Sunday 20 February 2022

१९४२: एका 'असीम' मैत्रीची कथा

व्हॉट्सअप हे एक विलक्षण माध्यम आहे. त्यावर कधी-कधी अशी काही माहिती मिळून जाते ज्याबद्दल आपण कधी स्वप्नातही विचार केलेला नसतो. गेल्या आठवड्यात माझं काहीसं तसंच झालं. 

ही गोष्ट एका वेगळ्याच काळातली नव्हे, तर एखाद्या निराळ्याच विश्वातली वाटावी अशी आहे. मला मिळालेली माहिती दोन-दोनदा तपासून, खात्री केल्यानंतरच मी ती सत्यकथा लिहिण्याचा निर्णय घेतला. ती वाचून झाल्यावर वाचकांच्या चेहऱ्यावर, कदाचित थोडी विषादाची किनार असलेल्या, पण निर्मळ अशा स्मितहास्याची एक लकेर उत्स्फूर्तपणे उमटेल अशी अशा मला आहे.

१९४२ साली, उत्तर आफ्रिकेतील गझालाच्या युद्धभूमीवर, फील्ड मार्शल एर्विन रोमेलच्या जर्मन फौजांनी दोस्त राष्ट्रांतर्फे लढणाऱ्या ब्रिटिश सेनेच्या 'तिसऱ्या भारतीय मोटर ब्रिगेड' या तुकडीचा पराभव केला. एकूण १७ भारतीय अधिकाऱ्यांना जर्मनांनी कैद केले आणि इटलीच्या अव्हर्सा शहरातील युद्धकैदी शिबिरात डांबले. ते सर्व अधिकारी तत्कालीन भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातले, निरनिराळ्या वंशाचे आणि भिन्न धर्मांचे होते. 

त्या युद्धकैद्यांपैकी काही नावे अशी होती ... 

मेजर पी. पी. कुमारमंगलम, कॅप्टन आगा मुहम्मद याह्याखान, कॅप्टन ए. एस. नरवणे, लेफ्टनंट टिक्काखान, आणि लेफ्टनंट साहबझादा याकूब खान.

तत्कालीन कॅप्टन ए. एस. नरवणे पुढे मेजर जनरल पदावरून १९७०च्या दशकात निवृत्त झाले. त्यांनी "A Soldier's Life in War and Peace" या आपल्या पुस्तकात, अव्हर्साच्या  युद्धकैदी शिबिरातील आठवणी नमूद करून ठेवल्या आहेत. त्यातील संदर्भानुसार, युद्धकैदी अधिकाऱ्यांपैकी मेजर कुमारमंगलम हे सर्वात वरिष्ठ असल्याने त्यांना कॅम्प प्रमुख नेमले गेले होते. कॅप्टन याह्याखान हे कॅम्प अडज्युटन्ट होते, तर लेफ्टनंट टिक्काखान हे कॅम्प क्वार्टरमास्टरचे काम पाहत होते. 

वर नमूद केलेली थोडीशीच माहिती मला व्हॉट्सअपवर मिळाली होती. परंतु, जर्मनांच्या कैदेत असलेल्या या भारतीय अधिकाऱ्यांचे पुढे काय झाले याचा मागोवा मला घ्यावासा वाटला. पाकिस्तानी सेनेचे मेजर जनरल सय्यद अली हमीद यांनी लिहिलेले एक वृत्त 'फ्रायडे टाइम्स' नावाच्या पाकिस्तानमधील साप्ताहिकात फेब्रुवारी २०१९मध्ये प्रसिद्ध झाले होते. मी त्या वृत्ताचाही अभ्यास केला. त्यातून जी कथा समोर आली ती अशी...  

१९४३ साली युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने फिरले. मुसोलिनीच्या अधिपत्याखाली जर्मनीला साथ देणाऱ्या इटलीचा पाडाव झाला. तेथे चाललेल्या धुमश्चक्रीचा फायदा उठवत, कुमारमंगलम, याह्याखान, याकूबखान आणि इतर अधिकारी कैदेतून पळून जाण्यात यशस्वी झाले. जर्मन गस्ती तुकड्यांच्या हाती सापडू नये यासाठी, इटलीचा समुद्रकिनारा आणि अपेनाइन पर्वतराजी यादरम्यानच्या भागात बरेच दिवस ते अक्षरशः रानोमाळ पायी भटकत राहिले. लेफ्टनंट याकूबखानला इटालियन भाषा अवगत असल्याने, काही स्थानिक शेतकऱ्यांच्या वस्तीवर त्यांना आसरा मिळवता आला. 

काही दिवसांनंतर कॅप्टन याह्याखानची मात्र इतरांपासून ताटातूट झाली. जवळजवळ ४०० किलोमीटर पायी भटकल्यानंतर, अखेर सुदैवाने तो एका भारतीय पलटणीजवळ पोहोचला. मात्र त्यावेळी त्याच्या फक्त एकाच पायातला बूट शाबूत होता!

दरम्यान, मेजर कुमारमंगलम, लेफ्टनंट याकूब खान आणि इतर अधिकारी त्या शेतकऱ्यांच्या वस्त्यांवर काही महिने लपून राहू शकले. तेथून निघण्याचा निर्णय त्यांनी घेतला तेंव्हा मेजर कुमारमंगलम यांच्यावर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केलेल्या एका इटालियन माउलीने स्वतःच्या गळ्यात घातलेला कंठा कुमारमंगलम यांना भेट दिला - वर 'इडापिडा टळो' असा भरघोस आशीर्वादही दिला! 

पण विधिलिखितच असे होते की, ते शुभचिन्ह आणि त्या माउलीचे आशीर्वाद मेजर कुमारमंगलमना फळणार नव्हते!

एका काळोख्या रात्री चालत असताना, अचानक पाय घसरून पडल्याने, कुमारमंगलम यांच्या पायाचा घोटा फ्रॅक्चर झाला. त्यांनी लेफ्टनंट याकूबखानला पदोपदी सांगितले की, "तू मला इथेच सोडून पळून जा, माझे मी बघेन". पण याकूब खानाने त्यांचे अजिबात ऐकले नाही. 

साहजिकच, ते दोघेही एका जर्मन गस्ती पथकाच्या तावडीत सापडले आणि 'स्टॅलाग लुफ्ट ३' नावाच्या तुरुंगात त्यांची रवानगी झाली. हाच तुरुंग पुढे "Great Escape" नावाच्या हॉलिवूड सिनेमामुळे प्रकाशझोतात आला. 

भारतीय सेनेचे हे शिलेदार भविष्यकाळात अमाप प्रसिद्धी पावतील अशी सुतराम कल्पनादेखील त्यांच्यापैकी कोणालाच तेंव्हा असण्याची शक्यता नव्हती.

पी. पी. कुमारमंगलम भारताचे सेनाध्यक्ष झाले (१९६६-६९), याह्याखान पाकिस्तानचे सेनाध्यक्ष आणि लष्करी हुकूमशहा झाले (१९६६-१९७१), टिक्काखानदेखील पाकिस्तानचे सेनाध्यक्ष होते (१९७२-१९७६) आणि साहबजादा याकूब खान यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्रीपद भूषवले (१९९६-१९९७).

सर्वात वर डावीकडून: कुमारमंगलम, नरवणे, याह्याखान व याकूबखान 

पाकिस्तानचे सेनाध्यक्ष बनण्यापूर्वी १९६६ साली जेंव्हा जनरल याह्याखान दिल्ली भेटीवर आले तेंव्हा विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी तत्कालीन भारतीय सेनाध्यक्ष जनरल कुमारमंगलम हजर होते!

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री असताना जेंव्हा साहबझादा याकूब खान इटली दौऱ्यावर गेले तेंव्हा त्यांनी त्या कुटुंबाला आवर्जून भेट दिली ज्यांच्या घरी त्यांच्यासह इतर भारतीय अधिकाऱ्यांनी काही महिने आश्रय घेतला होता!

तसे पाहता, ही गोष्ट वाचून "त्यात काय मोठेसे?" असा प्रश्न काही वाचकांना पडू शकेल. तरीदेखील ही गोष्ट लिहावी असे मला का वाटले असेल?

ही गोष्ट त्या काळातली आहे जेंव्हा हे सर्व सेनाधिकारी केवळ भारतीय किंवा पाकिस्तानी, हिंदू वा मुसलमान, पठाण किंवा तामिळी नव्हते. ते फक्त एकमेकांचे मित्रच नव्हे, तर जीवाला जीव द्यायला मागे-पुढे न पाहणारे आणि एकसारखाच गणवेश घालून लढणारे सैनिक होते!

भारताच्या फाळणीने या मैत्रीभावाची, परस्परप्रेमाची आणि एकोप्याची अक्षरशः राख केली. या राखेवर वेळोवेळी फुंकर मारून त्याखालची आग धगधगत ठेवण्याचे काम सीमेच्या अल्याड-पल्याडची राजकारणी मंडळी चोख बजावत असतात. आणि त्याहूनही मोठे दुर्दैव असे की, दोन्हीकडच्या काही पिढ्या एकमेकांसंबंधी नुसत्या अनभिज्ञ राहिल्या असे नव्हे, तर त्यांना पद्धतशीरपणे एकमेकांचा द्वेष करायला शिकवले गेले आणि आजही शिकवले जाते. 

पण एक काळ असा निश्चितच होता जेंव्हा दोन्हीकडचे सैनिक खांद्याला खांदा लावून एकत्र लढले होते आणि त्यांनी आपला सैनिकधर्म जपला होता!

'ते हि नो दिवसा गतः' इतकेच आज विषण्णपणे म्हणावे लागते.

___________________________________________________________________________________

मूळ इंग्रजी लेखात नसलेली काही माहिती

१. १९७१ साली जेंव्हा भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभूत करून बांगलादेशाची निर्मिती केली तेंव्हा हेच याह्याखान पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा होते. 

२. लेखात उल्लेखलेले मेजर जनरल ए. एस. नरवणे हे सध्याचे भारतीय सेनाध्यक्ष जनरल मनोज नरवणे यांचे काका होते. जनरल मनोज नरवणे इटली भेटीवर गेले असता, मुद्दाम त्या गावी जाऊन आले जेथे त्यांचे काका व इतर अधिकारी आश्रयाला राहिले होते. 

___________________________________________________________________________

मूळ इंग्रजी लेखक : श्री. करण थापर  

स्वैर मराठी रूपांतर: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

Wednesday 2 February 2022

२६ जानेवारी २०२२ आणि बदललेले काश्मीर

यंदा प्रजासत्ताक दिनी काश्मीर जरासे वेगळे भासले. दोन लक्षवेधी व्हिडिओमध्ये काश्मीर खोऱ्यातील बदललेले वातावरण दिसून आले.

मेहबूबा मुफ्ती, फारूक आणि ओमर अब्दुल्ला यांची निवासस्थाने असलेल्या, श्रीनगरमधील गुपकर रस्त्यावर ३० फूट तिरंगा हातांत घेऊन अभिमानाने चालणारा तरुणांचा गट एका व्हिडिओमध्ये दिसला. 

मेहबूबा यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये सांगितले होते की कलम ३७० पुन्हा लागू केल्याशिवाय काश्मीरमध्ये तिरंगा फडकवला जाणार नाही. मेहबूबा यांच्या या विधानामुळे त्यांच्या पक्षातील अनेक सदस्यांनी राजीनामाही दिला होता. तेव्हापासून सातत्याने मेहबूबा केंद्र सरकारला धमक्या देत आहेत. 

स्थानिक तरुणांनी मेहबूबा यांना दिलेला हा जणू एक संदेशच होता की, काश्मीरी तरुण भारताचा राष्ट्रीय ध्वज घेऊन प्रगतीपथावर निघाले आहेत, आणि काश्मीर राज्याची लूट करणाऱ्या जुन्या कारभाऱ्यांची हुकूमशाही आता चालणार नाही.

साजिद युसूफ शाह, साहिल बशीर भट हे कार्यकर्ते त्यांच्या डझनभर समर्थकांसह श्रीनगरच्या क्लॉक टॉवरवर ध्वजारोहणाचे आयोजन करताना दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसले. त्यासाठी त्यांना हायड्रॉलिक लिफ्टची मदत घ्यावी लागली. राष्ट्रगीत गायन, आणि काश्मीर मार्शल आर्ट्स अकादमीच्या प्रात्यक्षिकांसह स्थानिक लोकांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण समारंभ साजरा झाला. यापूर्वी क्लॉक टॉवरवर तिरंगा फडकला होता १९९५ मध्ये!

क्लॉक टॉवरचे छत कमकुवत असल्याने, क्लॉक टॉवरवर सूर्यास्तानंतर चढणे धोकादायक ठरले असते. त्यामुळे, संध्याकाळ होण्याआधीच ध्वज क्लॉकटॉवरवरून उरवण्यात आला. यावरही, ओमर अब्दुल्ला यांनी उपरोधिक टिप्पणी करण्याची संधी सोडली नाही. ते म्हणाले, “झेंडा संध्याकाळपर्यंत तरी फडकत ठेवायला हवा होता”.

काश्मीरमधून आलेल्या अधिकृत अहवालात असेही म्हटले आहे की राज्यातील सार्वजनिक उद्यानांसह अनेक ठिकाणी, हजारो राष्ट्रध्वज फडकताना दिसले. श्रीनगरमध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रध्वज फडकण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
 
शोपियाँ येथील आर्मी गुडविल स्कूलच्या आवारात १५० फुटी ध्वजस्तंभाचे उद्घाटन करण्यात आले. काही काळापूर्वी दहशतवाद्यांचे प्रमुख केंद्र असलेले शोपियान गाव आता काश्मीर खोऱ्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले आहे.
 
कोव्हिडच्या साथीमुळे शैक्षणिक संस्थांनी मात्र हा कार्यक्रम गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाप्रमाणेच कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित ठेवला.

सुरक्षा दलांनी ठार केलेल्या बुरहान वानी या दहशतवाद्याचे वडील, मुझफ्फर वानी यांनी, पुलवामा जिल्ह्यातील त्राल गावामध्ये, मुलींच्या उच्च माध्यमिक सरकारी विद्यालयात  ध्वजारोहण केले.

कुपवाडा येथे मार्शल आर्ट्सच्या प्रदर्शनाचा समावेश असलेल्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. पुंछ आणि राजौरी सेक्टरमधूनही असेच वृत्त आले. 

एकूणच राज्यभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. खोऱ्यात शांतता होती, कोणतीही अनुचित घटना घडली नाही किंवा बहिष्काराचे कोणतेही आवाहन करण्यात आले नाही. राज्यात कुठेही पाकिस्तानचे झेंडे फडकले नाहीत.

खबरदारीची उपाययोजना म्हणून २६ जानेवारी रोजी सकाळी मोबाईल इंटरनेट सेवा काही तासांसाठी बंद करण्यात आली होती.  मात्र, फोन सेवा आणि लँड लाईनद्वारे इंटरनेट सेवा सुरू ठेवली गेली.

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि राजकीय कार्यकर्त्यांचाही त्यात सहभाग होता. आंदोलकांनी स्वयंनिर्णयाच्या अधिकाराची मागणी केली आणि पाक सरकारकडून सातत्याने होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा निषेध केला. यावेळी काही स्थानिक राजकारण्यांची भाषणेदेखील झाली.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विघ्न आणण्यासाठी पाकिस्तानने Sikhs for Justice (SFJ) च्या सदस्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. प्रजासत्ताक दिनापूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडिओमध्ये, SFJ चे संस्थापक, गुरपतवंत सिंग पन्नू आणि एका महिला वक्त्यांनी काश्मीरमधील तरुणांना हिंसाचारासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला होता. पन्नू म्हणाले, "काश्मीरच्या लोकांनो, दिल्ली गाठा. पंतप्रधान मोदींना तिरंगा फडकवण्यापासून रोखा. बारामुल्ला,शोपियाँ, अनंतनाग येथे दररोज खोट्या चकमकीत तुमचे भाऊबंद मारले जात आहेत. जगात कोणालाच त्याची माहितीही नाही. २६ जानेवारीला तुम्ही दिल्लीला पोहोचलात तर संपूर्ण जगाला हे समजेल की काश्मीरी आणि शीख लोकांना भारतपासून स्वातंत्र्य हवे आहे."

या चिथावणीला हिजबुल मुजाहिदीनचाही पाठिंबा होता. या चिथावणीवर काश्मीरमधून उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. पण प्रत्यक्षात काहीच घडले नाही.

काश्मीरच्या कोणत्याही राजकीय नेत्यांनी मात्र त्यांच्या पक्षांच्या कार्यालयात ध्वजारोहणाचे आयोजन केले नाही. त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्राला शुभेच्छाही दिल्या नाहीत. उलट, कलम ३७० हटवल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला. ज्या संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेऊन हे राजकीय पुढारी आपापल्या पदांवर विराजमान आहेत ते संविधान लागू होण्याचा दिवस म्हणजेच हा प्रजासत्ताक दिन आहे याचा त्या राजकीय नेत्यांना सोयीस्करपणे विसर पडलेला दिसतो. तथापि, त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी खोऱ्यातील विविध भागात आयोजित झालेल्या कार्यक्रमात भाग घेतला. 

पाकिस्तानला काश्मीरात शांतता नकोच आहे. काश्मीरच्या मुद्द्याला प्रसिद्धीझोतात ठेवण्यासाठी त्यांनी यंदाही हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न केला. पण ज्या उत्साहाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यामुळे पाकिस्तानला चांगलीच चपराक बसली. ‘बंद’ किंवा बहिष्काराचे आवाहन कोणीच न केल्यामुळे भारतातील पाकसमर्थक लॉबीने या प्रदेशावरील पकड गमावली असल्याचे दिसून आले आहे.

हे तेच काश्मीर आहे जिथे काही वर्षांपूर्वी भारताचा झेंडा पायदळी तुडवण्यात आला होता. यंदा मात्र तो सर्वत्र दिमाखात फडकला.

हे सत्य नक्कीच पाकिस्तानच्या जिव्हारी झोंबणार आहे. काश्मीरच्या जनतेने दाखवलेले हे सकारात्मक चित्र जगापुढे आलेले पाकला खपणार नाही. नजीकच्या भविष्यात अधिक संख्येने दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न पाक  नक्कीच करणार.

या पार्श्वभूमीवर, भारतीय सुरक्षा दलांना अजिबात गाफील राहून चालणार नाही. पाकच्या नापाक कारवायांना आळा घालण्यासाठी आणि स्थानिक जनतेसोबत आपुलकी जपण्यासाठी त्यांनी सदैव कटिबद्ध राहणे अत्यावश्यक आहे.
_________________________

मूळ इंग्रजी लेखक : मेजर जनरल हर्ष कक्कर (सेवानिवृत्त) 

स्वैर मराठी रूपांतर: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)