Sunday, 5 December 2021

१९७१ ची पहिली हवाई चकमक

[या चकमकीत सहभागी असलेले (तत्कालीन फ्लाइंग ऑफिसर) विंग कमांडर सुनीत स्वारेस (सेवानिवृत्त) यांनी स्वतः दिलेल्या माहितीवर हा लेख आधारित आहे. (तत्कालीन फ्लाईट लेफ्टनंट) दिवंगत स्क्वाड्रन लीडर एम.ए. गणपती स्वतःच ही गोष्ट सांगत आहेत अशी कल्पना करून हा लेख लिहिलेला आहे.]

डावीकडून: रॉय, बागची, 'सू', 'डॉन' आणि मी (गणपती)

२२ नोव्हेंबर १९७१. कलकत्त्याच्या दमदम विमानतळावर गेल्या काही महिन्यांपासून आमची तुकडी तैनात होती. हवाई हल्ल्यापासून कलकत्ता शहराचा बचाव करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवलेली होती आणि ते एक अतिशय उबग आणणारे काम होते. 

मुळात या शहरावर हल्ला करायला कोण आणि कशासाठी आले असते? निरपराध नागरिकांवर हल्ले करून कोणाही शत्रूला, सामरिकदृष्ट्या काय साध्य होणार होते?

आधीच, पूर्व पाकिस्तानच्या नागरिकांवर, म्हणजे स्वतःच्याच देशवासीयांवर, अनन्वित अत्याचार करून, पाकिस्तानच्या लष्करी सत्ताधाऱ्यांनी देशविदेशात आपली भरपूर नाचक्की करून घेतलेली होती. 

पाकिस्तानचा लष्करी हुकूमशहा जनरल याह्याखान हा दारूबाज आणि स्त्रीलंपट मनुष्य होता. पण भारताच्या एका प्रमुख शहरावर हल्ला करून, प्रसारमाध्यमांद्वारे जगभरात स्वतःची आणखी छी:थू करून घेण्याइतकाही तो मूर्ख नव्हता. 

अशा परिस्थितीत आम्ही कलकत्त्यात उगाचच बसून होतो. ज्या युद्धाच्या पोकळ धमक्या गेले अनेक महिने याह्याखान देत होता, ते युद्ध प्रत्यक्षात झाल्याशिवाय मर्दुमकी गाजवायची संधी आम्हाला मिळणार नव्हती. मी युद्धासाठी तन-मनाने सज्ज झालो होतो आणि माझे नॅट विमान घेऊन आकाशात झेपावयाला माझे हात-पाय अक्षरशः शिवशिवत होते. पण सध्या तरी नुसते बसून राहण्याशिवाय नशीबात काही वेगळे दिसत नव्हते. 

१९६५ च्या युद्धातही पूर्वेकडच्या पाक सीमेवर फारसे काहीच घडले नव्हते. आताही तसेच होणार की काय अशी भीती आम्हा सर्वांना वाटत होती. 

त्या दिवशी दुपारी एक वाजता मी ओ.आर.पी. (Operational Readiness Platform) ड्यूटीकरिता विमानतळावर पोहोचलो. माझ्यासोबत फ्लाईट लेफ्टनंट रॉय अँड्रयू मॅसी, फ्लाइंग ऑफिसर डोनाल्ड उर्फ 'डॉन' लाझारस, आणि फ्लाइंग ऑफिसर सुनीत उर्फ 'सू' स्वारेस हे तिघेही होते. 

आजच्या ठरलेल्या व्यूहरचनेप्रमाणे, उड्डाणादरम्यान मी व रॉय आमची दोन विमाने घेऊन सर्वात पुढे म्हणजे 'लीडर' असणार होतो. 'डॉन' आणि 'सू' हे दोघे फ्लाइंग ऑफिसर्स त्यांची विमाने आमच्या दोन्ही बाजूंना ठेवून, म्हणजे आमचे 'विंगमॅन' असणार होते. 

आज सकाळच्या शिफ्टमध्ये आमचे कमांडिंग ऑफिसर आणि इतर तिघा वैमानिकांनी दोन वेळा 'स्क्रॅम्बल' (scramble) ची कारवाई करीत, पाकिस्तानी लढाऊ विमानांचा पाठलाग केला होता. पण पूर्व पाकिस्तानातील बोयरा गावाजवळील सीमेपर्यंत आपली विमाने पोहोचण्यापूर्वीच पाकिस्तानी विमानांनी तिथून पळ काढल्याने 'शिकार' हातातून निसटली होती. 

ड्यूटीवर पोहोचताच आम्ही आपापली विमाने पूर्णतः सज्ज असल्याची खात्री केली, आणीबाणीच्या प्रसंगी विमानातून सुखरूप बाहेर पडण्याकरिता असलेल्या Ejection Seat चे पट्टे तपासले, विमानाच्या तंत्रज्ञांसोबत दोन-चार मिनिटे गप्पा मारल्या आणि ऑफिस व विश्रांतीची जागा असा दुहेरी उपयोग असलेल्या तंबूत येऊन विसावलो.

फ्लाईट लेफ्टनंट के.बी. बागची आमचा फायटर कंट्रोलर होता. आमची दूरसंचार यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करून झाल्यावर त्याने आमच्या तंबूमध्ये फोन केला. 

मी फोन उचलत म्हटले, "फ्लाईट लेफ्टनंट गणपती..."

"गुड आफ्टरनून, 'गणा' सर, मी बागची बोलतोय"

"हॅलो केबी, काही गडबड?"

"नाही सर. सकाळी दोन 'स्क्रॅम्बल' झाले. पण आपली विमाने पोहोचेपर्यंत पाकिस्तानी सेबर्स पसार झाली होती."

"वाटल्यास तू आम्हाला स्टॅण्डबाय २  (Standby 2) वर ठेव." मी म्हणालो. 

"ठीक आहे सर. मी योग्य वेळी सांगेन."

सहसा आम्ही स्टॅण्डबाय ५ (Standby 5) वर असायचो. म्हणजेच, फायटर कंट्रोलरकडून इशारा मिळताच आम्ही तडक आमच्या विमानाकडे पळत सुटायचो, आणि इंजिन सुरु करून पाच मिनिटाच्या आत उड्डाण करायचो. 

शत्रूकडून सीमेपार काही संशयास्पद हालचाली होत असल्याची खबर मिळाल्यास फायटर कंट्रोलर आम्हाला अधिक सज्ज स्थितीत, म्हणजे स्टॅण्डबाय २ वर ठेवीत असे. त्या वेळी आम्ही पट्टे बांधून, आमच्या नॅट विमानांच्या सीटवरच बसून राहायचो, ज्यायोगे दोन मिनिटांच्या आत उड्डाण करणे शक्य होई. 

ऐन हिवाळ्यातही कलकत्त्याच्या धावपट्टीवर असलेले उष्ण तापमान आणि अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हात स्टॅण्डबाय २ चा पर्याय निश्चितच सुखावह नव्हता.

तसे पाहता, आज काही पराक्रम गाजवायला मिळायची शक्यता धूसर होती, कारण सकाळीच पाकिस्तानी सेबर्सनी दोन 'स्वीप' केलेले होते. परंतु, काहीतरी घडेल या आशेवर, आम्ही स्टॅण्डबाय २ वर राहून,  स्वतःला उन्हात भाजून घ्यायलाही तयार होतो. 

आम्ही आधी रेडिओवर बातम्या ऐकल्या. मग, थोडा वेळ एकमेकांसोबत गप्पा छाटल्या. त्यानंतर मात्र मी पंख्याच्या झोतात माझ्या कॅम्प कॉटवर पहुडलो आणि घरी पत्र लिहू लागलो. 'डॉन' आणि 'सू' स्क्रॅबल खेळत बसले आणि रॉय वाचनात गढून गेला. 

अचानक सायरन वाजू लागला आणि बागचीचा आवाज लाऊडस्पीकरवर कडाडला, "स्क्रॅम्बल, स्क्रॅम्बल, स्क्रॅम्बल"

लाऊडस्पीकरवर बागची देत असलेल्या सविस्तर सूचना ऐकत-ऐकतच आम्ही आमच्या नॅट विमानांकडे धाव घेतली. 

"कॉकटेल फॉर्मेशन, तीस अंशाच्या दिशेने एक हजार फुटांची उंची त्वरित गाठा, आणि विमानांचा वेग जास्तीत जास्त ठेवा."

नॅट विमानाचे इंजिन अक्षरशः क्षणार्धात सुरू होते. इतके, की आम्ही डोक्यावर हेल्मेट चढवून कॉकपिटचे झाकण बंद करेस्तोवर विमान उड्डाण करायला तयार असते. 

आम्ही रनवेवर पोहोचायच्या आतच डमडम विमानतळाच्या ATC (Air  traffic Control) म्हणजेच हवाई नियंत्रण कक्षातून आम्हाला रेडिओ संदेश मिळाला. "कॉकटेल फॉर्मेशन, क्लियर्ड फॉर टेकऑफ, ऑल फोर एयरक्राफ्ट्स."

सुदैवाने त्या क्षणी कोणतेही प्रवासी विमान उड्डाणाच्या किंवा उतरण्याच्या तयारीत नसल्याने आमच्यासाठी रनवे मोकळा होता. 

रेडिओवर कोणतेही उत्तर देण्याच्या फंदात न पडता, कॉकटेल फॉर्मेशनमधल्या आम्ही चौघांनी उड्डाण करण्यासाठी वेग घेतला.

आमची विमाने हवेवर स्वार होताच आम्ही चाके विमानांच्या पोटात घेतली, आणि ईशान्येकडे निघालो. काही क्षणातच आम्ही एक हजार फुटांची उंची गाठली आणि ५०० नॉट म्हणजेच, ताशी ९०० किलोमीटर वेगाने बोयराच्या दिशेने झेपावलो.

केवळ नकाशा आणि जायरोस्कोपिक होकायंत्रावरच अवलंबून असल्याने, जमिनीवरच्या सर्व खाणाखुणा आम्ही आमच्या मेंदूत अक्षरशः कोरून ठेवल्या होत्या. कारण, अत्यंत वेगवान फायटर विमानाच्या कॉकपिटमध्ये नकाशा पाहत बसण्याची उसंत मिळणे अशक्यच असते. 

शत्रूला आमचा सुगावा लागू न देण्यासाठी त्याच्या रडारच्या कक्षेपेक्षा खालच्या उंचीवर उडत जाणे आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. त्याचा एक फायदा असाही होता की त्या उंचीवर धुके असल्याने, आमच्यापेक्षा अधिक उंचीवर असलेल्या शत्रूच्या विमानांना आम्ही पाहू शकलो असतो, पण त्यांना आम्ही दिसणे मात्र अवघड होते. 

काही मिनिटातच आम्ही पूर्व पाकिस्तानातील बोयरा गावाजवळ पोहोचलो. भारत-पाक सीमेवर वाहणाऱ्या नदीच्या तीरावर, घोड्याच्या नालेसारख्या आकाराच्या एका बेचक्यात बोयरा हे गाव वसलेले असल्याने, विमानातूनही ते अगदी सहज ओळखता येत असे.

अचानक आमच्या रेडिओवर बागचीचा आवाज ऐकू आला, "उजवीकडे दोनच्या दिशेला, चार मैलावर घुसखोर विमान... "

घड्याळातील आकड्यांच्या आधारे दिशा दाखवण्याची पद्धत सैन्यदलांमध्ये सर्रास वापरली जाते. नाकासमोर घड्याळातील १२ चा आकडा असल्याची कल्पना केल्यास, आमच्या उजव्या हाताला, २ या आकड्याच्या दिशेला आमच्यापासून चार मैलांवर शत्रूचे घुसखोर विमान असल्याचे रडारवर पाहून, त्याची सूचना बागचीने आम्हाला रेडिओवर दिली होती. 

'डॉन' आणि मी, आमच्या चार विमानांच्या फॉर्मेशनमध्ये सर्वात उजवीकडे उडत असल्याने आम्ही शत्रूच्या अधिक जवळ होतो. 'सू' जरी डाव्या बाजूने उडत असला तरी अचूक 'स्पॉटिंग' करण्यात त्याचा हातखंडा होता. फॉर्मेशनमध्ये आपल्या 'लीडर'च्या विमानासोबत स्वतःचे विमान उडवत असताना, एकीकडे संपूर्ण आकाशावर नजर ठेवत शत्रूचे विमान शोधण्याच्या कौशल्याला 'स्पॉटिंग' असे म्हणतात. 

आमच्या अपेक्षेप्रमाणेच 'सू'चा आवाज रेडिओवर खणाणला, "कॉन्टॅक्ट." 

म्हणजेच शत्रूचे विमान त्याला दिसले होते. आम्हा सर्वानाही ते दिसावे म्हणून, ते विमान कोणत्या दिशेने व कसे उडत आहे याचे धावते वर्णन 'सू' करू लागला.

"कोणते विमान आहे?" फ्लाईट लेफ्टनंट बागचीने विचारले. 

त्या विमानाच्या दिशेने आपले विमान वळवीतच रॉयने उत्तर दिले, "सेबर."

रॉयचे विमान आपल्या दिशेने वळल्याचे दिसताच, स्वतःचा बचाव करण्यासाठी शत्रूच्या पायलटने त्याचे विमान अतिशय वेगाने वळवले. 

त्या विमानाला आपल्या टप्प्यात ठेवत, रॉय आणि 'सू' या दोघांनीही आपापली विमाने त्याच्या दिशेने वळवली आणि त्याचा पाठलाग सुरु केला. 

आपले विमान रॉयच्या विमानाच्या जोडीने उडवत असतानाच, आकाशावर नजर ठेवण्याचे आणि काही दिसल्यास त्वरित त्याची खबर देण्याचे काम 'सू' चोख बजावत होता. तो रेडिओवर ओरडला, "आणखी एक सेबर, ७ च्या दिशेला..."

हे ऐकताच मी व 'डॉन'ने आपापली विमाने त्यांच्या दिशेने वळवली. मी वाचलेल्या काही इंटेलिजन्स रिपोर्टमधली माहिती मला आठवली. काही सेबर विमानामध्ये अमेरिकेची 'साईडवाईन्डर' मिसाईल बसवलेली होती, जी आमच्या विमानातील बंदुकांपेक्षा दूरपर्यंत सहजपणे मारा करू शकत होती.

रॉय आणि 'सू' ज्या विमानाचा पाठलाग करीत होते ते सेबर तर मला दिसलेच पण त्यांच्या पिछाडीवर अचानक आलेले, आणि त्यांच्यावर क्षेपणास्त्राचा मारा करण्यासाठी सज्ज होत असलेले ते दुसरे पाकिस्तानी सेबर विमानही मी पाहिले. 

रेडिओवर "कॉन्टॅक्ट" असे ओरडतच मी त्या दुसऱ्या सेबरवर नेम धरला. मी मारलेल्या गोळ्या त्या सेबरला लागून त्याच्या पंखातून धूर येऊ लागल्याचे दिसताच मी आमचा ठरलेला कोडवर्ड रेडिओवर जाहीर केला, "मर्डर, मर्डर!"

आमच्या विमानांखाली असलेल्या धुक्यातून तिसरे एक सेबर विमान अनपेक्षितपणे वर आले. 'डॉन'च्या विमानापासून ते फक्त १५ मीटरवर होते. पण, त्या धक्क्यातून 'डॉन' निमिषार्धात सावरला आणि त्याने त्या सेबरवर आपल्या विमानाच्या बंदुकीचा मारा केला. 

दरम्यान, रॉय ज्या सेबरचा पाठलाग करीत होता ते वेगाने खाली सूर मारीत ढाक्याच्या दिशेने निघाले होते. पण, रॉयने आपल्या विमानाच्या बंदुकीने त्याचाही वेध घेतला. 

या सर्व घडामोडी केवळ तीन मिनिटात घडल्या होत्या!

मी व 'डॉन'ने टिपलेली दोन्ही सेबर विमाने तिथल्यातिथे कोसळली. त्यांच्या वैमानिकांनी ऐनवेळी पॅराशूटच्या सहाय्याने उड्या मारल्या, पण जमिनीवर पोहोचताच त्यांना युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले गेल्याचे आम्हाला नंतर समजले. रॉयने ज्या विमानाचा वेध घेतला होता त्याचे नुकसान झाले होते, पण ते मात्र ढाक्यापर्यंत परत पोहोचण्यात यशस्वी झाले असे नंतर कळाले.

अशा प्रकारे, पाकिस्तानची तिन्ही सेबर विमाने निकामी करण्यात आम्ही यशस्वी ठरलो होतो, आमच्या विमानांची काहीही हानी होऊ न देता!

प्रत्यक्ष युद्धाची घोषणादेखील होण्याआधीच, ही पहिली हवाई चकमक भारताने जिंकली होती!

डमडम विमानतळावर उतरण्याआधी माझे विमान स्वतःभोवतीच गोलगोल फिरवीत 'Victory Roll' करण्याचा मोह मला अजिबात आवरता आला नाही. 

माझी ती हवाई कसरत बघून विस्मयचकित झालेला ATC कंट्रोलर रेडिओवर कसेबसे इतकेच म्हणू शकला, "Maintain  discipline!"  

मोठ्याने हसत-हसतच मी माझे विमान उतरवले. पाठोपाठ रॉय, 'डॉन' आणि 'सू' देखील येऊन पोहोचले. 

आमच्या पराक्रमाची खबर आमच्या तंत्रज्ञांना आणि स्क्वाड्रनमधील सर्वांनाच समजली होती. रँक किंवा सिनियॉरिटी, या कशाचीच तमा न बाळगता, त्यांनी आम्हाला अक्षरशः आपल्या खांद्यांवर उचलूनच कॉकपिटमधून बाहेर काढले!

आपण एखाद्या कामासाठी सदैव सज्ज राहतो, विजयासाठी मनोमन प्रार्थनाही करीत असतो. पण संधी कधीतरी अचानकच दरवाजा ठोठावते. काही क्षणांसाठीच जेंव्हा ती येते, तेंव्हा तिला फक्त दोन्ही हातांनी कवटाळायचे असते, आणि विजयाची नशा अनुभवायची असते, बस्स !

या संपूर्ण कामगिरीबद्दल आमच्यावर पदकांचा वर्षाव झाला. आमचा फायटर कंट्रोलर, फ्लाइंग ऑफिसर बागचीला वायुसेना पदक मिळाले. रॉय, 'डॉन', आणि मी, आम्ही तिघेही वीरचक्राचे मानकरी ठरलो. आमच्या कमांडिंग ऑफिसरना विशिष्ट सेवा पदक देण्यात आले. 

फ्लाइंग ऑफिसर सुनीत उर्फ 'सू' स्वारेस, ज्याच्या तीक्ष्ण नजरेने शत्रूची विमाने सर्वप्रथम पाहिली होती, आणि ज्याने आम्हाला सुखरूपपणे त्या तिन्ही विमानांचा वेध घेण्यासाठी दिशा दाखवली होती, त्याला स्वतःला मात्र शिकार करण्यासाठी शत्रूचे कोणतेच सावज उरले नव्हते! केवळ त्यामुळेच त्या तरुण आणि शूर फ्लाइंग ऑफिसरला कोणतेही पदक मिळाले नाही. पण आमच्यासाठी मात्र तो सदैव हिरोच राहिला. 

आम्हाला नंतर समजले की, त्या दिवशी ढाका विमानतळाहून एकूण चार सेबर विमाने निघाली होती. पण एका विमानाचा रेडिओ निकामी झाल्यामुळे ते परत फिरले होते. 

ते विमान जर आले असते तर कदाचित ते 'सू'च्या बंदुकीचा बळी झाले असते!

किंवा कोण जाणे, कदाचित त्या चौथ्या सेबरने माझाच वेध घेतला असता!

म्हणतात ना, जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान नेहमीच दैव नावाची एक अदृश्य, अमूर्त शक्ती कार्यरत असते!


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने)

32 comments:

  1. मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन कर्तव्य निभवल्याचा आनंद तुम्ही सुंदर शब्दात वर्णन केला आहे.
    मला वाटत होते की मीच विमान चालवत होते😊😊😊

    ReplyDelete
  2. अक्षरशः खूप खूप ओघवती भाषा. प्रत्यक्ष आपणच या परिस्थितीत आहोत असा अनुभव देणारे वर्णन.सैनिकांच्या मन:स्थितीचे अचूक वर्णन.

    ReplyDelete
  3. चित्तथरारक. अभिमान वाटतो भारतीय सैन्यदलाचा. धन्यवाद. लिहीत / अनुवादित रहा.

    ReplyDelete
  4. अगदी रोमहर्षक. आपल्या ओघावत्या भाषेमुळे खरोकर युद्ध चालू असल्याचा भास झालं. पाकड्याना सर्व बाजूनी ठोकून काढलेले वर्णन म्हणजे जबरदस्त. जय हिंद

    ReplyDelete
  5. रोमहर्षक आणि थरारक वर्णन. वाचनासाठीचा एक सुंदर अनुभव. अधिकृतपणे युद्ध सुरु व्हायच्या आधीची ही घटना असल्याने या घटनेस ऐतिहासिक मुल्य सुद्धा आहे.

    ReplyDelete
  6. Excellent write up and worth reading sir

    ReplyDelete
  7. Superb experience jotted. Proud of Indian Forces.

    ReplyDelete
  8. थरारक आणि तेवढेच अभिमानास्पद

    ReplyDelete
  9. Wah Wah Wah kya Baat hai, what a Narration

    ReplyDelete
  10. छान लेख, रोमहर्षक.

    ReplyDelete
  11. Very well written.. Nice reading

    ReplyDelete
  12. बापट साहेब आपले लिखाण उत्कंठावर्धक आहे. धावते वर्णन / समालोचन फारच सुंदर केले आहे.
    आपल्याला शत्रुपक्षावर कुरघोडी करुन जेव्हा वीरश्री मिळते तो आनंद अवर्णनीय असतो. खूप छान!

    ReplyDelete
  13. जागेवर खिळवून ठेवणारे चित्रण…!!!

    ReplyDelete
  14. आपले लिखाण खूपच प्रभावी आहे.
    ...रविंद्र सराफ

    ReplyDelete
  15. Thrilled to hear from horse’s mouth

    ReplyDelete