Monday, 6 December 2021

१९७१: अखेर युद्धाला तोंड फुटले...

पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा व राष्ट्रपती, जनरल अयूबखान, यांनी एकदा गर्वोक्ती केली होती की, "ज्यांना भाषेचे शस्त्र पुरेसे नसेल, त्यांच्यावर आम्ही शस्त्रांची भाषा वापरू!" 

१९६९ साली जनरल याह्याखान यांनी अयुबखान यांना पदच्युत करून देशाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या हुकूमशाहीविरुद्ध पूर्व पाकिस्तानी लोकांनी बंड पुकारताच, याह्याखानांनी सोयिस्करपणे गृहीत धरले की या बंडाच्या मागे भारताचाच हात आहे. त्यांनी अयूबखानांचे ते मग्रूरीचे शब्द स्वतःच्याच, पूर्व पाकिस्तानातील देशवासियांविरुद्ध प्रत्यक्षात आणायला  सुरुवात केली. 

मार्च १९७१ मध्ये, पाकिस्तानी सैन्याने जेंव्हा पूर्व पाकिस्तानात दडपशाही सुरु केली तेंव्हाच भारतीय राज्यकर्त्यांना आणि सैन्यप्रमुखांना हे कळून चुकले होते की पाकिस्तानसोबत आणखी एक युद्ध आता अटळ आहे. पाकिस्तानी सैन्याने जनतेचा विश्वास आणि पाठिंबा संपादन करण्यासाठी, खोटाच प्रचार सुरू केला की पाकिस्तानी सैन्य अजिंक्य आहे. वस्तुस्थिती वेगळीच असली तरी या अपप्रचारामुळे, पाकिस्तानी जनताच नव्हे, तर स्वतः राज्यकर्तेही त्याच भ्रमात बोलू-वागू लागले. 

जसजशी पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती अधिकाधिक चिघळू लागली, तसे याह्याखान वरचेवर भारताविरुद्ध चिथावणीची भाषा करू लागले. जुलैमध्ये आणि नंतर  सप्टेंबरमध्ये त्यांनी तसे वक्तव्य जाहीरपणेच केले होते.

भारतीय गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरू केलेली होती. आपल्याच नागरिकांवर आपलेच सैन्य करीत असलेले अत्याचार पाहून वैतागलेले आणि पूर्व पाकिस्तानातच तैनात असलेले कित्येक बंगाली सैनिक पाक सैन्यातून पळून बंगाली मुक्तियोद्धयांना येऊन मिळाले होते. त्यांच्याकडून भारतीय गुप्तचर विभागाला माहितीचा खजिनाच उपलब्ध झाला होता.

पूर्व आणि पश्चिमेकडील भारत-पाक सीमांवर सुरु झालेल्या पाकिस्तानी हवाईदलाच्या वाढत्या हालचाली आपली रडार यंत्रणादेखील टिपत होती. नोव्हेंबर १९७१ पर्यंत पाकिस्तानी हवाईदल खूपच सक्रिय झाले आणि वरचेवर सीमेचे उल्लंघन करू लागले. 

जेंव्हा राजनैतिक स्तरावरच्या सविनय विनंत्यांना पाकिस्तान जुमानत नाही असे लक्षात आले, तेंव्हा मात्र त्यांच्या 'अरे'ला 'कारे' करण्याची मुभा भारतीय सैन्यदलांना दिली गेली.

२२ नोव्हेंबर १९७१ रोजी भारतीय वायुदलाने पाकिस्तानला दिलेले प्रत्त्युत्तर किती चोख होते हे आपण यापूर्वीच्या लेखात वाचलेच आहे. [१९७१ ची पहिली हवाई चकमक]

त्या चकमकीचा परिणाम असा झाला की जनरल याह्याखान यांनी जाहीरच करून टाकले की दहा दिवसांच्या आत पाकिस्तान भारतावर हल्ला करेल. आणि त्यांनी आपले वचन पाळले!

आपली तिन्ही सैन्यदले संपूर्णपणे सज्ज होती. भारतीय वायुसेना तर जणू ३ डिसेंबरच्या संध्याकाळी आपल्या हवाईतळांवर होऊ घातलेल्या पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याची वाटच पाहत होती !

१९६७ साली झालेल्या अरब-इस्रायली युद्धामध्ये, इस्राएलच्या हवाईदलाने अचानक हल्ला करून, इस्राएलला नेस्तनाबूत करण्याच्या तयारीत असलेली जवळ-जवळ सर्वच्यासर्व अरब लढाऊ विमाने उभ्या जागी नष्ट केली होती. त्या युद्धाची खडानखडा माहिती पाकिस्तानी हवाईप्रमुखांकडे होती, कारण आंतरराष्ट्रीय संकेतांना धुडकारून, काही पाकिस्तानी वायुसैनिकांनी अरब देशांतर्फे त्या युद्धात भाग घेतलेला होता! 

अगदी तस्साच धडा भारताला शिकवण्याची स्वप्ने पाकिस्तान पाहत होता!

पण भारतीय वायुदल म्हणजे काही दूधखुळ्यांची फौज नव्हती. अरब-इस्राएल युद्धामधून भारतानेही काही धडे घेतले असू शकतील, ही शक्यता पाकिस्तानने कदाचित विचारातही घेतली नसावी!

आम्ही भारतीय वायुसैनिक नेहमीच असे म्हणतो की, "दुसऱ्यांच्या चुकांमधून जेवढे शिकता येईल तेवढे शिकून घ्या. कारण, स्वतःच्या चुकांमधून शिकून शहाणे होण्याइतके आयुष्य कदाचित तुम्हाला मिळणारच नाही!"

ते जीवनसूत्र भारतीय वायुसेनेने तंतोतंत पाळले होते.

१९६५ च्या युद्धानंतर भारताने सीमावर्ती क्षेत्रात अनेक नवीन हवाईतळ तयार केले होते,  तसेच काही 'Blast Pens' देखील बनवले होते. ब्लास्ट पेन म्हणजे काँक्रीट वापरून बनवलेल्या अतिशय कणखर शेड असतात, ज्यामध्ये विमाने उभी करून त्यांची दुरुस्ती, देखभाल करता येते किंवा त्यामध्ये बॉम्ब लोड करता येतात. अर्थातच, ब्लास्ट पेनमध्ये असलेली विमाने शत्रूच्या बॉम्बवर्षावापासून बऱ्यापैकी सुरक्षित राहू शकतात.

आपल्याला अपेक्षित असलेला पाकिस्तानी हवाई हल्ला ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी झाला. प्रत्यक्ष युद्धघोषणा करण्यापूर्वीच भारतीय वायुसेनेला गारद करण्याकरिता केलेली ती खेळी होती. 

केवळ पाच मिनिटांच्या अवधीमध्ये पाकिस्तानने एकाचवेळी सात भारतीय हवाईतळांवर हल्ला चढवला. आग्रा, अंबाला, श्रीनगर, अवंतीपूर, जोधपूर, पठाणकोट, आणि उत्तरलाई या तळांबरोबरच पश्चिम सीमेवरच्या एका विमानवेधी रडार यंत्रणेलादेखील त्यांनी लक्ष्य केले होते.

आश्चर्य म्हणजे पाकिस्तानने भारताच्या पूर्व सीमेवर एकही हल्ला केला नाही. प्रत्यक्ष युद्धामध्ये हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आपली संसाधने जपून ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता, की 'सेबरचे कर्दनकाळ' ठरलेल्या भारतीय नॅट विमानांनी २२ नोव्हेंबरला जो तडाखा दिला होता त्यामुळे पाक घाबरला असावा, ते निश्चित सांगता येणार नाही.

पाकची खेळी यशस्वी ठरली का? पाहू या...

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका हिंदी सिनेमात दाखवल्याप्रमाणे भारतीय विमाने, पाकिस्तानची आयती शिकार होण्याकरिता, बुजगावण्यांसारखी धावपट्टीवर उभी करून निश्चितच ठेवलेली नव्हती! [वाचा: 'भुज- न भूतो न भविष्यति]

हवाईतळांवर दूर -दूर विखुरलेल्या ब्लास्ट पेन्समध्ये भारतीय लढाऊ विमाने सुखरूप होती. मोठी बॉम्बर विमाने आणि मालवाहू विमाने तर, पाक हवाईदल पोहोचूही शकणार नाही अशा ठिकाणी, म्हणजे सीमेपासून दूरवरच्या तळांवर आधीच हलवलेली होती. 

पाक हवाई हल्ले भारतीय हवाईदलाचे कितीसे नुकसान करू शकले ?

फारसे नाही. कारण, पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांनंतर काही तासांच्या आतच भारतीय हवाईदल पाकला चोख प्रत्त्युत्तर देऊ शकले होते. आपली विमाने त्याच रात्री साडेदहापासून ते मध्यरात्रीपर्यंत पाक हवाईतळांवर मारा करीत होती. 

प्रत्त्युत्तर द्यायला भारताला इतका वेळ का लागला?

आपली बॉम्बर विमाने दूरवरच्या हवाईतळांवर होती. तेथून त्यांना सीमेलगतच्या तळांवर हलवून, त्यात पुन्हा इंधन व दारुगोळा भरल्यानंतरच ती कामगिरीवर जाऊ शकणार होती. शक्तिशाली बॉम्बच्या प्रचंड विस्फोटक क्षमतेमुळे ते बॉम्ब विमानांमध्ये लोड करण्याचे काम मोठेच जिकीरीचे आणि वेळखाऊ असते. शिवाय, युद्धजन्य स्थितीत, सर्वत्र  'ब्लॅकआउट' असल्याने, तंत्रज्ञ व वायुसैनिक ते काम संपूर्ण काळोखामध्ये करीत होते.

४ डिसेंबरच्या पहाटे, ऐन हिवाळ्यातल्या दाट धुक्यामध्येसुद्धा आपल्या सुखॉई, मिग, मारूत, आणि हंटरसारख्या  फायटर विमानांसह कॅनबेरा विमानांनीही पाकिस्तानवर कडवा प्रतिहल्ला चढवला. जमिनीवरून होत असलेल्या शत्रूच्या गोळीबारामुळे आपल्या काही विमानांचे नुकसान झाले, पण तरीही, प्रतिहल्ल्यांची आपली कारवाई चार तारखेच्या दिवसभर सुरूच राहिली. 

ज्या युद्धाच्या धमक्या गेले अनेक महिने जनरल याह्याखान देत होता, ते युद्ध अखेर औपचारिकपणे सुरु झाले.

या युद्धातील लढाया कशाकशा होत गेल्या, हे पुढच्या भागांमध्ये पाहू या...


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने)


Sunday, 5 December 2021

१९७१ ची पहिली हवाई चकमक

[या चकमकीत सहभागी असलेले (तत्कालीन फ्लाइंग ऑफिसर) विंग कमांडर सुनीत स्वारेस (सेवानिवृत्त) यांनी स्वतः दिलेल्या माहितीवर हा लेख आधारित आहे. (तत्कालीन फ्लाईट लेफ्टनंट) दिवंगत स्क्वाड्रन लीडर एम.ए. गणपती स्वतःच ही गोष्ट सांगत आहेत अशी कल्पना करून हा लेख लिहिलेला आहे.]

डावीकडून: रॉय, बागची, 'सू', 'डॉन' आणि मी (गणपती)

२२ नोव्हेंबर १९७१. कलकत्त्याच्या दमदम विमानतळावर गेल्या काही महिन्यांपासून आमची तुकडी तैनात होती. हवाई हल्ल्यापासून कलकत्ता शहराचा बचाव करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवलेली होती आणि ते एक अतिशय उबग आणणारे काम होते. 

मुळात या शहरावर हल्ला करायला कोण आणि कशासाठी आले असते? निरपराध नागरिकांवर हल्ले करून कोणाही शत्रूला, सामरिकदृष्ट्या काय साध्य होणार होते?

आधीच, पूर्व पाकिस्तानच्या नागरिकांवर, म्हणजे स्वतःच्याच देशवासीयांवर, अनन्वित अत्याचार करून, पाकिस्तानच्या लष्करी सत्ताधाऱ्यांनी देशविदेशात आपली भरपूर नाचक्की करून घेतलेली होती. 

पाकिस्तानचा लष्करी हुकूमशहा जनरल याह्याखान हा दारूबाज आणि स्त्रीलंपट मनुष्य होता. पण भारताच्या एका प्रमुख शहरावर हल्ला करून, प्रसारमाध्यमांद्वारे जगभरात स्वतःची आणखी छी:थू करून घेण्याइतकाही तो मूर्ख नव्हता. 

अशा परिस्थितीत आम्ही कलकत्त्यात उगाचच बसून होतो. ज्या युद्धाच्या पोकळ धमक्या गेले अनेक महिने याह्याखान देत होता, ते युद्ध प्रत्यक्षात झाल्याशिवाय मर्दुमकी गाजवायची संधी आम्हाला मिळणार नव्हती. मी युद्धासाठी तन-मनाने सज्ज झालो होतो आणि माझे नॅट विमान घेऊन आकाशात झेपावयाला माझे हात-पाय अक्षरशः शिवशिवत होते. पण सध्या तरी नुसते बसून राहण्याशिवाय नशीबात काही वेगळे दिसत नव्हते. 

१९६५ च्या युद्धातही पूर्वेकडच्या पाक सीमेवर फारसे काहीच घडले नव्हते. आताही तसेच होणार की काय अशी भीती आम्हा सर्वांना वाटत होती. 

त्या दिवशी दुपारी एक वाजता मी ओ.आर.पी. (Operational Readiness Platform) ड्यूटीकरिता विमानतळावर पोहोचलो. माझ्यासोबत फ्लाईट लेफ्टनंट रॉय अँड्रयू मॅसी, फ्लाइंग ऑफिसर डोनाल्ड उर्फ 'डॉन' लाझारस, आणि फ्लाइंग ऑफिसर सुनीत उर्फ 'सू' स्वारेस हे तिघेही होते. 

आजच्या ठरलेल्या व्यूहरचनेप्रमाणे, उड्डाणादरम्यान मी व रॉय आमची दोन विमाने घेऊन सर्वात पुढे म्हणजे 'लीडर' असणार होतो. 'डॉन' आणि 'सू' हे दोघे फ्लाइंग ऑफिसर्स त्यांची विमाने आमच्या दोन्ही बाजूंना ठेवून, म्हणजे आमचे 'विंगमॅन' असणार होते. 

आज सकाळच्या शिफ्टमध्ये आमचे कमांडिंग ऑफिसर आणि इतर तिघा वैमानिकांनी दोन वेळा 'स्क्रॅम्बल' (scramble) ची कारवाई करीत, पाकिस्तानी लढाऊ विमानांचा पाठलाग केला होता. पण पूर्व पाकिस्तानातील बोयरा गावाजवळील सीमेपर्यंत आपली विमाने पोहोचण्यापूर्वीच पाकिस्तानी विमानांनी तिथून पळ काढल्याने 'शिकार' हातातून निसटली होती. 

ड्यूटीवर पोहोचताच आम्ही आपापली विमाने पूर्णतः सज्ज असल्याची खात्री केली, आणीबाणीच्या प्रसंगी विमानातून सुखरूप बाहेर पडण्याकरिता असलेल्या Ejection Seat चे पट्टे तपासले, विमानाच्या तंत्रज्ञांसोबत दोन-चार मिनिटे गप्पा मारल्या आणि ऑफिस व विश्रांतीची जागा असा दुहेरी उपयोग असलेल्या तंबूत येऊन विसावलो.

फ्लाईट लेफ्टनंट के.बी. बागची आमचा फायटर कंट्रोलर होता. आमची दूरसंचार यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करून झाल्यावर त्याने आमच्या तंबूमध्ये फोन केला. 

मी फोन उचलत म्हटले, "फ्लाईट लेफ्टनंट गणपती..."

"गुड आफ्टरनून, 'गणा' सर, मी बागची बोलतोय"

"हॅलो केबी, काही गडबड?"

"नाही सर. सकाळी दोन 'स्क्रॅम्बल' झाले. पण आपली विमाने पोहोचेपर्यंत पाकिस्तानी सेबर्स पसार झाली होती."

"वाटल्यास तू आम्हाला स्टॅण्डबाय २  (Standby 2) वर ठेव." मी म्हणालो. 

"ठीक आहे सर. मी योग्य वेळी सांगेन."

सहसा आम्ही स्टॅण्डबाय ५ (Standby 5) वर असायचो. म्हणजेच, फायटर कंट्रोलरकडून इशारा मिळताच आम्ही तडक आमच्या विमानाकडे पळत सुटायचो, आणि इंजिन सुरु करून पाच मिनिटाच्या आत उड्डाण करायचो. 

शत्रूकडून सीमेपार काही संशयास्पद हालचाली होत असल्याची खबर मिळाल्यास फायटर कंट्रोलर आम्हाला अधिक सज्ज स्थितीत, म्हणजे स्टॅण्डबाय २ वर ठेवीत असे. त्या वेळी आम्ही पट्टे बांधून, आमच्या नॅट विमानांच्या सीटवरच बसून राहायचो, ज्यायोगे दोन मिनिटांच्या आत उड्डाण करणे शक्य होई. 

ऐन हिवाळ्यातही कलकत्त्याच्या धावपट्टीवर असलेले उष्ण तापमान आणि अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हात स्टॅण्डबाय २ चा पर्याय निश्चितच सुखावह नव्हता.

तसे पाहता, आज काही पराक्रम गाजवायला मिळायची शक्यता धूसर होती, कारण सकाळीच पाकिस्तानी सेबर्सनी दोन 'स्वीप' केलेले होते. परंतु, काहीतरी घडेल या आशेवर, आम्ही स्टॅण्डबाय २ वर राहून,  स्वतःला उन्हात भाजून घ्यायलाही तयार होतो. 

आम्ही आधी रेडिओवर बातम्या ऐकल्या. मग, थोडा वेळ एकमेकांसोबत गप्पा छाटल्या. त्यानंतर मात्र मी पंख्याच्या झोतात माझ्या कॅम्प कॉटवर पहुडलो आणि घरी पत्र लिहू लागलो. 'डॉन' आणि 'सू' स्क्रॅबल खेळत बसले आणि रॉय वाचनात गढून गेला. 

अचानक सायरन वाजू लागला आणि बागचीचा आवाज लाऊडस्पीकरवर कडाडला, "स्क्रॅम्बल, स्क्रॅम्बल, स्क्रॅम्बल"

लाऊडस्पीकरवर बागची देत असलेल्या सविस्तर सूचना ऐकत-ऐकतच आम्ही आमच्या नॅट विमानांकडे धाव घेतली. 

"कॉकटेल फॉर्मेशन, तीस अंशाच्या दिशेने एक हजार फुटांची उंची त्वरित गाठा, आणि विमानांचा वेग जास्तीत जास्त ठेवा."

नॅट विमानाचे इंजिन अक्षरशः क्षणार्धात सुरू होते. इतके, की आम्ही डोक्यावर हेल्मेट चढवून कॉकपिटचे झाकण बंद करेस्तोवर विमान उड्डाण करायला तयार असते. 

आम्ही रनवेवर पोहोचायच्या आतच डमडम विमानतळाच्या ATC (Air  traffic Control) म्हणजेच हवाई नियंत्रण कक्षातून आम्हाला रेडिओ संदेश मिळाला. "कॉकटेल फॉर्मेशन, क्लियर्ड फॉर टेकऑफ, ऑल फोर एयरक्राफ्ट्स."

सुदैवाने त्या क्षणी कोणतेही प्रवासी विमान उड्डाणाच्या किंवा उतरण्याच्या तयारीत नसल्याने आमच्यासाठी रनवे मोकळा होता. 

रेडिओवर कोणतेही उत्तर देण्याच्या फंदात न पडता, कॉकटेल फॉर्मेशनमधल्या आम्ही चौघांनी उड्डाण करण्यासाठी वेग घेतला.

आमची विमाने हवेवर स्वार होताच आम्ही चाके विमानांच्या पोटात घेतली, आणि ईशान्येकडे निघालो. काही क्षणातच आम्ही एक हजार फुटांची उंची गाठली आणि ५०० नॉट म्हणजेच, ताशी ९०० किलोमीटर वेगाने बोयराच्या दिशेने झेपावलो.

केवळ नकाशा आणि जायरोस्कोपिक होकायंत्रावरच अवलंबून असल्याने, जमिनीवरच्या सर्व खाणाखुणा आम्ही आमच्या मेंदूत अक्षरशः कोरून ठेवल्या होत्या. कारण, अत्यंत वेगवान फायटर विमानाच्या कॉकपिटमध्ये नकाशा पाहत बसण्याची उसंत मिळणे अशक्यच असते. 

शत्रूला आमचा सुगावा लागू न देण्यासाठी त्याच्या रडारच्या कक्षेपेक्षा खालच्या उंचीवर उडत जाणे आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. त्याचा एक फायदा असाही होता की त्या उंचीवर धुके असल्याने, आमच्यापेक्षा अधिक उंचीवर असलेल्या शत्रूच्या विमानांना आम्ही पाहू शकलो असतो, पण त्यांना आम्ही दिसणे मात्र अवघड होते. 

काही मिनिटातच आम्ही पूर्व पाकिस्तानातील बोयरा गावाजवळ पोहोचलो. भारत-पाक सीमेवर वाहणाऱ्या नदीच्या तीरावर, घोड्याच्या नालेसारख्या आकाराच्या एका बेचक्यात बोयरा हे गाव वसलेले असल्याने, विमानातूनही ते अगदी सहज ओळखता येत असे.

अचानक आमच्या रेडिओवर बागचीचा आवाज ऐकू आला, "उजवीकडे दोनच्या दिशेला, चार मैलावर घुसखोर विमान... "

घड्याळातील आकड्यांच्या आधारे दिशा दाखवण्याची पद्धत सैन्यदलांमध्ये सर्रास वापरली जाते. नाकासमोर घड्याळातील १२ चा आकडा असल्याची कल्पना केल्यास, आमच्या उजव्या हाताला, २ या आकड्याच्या दिशेला आमच्यापासून चार मैलांवर शत्रूचे घुसखोर विमान असल्याचे रडारवर पाहून, त्याची सूचना बागचीने आम्हाला रेडिओवर दिली होती. 

'डॉन' आणि मी, आमच्या चार विमानांच्या फॉर्मेशनमध्ये सर्वात उजवीकडे उडत असल्याने आम्ही शत्रूच्या अधिक जवळ होतो. 'सू' जरी डाव्या बाजूने उडत असला तरी अचूक 'स्पॉटिंग' करण्यात त्याचा हातखंडा होता. फॉर्मेशनमध्ये आपल्या 'लीडर'च्या विमानासोबत स्वतःचे विमान उडवत असताना, एकीकडे संपूर्ण आकाशावर नजर ठेवत शत्रूचे विमान शोधण्याच्या कौशल्याला 'स्पॉटिंग' असे म्हणतात. 

आमच्या अपेक्षेप्रमाणेच 'सू'चा आवाज रेडिओवर खणाणला, "कॉन्टॅक्ट." 

म्हणजेच शत्रूचे विमान त्याला दिसले होते. आम्हा सर्वानाही ते दिसावे म्हणून, ते विमान कोणत्या दिशेने व कसे उडत आहे याचे धावते वर्णन 'सू' करू लागला.

"कोणते विमान आहे?" फ्लाईट लेफ्टनंट बागचीने विचारले. 

त्या विमानाच्या दिशेने आपले विमान वळवीतच रॉयने उत्तर दिले, "सेबर."

रॉयचे विमान आपल्या दिशेने वळल्याचे दिसताच, स्वतःचा बचाव करण्यासाठी शत्रूच्या पायलटने त्याचे विमान अतिशय वेगाने वळवले. 

त्या विमानाला आपल्या टप्प्यात ठेवत, रॉय आणि 'सू' या दोघांनीही आपापली विमाने त्याच्या दिशेने वळवली आणि त्याचा पाठलाग सुरु केला. 

आपले विमान रॉयच्या विमानाच्या जोडीने उडवत असतानाच, आकाशावर नजर ठेवण्याचे आणि काही दिसल्यास त्वरित त्याची खबर देण्याचे काम 'सू' चोख बजावत होता. तो रेडिओवर ओरडला, "आणखी एक सेबर, ७ च्या दिशेला..."

हे ऐकताच मी व 'डॉन'ने आपापली विमाने त्यांच्या दिशेने वळवली. मी वाचलेल्या काही इंटेलिजन्स रिपोर्टमधली माहिती मला आठवली. काही सेबर विमानामध्ये अमेरिकेची 'साईडवाईन्डर' मिसाईल बसवलेली होती, जी आमच्या विमानातील बंदुकांपेक्षा दूरपर्यंत सहजपणे मारा करू शकत होती.

रॉय आणि 'सू' ज्या विमानाचा पाठलाग करीत होते ते सेबर तर मला दिसलेच पण त्यांच्या पिछाडीवर अचानक आलेले, आणि त्यांच्यावर क्षेपणास्त्राचा मारा करण्यासाठी सज्ज होत असलेले ते दुसरे पाकिस्तानी सेबर विमानही मी पाहिले. 

रेडिओवर "कॉन्टॅक्ट" असे ओरडतच मी त्या दुसऱ्या सेबरवर नेम धरला. मी मारलेल्या गोळ्या त्या सेबरला लागून त्याच्या पंखातून धूर येऊ लागल्याचे दिसताच मी आमचा ठरलेला कोडवर्ड रेडिओवर जाहीर केला, "मर्डर, मर्डर!"

आमच्या विमानांखाली असलेल्या धुक्यातून तिसरे एक सेबर विमान अनपेक्षितपणे वर आले. 'डॉन'च्या विमानापासून ते फक्त १५ मीटरवर होते. पण, त्या धक्क्यातून 'डॉन' निमिषार्धात सावरला आणि त्याने त्या सेबरवर आपल्या विमानाच्या बंदुकीचा मारा केला. 

दरम्यान, रॉय ज्या सेबरचा पाठलाग करीत होता ते वेगाने खाली सूर मारीत ढाक्याच्या दिशेने निघाले होते. पण, रॉयने आपल्या विमानाच्या बंदुकीने त्याचाही वेध घेतला. 

या सर्व घडामोडी केवळ तीन मिनिटात घडल्या होत्या!

मी व 'डॉन'ने टिपलेली दोन्ही सेबर विमाने तिथल्यातिथे कोसळली. त्यांच्या वैमानिकांनी ऐनवेळी पॅराशूटच्या सहाय्याने उड्या मारल्या, पण जमिनीवर पोहोचताच त्यांना युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले गेल्याचे आम्हाला नंतर समजले. रॉयने ज्या विमानाचा वेध घेतला होता त्याचे नुकसान झाले होते, पण ते मात्र ढाक्यापर्यंत परत पोहोचण्यात यशस्वी झाले असे नंतर कळाले.

अशा प्रकारे, पाकिस्तानची तिन्ही सेबर विमाने निकामी करण्यात आम्ही यशस्वी ठरलो होतो, आमच्या विमानांची काहीही हानी होऊ न देता!

प्रत्यक्ष युद्धाची घोषणादेखील होण्याआधीच, ही पहिली हवाई चकमक भारताने जिंकली होती!

डमडम विमानतळावर उतरण्याआधी माझे विमान स्वतःभोवतीच गोलगोल फिरवीत 'Victory Roll' करण्याचा मोह मला अजिबात आवरता आला नाही. 

माझी ती हवाई कसरत बघून विस्मयचकित झालेला ATC कंट्रोलर रेडिओवर कसेबसे इतकेच म्हणू शकला, "Maintain  discipline!"  

मोठ्याने हसत-हसतच मी माझे विमान उतरवले. पाठोपाठ रॉय, 'डॉन' आणि 'सू' देखील येऊन पोहोचले. 

आमच्या पराक्रमाची खबर आमच्या तंत्रज्ञांना आणि स्क्वाड्रनमधील सर्वांनाच समजली होती. रँक किंवा सिनियॉरिटी, या कशाचीच तमा न बाळगता, त्यांनी आम्हाला अक्षरशः आपल्या खांद्यांवर उचलूनच कॉकपिटमधून बाहेर काढले!

आपण एखाद्या कामासाठी सदैव सज्ज राहतो, विजयासाठी मनोमन प्रार्थनाही करीत असतो. पण संधी कधीतरी अचानकच दरवाजा ठोठावते. काही क्षणांसाठीच जेंव्हा ती येते, तेंव्हा तिला फक्त दोन्ही हातांनी कवटाळायचे असते, आणि विजयाची नशा अनुभवायची असते, बस्स !

या संपूर्ण कामगिरीबद्दल आमच्यावर पदकांचा वर्षाव झाला. आमचा फायटर कंट्रोलर, फ्लाइंग ऑफिसर बागचीला वायुसेना पदक मिळाले. रॉय, 'डॉन', आणि मी, आम्ही तिघेही वीरचक्राचे मानकरी ठरलो. आमच्या कमांडिंग ऑफिसरना विशिष्ट सेवा पदक देण्यात आले. 

फ्लाइंग ऑफिसर सुनीत उर्फ 'सू' स्वारेस, ज्याच्या तीक्ष्ण नजरेने शत्रूची विमाने सर्वप्रथम पाहिली होती, आणि ज्याने आम्हाला सुखरूपपणे त्या तिन्ही विमानांचा वेध घेण्यासाठी दिशा दाखवली होती, त्याला स्वतःला मात्र शिकार करण्यासाठी शत्रूचे कोणतेच सावज उरले नव्हते! केवळ त्यामुळेच त्या तरुण आणि शूर फ्लाइंग ऑफिसरला कोणतेही पदक मिळाले नाही. पण आमच्यासाठी मात्र तो सदैव हिरोच राहिला. 

आम्हाला नंतर समजले की, त्या दिवशी ढाका विमानतळाहून एकूण चार सेबर विमाने निघाली होती. पण एका विमानाचा रेडिओ निकामी झाल्यामुळे ते परत फिरले होते. 

ते विमान जर आले असते तर कदाचित ते 'सू'च्या बंदुकीचा बळी झाले असते!

किंवा कोण जाणे, कदाचित त्या चौथ्या सेबरने माझाच वेध घेतला असता!

म्हणतात ना, जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान नेहमीच दैव नावाची एक अदृश्य, अमूर्त शक्ती कार्यरत असते!


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने)

Friday, 3 December 2021

एअर पॉवर म्हणजे नक्की काय?

१७ डिसेंबर १९०३ रोजी, राईट बंधूंनी गुरुत्वाकर्षणाचे नियम अक्षरशः धाब्यावर बसवले आणि गगनाला गवसणी घातली. संपूर्णतः मानवी नियंत्रणाखाली केलेले इतिहासातले ते पहिले-वहिले उड्डाण होते. 

केवळ १२ सेकंदाच्या त्या उड्डाणामध्ये, जमिनीपासून फक्त दहा फूट उंचीवरून उडत, ते विमान जेमतेम एकशेवीस फूट अंतर जाऊ शकले. परंतु भविष्यामध्ये, राने-वने, दऱ्या-डोंगरच नव्हे तर अथांग समुद्रांवरूनही झेप घेऊन पृथ्वीला संकुचित करण्याची क्षमता त्या विमानाने जगाला दिली. 

त्या दिवशी वाऱ्याच्या एका झोताने त्या विमानाला भिरकावून त्याचे तुकडे-तुकडे केले खरे, पण उड्डाणाचे स्वप्न मात्र अभंग राहिले. त्यानंतर काही दशकातच मानवाने आकाश जिंकून अवकाशात झेप घेतली. 

राईट बंधूंच्या त्या पहिल्या उड्डाणाची आठवण म्हणून, त्याच विमानाच्या तुटक्या पंखाचा एक कापडी तुकडा खिशात घेऊन, १९६९ मध्ये नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला होता!

१९६२ साली विमानातून पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अमेरिकन वैमानिक जॉन ग्लेन याने वयाच्या ७७व्या वर्षी, १९९८ मध्ये पुन्हा तोच पराक्रम केला. त्याच्याही खिशात राईट बंधूंच्या विमानाचा एक तुकडा होता!

एप्रिल २०२१ मध्ये नासाने आपले 'इंजेन्युइटी' नावाचे यान मंगळावर उतरवले. राईट बंधूंच्या विमानाचा एक तुकडा त्या अवकाशयांनामध्येही होताच !    

१९०३ सालच्या त्या ऐतिहासिक उड्डाणाचे महत्व सैन्यदलांना समजायला अजिबात वेळ लागला नाही. तोपावेतो फक्त जमीन आणि समुद्रापर्यंत सीमित असलेले युद्धक्षेत्र आता आसमंतापर्यंत विस्तारणार होते. उंची, वेग आणि पल्ला, या तिन्ही बाबतीत सरस असलेले हे 'हवाई खेळणे' एक अत्यंत प्रभावी हत्यार ठरू शकणार होते! 

शत्रुचे सैन्य किती आहे आणि ते कसे तैनात केलेले आहे ही माहिती अत्यंत महत्वाची असते. म्हणूनच, हवाई टेहळणीसाठी विमानांचा वापर सर्वप्रथम सुरु झाला. अर्थातच, त्या टेहळणी विमानांवर शत्रुसैन्य गोळ्या झाडत असे, पण ते व्यर्थच होते. कारण, वेगवान विमानांना टिपणे सोपे निश्चितच नसते. 

त्या काळच्या, लाकूड आणि कापड वापरून बनवलेल्या नाजूक विमानांतून फक्त छोटे बॉम्ब टाकणे शक्य असल्याने शत्रूचे फारसे नुकसान होत नसे. पण मोठा आवाज करीत विमाने अचानक येत आणि काही कळायच्या आत थोडाफार अग्निवर्षाव करून निघूनही जात. शत्रूच्या मुलखात दूरपर्यंत पोहोचण्याची क्षमता असल्याने, शत्रुसैन्याचे मनोबल खच्ची करण्याचे आणि तेथील जनतेच्या छातीत धडकी भरवण्याचे काम विमाने चोख बजावत असत. 

लवकरच, दोन्ही बाजूंच्या विमानांचे आपसातले हवाई युद्धही सुरु झाले. कारण, सैन्यदलांच्या हे लक्षात आले की 'हवाईक्षमता ज्याची खरी, तोच पृथ्वीवर राज्य करी'!

दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या फौजांनी पश्चिमी युरोप अक्षरशः विजेच्या वेगाने पादाक्रांत करत इंग्लंडची खाडी गाठली होती. पण त्यापुढचे २१ मैल समुद्रमार्गे पार करून इंग्लंडवर हल्ला करण्यासाठी जर्मनीच्या 'लुफ्टवाफ्फ' या हवाईदलाला इंग्लंडच्या 'रॉयल एअर फोर्स' (RAF) ला नमवून 'हवाई वर्चस्व' (Air Superiority) मिळवणे भाग होते, जे त्यांना शेवटपर्यंत जमले नाही. तसे झाले असते तर मात्र दुसऱ्या महायुद्धाचा आणि संपूर्ण जगाचा इतिहास काही वेगळाच झाला असता!

RAF च्या वैमानिकांचे तोंडभरून कौतुक करताना इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणाले होते, "मूठभर लोकांनी, इतक्या मोठ्या जनसमुदायावर एवढे प्रचंड उपकार आजपर्यंत कधीही केले नसतील!" 

हवाईदल म्हणजे जणू पायदळाच्या तोफखान्याचेच एक शेपूट असल्याचा गैरसमज पूर्वी लोकांच्या मनात होता. काही प्रमाणात तो गैरसमज आजही प्रचलित आहे. प्रत्यक्षात मात्र, हवाईदलाच्या कार्याची आणि एकंदर क्षमतेची व्याप्ती खूप मोठी आहे. 

दुसऱ्या महायुद्धात सागरी चकमकींमध्ये हवाईदलांनीही भाग घेऊन मोठीच कामगिरी बजावली. केवळ सागरी सामर्थ्याच्या बळावर आपापल्या देशांचे साम्राज्य जगभर पसरवणाऱ्या युद्धनौका, विमानातून अचूक टाकलेल्या बॉम्बमुळे सागराच्या उदरात गडप होऊ लागल्या! 

युद्धसामग्री तयार करणाऱ्या जर्मन कारखान्यांना वीज पुरवणारी मोठमोठी धरणे RAF च्या वैमानिकांनी उद्ध्वस्त केल्यामुळे दुसऱ्या महायुद्धात जर्मन युद्धक्षमतेचे कंबरडे मोडले होते!

जपानच्या भूमीवर अमेरिकन सैनिकाचे पाऊल पडायच्याही आधी अमेरिकेने विमानातून दोन अणुबॉम्ब टाकून जपानला शरणागती पत्करायला भाग पाडले होते. 

असंख्य सामरिक बलस्थाने असूनही हवाईदलाच्या खऱ्याखुऱ्या क्षमतेबाबत जनमानसामध्ये संदिग्धताच दिसते. विन्स्टन चर्चिल स्वतःच म्हणाले होते, "हवाईदलाच्या युद्धक्षमतेचा नेमका अंदाज बांधणे खूपच कठीण आहे." 

अलीकडेच आणखी कुणीतरी असेही म्हणून ठेवले आहे, "हवाईदलाची युद्धक्षमता म्हणजे, नवीन पिढीच्या प्रणयाराधनेसारखीच आहे... "  

कुणी काहीही म्हणो, पण हवाई ताकद ही एखाद्याला अतिशय गर्भगळित करणारी किंवा अतिशय उल्हसित करणारीही असू शकते. अर्थातच, विमानातून सोडले गेलेले क्षेपणास्त्र तुमच्या दिशेने येत आहे की तुमच्यापासून दूर जाणाऱ्या त्या अस्त्राचे अग्निपुच्छ तुम्ही पाहत आहात, यावर ते अवलंबून असेल! 

१९७१ च्या भारत-पाक युद्धात, पूर्व पाकिस्तानवरील संपूर्ण आकाशावर भारतीय वायुसेनेने वर्चस्व मिळवलेले होते. म्हणूनच भारतीय नौदल आणि पायदळाला चहूबाजूंनी ढाक्यापर्यंत मुसंडी मारता आली. केवळ चौदा दिवसात भारताने पाकिस्तानला सपशेल पराभूत केले, ९०००० पाकिस्तानी युद्धकैदी ताब्यात घेतले आणि बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ते याचमुळे!

भारतीय वायुदलाच्या विजयगाथेची एक लेखमाला आपल्यापुढे सादर होत आहे, त्या मालेतले हे पहिले पुष्प ! 


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
'How India Used Air Power In Bangladesh Liberation War In 1971'
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने)


Tuesday, 31 August 2021

एक अविस्मरणीय 'फौजी' गोकुळाष्टमी !

काल अचानकच मला १९९०च्या दशकातील एका गोकुळाष्टमीची आठवण झाली. आमची गोरखा बटालियन त्या काळी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील लष्करी छावणीमध्ये तैनात होती.

गोरखा सैनिकाला प्रेमाने 'कांछा' (मुलगा) असे म्हटले जाते. हे सैनिक मनाने अतिशय निर्मळ, आणि देवभक्त असतात. त्यांच्या भाबड्या बाह्य रूपामुळे, ते किंचित मंदबुद्धी असावेत असा अनेकांचा गैरसमज होतो, परंतु, तसे अजिबात नाही. गोरखा सैनिक अतिशय कडवे लढवय्ये, आणि कमालीचे आज्ञाधारक म्हणून जगप्रसिद्ध आहेत. 

आमच्या बटालियनमध्ये सर्वच धार्मिक सण अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरे होत असत. सर्व धर्मांचे शिक्षण घेऊन सैन्यदलात भरती झालेले, व 'पंडितजी', 'मौलवी', 'ग्रंथी' किंवा 'पाद्री' अशा नावाने ओळखले जाणारे जवान प्रत्येक युनिटमध्ये असतात. त्या काळी आमच्या बटालियनचे 'पंडितजी' रक्ताच्या कर्करोगाने आजारी होते. अर्थातच, पारंपरिक गोकुळाष्टमीचे आयोजन करण्यासाठी त्या वर्षी पंडितजी असणार नव्हते. 

सैन्यदलाचे कोणतेच काम कुणा एकावाचून कधीच अडत नाही. अर्थातच गोकुळाष्टमीची 'मंदिर परेड' देखील पंडितजीविनाच पार पाडणे क्रमप्राप्त होते. (मंदिरातील कोणत्याही उत्सव किंवा एकत्रित धार्मिक कार्यक्रमांना बोली भाषेत 'मंदिर परेड' असेच म्हटले जाते!) त्यामुळे, एक 'कामचलाऊ पंडितजी' निवडण्याची जबाबदारी कमांडिंग ऑफिसरसाहेबांनी माझ्यावर सोपवली. पूजापाठ आणि मंत्रोच्चारणाचे जुजबी ज्ञान असलेला एखादा सैनिक त्या कामासाठी पुरेसा होता. 

आमच्या बटालियनमध्ये जरा चौकशी केल्यावर मला एक एक छेत्री (ब्राह्मण) नेपाळी मुलगा सापडला. थोडेफार संस्कृत श्लोक, आणि पूजा-अर्चा यांची जाण असलेला व बऱ्यापैकी धार्मिक वृत्तीचा असा तो जवान, दिसायला अगदीच पोरगेला होता. मी त्याची चौकशी करायला सुरुवात केली. जेमतेम १-२ वर्षे लष्करी सेवा केलेला तो मुलगा थोडा घाबरला. पण, जी जबाबदारी सोपवण्याकरिता मी त्याची चौकशी करीत होतो ते समजताच, त्याने खास 'कांछा स्टाईल' ने मला उत्तर दिले "हुंछा शाब"! 

त्याउप्पर त्या कांछाने मला सांगितले की स्वतःच्या घरी आणि आमच्या युनिटच्या मंदिरात विविध पूजा-अर्चा होताना त्याने अनेक वेळा पाहिल्या होत्या आणि तो ही गोकुळाष्टमीची पूजा सुरळीत पार पाडू शकेल. तो नेमके कोणकोणते विधी, आणि कसेकसे करणार याविषयी आणखी चार प्रश्न विचारून मी खात्री करून घेतली आणि निश्चिन्त झालो. शंख वाजवणे, भगवान श्रीकृष्णाच्या पाळण्याची दोरी हळूहळू खाली सोडणे, जन्मोत्सवानंतर प्रसाद वितरण करणे, अशी व यासारखी इतरही कामे करण्यासाठी, मी आणखी दोन जवान त्याच्यासोबत नेमले. 

गोकुळाष्टमीच्या रात्री, सर्व अधिकारी, जवान आणि त्यांचे परिवार मंदिरात एकत्र जमले. कमांडिंग ऑफिसरही पोहोचले. सुमारे साडेअकरा वाजल्यापासून, अत्यंत जोशात आणि भक्तिभावाने आमचे 'कामचलाऊ पंडितजी' संस्कृत मंत्रोच्चार करू लागले. अधून-मधून भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील कथाही त्याने सांगितल्यावर, मी सुखावलो. मी केलेली निवड अजिबात चुकली नसल्याचे मला जाणवले. सर्वजण तल्लीन होऊन कथा ऐकत होते व भजने म्हणण्यात सहभागी होत होते. 

पण, कृष्णजन्माची घटिका जसजशी जवळ येऊ लागली तसे मला जाणवले की आमचा 'कामचलाऊ पंडितजी' काहीसा अस्वस्थ होता. जणू तो त्याच्या दोन साथीदारांना गुपचूप काहीतरी सांगण्याचा किंवा विचारण्याचा प्रयत्न करीत होता.

बरोबर अकरा वाजून एकोणसाठ मिनिटे होताच तो उठून उभा राहिला. रेशमी कुडता, आणि सोनेरी काठाचे धोतर, अशा वेषातच, पाय आपटून त्याने कडक 'सावधान पोझिशन' घेतली. ताडताड पावले टाकीत त्याने कमांडिंग ऑफिसरसाहेबांच्या दिशेने कूच केले. मला अनपेक्षित असलेल्या त्याच्या या हालचाली पाहून मी पूर्णपणे बावचळून गेलो होतो. 

त्या कांछाने कमांडिंग ऑफिसरसाहेबांना कडक सलाम ठोकला, आणि एखाद्या ड्रिल परेडमध्ये शोभेल असा आवाज लावत तो ओरडला, "श्रीमान, श्रीकृष्ण भगवान को जन्म करने की अनुमती चाहता हूँ!"

त्या भाबड्या आणि पोरसवद्या कांछाची चूक म्हणावी, तर ती चूकही नव्हती. युनिटमध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात कमांडिंग ऑफिसरसाहेबांची परवानगी घेतल्यानंतरच केली जाते, हे त्याने अनेकदा पाहिले असणार. ऐन कृष्णजन्माचा सोहळा होण्यापूर्वी अशी परवानगी घेणे आवश्यक आहे की नाही याच संभ्रमात पाच मिनिटे काढल्यानंतर ऐनवेळी, 'It is better to err on the safer side' असा विचार त्याने केला असणार! 

परंतु, काहीही पूर्वकल्पना नसताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे माझ्या तोंडाचा भलामोठा 'आ' वासलेला होता. सगळीकडे अक्षरशः नीरव शांतता पसरली होती. युनिटमधील सर्वच अधिकारी आळीपाळीने माझ्याकडे आणि कमांडिंग ऑफिसरसाहेबांकडे पाहू लागले होते. जवान तर अगदीच घाबरून गेलेले होते. "आता पुढे काय होणार?" हाच प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर होता. 

झालेली गडबड आमच्या कमांडिंग ऑफिसरसाहेबांनी एका निमिषार्धात जाणली. त्यांनी शांतपणे एक नजर सर्वत्र फिरवली आणि त्या कांछाकडे पाहत अत्यंत धीरगंभीर स्वरात ते म्हणाले, "पंडितजी, भगवान श्रीकृष्ण जी को पैदा करें" 

त्या क्षणी, भगवान श्रीकृष्णाचा पाळणा खाली सोडला गेला आणि ढोलक-झान्जाच्या नादात, सर्वांनी एकमुखाने जयजयकार सुरु केला. अर्थात, त्याआधी संपूर्ण मंदिर परेडने सुटकेचा नि:श्वास सोडला असणार यात शंका नाही. 

नेहमीच असे म्हटले जाते की, "सैन्यात प्रत्येक कामासाठी एक ठराविक पद्धत, किंवा 'ड्रिल' असते". 

त्याचा प्रत्यय आम्हा सर्वांना त्या दिवशी आला. त्या अपरिपक्व आणि अननुभवी कांछाने, नेमून दिली गेलेली ठराविक पद्धत मंदिरातदेखील अवलंबली, आणि प्रत्यक्ष भगवंताच्या जन्मासाठी कमांडिंग ऑफिसरसाहेबांची अनुमती मागितली.

एखाद्याने ती चूक हसण्यावारी तरी नेली असती किंवा त्या सैनिकाला जागच्याजागी धारेवरच धरले असते. 

परंतु, असेही म्हटले जाते की, "सैन्यदल कोणताही प्रसंग सूज्ञपणे आणि खंबीरपणे हाताळते."  

आमच्या कमांडिंग ऑफिसरसाहेबांनी ती परिस्थिती अतिशय धीरोदात्तपणे निभावून नेली आणि त्या सोहळ्याचे पावित्र्य अबाधित ठेवले. नेतृत्त्वकौशल्य या विषयात, आम्हा सर्वांसाठीच तो एक मोलाचा धडा होता. 

युद्ध असो किंवा मंदिरांतील धार्मिक सोहळा असो, आपल्या बटालियनचे नेतृत्व करणाऱ्या कमांडिंग ऑफिसरची भूमिका अतिशय महत्वाची आणि निर्णायक ठरते  हेच खरे! 

जय हिंद!

_________________________________________________________________________________

मूळ इंग्रजीअनुभव लेखक: ब्रिगेडियर सतीश घाटपांडे (सेवानिवृत्त)

मराठी भावानुवाद:  कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 

९४२२८७०२९४

Tuesday, 17 August 2021

काबूलचा पाडाव आणि श्रीनगरचा बचाव

अखेर काल काबूल तालिबान्यांच्या हाती पडले. 

हे सर्व नाट्य अफगाणिस्तानात घडत होते तेव्हा सहजच, माझे मन श्रीनगरला पोहोचले. २२ ऑक्टोबर १९४७ रोजी पाकिस्तानने काश्मिरात घुसखोरी करून, जेंव्हा संपूर्ण काश्मीर बळकावण्याचा कुटिल डाव रचला होता, तेंव्हा मी त्या घटनेचा साक्षीदार होतो. ब्रिटिश आणि पाकिस्तान लष्करांच्या संगनमताने, काही तासांच्या आतच घुसखोरांनी मुझफ्फराबाद घशात घातले. त्यानंतर श्रीनगरवर मुसंडी मारून, काश्मीर ताब्यात घायचे आणि पाकिस्तानमध्ये विलीन करून टाकायचे, अशी ती  योजना होती. 

परंतु महाराजा हरी सिंह, आणि त्यांचे चीफ ऑफ स्टाफ, ब्रिगेडियर राजेंद्र सिंह यांनी, राजधानीमध्ये हाताशी असलेल्या शंभर डोगरा सैनिकांसह, ही योजना हाणून पाडण्यासाठी झुंजायचा निर्णय घेतला. त्यांच्या त्या निर्णयामुळेच, भारत सरकारला काश्मीर वाचवण्यासाठी ५ दिवस मिळू शकले. २७ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीर राज्य भारतात विलीन झाले, आणि या जवळजवळ एकतरफी असलेल्या युद्धात भारतीय सैन्याने उडी घेतली. 

भारतीय सैन्याच्या आगमनापर्यंत काश्मीर राज्य कसेबसे तग धरून होते. चालढकल करत राहण्याच्या माउंटबॅटन यांच्या नीतीला जर पंतप्रधान नेहरू बळी पडले नसते, तर आपण बारामुल्लाही वाचवू शकलो असतो. पुढे आपल्याला बारामुल्ला परत मिळवण्यासाठी शर्थ करावी लागली नसती. आजवर जगासमोर पूर्णपणे न आलेली ही एक दीर्घकथा आहे, जी आता हळूहळू सांगितली जात आहे. पंतप्रधानांच्या 'आझादी का अमृत महोत्सव' या कार्यक्रमाचे आभार मानावेत तेवढे कमीच पडतील. 

काश्मीर वाचवण्याच्या या गाथेची तुलना जर अफगाणिस्तानशी केली तर, केवढा तरी विरोधाभास आढळतो. गेल्या गुरुवारीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन म्हणाले होते, की जरी तालिबानने काबूलपासून १५० किलोमीटर दूर असलेले गझनी शहर ताब्यात घेतले असले तरी, आणखी ९० दिवसातदेखील ते  काबूलला पोहोचू शकणार नाहीत. तालिबानी सैन्यापेक्षा दुप्पट ताकद असलेले बलाढ्य अफगाणी सैन्य त्यांचा प्रतिकार करेल! मात्र, प्रत्यक्षात काय घडलं?

याउलट, जेंव्हा पाकिस्तानने जम्मू -काश्मीर राज्याच्या मुझफ्फराबाद या एका मोर्चावर हल्ला केला होता तेंव्हा त्यांचे सैन्यबळ काश्मीर राज्याच्या एकूण सैन्यापेक्षादेखील अधिक होते. पाकिस्तानच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या जमातींमधील सुमारे २०००० टोळीवाल्यांना पाकिस्तानी सैन्याने शस्त्रे आणि नेतृत्व पुरवून, काश्मीरमध्ये घुसवले होते. त्यात ब्रिटिश सैनिकांची मदतही होतीच. काश्मीर सैन्यदलाच्या एकूण सैनिकांची संख्या होती केवळ १००००! आणि लखनपूर ते लडाख पर्यंत पसरलेल्या १००० किलोमीटर लांब सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. 

पुन्हा अफगाणिस्तानचा विचार केला तर, १२ ऑगस्ट रोजी तालिबानी सैनिक गझनीमध्ये म्हणजे काबूलपासून १५० किलोमीटर अंतरावर होते. १५ ऑगस्ट रोजी त्यांनी काबूल ताब्यात घेतले. म्हणजे केवळ ३ दिवसांच्या आत! त्याउलट, ७४ वर्षांपूर्वी, काश्मीर युद्धात काय घडले होते? मुझफ्फराबाद ते श्रीनगर अंतर होते १२५ किलोमीटर. परंतु, तेथपर्यंत पाकिस्तानी घुसखोर पोहोचूच शकले नाहीत. महाराजा हरिसिंगांच्या आदेशानुसार, 'बंदुकीतली  शेवटची गोळी झाडली जाईस्तोवर, आणि त्यानंतरही शेवटच्या सैनिकाच्या कुडीत प्राण असेतोवर' डोग्रा सैन्य लढले. ब्रिगेडियर राजेंद्रसिंह यांच्या हौतात्म्यानंतरही, ५ दिवसात पाकिस्तानी घुसखोर कशीबशी बारामुल्लापर्यंत, म्हणजे ८० किलोमीटरची मजल मारू शकले! 

मला राहून-राहून आश्चर्य याचेच वाटते की, एकविसाव्या शतकातल्या, आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या आणि बलाढ्य अमेरिकी सैन्याच्या छत्रछायेत दोन दशके राहिलेल्या अफगाण सैन्याने नेमके काय केले? अफगाणिस्तानचे अध्यक्ष तर अफगाणिस्तान सोडून निघूनच गेले.

मला हे सांगताना अभिमान वाटतो की माझ्या हयातीतच मला हा विरोधाभास पाहता आला. 

थोडी हळहळदेखील वाटते, आणि ती अशासाठी की ज्या कडव्या डोगरा सैनिकांनी काश्मीर वाचवण्यासाठी आपल्या जीवाचे रान केले, ते मात्र आज विस्मृतीत गेले आहेत. 

आणि म्हणूनच 'आझादी का अमृत महोत्सव' या कार्यक्रमातून त्या वीरांची आठवण आपण पुन्हा जागृत करीत आहोत, यासाठी पंतप्रधानांचे शतशः आभार.

मूळ इंग्रजी लेखक: अज्ञात 

मराठी अनुवाद:     कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

Wednesday, 21 July 2021

लोलाबच्या जंगलात ईदचा थरार!

आपल्या आयुष्यातले काही महत्त्वाचे दिवस आणि त्या दिवशीच्या घडामोडी आपल्याला वरचेवर आठवत राहतात. १९९८ सालचा बकरीईद म्हणजेच ईद-उल-झुहाचा सण माझ्यासाठी असाच  अविस्मरणीय दिवस आहे.   

त्या वेळी काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या '१५ राष्ट्रीय रायफल्स' (१५ RR) या बटालियनचा मी सेकंड-इन-कमांड (2IC) होतो. प्रत्येक युनिटमध्ये, कमांडिंग ऑफिसरच्या (CO च्या) खालोखाल 2IC हा सर्वात वरिष्ठ अधिकारी असतो.  

आमची '१५ राष्ट्रीय रायफल्स' ही बटालियन, दहशतवाद्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी १९९४ साली उभे केलेले एक विशेष युनिट होते. आमच्या बटालियनला बरीच टोपण नावे पडलेली होती.  पाकिस्तानी लष्कर आणि स्थानिक काश्मिरी लोक आमचा उल्लेख 'राष्ट्रीय राक्षस' असा करीत असत. 'रोते रहो फौज', 'राम राम फौज' अशीही काही नावे पाकिस्तान्यांनी आम्हाला ठेवली होती.   

१९९८ सालच्या ७/८ जुलै दरम्यानची ती  रात्र होती. दहशतवाद्यांसोबत बांदिपोरा येथे झालेल्या चकमकीनंतर आम्ही नुकतेच परतलो होतो. त्या चकमकीमध्ये, दोन दहशतवाद्यांना 'जहन्नुम' मध्ये धाडण्यात आम्हाला यश आले होते. आम्ही सर्व अधिकारी आणि आमचे कांछे अतिशय आनंदात होतो (गुरखा जवानाला  प्रेमाने 'कांछा' असे म्हटले जाते). COसाहेब रजेवर असल्याने त्यांच्या जागी मीच कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होतो. 

त्या रात्री यशस्वी होऊन बटालियनमध्ये परतताच, माझ्या खोलीत सर्वांनी जमून यश साजरे करायचे, असे आम्ही ठरवले. त्याच रात्री ब्राझील आणि नेदरलँड्स दरम्यान वर्ल्ड कप फुटबॉलचा उपांत्य फेरीचा सामनादेखील चालू होता. मॅच पाहता पाहता, काही चविष्ट स्नॅक्ससोबत  आम्ही मद्याचा आस्वाद घेत होतो. 

आमचे सेलिब्रेशन सुरु असतानाच, रात्री सुमारे दीड वाजता माझा रेडिओ ऑपरेटर अचानक माझ्या खोलीत रेडिओ सेटसह आला. त्याने मला सांगितले की बटालियनच्या 'एफ' कंपनीच्या कमांडर साहेबांकडून एक SOS कॉल आला आहे. मी रेडिओ कॉल घेतला आणि पलीकडचे शब्द ऐकून मला धक्काच बसला. कंपनी कमांडरने मला जे सांगितले ते अतिशय भयानक आणि कमालीचे चिंताजनक होते. 

"सर, माझ्या कंपनी पोस्टसमोर जवळ-जवळ १०० दहशतवादी आले आहेत आणि 'अल्लाहू अकबर' चा नारा देत आहेत."

'एफ' कंपनीची ही पोस्ट लोलाबच्या जंगलात होती. कंपनी कमांडर पुढे म्हणाला, "सर, माझ्या पायात ग्रेनेडचे छर्रे घुसले आहेत. माझ्या हाताखालचे वरिष्ठ सुभेदारसाहेबदेखील जखमी झालेले आहेत. दहशतवादी आमच्या पोस्टच्या हद्दीत घुसून चौफेर गोळीबार करीत आहेत. आम्हीही कडवा प्रतिकार करीत आहोत."

कंपनी कमांडरचे ते बोलणे ऐकून एक-दोन क्षण मी अक्षरशः स्तब्ध झालो. पण तिसऱ्याच क्षणी मी माझ्या बटालियनच्या अ‍ॅडजुटंटला (हाताखालच्या एका अधिकाऱ्याला) हुकूम दिला, "बटालियनच्या इतर सर्व कंपन्यांना 'एफ' कंपनीच्या मदतीकरिता सज्ज व्हायला सांग. शक्य तितक्या लवकर इतर कंपन्यानी एकत्रितपणे लोलाबच्या जंगलाकडे कूच करायचे आहे." 

'एफ' कंपनीचा कमांडर कॅप्टन श्रीनिवासन होता. आम्ही सगळे त्याला 'श्रीनी' या नावानेच ओळखत होतो. मी पुन्हा श्रीनीला रेडिओ कॉल लावला आणि म्हटले, "श्रीनी, मी इथून निघतोय. तोवर तुम्ही लढत राहा.  माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेतच."

एक दीर्घ श्वास घेऊन मी पुढे म्हणालो, "श्रीनी, माय डियर ... मी पोचेपर्यंत जिवंत राहा!" इतकेच बोलून, मी माझ्या क्यूआरटी (Quick  Reaction  Team) सह निघालो. 

आम्ही त्या जंगलात पोचलो तेंव्हा बरेच मॉर्टर बॉम्ब फुटण्याचे आवाज येत होते. एके४७ रायफलींच्या फैरी झडत होत्या. 'एफ' कंपनी ज्या टेकडीवर होती त्यावर चढायला आम्ही सुरुवात केली.

आम्हा सर्वांच्या अंगात बुलेटप्रूफ जॅकेट होते. हातात एके४७ रायफल आणि पाठीवर जास्तीचा दारुगोळाही होता. ते सर्व वजन अंगावर घेऊन, आणि त्या गडद अंधारात, शक्य तितक्या लवकर टेकडीवर चढायचा आम्ही प्रयत्न करीत होतो. अर्ध्या वाटेवर पोहोचेपर्यंत आम्हा सर्वांनाच धाप लागली होती. शरीर प्रचंड दमले होते. पण आम्हाला थांबण्याची इच्छाही होत नव्हती. श्रीनी आणि त्याच्या धाडसी कांछांची काय अवस्था झाली असेल याचा विचार आम्हाला थांबू देत नव्हता.  

पहाटेच्या सुमारास मॉर्टरचे स्फोट थांबले, पण एके४७ रायफल्सचे आवाज अधून-मधून येतच होते. आमच्यावरही  छुपा  गनिमी हल्ला होण्याची शक्यता असल्याने  आम्ही सावधगिरी बाळगूनच, पण शक्य तितक्या भराभर चढत चाललो होतो. पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार जवळ-जवळ थांबला. फक्त एखादा-दुसरा शॉट अधून-मधून ऐकू येत होता. 

आता मात्र मला प्रचंड भीती आणि दुःखाने ग्रासले. "श्रीनी आणि त्याच्या कंपनीचे कांछे काय अवस्थेत असतील? जिवंत तरी भेटतील की नाही?" एक ना दोन, अनेक दुष्ट विचार मनात तरळत होते. चिंतित मनानेच पण सर्व शक्तीनिशी आम्ही ती  टेकडी चढत राहिलो.  

काही वेळातच फटफटू लागले. अचानकच सर्वात पुढे चढत असलेला माझा एक कांछा गुरखाली भाषेत ओरडला, "कंपनी कमांडर शाब और सिनियर जेसीओ शाब मरेको छाई ना. कंपनी कमांडर शाब खडा भायेरा चिरुट खाय रहा छा." (कंपनी कमांडर साहेब आणि सिनियर जेसीओ मरण पावलेले नाहीत. कंपनी कमांडरसाहेब  सिगरेट पीत उभे आहेत.) 

हे ऐकून आम्हाला त्या परिस्थितीतही जवळ-जवळ हर्षवायूच झाला. आम्ही आमचा थकवा विसरलो आणि अक्षरशः धावतच उरलेली टेकडी चढून गेलो. पहाटे सहाच्या सुमारास आम्ही जेंव्हा टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो तेंव्हा, एखादे लहान मूल वडिलांना बिलगावे तशी श्रीनीने मला मिठी मारली, "तुम्ही पोहोचेपर्यंत मी जिवंत राहिलोय सर!" असे म्हणून तो आनंदाने आणि विजयाच्या उन्मादानेच, पण हमसाहमशी रडू लागला. मी त्याला थोपटत होतो. पण,  श्रीनी जिवंतपणे माझ्या मिठीत आहे यावर माझाच विश्वास बसत नव्हता. 

ताबडतोब मी त्याला विचारले, "परिस्थिती कशी आहे?" 

त्याने मला सविस्तर रिपोर्ट दिला. नाईक राजकुमार नावाचा एक शूर  एनसीओ  आम्ही गमावला होता. हातगोळ्यांचे छर्रे आणि एके४७ रायफल्सच्या गोळ्यांनी आठ जवान जखमी झाले होते, पण त्यांची प्रकृती स्थिर होती. स्वतः कॅप्टन श्रीनिवासनच्या आणि कंपनीच्या वरिष्ठ सुभेदारसाहेबांच्या पायात जखमा होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. 

श्रीनीने पुढे सांगितले की किमान आठ दहशतवाद्यांना त्यांनी निश्चितपणे ठार मारले होते. शिवाय, जंगलात आणखी मृतदेहांचा शोध सुरू होता. ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचे मृतदेह पडले होते तेथे त्याने मला नेले. चार अतिरेक्यांचे मृतदेह मिडीयम मशीनगन (एमएमजी) बंकरच्या समोर, अगदी एमएमजीच्या नळीच्या खालीच पडले होते.  एमएमजीमधून मारा करणार्‍या आमच्या एनसीओच्या हातावर गोळ्या लागल्या होत्या, परंतु त्याने गोळीबार थांबवला नव्हता. पोस्टपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर दहशतवाद्यांचे आणखी दोन मृतदेह आम्हाला सापडले. विशेष म्हणजे, आमच्या जवानांनी ठार केलेल्या त्या 'दहशतवाद्यां'पैकी एकजण मूळचा अफगाणी होता, आणि तीन जण तर चक्क पाकिस्तानी सैन्यातील शिपाई होते. त्यांच्या कपड्यांवर असलेले पाकिस्तानी ऑर्डनन्स फॅक्टरीचे शिक्के आणि त्यांच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रांवरून ही बाब सिद्ध झाली!

श्रीनीने मला सांगितले की, जेव्हा दहशतवाद्यांनी धार्मिक घोषणाबाजी सुरू केली, आणि गोळीबार करत ते पोस्टच्या हद्दीत घुसू लागले तेंव्हा 'एफ' कंपनीच्या जवानांनी कडवा प्रतिकार केला होता. दहशतवाद्यांची संख्या नीटशी समजत नव्हती. पण, ते ५०-६० पेक्षा कमी निश्चितच नव्हते. पुढे काही काळानंतर आम्हाला समजले की लोलाबच्या जंगलामध्ये आणखी काही दहशतवादी मृतावस्थेत सापडले होते. 

कॅप्टन श्रीनी, [पुढे ब्रिगेडियर श्रीनिवासन (सेवानिवृत्त)], व त्यांच्या शूरवीर कांछांनी त्या रात्री पराक्रमाची शर्थ केली. आमच्या जखमी जवानांना लोलाबच्या जंगलातून हलवून सुरक्षितपणे रुग्णालयात आणण्यात आणि दहशतवाद्यांचे मृतदेह बटालियन    मुख्यालयामध्ये नेण्यात 'ईद-उल-झुहा'चा तो संपूर्ण दिवस निघून गेला होता! 

लोलाबच्या जंगलाशी निगडित आणखी एक दुःखद आठवण म्हणजे, माझ्याच शाळेत शिकलेला, आणि शौर्य चक्र, व सेना मेडल विजेता, कर्नल संतोष महाडिक, याने पुढे २०१५ साली, त्याच जंगलात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करले. 

जय हिंद !

_______________________________

मूळ इंग्रजीअनुभव लेखक: कर्नल प्रताप जाधव (सेवानिवृत्त)

मराठी भावानुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

Friday, 30 April 2021

एक चावा आणि एक 'चावी' !

कमिशन घेऊन ज्या बटालियनमध्ये मी नुकताच रुजू झालो होतो ती, मराठा लाईट इन्फंट्रीची पहिली बटालियन, (1 MLI) "जंगी पलटण" या टोपण नावानेच अधिक ओळखली जाते. जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागात भारत-पाक सीमेवर खडतर सेवा बजावल्यानंतर आमची बटालियन पुणे येथे नुकतीच बदलीवर आलेली होती. सीमेवरील "फील्ड पोस्टिंग" करून आल्यानंतर आम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी "पीस पोस्टिंग" मिळणे स्वाभाविकच होते. परंतु, आम्हाला लवकरच पुन्हा फील्डवर जावे लागले.

ऑक्टोबर-नोव्हेंबर १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धाच्या दहा महिने आधी, म्हणजे  डिसेंबर १९६१ मध्ये, दमण आणि दीव हे प्रदेश पोर्तुगीजांच्या अधिपत्यातून मुक्त करण्यासाठी, भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय'  ही मोहीम हाती घेतली होती. याच 'ऑपरेशन विजय' मध्ये, एका स्वतंत्र मोहिमेसाठी आमच्या बटालियनची निवड झाली. दमण येथे असलेली पोर्तुगीज छावणी ताब्यात घेण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली गेली. 

ही कामगिरी अवघ्या ३६ तासात आम्ही फत्ते केली खरी, पण आमच्या व पोर्तुगीज सैन्यांची काही प्रमाणात जीवितहानीदेखील झाली.

'जंगी पलटण'चा सर्वात कनिष्ठ अधिकारी म्हणून, मला युद्धकैद्यांच्या शिबिराचा मुख्य अधिकारी (पी.ओ.डब्ल्यू. कॅंप कमांडंट) नेमण्यात आले. आमच्या कैदेत असलेले बहुसंख्य पोर्तुगीज सैनिक निव्वळ सक्तीच्या भरतीमुळे सैन्यात दाखल झालेले होते. कदाचित  त्यामुळेच, ते बऱ्यापैकी मवाळ प्रवृत्तीचे होते. परंतु, त्यांनी काहीही गडबड करू पाहिल्यास त्यांना रोखण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ते राहत असलेल्या बॅरॅकसमोर एक मोकळी जागा होती जिथे त्यांना दैनंदिन हजेरीसाठी (रोलकॉल मस्टर) उभे केले जाई. त्या मैदानामागेच त्यांचे भोजनगृह व भटारखाना होता आणि त्यांची राहण्याची व्यवस्था समोरील  बाजूस होती. 

दमणच्या यशस्वी मोहिमेनंतर, आमचे अभिनंदन करण्यासाठी, आणि ही कामगिरी आम्ही कशी पार पाडली ते जाणून घेण्यासाठी पाहुण्यांचा ओघ आमच्या बटालियनमध्ये सुरू झाला.

त्या महिन्याच्या अखेरीस, एका महत्वाच्या व्यक्तीने आमच्या बटालियनला भेट दिली. त्या अधिकाऱ्याची, भारत सरकारच्या त्या काळच्या सर्वोच्च सत्ताकेंद्राशी, (पंतप्रधानांशी) असलेली 'विशेष जवळीक', आणि कदाचित त्यामुळेच झालेली त्यांची नेत्रदीपक, पण अनपेक्षित पदोन्नती, हा एकंदर लष्करी वर्तुळात मोठाच चर्चेचा विषय होता. ती  व्यक्ती होती, 'चीफ ऑफ जनरल स्टाफ' (सी.जी.एस) लेफ्टनंट जनरल ब्रिजमोहन उर्फ 'बिज्जी' कौल!  

जनरल कौलसाहेबांच्या सैनिकी कारकीर्दीचा आलेख त्याकाळी अतिशय चढता होता. पण, पुढे वर्षभराच्या आत ते भलतेच कुप्रसिद्ध होणार होते याची कल्पना त्यावेळी कोणालाही असणे अशक्य होते. 

१९६२ साली, चीनच्या हातून झालेल्या, भारताच्या दारुण पराभवाकरता जी चांडाळचौकडी जबाबदार होती त्यापैकी एक, हे कौलसाहेब होते! 

जनरल कौलसाहेबांच्या आग्रहाखातर, त्या दिवशीच्या एकूण कार्यक्रमातील शेवटचा भाग म्हणून, पी.ओ.डब्ल्यू. कॅंपला त्यांची भेट ठरवली गेली होती. त्यानुसार, सर्व कैद्यांना 'व्हीआयपी'ला भेटण्यासाठी एका रांगेत उभे केलेले होते. पाहुण्यांचा संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतरच कैद्यांना जेवण दिले जाणार होते. एकूण कार्यक्रम लांबत गेल्याने कैद्यांना जेवणासाठी तिष्ठत ठेवणे भाग होते. अखेर, पाहुणे कैद्यांच्या भेटीसाठी आले आणि सर्व कैद्यांनी त्यांना सलामी दिली. रिवाजाप्रमाणे, कैद्यांना उद्देशून जनरलसाहेब चार शब्द बोलले. परंतु, बहुसंख्य कैद्यांना इंग्रजी समजत नसल्यामुळे ते भाषण त्यांच्या डोक्यावरूनच गेले असावे. 

भाषण संपताच जनरल कौल आपल्या जीपच्या दिशेने निघाले. पण, जीपमध्ये बसण्यापूर्वी ते किंचित थबकले व सर्व अधिकाऱ्यांशी हस्तांदोलन करू लागले. तेवढ्यात, रस्त्यावरचे एक भटके कुत्रे अचानकच आले आणि कुणाला काही कळण्याच्या आत जनरलसाहेबांच्या पायाचा चावा घेऊन पळून गेले. चावा तसा काही फार मोठा नव्हता, पण त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. प्रत्येकजण जाऊन जनरलसाहेबांभोवती जणू पिंगा घालू लागला. कारण, इथे कुणा 'समर्थाघरचे श्वान' नव्हे तर, एक साधे, भटके श्वान येऊन, प्रत्यक्ष 'समर्थां'नाच चावले होते!

आमच्या कमांडिंग ऑफिसर साहेबांनी कसनुसं होऊन दिलगिरी व्यक्त केली. पुढे त्यांनी जनरलसाहेबांना हेही आश्वासन दिले की त्या भटक्या कुत्र्यावर नजर ठेवली जाईल आणि जर त्या कुत्र्याच्या हालचाली विचित्र वाटल्या तर ती खबर तातडीने जनरलसाहेबांना दिली जाईल!

जनरलसाहेब निघून जाताच, बटालियनच्या सर्व अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावली गेली. 

अचानक ते कुत्रे तिथे कसे काय घुसले आणि दुर्दैवाने, नेमके जनरलसाहेबांनाच का चावले असावे, याचा उहापोह सुरु झाला. सर्वात ज्युनियर अधिकारी असलो तरी चर्चेत माझेही योगदान असावे असे मला वाटले. म्हणून मग दोन आण्याचे का असेनात, पण माझे दोन मुद्दे मी मांडलेच. 

माझा पहिला मुद्दा असा होता की, कुत्र्यांच्या घ्राणेंद्रियांची शक्ती मनुष्याहून अधिक तीक्ष्ण असते. म्हणूनच, एखाद्या वाईट माणसाचा विशिष्ट वास कुत्र्यांच्या नाकाला आपसूक जाणवतो. जनरल कौलसाहेब कसे आहेत हे त्या कुत्र्याने बरोब्बर ओळखल्यानेच कुत्रे त्यांना चावले असावे!   

माझा दुसरा मुद्दा असा होता की, त्या दिवशी कैद्यांच्या जेवणाला खूपच उशीर झालेला होता. रोज जेवताना कैदी त्या कुत्र्यासमोर पावाचे तुकडे टाकत, हेही मी पूर्वी पाहिले होते. आज ज्या माणसामुळे आपल्या जेवणाला उशीर झाला त्याला कडकडून चावावे असे त्या कुत्र्याला वाटणे स्वाभाविक होते!

जेमतेम विशीतला माझ्यासारखा कोवळा सेकंड लेफ्टनंट असलीच काहीतरी बालिश बडबड करणार, हे सगळ्यांनी गृहीत धरलेले असल्याने, माझे मुद्दे त्वरित केरात टाकण्यात आले. 

मात्र, अशी घटना पुन्हा घडू नये याची खबरदारी घेण्याचा हुकूम मला देण्यात आला. शिवाय, त्या कुत्र्याच्या हालचालींचे निरीक्षण करून, त्यासंबंधीचा अहवाल जनरल कौलसाहेबांच्या मुख्यालयात दररोज सिग्नलने (तारेने) पाठवायचे कामही माझ्याकडेच आले! 

मी त्या कुत्र्यावर बारीक लक्ष ठेवून होतो. कुत्रा पिसाळलेला नाही याची खात्री करूनच, "कुत्रा ठीक आहे" असा सिग्नल पुढचे ४-५ दिवस मी नित्यनेमाने दिल्लीला पाठवीत राहिलो. आठवड्याच्या शेवटी मात्र, जरा खोडसाळपणेच, परंतु, वरकरणी अजिबात आक्षेपार्ह वाटणार नाही असा एक सिग्नल मी तयार केला,

"कुत्रा अजूनही ठीक आहे. जनरलसाहेब कसे आहेत?"

मी धाडून दिलेल्या सिग्नलची कार्यालयीन प्रत जेंव्हा माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पाहिली तेंव्हा बटालियनमध्ये एकच हलकल्लोळ माजला. माझ्या या जादा शहाणपणाचा आता काय परिणाम भोगावा लागणार? असा प्रश्न साहजिकच सगळ्यांना पडला. प्रत्यक्षात मात्र, मी मारलेली 'चावी' दिल्लीत अगदी नेमक्या कुलुपाला लागली असावी असे दिसले.

उत्तरादाखल एकाच ओळीचा एक त्रोटक सिग्नल दिल्लीहून आला. 

"याउपर याविषयी कोणताही अहवाल आमच्याकडे पाठविण्याची गरज नाही!" 

बटालियनमधल्या सगळ्यांचा जीव तर भांड्यात पडलाच, पण माझी टेहळणी आणि ससेमिरा थांबल्याने, त्या कुत्र्यानेही हुश्श्श म्हटले असणार यात शंका नाही! 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मूळ इंग्रजी अनुभवलेखक : लेफ्टनंट जनरल विजय ओबेरॉय [सेवानिवृत्त]

मराठी भावानुवाद  : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त]

मोबाईल व व्हॉट्सऍप क्रमांकः ९४२२८७०२९४

ईमेल : abbapat@gmail.com