Wednesday, 21 July 2021

लोलाबच्या जंगलात ईदचा थरार!

आपल्या आयुष्यातले काही महत्त्वाचे दिवस आणि त्या दिवशीच्या घडामोडी आपल्याला वरचेवर आठवत राहतात. १९९८ सालचा बकरीईद म्हणजेच ईद-उल-झुहाचा सण माझ्यासाठी असाच  अविस्मरणीय दिवस आहे.   

त्या वेळी काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या '१५ राष्ट्रीय रायफल्स' (१५ RR) या बटालियनचा मी सेकंड-इन-कमांड (2IC) होतो. प्रत्येक युनिटमध्ये, कमांडिंग ऑफिसरच्या (CO च्या) खालोखाल 2IC हा सर्वात वरिष्ठ अधिकारी असतो.  

आमची '१५ राष्ट्रीय रायफल्स' ही बटालियन, दहशतवाद्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी १९९४ साली उभे केलेले एक विशेष युनिट होते. आमच्या बटालियनला बरीच टोपण नावे पडलेली होती.  पाकिस्तानी लष्कर आणि स्थानिक काश्मिरी लोक आमचा उल्लेख 'राष्ट्रीय राक्षस' असा करीत असत. 'रोते रहो फौज', 'राम राम फौज' अशीही काही नावे पाकिस्तान्यांनी आम्हाला ठेवली होती.   

१९९८ सालच्या ७/८ जुलै दरम्यानची ती  रात्र होती. दहशतवाद्यांसोबत बांदिपोरा येथे झालेल्या चकमकीनंतर आम्ही नुकतेच परतलो होतो. त्या चकमकीमध्ये, दोन दहशतवाद्यांना 'जहन्नुम' मध्ये धाडण्यात आम्हाला यश आले होते. आम्ही सर्व अधिकारी आणि आमचे कांछे अतिशय आनंदात होतो (गुरखा जवानाला  प्रेमाने 'कांछा' असे म्हटले जाते)COसाहेब रजेवर असल्याने त्यांच्या जागी मीच कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होतो. 

त्या रात्री यशस्वी होऊन बटालियनमध्ये परतताच, माझ्या खोलीत सर्वांनी जमून यश साजरे करायचे, असे आम्ही ठरवले. त्याच रात्री ब्राझील आणि नेदरलँड्स दरम्यान वर्ल्ड कप फुटबॉलचा उपांत्य फेरीचा सामनादेखील चालू होता. मॅच पाहता पाहता, काही चविष्ट स्नॅक्ससोबत  आम्ही मद्याचा आस्वाद घेत होतो. 

आमचे सेलिब्रेशन सुरु असतानाच, रात्री सुमारे दीड वाजता माझा रेडिओ ऑपरेटर अचानक माझ्या खोलीत रेडिओ सेटसह आला. त्याने मला सांगितले की बटालियनच्या 'एफ' कंपनीच्या कमांडर साहेबांकडून एक SOS कॉल आला आहे. मी रेडिओ कॉल घेतला आणि पलीकडचे शब्द ऐकून मला धक्काच बसला. कंपनी कमांडरने मला जे सांगितले ते अतिशय भयानक आणि कमालीचे चिंताजनक होते. 

"सर, माझ्या कंपनी पोस्टसमोर जवळ-जवळ १०० दहशतवादी आले आहेत आणि 'अल्लाहू अकबर' चा नारा देत आहेत."

'एफ' कंपनीची ही पोस्ट लोलाबच्या जंगलात होती. कंपनी कमांडर पुढे म्हणाला, "सर, माझ्या पायात ग्रेनेडचे छर्रे घुसले आहेत. माझ्या हाताखालचे वरिष्ठ सुभेदारसाहेबदेखील जखमी झालेले आहेत. दहशतवादी आमच्या पोस्टच्या हद्दीत घुसून चौफेर गोळीबार करीत आहेत. आम्हीही कडवा प्रतिकार करीत आहोत."

कंपनी कमांडरचे ते बोलणे ऐकून एक-दोन क्षण मी अक्षरशः स्तब्ध झालो. पण तिसऱ्याच क्षणी मी माझ्या बटालियनच्या अ‍ॅडजुटंटला (हाताखालच्या एका अधिकाऱ्याला) हुकूम दिला, "बटालियनच्या इतर सर्व कंपन्यांना 'एफ' कंपनीच्या मदतीकरिता सज्ज व्हायला सांग. शक्य तितक्या लवकर इतर कंपन्यानी एकत्रितपणे लोलाबच्या जंगलाकडे कूच करायचे आहे." 

'एफ' कंपनीचा कमांडर कॅप्टन श्रीनिवासन होता. आम्ही सगळे त्याला 'श्रीनी' या नावानेच ओळखत होतो. मी पुन्हा श्रीनीला रेडिओ कॉल लावला आणि म्हटले, "श्रीनी, मी इथून निघतोय. तोवर तुम्ही लढत राहा.  माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेतच."

एक दीर्घ श्वास घेऊन मी पुढे म्हणालो, "श्रीनी, माय डियर ... मी पोचेपर्यंत जिवंत राहा!" इतकेच बोलून, मी माझ्या क्यूआरटी (Quick  Reaction  Team) सह निघालो. 

आम्ही त्या जंगलात पोचलो तेंव्हा बरेच मॉर्टर बॉम्ब फुटण्याचे आवाज येत होते. एके४७ रायफलींच्या फैरी झडत होत्या. 'एफ' कंपनी ज्या टेकडीवर होती त्यावर चढायला आम्ही सुरुवात केली.

आम्हा सर्वांच्या अंगात बुलेटप्रूफ जॅकेट होते. हातात एके४७ रायफल आणि पाठीवर जास्तीचा दारुगोळाही होता. ते सर्व वजन अंगावर घेऊन, आणि त्या गडद अंधारात, शक्य तितक्या लवकर टेकडीवर चढायचा आम्ही प्रयत्न करीत होतो. अर्ध्या वाटेवर पोहोचेपर्यंत आम्हा सर्वांनाच धाप लागली होती. शरीर प्रचंड दमले होते. पण आम्हाला थांबण्याची इच्छाही होत नव्हती. श्रीनी आणि त्याच्या धाडसी कांछांची काय अवस्था झाली असेल याचा विचार आम्हाला थांबू देत नव्हता.  

पहाटेच्या सुमारास मॉर्टरचे स्फोट थांबले, पण एके४७ रायफल्सचे आवाज अधून-मधून येतच होते. आमच्यावरही  छुपा  गनिमी हल्ला होण्याची शक्यता असल्याने  आम्ही सावधगिरी बाळगूनच, पण शक्य तितक्या भराभर चढत चाललो होतो. पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार जवळ-जवळ थांबला. फक्त एखादा-दुसरा शॉट अधून-मधून ऐकू येत होता. 

आता मात्र मला प्रचंड भीती आणि दुःखाने ग्रासले. "श्रीनी आणि त्याच्या कंपनीचे कांछे काय अवस्थेत असतील? जिवंत तरी भेटतील की नाही?" एक ना दोन, अनेक दुष्ट विचार मनात तरळत होते. चिंतित मनानेच पण सर्व शक्तीनिशी आम्ही ती  टेकडी चढत राहिलो.  

काही वेळातच फटफटू लागले. अचानकच सर्वात पुढे चढत असलेला माझा एक कांछा गुरखाली भाषेत ओरडला, "कंपनी कमांडर शाब और सिनियर जेसीओ शाब मरेको छाई ना. कंपनी कमांडर शाब खडा भायेरा चिरुट खाय रहा छा." (कंपनी कमांडर साहेब आणि सिनियर जेसीओ मरण पावलेले नाहीत. कंपनी कमांडरसाहेब  सिगरेट पीत उभे आहेत.) 

हे ऐकून आम्हाला त्या परिस्थितीतही जवळ-जवळ हर्षवायूच झाला. आम्ही आमचा थकवा विसरलो आणि अक्षरशः धावतच उरलेली टेकडी चढून गेलो. पहाटे सहाच्या सुमारास आम्ही जेंव्हा टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो तेंव्हा, एखादे लहान मूल वडिलांना बिलगावे तशी श्रीनीने मला मिठी मारली, "तुम्ही पोहोचेपर्यंत मी जिवंत राहिलोय सर!" असे म्हणून तो आनंदाने आणि विजयाच्या उन्मादानेच, पण हमसाहमशी रडू लागला. मी त्याला थोपटत होतो. पण,  श्रीनी जिवंतपणे माझ्या मिठीत आहे यावर माझाच विश्वास बसत नव्हता. 

ताबडतोब मी त्याला विचारले, "परिस्थिती कशी आहे?" 

त्याने मला सविस्तर रिपोर्ट दिला. नाईक राजकुमार नावाचा एक शूर  एनसीओ  आम्ही गमावला होता. हातगोळ्यांचे छर्रे आणि एके४७ रायफल्सच्या गोळ्यांनी आठ जवान जखमी झाले होते, पण त्यांची प्रकृती स्थिर होती. स्वतः कॅप्टन श्रीनिवासनच्या आणि कंपनीच्या वरिष्ठ सुभेदारसाहेबांच्या पायात जखमा होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. 

श्रीनीने पुढे सांगितले की किमान आठ दहशतवाद्यांना त्यांनी निश्चितपणे ठार मारले होते. शिवाय, जंगलात आणखी मृतदेहांचा शोध सुरू होता. ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचे मृतदेह पडले होते तेथे त्याने मला नेले. चार अतिरेक्यांचे मृतदेह मिडीयम मशीनगन (एमएमजी) बंकरच्या समोर, अगदी एमएमजीच्या नळीच्या खालीच पडले होते.  एमएमजीमधून मारा करणार्‍या आमच्या एनसीओच्या हातावर गोळ्या लागल्या होत्या, परंतु त्याने गोळीबार थांबवला नव्हता. पोस्टपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर दहशतवाद्यांचे आणखी दोन मृतदेह आम्हाला सापडले. विशेष म्हणजे, आमच्या जवानांनी ठार केलेल्या त्या 'दहशतवाद्यां'पैकी एकजण मूळचा अफगाणी होता, आणि तीन जण तर चक्क पाकिस्तानी सैन्यातील शिपाई होते. त्यांच्या कपड्यांवर असलेले पाकिस्तानी ऑर्डनन्स फॅक्टरीचे शिक्के आणि त्यांच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रांवरून ही बाब सिद्ध झाली!

श्रीनीने मला सांगितले की, जेव्हा दहशतवाद्यांनी धार्मिक घोषणाबाजी सुरू केली, आणि गोळीबार करत ते पोस्टच्या हद्दीत घुसू लागले तेंव्हा 'एफ' कंपनीच्या जवानांनी कडवा प्रतिकार केला होता. दहशतवाद्यांची संख्या नीटशी समजत नव्हती. पण, ते ५०-६० पेक्षा कमी निश्चितच नव्हते. पुढे काही काळानंतर आम्हाला समजले की लोलाबच्या जंगलामध्ये आणखी काही दहशतवादी मृतावस्थेत सापडले होते. 

कॅप्टन श्रीनी, [पुढे ब्रिगेडियर श्रीनिवासन (सेवानिवृत्त)], व त्यांच्या शूरवीर कांछांनी त्या रात्री पराक्रमाची शर्थ केली. आमच्या जखमी जवानांना लोलाबच्या जंगलातून हलवून सुरक्षितपणे रुग्णालयात आणण्यात आणि दहशतवाद्यांचे मृतदेह बटालियन    मुख्यालयामध्ये नेण्यात 'ईद-उल-झुहा'चा तो संपूर्ण दिवस निघून गेला होता! 

लोलाबच्या जंगलाशी निगडित आणखी एक दुःखद आठवण म्हणजे, माझ्याच शाळेत शिकलेला, आणि शौर्य चक्र, व सेना मेडल विजेता, कर्नल संतोष महाडिक, याने पुढे २०१५ साली, त्याच जंगलात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करले. 

जय हिंद !

_______________________________

मूळ इंग्रजीअनुभव लेखक: कर्नल प्रताप जाधव (सेवानिवृत्त)

मराठी भावानुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

16 comments:

  1. Thrilling story nicely covers sir

    ReplyDelete
  2. Thrilling story nicely covered sir

    ReplyDelete
  3. Excellent narration/translation!!!

    ReplyDelete
  4. ग्रेट! आपल्या शूर आणि धाडसी जवानांचा अभिमान वाटतो.🙏

    ReplyDelete
  5. Pradip Narsale23 July 2021 at 09:03

    Goosebumps...

    ReplyDelete
  6. बापरे... सर्व वर्णन वाचताना अंगावर काटा आणि हृदयात धडधड... तुमचे आणि सर्व साथीदारांचे अभिनंदन.. छान असतात तुमच्या गोष्टी, असेच लिहिते राहा.. जयहिंद..

    ReplyDelete
  7. आम्हाला जवानांबद्दल त्यांच्या शौर्याबद्दल कायम अभिमान वाटत असतो.या त्यांच्या त्यागाचे त्यांनी सांडलेल्या रक्ताची राज्यकर्त्यांनी आणि सामान्य जनतेने ठेवायला हवी.१ला मान जवानांचाच.रक्षण कर्यांना कधी विसरु नये.

    ReplyDelete