीवर राज्य करी!'

पाकिस्तानी सैन्यदलांच्या या अज्ञानाला, किंवा त्यांच्या पोकळ उद्दामपणाला काय म्हणावे हेच समजत नाही.  

याउलट, पूर्वेकडच्या आकाशावर भारतीय वायुसेनेने मिळवलेले वर्चस्व लक्षात घेतले तर सहज समजते की, आपल्या पायदळाला, केवळ ११ दिवसात, पूर्व पाकिस्तानाची राजधानी ढाक्यापर्यंत मुसंडी कोणत्या जोरावर मारता आली असेल!

जैसलमेर येथे भारतीय वायुसेनेचा एक सीमावर्ती तळ होता. तेथील धावपट्टी युद्धासाठी सदैव सज्ज ठेवण्याकरता काही संसाधने आणि थोडे वायुसैनिक तेथे तैनात होते.

परंतु, युद्धाला तोंड फुटण्याच्या काही दिवस आधी, वायुदलाने चार हंटर विमानेदेखील जैसलमेरला आणून ठेवलेली होती. हेतू असा की, भविष्यात जमिनीवरील किंवा हवाई हल्ल्याच्या प्रसंगीही ती उपयोगी पडावी. 

मुळातच, लवचिकता हा हवाई शक्तीचा एक अंगीभूत गुणआहे. म्हणूनच, जमिनी किंवा हवाई, यापैकी कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यासाठी आवश्यक ते बदल विमानांच्या शस्त्रांमध्ये करणे, म्हणजे अक्षरशः काही मिनिटांचे काम असते.

लोंगेवालाच्या आघाडीवर, २५०० सैनिक आणि ४० रणगाड्यांसह आक्रमण करणाऱ्या पाकिस्तानी पायदळाचा मुकाबला करायला  तेथील भारतीय चौकीवर फक्त १२० सैनिक आणि आणि एकमेव रणगाडा-विरोधी तोफ होती!

केवळ संख्याबळाचा विचार केल्यास, ही स्थिती पाकिस्तानसाठी अतिशय अनुकूल होती असे कोणीही म्हणेल. परंतु, पाकिस्तान एक गोष्ट लक्षात घ्यायला विसरला. 

ती गोष्ट म्हणजे भारताची हवाई शक्ति, जी युद्धाचे पारडे भारताच्या बाजूला फिरवू शकली असती.  

आणि पारडे तसेच फिरले!

लोंगेवाला चौकीवर ४ डिसेंबरच्या संध्याकाळी तैनात असलेल्या आपल्या मूठभर शूर जवानांनी एकीकडे भारतीय वायुसेनेकडे हवाई सुरक्षेची मागणी केली, आणि दुसरीकडे पाकिस्तानी आक्रमणाला मोठया बहादुरीने संपूर्ण रात्रभर थोपवून धरले.

त्या रात्रीच हवाई हल्ले करण्याच्या भारतीय वायुसेनेच्या अक्षमतेबद्दल, त्या लढाईच्या अनुषंगाने पुष्कळ काही लिहिले-बोलले गेले आहे.

१९७१ साली जे तंत्रज्ञान उपलब्ध होते त्याच्या बळावर रात्रीच्या अंधारात हवाई हल्ले करता येत नव्हते. शिवाय, वाळवंटात इतस्ततः विखुरलेल्या रणगाड्यांवर आणि भारतीय जवानांसोबत हातघाईची लढाई लढत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांवर रात्री हवाई हल्ला करण्याचा प्रश्नच नव्हता. एखादा बॉम्ब चुकून-माकून आपल्याच जवानांवर पडला असता तर?

४ डिसेंबरच्या रात्री भारतीय वायुसेनेची हंटर विमाने इंधन भरून, आणि दारूगोळा सोबत घेऊन, उड्डाणाच्या तयारीत जैसलमेरच्या हवाई तळावर उभी होती. ५ डिसेंबरला भल्या पहाटे आपल्या विमानांनी भरारी घेतली आणि ती लोंगेवालाच्या युद्धभूमीवर पोहोचली. 

पायदळाच्या तोफखान्याची गोळाबारी अचूक व्हावी म्हणून, 'एयर ऑब्सर्व्हेशन पोस्ट' (Air OP) नावाचा, तोफखान्याचाच एक टेहळणी अधिकारी नेमलेला असतो. एखाद्या उंच ठिकाणावरून, अथवा शक्य तितके शत्रूसैन्याच्या जवळ पोहोचून टेहळणी करीत, शत्रूच्या ठिकाणाचे नेमके दिशानिर्देश तो Air OP आपल्या रेडिओवरून सांगत असतो. प्रत्यक्ष लक्ष्यापासून अनेक मैल लांब असलेल्या तोफा त्या निर्देशांच्या आधारे दिशा ठरवून शत्रूवर अचूक मारा करतात. 

विमानातून मारा करणाऱ्या वैमानिकांसाठी नेमके हेच काम फॉरवर्ड एयर कंट्रोलर (FAC) नावाचा एक अधिकारी करीत असतो.  

५ डिसेंबरच्या पहाटे, पायदळाच्या Air OP ने आपल्या छोट्या 'कृषक' विमानातून उडत, वायुसेनेच्या विमानांसाठी FAC ची भूमिका बजावली. त्याच्या दिशानिर्देशानुसार उंचावरून सूर मारत, आपल्या हंटर विमानांनी रॉकेट आणि ३० मिलीमीटर बंदुकांनी मारा करीत, पाकिस्तानी रणगाड्यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले.

लोंगेवालाच्या युद्धाचे कल्पनाचित्र 
[चित्रकार ग्रुप कॅप्टन देब गोहाईन]

जैसलमेरला एकूण चारच हंटर विमाने तैनात होती. शत्रूवर हल्ले करायचे, जैसलमेरला परतून विमानात पुन्हा इंधन व दारूगोळा भरायचा, आणि पुन्हा युद्धभूमीवर पोहोचायचे, असा क्रम त्या विमानांनी आळीपाळीने चालू ठेवला आणि शत्रूला दिवसभरात अजिबात उसंत मिळू दिली नाही.

'दे माय धरणी ठाय' अशी अवस्था झालेले पाकिस्तानी रणगाडे आणि ट्र्क लोंगेवालाच्या वाळवंटामध्ये दिवसभर सैरावैरा धावत राहिले, पण व्यर्थ. पाकिस्तानी विमाने किंवा विमानवेधी तोफांकडून काहीही प्रतिकार होत नसल्याने, आपल्या 'हंटर' विमानांच्या वैमानिकांनी अक्षरशः तळ्यातली बदके टिपावीत तशी पाकिस्तानी रणगाड्यांची शिकार केली!

'हंटर' विमानाच्या कॅमेरामधून टिपलेली रणगाड्याची 'शिकार'!

कुठेही न थांबता जैसलमेरला पोहोचायची स्वप्ने पाकिस्तानने पाहिलेली असल्याने त्यांचे रणगाडे आपल्यासोबत जास्तीचा तेलसाठा घेऊन निघालेले होते. त्यामुळे भारतीय विमानांनी त्यांना लावलेल्या आगीत तेल ओतण्याचे काम त्यांनी स्वतःच करून टाकले!

लोंगेवालाच्या लढाईत भारताने दोन सैनिक गमावले. पण, वायुसेना आणि पायदळाने परस्पर समन्वय साधत पाकिस्तानी सैन्याची अक्षरशः ससेहोलपट केली. पाकिस्तानचे ३४ रणगाडे, शंभराहून अधिक वाहने, आणि २०० सैनिक या युद्धात बळी पडले. 

वाळवंटात सैरावैरा धावणाऱ्या पाकिस्तानी रणगाड्यांच्या 'पाऊलखुणा'
 

त्या दिवशी पाकिस्तानचा एक रेडिओ संदेश आपल्या यंत्रणेने टिपला होता. त्यात म्हटले होते, 

"भारतीय विमानांनी थैमान घातले आहे. एक विमान जाते न जाते, तोच दुसरे येते आणि वीसेक मिनिटे आग ओकते. आमचे चाळीस टक्के रणगाडे आणि सैनिक खलास तरी झाले आहेत किंवा जखमी वा निकामी झालेले आहेत. आता आम्हाला पुढे जाणे अतिशय कठीण आहे. आमच्या रक्षणासाठी त्वरित विमाने पाठवा. अन्यथा येथून सुरक्षित माघारी येणेही आम्हाला अशक्य होऊन बसेल." 

त्याच रात्री, राजस्थान सेक्टरमधील आपल्या पायदळाच्या जनरलसाहेबांनी जैसलमेर हवाईतळाच्या प्रमुखांना पाठवलेल्या संदेशात म्हटले होते, 

"आज आपण एकमेकांना दिलेली साथ अप्रतिम होती. तुमच्या वैमानिकांनी अतिशय अचूक नेमबाजी करून पाकिस्तानी रणगाड्यांना नष्ट केल्यामुळेच त्यांच्या आक्रमणाची धार बोथट झाली. तुमच्या वैमानिकांना माझे आणि माझ्या सैनिकांचे विशेष आभार आणि कौतुक कळवा. हार्दिक अभिनंदन!"

लोंगेवालापासून जैसलमेरचे अंतर, अगदी युद्धकाळातदेखील, एका दिवसात कापणे सहज शक्य आहे. पण, त्या शक्यतेला शेख चिल्लीचे, म्हणजेच पाकिस्तानचे, दिवास्वप्न ठरवू शकणारी क गोष्ट भारताकडे होती, आणि ती म्हणजे 'हवाई ताकद'!

युद्धशास्त्राचा एक मूलभूत धडा विसरल्याची किंमत पाकिस्तानला मोजावीच लागली. 

"लोंगेवालामध्ये नाश्ता, रामगढमध्ये भोजन आणि जैसलमेरमध्ये रात्रीची मेजवानी" चाखायची स्वप्ने पाहणारे पाकिस्तानी स्वतःच्याच जळत्या रणगाड्यांच्या तंदूरमध्ये भाजून निघाले! 

त्या आगीत त्यांची मग्रुरी तर खाक झालीच पण भविष्यात ताकदेखील फुंकून पिण्याची अक्कल त्यांना निश्चितच आली असणार!

मला अनेकदा लोक विचारतात, "या युद्धातील भारतीय विजयाचे श्रेय कोणाला द्यावे? पायदळाला की वायुसेनेला? 

उत्तर अगदी सोपे आहे. 

"भारतीय पायदळ आणि वायुसेना या दोघांमधील परस्पर समन्वयाला!"

जरासा गमतीचा भाग म्हणून, वाळवंटात लढल्या गेलेल्या त्या लढाईचे श्रेय नौसेनेलाही देता येईल, कारण उंटाला वाळवंटातले जहाज मानतातच! 

अर्थात, पाकिस्तानच्या लढाऊ सामग्रीच्या अरबी समुद्रातून होणाऱ्या वाहतुकीची भारतीय नौसेनेने जी कोंडी केली त्यामुळे अप्रत्यक्षपणे या लढाईवर प्रभाव पडला असे मात्र निश्चित म्हणता येईल. 

त्यामुळे, "भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांनी मिळून भारताला विजय मिळवून दिला", हेच म्हणणे योग्य!

भारतालाच नव्हे, तर बांगलादेशाच्या नागरिकांनादेखील आपल्या सेनादलांनी विजय मिळवून दिला!

कारण पश्चिमेकडील युद्धात जर आपण राजस्थानचा भूभाग गमावला असता तर तहामध्ये त्याच्या बदल्यात आपल्याला कदाचित संपूर्ण बांगलादेश पाकिस्तानला परत द्यावा लागू शकला असता!


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने)

Sunday, 12 December 2021

१९७१: पूर्वेकडच्या आकाशावर भारतीय वायुसेनेचे वर्चस्व

पूर्व पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींना स्वगृही सुखरूप परत पाठवणे हेच भारताचे उद्दिष्ट होते. त्यासाठीच, 'मुक्तीबाहिनी' ला भारतीय सैन्य गुप्तपणे मदत करीत असले तरीही ते उघडपणे पूर्व पाकिस्तानात घुसले नव्हते.

पाकिस्तानच्या हवाईदलाने व पायदळाने पश्चिमेकडून भारतावर हल्ला केल्यानंतर भारतानेही पश्चिम पाकिस्तानवर प्रतिहल्ला केला खरा, परंतु, 'पूर्व पाकिस्तानला 'किलो फ्लाईट'चा दणका' बसल्यानंतरच भारताने युद्धाची औपचारिक घोषणा केली होती.

औपचारिकपणे युद्ध सुरु झाल्यानंतर मात्र, भारतीय वायुसेनेने काहीही हातचे राखले नाही. त्या रात्रीपासूनच आपल्या कॅनबेरा बॉम्बर विमानांनी पूर्व पाकिस्तानातल्या तेजगांव आणि कुर्मिटोला येथील पाकिस्तानी हवाईतळांवर हल्ले सुरु केले. 

"पूर्वेकडच्या सुरक्षेची किल्ली पश्चिम आघाडीवरच सापडेल" ही पाकिस्तानची युद्धनीती असली तरी  भारताने मात्र, "पूर्वेकडे झटपट कारवाई आणि पश्चिमेकडे टुकूटुकू लढाई" हे सूत्र अवलंबले होते.

पूर्वेकडील पाकिस्तानी हवाईदलाला समूळ संपवायच्या आणि तेथील संपूर्ण आकाशावर वर्चस्व मिळवण्याच्या इराद्याने, ४ डिसेंबरच्या पहाटेही आपले हवाई प्रतिहल्ले सुरूच राहिले. 

कारण?

'हवाईक्षमता ज्याची खरी, तोच पृथ्वीवर राज्य करी'!

पूर्वेकडील पाकिस्तानी हवाईदलाला जमिनीवरच 'झोपवणे', म्हणजेच हवाई हल्ले करण्याची त्यांची क्षमताच संपवणे, हे भारतीय वायुसेनेचे पहिले लक्ष्य होते. भारतीय वायुसेनेने संपूर्ण हवाई वर्चस्व मिळवल्यानंतर, समुद्रमार्गे येणारी पाकिस्तानी रसद-कुमक रोखणे आपल्या नौदलाला, आणि ढाक्यापर्यंत मुसंडी मारणे आपल्या पायदळाला सोपे जाणार होते.

पूर्व पाकिस्तानातील लष्करी ठाण्यांवर हल्ले करीत असताना, आसपासच्या नागरिकांना काहीही इजा होऊ न देण्याची संपूर्ण खबरदारी भारतीय वायुसेनेने घेतली होती. पाकिस्तानी हवाईतळांवर हल्ले करून, पाक विमानांना हेरून नष्ट करणे, आणि तेथील हवाई यंत्रणा निकामी करणे, हे काम सोपे मात्र अजिबात नव्हते.

पाकिस्तानी हवाईदलानेही त्यांची विमाने -अगदी आपण ठेवली होती तशीच- सहजी दृष्टीस पडणार नाहीत अशा प्रकारे ठिकठिकाणी विखरून ठेवली होती. त्यांना हेरणे आणि नष्ट करणे म्हणजे, शब्दशः, 'गवताच्या गंजीतली टाचणी शोधण्याइतकेच' कठीण होते. 

किंबहुना त्याहूनही अवघड!

कल्पना करा की, शत्रूचा अतिशय कडक सुरक्षा बंदोबस्त असलेल्या विमानतळावर, अगदी कमी उंचीवरून विमान उडवीत, ताशी ९०० किलोमीटर वेगाने, म्हणजेच दर सेकंदाला अडीचशे मीटर अंतर तुम्ही कापत आहात.  अशा प्रकारे उडत असतानाच, तुम्हाला डावी-उजवीकडे पाहत, जमिनीवरचे लक्ष्य शोधत जायचे आहे. त्याच वेळी, वरच्या बाजूलाही नजर ठेवायची आहे, कारण तुमच्या मागावर आलेल्या शत्रूच्या फायटर विमानाचे लक्ष्य बनण्याची तुमची इच्छा नक्कीच नसणार! 

हे सगळे करीत असतानाच, जमिनीवरून शत्रूच्या विमानवेधी तोफा तुमच्यावर नेम धरून, दर सेकंदाला ४० मिलीमीटर व्यासाचे दोन बॉम्ब फेकत असणारच आहेत! 

कशी वाटते ही कल्पना?

४ डिसेंबरपासून, अगदी अशाच परिस्थितीत हल्ले करीत, आपल्या विमानांनी शत्रूची पुष्कळशी हवाई यंत्रणा व काही विमाने नष्ट केली आणि शत्रूला बेजार केले. परंतु, अजूनही पाक विमाने हवेत उडत होती आणि आपल्या विमानांवर हल्ले करीतच होती. म्हणजेच, आपल्याला शंभर टक्के यश मिळाले नव्हते. त्यामुळे, भारतीय वायुसेनेने वेगळी विमाने व शस्त्रे, आणि तीही अगदी निराळ्याच पद्धतीने वापरण्याचा निर्णय घेतला.

मिग-२१ ही अतिशय वेगवान विमाने, मुख्यत्वे आपल्या हद्दीत शिरलेल्या शत्रूच्या विमानांचा पाठलाग करून त्यांना पाडण्याच्या कामी वापरली जात असत. जमिनीवर बॉम्ब टाकण्यासाठी आपली हंटर आणि कॅनबेरा विमाने जेंव्हा जात, त्यावेळी त्यांना पाडण्याच्या हेतूने येणाऱ्या सेबर विमानांपासून त्यांचा बचाव करणे, हेही मिग-२१ विमानांचे काम असे. क्वचितप्रसंगी, जमिनीवर मारा करण्यासाठी असलेली रॉकेट्सदेखील मिग-२१ विमाने सोबत नेत असत.

१९७१च्या युद्धात प्रथमच, पाचशे किलोचे प्रत्येकी दोन-दोन बॉम्ब तेजगाव विमानतळावर टाकण्याचे काम चार मिग-२१ विमानांच्या तुकडीवर सोपवले गेले. 

एकेका विमानाला अगदी कमी उंचीवरून, पण अतिशय वेगाने, शत्रूच्या धावपट्टीकडे तिरप्या दिशेने उडत जावे लागणार होते. इतर तीन विमानांनी अशाच प्रकारे वेगवेगळ्या दिशांनी उडत येऊन मारा करायचा होता. शत्रूच्या विमानवेधी तोफांना झटपट दिशा बदलून विमानांचा वेध घेता येऊ नये, यासाठी ही रणनीती आवश्यक होती. 

परंतु, या रणनीतीचे काही तोटेदेखील होतेच. हे बॉम्बहल्ले काहीसे अंदाधुंद केले जाणार असल्याने अचूक मारा होण्याची शाश्वती नव्हती. त्यामुळे कदाचित, काही दिवस, किंवा काही आठवडेसुद्धा, सतत व मोठया संख्येने मारा करीत राहण्याची गरज होती. आणि नेमके तेच आपल्याला नको होते. 

दोन वेगवेगळ्या आघाड्यांवर आपले सैन्य शत्रूचा सामना करीत होते. त्यामुळे, पूर्वेकडे मुसंडी मारीत निघालेल्या आपल्या पायदळाला लवकरात लवकर ढाक्यापर्यंत पोहोचता आले असते तरच युद्ध निर्णायकपणे जिंकता येणार होते. हे लक्षात घेऊन, भारतीय वायुसेनेने एक धाडसी निर्णय घेतला.

मिग विमानांनी तेजगांव विमानतळावर केलेला हल्ला 
(ग्रुप कॅप्टन देब गोहाइन यांनी रेखाटलेले कल्पनाचित्र)  

मिग-२१ विमानांनी कमी उंचीवरून, धावपट्टीकडे तिरप्या दिशेने न उडता, खूप उंचावरून अचानक ६० अंशाच्या कोनात खाली सूर मारत यायचे आणि धावपट्टीच्या वरूनच उडत बॉम्ब टाकायचे ठरले. यामुळे आपल्या माऱ्यामध्ये अधिक अचूकता येणार होती, पण आपल्या विमानांना असलेला धोका कैक पटींनी वाढणार होता. 

एकाच दिशेने, एकापाठोपाठ धावपट्टीच्या वरच येत असलेल्या या चारी विमानांचा वेध घेणे शत्रूच्या विमानवेधी तोफांना खूपच सोपे होते.   

आपल्या विमानांना आणि आणि वैमानिकांच्या जीवांना असलेला हा गंभीर धोका पत्करूनही, अशाच प्रकारे हल्ले करायचे ठरले!

चारी मिग-२१ विमानांनी अतिशय विस्मयकारकरीत्या अचूक बॉम्ब टाकून तेजगांवच्या धावपट्टीवर आठ मोठमोठे खड्डे पाडल्याने ती धावपट्टी वापरता येणे अशक्य झाले.

युद्ध संपल्यानंतर, आपल्या मिग वैमानिकांनी केलेली ही कामगिरी जेंव्हा संपूर्ण जगाने  बघितली, तेंव्हा मिग विमाने बनवणाऱ्या रशियन लोकांनीच नव्हे, तर पाकिस्तानचा परममित्र असलेल्या अमेरिकेनेही आश्चर्याने अक्षरशः तोंडात बोटे घातली!

परंतु, युद्धात असे काही घडण्याची शक्यता पाकिस्तान्यांनीही लक्षात घेऊन ठेवली असावी. त्या धावपट्टीवरून सेबर विमानांना जेमतेम उड्डाण करता येईल इतपत दुरुस्ती, पाकिस्तान्यांनी अक्षरशः दिवसरात्र खपत, २४ तासाच्या आत करून टाकली. त्याकाळी रात्रीच्या अंधारात अचूक मारा करता येणे अशक्य होते. पण, पहाटे-पहाटे मिग विमाने हल्ला करण्यासाठी येणार याची त्यांना जवळ-जवळ खात्रीच होती.

परंतु, त्यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नीही नसलेली कारवाई भारतीय वायुसेनेने केली. 

मिग-२१ विमानांनी पहाटे-पहाटे नव्हे, तर पहाटेपूर्वीच हल्ला केला आणि पाकिस्तान्यांनी दुरुस्त केलेली धावपट्टी बॉम्ब टाकून संपूर्णपणे नादुरुस्त करून टाकली!

आपल्या विमानांनी अचूक बॉम्ब टाकून, तेजगांव धावपट्टीची जी अवस्था केली होती ती पाहिल्यानंतर, पाकिस्तानी हवाईदलाचा एक वरिष्ठ अधिकारी हताशपणे म्हणाला होता, "पूर्वेकडचे पाकिस्तानी हवाईदल संपले असेच म्हणावे लागेल. आता मात्र पूर्व पाकिस्तानची धडगत नाही!"

भारतीय मिग-२१ विमानांनी उध्वस्त केलेली धावपट्टी 

या घटनेनंतर भारतीय वायुसेनेने अगदी दिवसा-ढवळ्यासुद्धा हवाई हल्ले करीत, पूर्व पाकिस्तानातील संपूर्ण हवाई यंत्रणा नष्ट केली आणि सामरिक इतिहासात 'न भूतो,न भविष्यति' अशा एका शौर्यगाथेची नोंद केली. 

भारतीय वायुसेनेने शत्रूवर केवळ 'हवाई वर्चस्व' मिळवले नव्हते, तर पूर्व पाकिस्तानवर आपले 'हवाई साम्राज्य'च स्थापन केले होते!

आता मात्र पूर्व पाकिस्तानचा पाडाव अटळ होता!


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने)

Saturday, 11 December 2021

१९७१: पूर्व पाकिस्तानला 'किलो फ्लाईट'चा दणका

'किलो फ्लाईट' चे जिगरबाज योद्धे 

याआधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी पाकिस्तानने एकाचवेळी सात भारतीय हवाईतळांवर हल्ला चढवला. प्रत्यक्ष युद्धघोषणा करण्यापूर्वीच भारतीय वायुसेनेला गारद करण्याकरिता केलेली ती खेळी होती. 

आश्चर्य म्हणजे भारताच्या पूर्व सीमेवर पाकिस्तानने एकही हल्ला केला नाही. प्रत्यक्ष युद्धामध्ये हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आपली संसाधने जपून ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता, की 'सेबरचे कर्दनकाळ' ठरलेल्या भारतीय नॅट विमानांनी २२ नोव्हेंबरला जो तडाखा दिला होता त्यामुळे पाक घाबरला असावा, ते निश्चित सांगता येणार नाही. कदाचित तसे  न करण्यामागे युद्धनीतीचा एखादा डावपेचही असू शकेल. 

१९६५ च्या युद्धात पाकिस्तानने भारताविरुद्ध पूर्वेकडची आघाडी उघडलीच नव्हती. "पूर्वेकडच्या सुरक्षेची किल्ली पश्चिम आघाडीवरच सापडेल", हीच पाकिस्तानची त्या काळातली साधी-सोपी युद्धनीती होती. म्हणजेच, भारताची सैन्यदले पश्चिम आघाडीवरच झुंजत ठेवण्यास आपण त्याला भाग पाडले, तर पूर्व पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी भारताकडे सैन्यच उरणार नाही, असा तो विचार होता. १९७१ मध्ये देखील तेच तंत्र वापरण्याचा जनरल याह्याखान यांचा मानस असावा.  

परंतु, भारताची युद्धनीती अर्थातच याच्या संपूर्णपणे विरुद्ध होती. त्यानुसार, पूर्वेकडेच हल्ला करायचे भारताने पक्के ठरवले होते. पण तो हल्ला प्रत्यक्षात भारतीय हवाईदलाने नव्हे तर दुसऱ्याच कोणीतरी केला. 

कोणी आणि का?

'किलो फ्लाईट' चे जिगरबाज योद्धे 

मार्च १९७१ पासून पूर्व पाकिस्तानात सुरु झालेल्या भीषण हत्यासत्र आणि दडपशाहीमुळे, तेथून पळून आलेल्या लाखो शरणार्थींचे लोंढे ईशान्य भारतात येऊ लागले होते. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नाराजीला न जुमानता, पाकिस्तानने तेथील नरसंहार सुरूच ठेवला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा पाकिस्तानला उघड-उघड पाठिंबा असल्याने याह्याखानचा उद्दामपणा वाढतच चालला होता. 

तो नरसंहार थांबवणे भारतासाठीही अत्यंत महत्वाचे होते, कारण त्याशिवाय शरणार्थींचा जनसमुदाय त्यांच्या देशात परतणार नव्हता. कूटनीतिक प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याने, सैन्यबळ वापरण्याचा मार्गच फक्त उरला होता. म्हणूनच, पूर्व पाकिस्तानला त्याच्या भवितव्यावर सोडून फक्त पश्चिमेकडे लक्ष केंद्रित करण्याचा पर्याय भारताकडे उपलब्धच नव्हता.  

भारतात पळून आलेल्या शरणार्थींनी 'मुक्तीबाहिनी' नावाची एक संघटना उभी केली होती. त्या संघटनेला सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य भारताने गुप्तपणे हाती घेतलेच होते. मुक्तीबाहिनीमध्ये पाकिस्तानी हवाईदलातून पळून आलेले अनेक बंगाली पायलट व वायुसैनिकही होते. पाकिस्तानी सैन्याला धडा शिकवायला त्यांचे बाहू फुरफुरत होतेच. हवाई युद्धात ते कुशल असल्याने 'किलो फ्लाईट' नावाची एक छोटी हवाई तुकडी त्यांनी उभारली. भारतीय वायुसेनेने त्यांना तीन विमाने भेट दिली. 

मालवाहतूक व दळणवळणासाठी वापरली जाणारी ती तीन विमाने होती - एक 'डाकोटा', एक 'ऑटर', आणि एक 'चेतक' हेलीकॉप्टर. त्यापैकी सगळ्यात मोठे, म्हणजे डाकोटा विमान कलकत्त्यामध्ये अस्थायी रूपात अस्तित्वात आलेल्या 'बांगलादेश सरकार'ने वापरायला सुरुवात केली. 

'चेतक हेलिकॉप्टर'

भारतीय वायुसेनेच्या इंजिनियरांनी 'ऑटर' आणि 'चेतक' हेलीकॉप्टरमध्ये 'जुगाड' करून बंदुका आणि रॉकेट पॉड बसवून दिले. जोरहाट येथील हवाईतळाचे प्रमुख, ग्रुप कॅप्टन चंदन सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय वायुसेनेच्या  प्रशिक्षकांनी बंगाली पायलट व वायुसैनिकांचे हवाई प्रशिक्षण सुरु केले. 

अतिशय कठोर परिश्रम करून त्या सर्व वायुयोद्ध्यांनी विमाने चालविण्यात आणि अचूक नेमबाजी करण्यात विशेष प्राविण्य मिळवले. रात्रीच्या अंधारात, आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ती विमाने चालवण्याचे आणि त्यामधून शत्रूवर मारा करण्याचे प्रशिक्षण घेऊन 'किलो फ्लाईट' आपल्या कामात तरबेज झाली. 

२८ सप्टेंबर १९७१ रोजी, भारताच्या दिमापूर येथील हवाई तळावर, भारतीय वायुसेनाप्रमुख एयर चीफ मार्शल पी. सी. लाल यांनी औपचारिकपणे 'किलो फ्लाईट' चे उदघाटन केले. 

आजही, दरवर्षी २८ सप्टेंबरला बांगलादेश आपला वायुसेना दिवस साजरा करतो!

वायुसेनाप्रमुख एयर चीफ मार्शल पी. सी. लाल

पाकिस्तानने ३ डिसेंबरच्या सायंकाळी भारताच्या पश्चिम सीमेवरील हवाईतळांवर हल्ला करताच आपण पश्चिम पाकिस्तानवर प्रतिहल्ला चढवला. पूर्व पाकिस्तानवर पहिला हल्ला करण्याचा मान मात्र भारताने 'किलो फ्लाईट'ला दिला!

त्या हल्ल्याबाबत गुप्तता टिकवण्यासाठी, भारताची औपचारिक युद्धघोषणा थोडी उशिरा करावी अशी विनंती, एयर चीफ मार्शल पी. सी. लाल यांनी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींना केली. श्रीमती गांधींनी त्या विनंतीला मानही दिला! यामागे हेतु असा होता की, पूर्व पाकिस्तानी वायुसेना बेसावध राहावी आणि त्यांच्या विमानांना 'किलो फ्लाईट'च्या छोट्या विमानांवर प्रतिहल्ला करता येऊ नये. 

त्रिपुरामधल्या कैलासशहर विमानतळाच्या ३००० फुटी धावपट्टीवरून 'किलो फ्लाईट'च्या 'ऑटर' विमानाने, आणि जवळच्याच तेलीयामुरा विमानतळावरून 'चेतक' हेलिकॉप्टरने, ३ डिसेंबरच्या संध्याकाळी उड्डाण केले.

दोन्ही विमाने रात्रीच्या अंधारात आणि जवळपासच्या टेकड्यांपासून अतिशय कमी उंचीवरून उडत होती. पाकिस्तानी हवाईदलाला आपला सुगावा लागू नये हाच त्यांचा मुख्य हेतू होता. ती युद्धजन्य परिस्थिती होती म्हणूनच 'किलो फ्लाईट'च्या शूर वैमानिकांनी, कोणत्याही यांत्रिक अथवा मानवी मार्गदर्शनाशिवाय, ते 'आंधळे' उड्डाण करण्याचे धाडस केले. एरवी अशा प्रकारचे उड्डाण करण्याची कल्पनाही कोणी करू शकणार नाही!

तुटपुंज्या शस्त्रास्त्रांसहित, आणि अतिशय कमी वेगाने उडत चाललेल्या त्या विमानांची अवस्था अक्षरशः 'अंधार माझा सोबती' अशीच होती! आपल्या मायभूमीला जुलमी पाकिस्तानी राजवटीतून मुक्त करण्याची विजिगीषा उराशी बाळगलेल्या त्या हवाई योद्ध्यांचे असामान्य साहस हीच काय ती एकमेव जमेची बाजू होती.

'ऑटर' विमान

पाकिस्तानच्या विमानवेधी तोफांचा थोडासा भडिमार त्या दोन्ही विमानांवर झाला, पण  त्यातून ती बचावली. सुदैवाने, पाकिस्तानी विमाने मात्र त्यांच्या मागावर धावली नाहीत. 'ऑटर' विमानाने चितगांव (Chittagong) येथील तेलशुद्धीकरण कारखान्यातल्या तेलसाठ्यांना आग लावली, तर नारायणगंज येथील तेलाच्या टाक्या पेटवून येण्यात 'चेतक' हेलिकॉप्टर यशस्वी ठरले.

दोन्ही विमाने भारतात सुखरूप पोहोचून विमानतळांवर उतरायच्या आतच, पाकिस्तानी तेलसाठ्याची दोन महत्वाची ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची सुवार्ता BBC रेडिओने जाहीर केली होती!

नारायणगंजचे तेलसाठे उद्ध्वस्त होताना 
(
ग्रुप कॅप्टन देब गोहाइन यांनी रेखाटलेले कल्पनाचित्र) 

बांगलादेशचा जन्म होण्याआधीच त्यांच्या नवजात हवाईदलाने आपली पहिली कामगिरी अतिशय नेत्रदीपकरीत्या फत्ते केली!

आधीच ठरल्याप्रमाणे, 'किलो फ्लाईट'चा हल्ला यशस्वी झाल्या-झाल्या, म्हणजे ३ डिसेंबरच्या मध्यरात्री, पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारल्याची औपचारिक घोषणा भारताने केली.

४ डिसेंबरच्या पहाटेपासून पूर्वेकडील हवाई हल्ल्याची सर्व सूत्रे भारतीय वायुसेनेने आपल्या हातात घेतली. पुढे काय-काय घडले? 

पुढील लेखात... 


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने) 

Monday, 6 December 2021

१९७१: अखेर युद्धाला तोंड फुटले...

पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा व राष्ट्रपती, जनरल अयूबखान, यांनी एकदा गर्वोक्ती केली होती की, "ज्यांना भाषेचे शस्त्र पुरेसे नसेल, त्यांच्यावर आम्ही शस्त्रांची भाषा वापरू!" 

१९६९ साली जनरल याह्याखान यांनी अयुबखान यांना पदच्युत करून देशाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या हुकूमशाहीविरुद्ध पूर्व पाकिस्तानी लोकांनी बंड पुकारताच, याह्याखानांनी सोयिस्करपणे गृहीत धरले की या बंडाच्या मागे भारताचाच हात आहे. त्यांनी अयूबखानांचे ते मग्रूरीचे शब्द स्वतःच्याच, पूर्व पाकिस्तानातील देशवासियांविरुद्ध प्रत्यक्षात आणायला  सुरुवात केली. 

मार्च १९७१ मध्ये, पाकिस्तानी सैन्याने जेंव्हा पूर्व पाकिस्तानात दडपशाही सुरु केली तेंव्हाच भारतीय राज्यकर्त्यांना आणि सैन्यप्रमुखांना हे कळून चुकले होते की पाकिस्तानसोबत आणखी एक युद्ध आता अटळ आहे. पाकिस्तानी सैन्याने जनतेचा विश्वास आणि पाठिंबा संपादन करण्यासाठी, खोटाच प्रचार सुरू केला की पाकिस्तानी सैन्य अजिंक्य आहे. वस्तुस्थिती वेगळीच असली तरी या अपप्रचारामुळे, पाकिस्तानी जनताच नव्हे, तर स्वतः राज्यकर्तेही त्याच भ्रमात बोलू-वागू लागले. 

जसजशी पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती अधिकाधिक चिघळू लागली, तसे याह्याखान वरचेवर भारताविरुद्ध चिथावणीची भाषा करू लागले. जुलैमध्ये आणि नंतर  सप्टेंबरमध्ये त्यांनी तसे वक्तव्य जाहीरपणेच केले होते.

भारतीय गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरू केलेली होती. आपल्याच नागरिकांवर आपलेच सैन्य करीत असलेले अत्याचार पाहून वैतागलेले आणि पूर्व पाकिस्तानातच तैनात असलेले कित्येक बंगाली सैनिक पाक सैन्यातून पळून बंगाली मुक्तियोद्धयांना येऊन मिळाले होते. त्यांच्याकडून भारतीय गुप्तचर विभागाला माहितीचा खजिनाच उपलब्ध झाला होता.

पूर्व आणि पश्चिमेकडील भारत-पाक सीमांवर सुरु झालेल्या पाकिस्तानी हवाईदलाच्या वाढत्या हालचाली आपली रडार यंत्रणादेखील टिपत होती. नोव्हेंबर १९७१ पर्यंत पाकिस्तानी हवाईदल खूपच सक्रिय झाले आणि वरचेवर सीमेचे उल्लंघन करू लागले. 

जेंव्हा राजनैतिक स्तरावरच्या सविनय विनंत्यांना पाकिस्तान जुमानत नाही असे लक्षात आले, तेंव्हा मात्र त्यांच्या 'अरे'ला 'कारे' करण्याची मुभा भारतीय सैन्यदलांना दिली गेली.

२२ नोव्हेंबर १९७१ रोजी भारतीय वायुदलाने पाकिस्तानला दिलेले प्रत्त्युत्तर किती चोख होते हे आपण यापूर्वीच्या लेखात वाचलेच आहे. [१९७१ ची पहिली हवाई चकमक]

त्या चकमकीचा परिणाम असा झाला की जनरल याह्याखान यांनी जाहीरच करून टाकले की दहा दिवसांच्या आत पाकिस्तान भारतावर हल्ला करेल. आणि त्यांनी आपले वचन पाळले!

आपली तिन्ही सैन्यदले संपूर्णपणे सज्ज होती. भारतीय वायुसेना तर जणू ३ डिसेंबरच्या संध्याकाळी आपल्या हवाईतळांवर होऊ घातलेल्या पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याची वाटच पाहत होती !

१९६७ साली झालेल्या अरब-इस्रायली युद्धामध्ये, इस्राएलच्या हवाईदलाने अचानक हल्ला करून, इस्राएलला नेस्तनाबूत करण्याच्या तयारीत असलेली जवळ-जवळ सर्वच्यासर्व अरब लढाऊ विमाने उभ्या जागी नष्ट केली होती. त्या युद्धाची खडानखडा माहिती पाकिस्तानी हवाईप्रमुखांकडे होती, कारण आंतरराष्ट्रीय संकेतांना धुडकारून, काही पाकिस्तानी वायुसैनिकांनी अरब देशांतर्फे त्या युद्धात भाग घेतलेला होता! 

अगदी तस्साच धडा भारताला शिकवण्याची स्वप्ने पाकिस्तान पाहत होता!

पण भारतीय वायुदल म्हणजे काही दूधखुळ्यांची फौज नव्हती. अरब-इस्राएल युद्धामधून भारतानेही काही धडे घेतले असू शकतील, ही शक्यता पाकिस्तानने कदाचित विचारातही घेतली नसावी!

आम्ही भारतीय वायुसैनिक नेहमीच असे म्हणतो की, "दुसऱ्यांच्या चुकांमधून जेवढे शिकता येईल तेवढे शिकून घ्या. कारण, स्वतःच्या चुकांमधून शिकून शहाणे होण्याइतके आयुष्य कदाचित तुम्हाला मिळणारच नाही!"

ते जीवनसूत्र भारतीय वायुसेनेने तंतोतंत पाळले होते.

१९६५ च्या युद्धानंतर भारताने सीमावर्ती क्षेत्रात अनेक नवीन हवाईतळ तयार केले होते,  तसेच काही 'Blast Pens' देखील बनवले होते. ब्लास्ट पेन म्हणजे काँक्रीट वापरून बनवलेल्या अतिशय कणखर शेड असतात, ज्यामध्ये विमाने उभी करून त्यांची दुरुस्ती, देखभाल करता येते किंवा त्यामध्ये बॉम्ब लोड करता येतात. अर्थातच, ब्लास्ट पेनमध्ये असलेली विमाने शत्रूच्या बॉम्बवर्षावापासून बऱ्यापैकी सुरक्षित राहू शकतात.

आपल्याला अपेक्षित असलेला पाकिस्तानी हवाई हल्ला ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी झाला. प्रत्यक्ष युद्धघोषणा करण्यापूर्वीच भारतीय वायुसेनेला गारद करण्याकरिता केलेली ती खेळी होती. 

केवळ पाच मिनिटांच्या अवधीमध्ये पाकिस्तानने एकाचवेळी सात भारतीय हवाईतळांवर हल्ला चढवला. आग्रा, अंबाला, श्रीनगर, अवंतीपूर, जोधपूर, पठाणकोट, आणि उत्तरलाई या तळांबरोबरच पश्चिम सीमेवरच्या एका विमानवेधी रडार यंत्रणेलादेखील त्यांनी लक्ष्य केले होते.

आश्चर्य म्हणजे पाकिस्तानने भारताच्या पूर्व सीमेवर एकही हल्ला केला नाही. प्रत्यक्ष युद्धामध्ये हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आपली संसाधने जपून ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता, की 'सेबरचे कर्दनकाळ' ठरलेल्या भारतीय नॅट विमानांनी २२ नोव्हेंबरला जो तडाखा दिला होता त्यामुळे पाक घाबरला असावा, ते निश्चित सांगता येणार नाही.

पाकची खेळी यशस्वी ठरली का? पाहू या...

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका हिंदी सिनेमात दाखवल्याप्रमाणे भारतीय विमाने, पाकिस्तानची आयती शिकार होण्याकरिता, बुजगावण्यांसारखी धावपट्टीवर उभी करून निश्चितच ठेवलेली नव्हती! [वाचा: 'भुज- न भूतो न भविष्यति]

हवाईतळांवर दूर -दूर विखुरलेल्या ब्लास्ट पेन्समध्ये भारतीय लढाऊ विमाने सुखरूप होती. मोठी बॉम्बर विमाने आणि मालवाहू विमाने तर, पाक हवाईदल पोहोचूही शकणार नाही अशा ठिकाणी, म्हणजे सीमेपासून दूरवरच्या तळांवर आधीच हलवलेली होती. 

पाक हवाई हल्ले भारतीय हवाईदलाचे कितीसे नुकसान करू शकले ?

फारसे नाही. कारण, पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांनंतर काही तासांच्या आतच भारतीय हवाईदल पाकला चोख प्रत्त्युत्तर देऊ शकले होते. आपली विमाने त्याच रात्री साडेदहापासून ते मध्यरात्रीपर्यंत पाक हवाईतळांवर मारा करीत होती. 

प्रत्त्युत्तर द्यायला भारताला इतका वेळ का लागला?

आपली बॉम्बर विमाने दूरवरच्या हवाईतळांवर होती. तेथून त्यांना सीमेलगतच्या तळांवर हलवून, त्यात पुन्हा इंधन व दारुगोळा भरल्यानंतरच ती कामगिरीवर जाऊ शकणार होती. शक्तिशाली बॉम्बच्या प्रचंड विस्फोटक क्षमतेमुळे ते बॉम्ब विमानांमध्ये लोड करण्याचे काम मोठेच जिकीरीचे आणि वेळखाऊ असते. शिवाय, युद्धजन्य स्थितीत, सर्वत्र  'ब्लॅकआउट' असल्याने, तंत्रज्ञ व वायुसैनिक ते काम संपूर्ण काळोखामध्ये करीत होते.

४ डिसेंबरच्या पहाटे, ऐन हिवाळ्यातल्या दाट धुक्यामध्येसुद्धा आपल्या सुखॉई, मिग, मारूत, आणि हंटरसारख्या  फायटर विमानांसह कॅनबेरा विमानांनीही पाकिस्तानवर कडवा प्रतिहल्ला चढवला. जमिनीवरून होत असलेल्या शत्रूच्या गोळीबारामुळे आपल्या काही विमानांचे नुकसान झाले, पण तरीही, प्रतिहल्ल्यांची आपली कारवाई चार तारखेच्या दिवसभर सुरूच राहिली. 

ज्या युद्धाच्या धमक्या गेले अनेक महिने जनरल याह्याखान देत होता, ते युद्ध अखेर औपचारिकपणे सुरु झाले.

या युद्धातील लढाया कशाकशा होत गेल्या, हे पुढच्या भागांमध्ये पाहू या...


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने)