Sunday 20 February 2022

१९४२: एका 'असीम' मैत्रीची कथा

व्हॉट्सअप हे एक विलक्षण माध्यम आहे. त्यावर कधी-कधी अशी काही माहिती मिळून जाते ज्याबद्दल आपण कधी स्वप्नातही विचार केलेला नसतो. गेल्या आठवड्यात माझं काहीसं तसंच झालं. 

ही गोष्ट एका वेगळ्याच काळातली नव्हे, तर एखाद्या निराळ्याच विश्वातली वाटावी अशी आहे. मला मिळालेली माहिती दोन-दोनदा तपासून, खात्री केल्यानंतरच मी ती सत्यकथा लिहिण्याचा निर्णय घेतला. ती वाचून झाल्यावर वाचकांच्या चेहऱ्यावर, कदाचित थोडी विषादाची किनार असलेल्या, पण निर्मळ अशा स्मितहास्याची एक लकेर उत्स्फूर्तपणे उमटेल अशी अशा मला आहे.

१९४२ साली, उत्तर आफ्रिकेतील गझालाच्या युद्धभूमीवर, फील्ड मार्शल एर्विन रोमेलच्या जर्मन फौजांनी दोस्त राष्ट्रांतर्फे लढणाऱ्या ब्रिटिश सेनेच्या 'तिसऱ्या भारतीय मोटर ब्रिगेड' या तुकडीचा पराभव केला. एकूण १७ भारतीय अधिकाऱ्यांना जर्मनांनी कैद केले आणि इटलीच्या अव्हर्सा शहरातील युद्धकैदी शिबिरात डांबले. ते सर्व अधिकारी तत्कालीन भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातले, निरनिराळ्या वंशाचे आणि भिन्न धर्मांचे होते. 

त्या युद्धकैद्यांपैकी काही नावे अशी होती ... 

मेजर पी. पी. कुमारमंगलम, कॅप्टन आगा मुहम्मद याह्याखान, कॅप्टन ए. एस. नरवणे, लेफ्टनंट टिक्काखान, आणि लेफ्टनंट साहबझादा याकूब खान.

तत्कालीन कॅप्टन ए. एस. नरवणे पुढे मेजर जनरल पदावरून १९७०च्या दशकात निवृत्त झाले. त्यांनी "A Soldier's Life in War and Peace" या आपल्या पुस्तकात, अव्हर्साच्या  युद्धकैदी शिबिरातील आठवणी नमूद करून ठेवल्या आहेत. त्यातील संदर्भानुसार, युद्धकैदी अधिकाऱ्यांपैकी मेजर कुमारमंगलम हे सर्वात वरिष्ठ असल्याने त्यांना कॅम्प प्रमुख नेमले गेले होते. कॅप्टन याह्याखान हे कॅम्प अडज्युटन्ट होते, तर लेफ्टनंट टिक्काखान हे कॅम्प क्वार्टरमास्टरचे काम पाहत होते. 

वर नमूद केलेली थोडीशीच माहिती मला व्हॉट्सअपवर मिळाली होती. परंतु, जर्मनांच्या कैदेत असलेल्या या भारतीय अधिकाऱ्यांचे पुढे काय झाले याचा मागोवा मला घ्यावासा वाटला. पाकिस्तानी सेनेचे मेजर जनरल सय्यद अली हमीद यांनी लिहिलेले एक वृत्त 'फ्रायडे टाइम्स' नावाच्या पाकिस्तानमधील साप्ताहिकात फेब्रुवारी २०१९मध्ये प्रसिद्ध झाले होते. मी त्या वृत्ताचाही अभ्यास केला. त्यातून जी कथा समोर आली ती अशी...  

१९४३ साली युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने फिरले. मुसोलिनीच्या अधिपत्याखाली जर्मनीला साथ देणाऱ्या इटलीचा पाडाव झाला. तेथे चाललेल्या धुमश्चक्रीचा फायदा उठवत, कुमारमंगलम, याह्याखान, याकूबखान आणि इतर अधिकारी कैदेतून पळून जाण्यात यशस्वी झाले. जर्मन गस्ती तुकड्यांच्या हाती सापडू नये यासाठी, इटलीचा समुद्रकिनारा आणि अपेनाइन पर्वतराजी यादरम्यानच्या भागात बरेच दिवस ते अक्षरशः रानोमाळ पायी भटकत राहिले. लेफ्टनंट याकूबखानला इटालियन भाषा अवगत असल्याने, काही स्थानिक शेतकऱ्यांच्या वस्तीवर त्यांना आसरा मिळवता आला. 

काही दिवसांनंतर कॅप्टन याह्याखानची मात्र इतरांपासून ताटातूट झाली. जवळजवळ ४०० किलोमीटर पायी भटकल्यानंतर, अखेर सुदैवाने तो एका भारतीय पलटणीजवळ पोहोचला. मात्र त्यावेळी त्याच्या फक्त एकाच पायातला बूट शाबूत होता!

दरम्यान, मेजर कुमारमंगलम, लेफ्टनंट याकूब खान आणि इतर अधिकारी त्या शेतकऱ्यांच्या वस्त्यांवर काही महिने लपून राहू शकले. तेथून निघण्याचा निर्णय त्यांनी घेतला तेंव्हा मेजर कुमारमंगलम यांच्यावर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केलेल्या एका इटालियन माउलीने स्वतःच्या गळ्यात घातलेला कंठा कुमारमंगलम यांना भेट दिला - वर 'इडापिडा टळो' असा भरघोस आशीर्वादही दिला! 

पण विधिलिखितच असे होते की, ते शुभचिन्ह आणि त्या माउलीचे आशीर्वाद मेजर कुमारमंगलमना फळणार नव्हते!

एका काळोख्या रात्री चालत असताना, अचानक पाय घसरून पडल्याने, कुमारमंगलम यांच्या पायाचा घोटा फ्रॅक्चर झाला. त्यांनी लेफ्टनंट याकूबखानला पदोपदी सांगितले की, "तू मला इथेच सोडून पळून जा, माझे मी बघेन". पण याकूब खानाने त्यांचे अजिबात ऐकले नाही. 

साहजिकच, ते दोघेही एका जर्मन गस्ती पथकाच्या तावडीत सापडले आणि 'स्टॅलाग लुफ्ट ३' नावाच्या तुरुंगात त्यांची रवानगी झाली. हाच तुरुंग पुढे "Great Escape" नावाच्या हॉलिवूड सिनेमामुळे प्रकाशझोतात आला. 

भारतीय सेनेचे हे शिलेदार भविष्यकाळात अमाप प्रसिद्धी पावतील अशी सुतराम कल्पनादेखील त्यांच्यापैकी कोणालाच तेंव्हा असण्याची शक्यता नव्हती.

पी. पी. कुमारमंगलम भारताचे सेनाध्यक्ष झाले (१९६६-६९), याह्याखान पाकिस्तानचे सेनाध्यक्ष आणि लष्करी हुकूमशहा झाले (१९६६-१९७१), टिक्काखानदेखील पाकिस्तानचे सेनाध्यक्ष होते (१९७२-१९७६) आणि साहबजादा याकूब खान यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्रीपद भूषवले (१९९६-१९९७).

सर्वात वर डावीकडून: कुमारमंगलम, नरवणे, याह्याखान व याकूबखान 

पाकिस्तानचे सेनाध्यक्ष बनण्यापूर्वी १९६६ साली जेंव्हा जनरल याह्याखान दिल्ली भेटीवर आले तेंव्हा विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी तत्कालीन भारतीय सेनाध्यक्ष जनरल कुमारमंगलम हजर होते!

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री असताना जेंव्हा साहबझादा याकूब खान इटली दौऱ्यावर गेले तेंव्हा त्यांनी त्या कुटुंबाला आवर्जून भेट दिली ज्यांच्या घरी त्यांच्यासह इतर भारतीय अधिकाऱ्यांनी काही महिने आश्रय घेतला होता!

तसे पाहता, ही गोष्ट वाचून "त्यात काय मोठेसे?" असा प्रश्न काही वाचकांना पडू शकेल. तरीदेखील ही गोष्ट लिहावी असे मला का वाटले असेल?

ही गोष्ट त्या काळातली आहे जेंव्हा हे सर्व सेनाधिकारी केवळ भारतीय किंवा पाकिस्तानी, हिंदू वा मुसलमान, पठाण किंवा तामिळी नव्हते. ते फक्त एकमेकांचे मित्रच नव्हे, तर जीवाला जीव द्यायला मागे-पुढे न पाहणारे आणि एकसारखाच गणवेश घालून लढणारे सैनिक होते!

भारताच्या फाळणीने या मैत्रीभावाची, परस्परप्रेमाची आणि एकोप्याची अक्षरशः राख केली. या राखेवर वेळोवेळी फुंकर मारून त्याखालची आग धगधगत ठेवण्याचे काम सीमेच्या अल्याड-पल्याडची राजकारणी मंडळी चोख बजावत असतात. आणि त्याहूनही मोठे दुर्दैव असे की, दोन्हीकडच्या काही पिढ्या एकमेकांसंबंधी नुसत्या अनभिज्ञ राहिल्या असे नव्हे, तर त्यांना पद्धतशीरपणे एकमेकांचा द्वेष करायला शिकवले गेले आणि आजही शिकवले जाते. 

पण एक काळ असा निश्चितच होता जेंव्हा दोन्हीकडचे सैनिक खांद्याला खांदा लावून एकत्र लढले होते आणि त्यांनी आपला सैनिकधर्म जपला होता!

'ते हि नो दिवसा गतः' इतकेच आज विषण्णपणे म्हणावे लागते.

___________________________________________________________________________________

मूळ इंग्रजी लेखात नसलेली काही माहिती

१. १९७१ साली जेंव्हा भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभूत करून बांगलादेशाची निर्मिती केली तेंव्हा हेच याह्याखान पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा होते. 

२. लेखात उल्लेखलेले मेजर जनरल ए. एस. नरवणे हे सध्याचे भारतीय सेनाध्यक्ष जनरल मनोज नरवणे यांचे काका होते. जनरल मनोज नरवणे इटली भेटीवर गेले असता, मुद्दाम त्या गावी जाऊन आले जेथे त्यांचे काका व इतर अधिकारी आश्रयाला राहिले होते. 

___________________________________________________________________________

मूळ इंग्रजी लेखक : श्री. करण थापर  

स्वैर मराठी रूपांतर: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

33 comments:

  1. मस्तच.👌
    इतकेच म्हणावेसे वाटते की, हम सब कठपुतली हैं और उसकी डोर उपरवालेके हाथमें है.

    ReplyDelete
  2. श्री करण थापर यांचे वडील पणं आर्मी उच्च पदस्थ होतें (बहुदा आर्मी चीफ) आणि जनरल झिया उल हक त्यांच्या under ब्रिटिश आर्मी त होतें, असं वाचल्याचे आठवते

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. होय.
      १९६२ सालच्या युद्धात ते सेनाध्यक्ष होते.

      Delete
  3. एका काळात एकाच छत्राखाली लढणारे युद्धकैदी झाल्यावर तिथून निसटल्यावर सुरक्षित रहाण्यासाठी एकमेकांसाठी आपले जिव धोक्यात घालणारे मित्र ज्यावेळी त्यांच्यावर एकमेकावीरुद्ध रक्षणाची जबाबदारी येते तेव्राहा मैत्ष्ट्ररी विसरुन एकमेकांचे कट्टर वैरी होतात
    काळाचा महिमा अगाध आहे.

    ReplyDelete
  4. Nice one Anand. The bonds formed with Comrades at Arms are beyond compare.

    ReplyDelete
  5. Very nicely translated and quickly written.👌👌👍👍🙏🙏
    Ravindra Saraf

    ReplyDelete
  6. एकदम भारी. आपले मोठे नुकसान संधीसाधू राजकारण्यांच्या राजकारणामुळे झाले आहे हे मात्र खरे

    ReplyDelete
  7. जातीय भेदाभेद हा राजकियच असतो आम्ही रोजच्या जीवनात या गोष्टी गौण समजतो.
    माहिती थोडक्यात पन योग्य आहे.

    ReplyDelete
  8. Facts are sometimes more fabulous than fiction. Had this been shown in a hindi movie, we would have probably ridiculed it. Very nicely written 👌

    ReplyDelete
  9. Very nice sir. Appreciate style of narrating facts

    ReplyDelete
  10. Nice one ! खरोखरीच वेगळी कथा

    ReplyDelete
  11. We -in India- have always looked at some of the subjects in very unfavourable light (justifiably so isnt it). Little realizing that our own military commanders at one time wore the same uniform as they did and faced the foe together. Understandably they shared a strong sense of bonding with them. Thanks Colonel for narrating the enlightening story of how ironic turn of events can be.
    Milind Ranade

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks, Milind!
      Yes, some of these turns of events from our past have been ironic indeed!

      Delete
  12. खूप छान सत्यकथा.. आपले आभार

    ReplyDelete
  13. Very nicely written and translated. काळाचा महिमा अगाध आहे. एकमेकाला वाचविणारे मित्र वरिष्ठपदी एकमेका विरुद्ध लढले.स्वार्थी राजकारणी फाळणीला कारणीभूत ठरले आणि फालतू ambitions, तसेच धार्मिक interference मुळे; दोन्ही देशात दुष्मनी व कटुता जोपासली.

    ReplyDelete
  14. अतिशय उद्बोधक अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आनंद.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद विश्वास! 🙂🙏

      Delete