Monday, 6 December 2021

१९७१: अखेर युद्धाला तोंड फुटले...

पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा व राष्ट्रपती, जनरल अयूबखान, यांनी एकदा गर्वोक्ती केली होती की, "ज्यांना भाषेचे शस्त्र पुरेसे नसेल, त्यांच्यावर आम्ही शस्त्रांची भाषा वापरू!" 

१९६९ साली जनरल याह्याखान यांनी अयुबखान यांना पदच्युत करून देशाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या हुकूमशाहीविरुद्ध पूर्व पाकिस्तानी लोकांनी बंड पुकारताच, याह्याखानांनी सोयिस्करपणे गृहीत धरले की या बंडाच्या मागे भारताचाच हात आहे. त्यांनी अयूबखानांचे ते मग्रूरीचे शब्द स्वतःच्याच, पूर्व पाकिस्तानातील देशवासियांविरुद्ध प्रत्यक्षात आणायला  सुरुवात केली. 

मार्च १९७१ मध्ये, पाकिस्तानी सैन्याने जेंव्हा पूर्व पाकिस्तानात दडपशाही सुरु केली तेंव्हाच भारतीय राज्यकर्त्यांना आणि सैन्यप्रमुखांना हे कळून चुकले होते की पाकिस्तानसोबत आणखी एक युद्ध आता अटळ आहे. पाकिस्तानी सैन्याने जनतेचा विश्वास आणि पाठिंबा संपादन करण्यासाठी, खोटाच प्रचार सुरू केला की पाकिस्तानी सैन्य अजिंक्य आहे. वस्तुस्थिती वेगळीच असली तरी या अपप्रचारामुळे, पाकिस्तानी जनताच नव्हे, तर स्वतः राज्यकर्तेही त्याच भ्रमात बोलू-वागू लागले. 

जसजशी पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती अधिकाधिक चिघळू लागली, तसे याह्याखान वरचेवर भारताविरुद्ध चिथावणीची भाषा करू लागले. जुलैमध्ये आणि नंतर  सप्टेंबरमध्ये त्यांनी तसे वक्तव्य जाहीरपणेच केले होते.

भारतीय गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरू केलेली होती. आपल्याच नागरिकांवर आपलेच सैन्य करीत असलेले अत्याचार पाहून वैतागलेले आणि पूर्व पाकिस्तानातच तैनात असलेले कित्येक बंगाली सैनिक पाक सैन्यातून पळून बंगाली मुक्तियोद्धयांना येऊन मिळाले होते. त्यांच्याकडून भारतीय गुप्तचर विभागाला माहितीचा खजिनाच उपलब्ध झाला होता.

पूर्व आणि पश्चिमेकडील भारत-पाक सीमांवर सुरु झालेल्या पाकिस्तानी हवाईदलाच्या वाढत्या हालचाली आपली रडार यंत्रणादेखील टिपत होती. नोव्हेंबर १९७१ पर्यंत पाकिस्तानी हवाईदल खूपच सक्रिय झाले आणि वरचेवर सीमेचे उल्लंघन करू लागले. 

जेंव्हा राजनैतिक स्तरावरच्या सविनय विनंत्यांना पाकिस्तान जुमानत नाही असे लक्षात आले, तेंव्हा मात्र त्यांच्या 'अरे'ला 'कारे' करण्याची मुभा भारतीय सैन्यदलांना दिली गेली.

२२ नोव्हेंबर १९७१ रोजी भारतीय वायुदलाने पाकिस्तानला दिलेले प्रत्त्युत्तर किती चोख होते हे आपण यापूर्वीच्या लेखात वाचलेच आहे. [१९७१ ची पहिली हवाई चकमक]

त्या चकमकीचा परिणाम असा झाला की जनरल याह्याखान यांनी जाहीरच करून टाकले की दहा दिवसांच्या आत पाकिस्तान भारतावर हल्ला करेल. आणि त्यांनी आपले वचन पाळले!

आपली तिन्ही सैन्यदले संपूर्णपणे सज्ज होती. भारतीय वायुसेना तर जणू ३ डिसेंबरच्या संध्याकाळी आपल्या हवाईतळांवर होऊ घातलेल्या पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याची वाटच पाहत होती !

१९६७ साली झालेल्या अरब-इस्रायली युद्धामध्ये, इस्राएलच्या हवाईदलाने अचानक हल्ला करून, इस्राएलला नेस्तनाबूत करण्याच्या तयारीत असलेली जवळ-जवळ सर्वच्यासर्व अरब लढाऊ विमाने उभ्या जागी नष्ट केली होती. त्या युद्धाची खडानखडा माहिती पाकिस्तानी हवाईप्रमुखांकडे होती, कारण आंतरराष्ट्रीय संकेतांना धुडकारून, काही पाकिस्तानी वायुसैनिकांनी अरब देशांतर्फे त्या युद्धात भाग घेतलेला होता! 

अगदी तस्साच धडा भारताला शिकवण्याची स्वप्ने पाकिस्तान पाहत होता!

पण भारतीय वायुदल म्हणजे काही दूधखुळ्यांची फौज नव्हती. अरब-इस्राएल युद्धामधून भारतानेही काही धडे घेतले असू शकतील, ही शक्यता पाकिस्तानने कदाचित विचारातही घेतली नसावी!

आम्ही भारतीय वायुसैनिक नेहमीच असे म्हणतो की, "दुसऱ्यांच्या चुकांमधून जेवढे शिकता येईल तेवढे शिकून घ्या. कारण, स्वतःच्या चुकांमधून शिकून शहाणे होण्याइतके आयुष्य कदाचित तुम्हाला मिळणारच नाही!"

ते जीवनसूत्र भारतीय वायुसेनेने तंतोतंत पाळले होते.

१९६५ च्या युद्धानंतर भारताने सीमावर्ती क्षेत्रात अनेक नवीन हवाईतळ तयार केले होते,  तसेच काही 'Blast Pens' देखील बनवले होते. ब्लास्ट पेन म्हणजे काँक्रीट वापरून बनवलेल्या अतिशय कणखर शेड असतात, ज्यामध्ये विमाने उभी करून त्यांची दुरुस्ती, देखभाल करता येते किंवा त्यामध्ये बॉम्ब लोड करता येतात. अर्थातच, ब्लास्ट पेनमध्ये असलेली विमाने शत्रूच्या बॉम्बवर्षावापासून बऱ्यापैकी सुरक्षित राहू शकतात.

आपल्याला अपेक्षित असलेला पाकिस्तानी हवाई हल्ला ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी झाला. प्रत्यक्ष युद्धघोषणा करण्यापूर्वीच भारतीय वायुसेनेला गारद करण्याकरिता केलेली ती खेळी होती. 

केवळ पाच मिनिटांच्या अवधीमध्ये पाकिस्तानने एकाचवेळी सात भारतीय हवाईतळांवर हल्ला चढवला. आग्रा, अंबाला, श्रीनगर, अवंतीपूर, जोधपूर, पठाणकोट, आणि उत्तरलाई या तळांबरोबरच पश्चिम सीमेवरच्या एका विमानवेधी रडार यंत्रणेलादेखील त्यांनी लक्ष्य केले होते.

आश्चर्य म्हणजे पाकिस्तानने भारताच्या पूर्व सीमेवर एकही हल्ला केला नाही. प्रत्यक्ष युद्धामध्ये हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आपली संसाधने जपून ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता, की 'सेबरचे कर्दनकाळ' ठरलेल्या भारतीय नॅट विमानांनी २२ नोव्हेंबरला जो तडाखा दिला होता त्यामुळे पाक घाबरला असावा, ते निश्चित सांगता येणार नाही.

पाकची खेळी यशस्वी ठरली का? पाहू या...

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका हिंदी सिनेमात दाखवल्याप्रमाणे भारतीय विमाने, पाकिस्तानची आयती शिकार होण्याकरिता, बुजगावण्यांसारखी धावपट्टीवर उभी करून निश्चितच ठेवलेली नव्हती! [वाचा: 'भुज- न भूतो न भविष्यति]

हवाईतळांवर दूर -दूर विखुरलेल्या ब्लास्ट पेन्समध्ये भारतीय लढाऊ विमाने सुखरूप होती. मोठी बॉम्बर विमाने आणि मालवाहू विमाने तर, पाक हवाईदल पोहोचूही शकणार नाही अशा ठिकाणी, म्हणजे सीमेपासून दूरवरच्या तळांवर आधीच हलवलेली होती. 

पाक हवाई हल्ले भारतीय हवाईदलाचे कितीसे नुकसान करू शकले ?

फारसे नाही. कारण, पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांनंतर काही तासांच्या आतच भारतीय हवाईदल पाकला चोख प्रत्त्युत्तर देऊ शकले होते. आपली विमाने त्याच रात्री साडेदहापासून ते मध्यरात्रीपर्यंत पाक हवाईतळांवर मारा करीत होती. 

प्रत्त्युत्तर द्यायला भारताला इतका वेळ का लागला?

आपली बॉम्बर विमाने दूरवरच्या हवाईतळांवर होती. तेथून त्यांना सीमेलगतच्या तळांवर हलवून, त्यात पुन्हा इंधन व दारुगोळा भरल्यानंतरच ती कामगिरीवर जाऊ शकणार होती. शक्तिशाली बॉम्बच्या प्रचंड विस्फोटक क्षमतेमुळे ते बॉम्ब विमानांमध्ये लोड करण्याचे काम मोठेच जिकीरीचे आणि वेळखाऊ असते. शिवाय, युद्धजन्य स्थितीत, सर्वत्र  'ब्लॅकआउट' असल्याने, तंत्रज्ञ व वायुसैनिक ते काम संपूर्ण काळोखामध्ये करीत होते.

४ डिसेंबरच्या पहाटे, ऐन हिवाळ्यातल्या दाट धुक्यामध्येसुद्धा आपल्या सुखॉई, मिग, मारूत, आणि हंटरसारख्या  फायटर विमानांसह कॅनबेरा विमानांनीही पाकिस्तानवर कडवा प्रतिहल्ला चढवला. जमिनीवरून होत असलेल्या शत्रूच्या गोळीबारामुळे आपल्या काही विमानांचे नुकसान झाले, पण तरीही, प्रतिहल्ल्यांची आपली कारवाई चार तारखेच्या दिवसभर सुरूच राहिली. 

ज्या युद्धाच्या धमक्या गेले अनेक महिने जनरल याह्याखान देत होता, ते युद्ध अखेर औपचारिकपणे सुरु झाले.

या युद्धातील लढाया कशाकशा होत गेल्या, हे पुढच्या भागांमध्ये पाहू या...


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने)


7 comments: