Friday, 3 December 2021

एअर पॉवर म्हणजे नक्की काय?

१७ डिसेंबर १९०३ रोजी, राईट बंधूंनी गुरुत्वाकर्षणाचे नियम अक्षरशः धाब्यावर बसवले आणि गगनाला गवसणी घातली. संपूर्णतः मानवी नियंत्रणाखाली केलेले इतिहासातले ते पहिले-वहिले उड्डाण होते. 

केवळ १२ सेकंदाच्या त्या उड्डाणामध्ये, जमिनीपासून फक्त दहा फूट उंचीवरून उडत, ते विमान जेमतेम एकशेवीस फूट अंतर जाऊ शकले. परंतु भविष्यामध्ये, राने-वने, दऱ्या-डोंगरच नव्हे तर अथांग समुद्रांवरूनही झेप घेऊन पृथ्वीला संकुचित करण्याची क्षमता त्या विमानाने जगाला दिली. 

त्या दिवशी वाऱ्याच्या एका झोताने त्या विमानाला भिरकावून त्याचे तुकडे-तुकडे केले खरे, पण उड्डाणाचे स्वप्न मात्र अभंग राहिले. त्यानंतर काही दशकातच मानवाने आकाश जिंकून अवकाशात झेप घेतली. 

राईट बंधूंच्या त्या पहिल्या उड्डाणाची आठवण म्हणून, त्याच विमानाच्या तुटक्या पंखाचा एक कापडी तुकडा खिशात घेऊन, १९६९ मध्ये नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला होता!

१९६२ साली विमानातून पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अमेरिकन वैमानिक जॉन ग्लेन याने वयाच्या ७७व्या वर्षी, १९९८ मध्ये पुन्हा तोच पराक्रम केला. त्याच्याही खिशात राईट बंधूंच्या विमानाचा एक तुकडा होता!

एप्रिल २०२१ मध्ये नासाने आपले 'इंजेन्युइटी' नावाचे यान मंगळावर उतरवले. राईट बंधूंच्या विमानाचा एक तुकडा त्या अवकाशयांनामध्येही होताच !    

१९०३ सालच्या त्या ऐतिहासिक उड्डाणाचे महत्व सैन्यदलांना समजायला अजिबात वेळ लागला नाही. तोपावेतो फक्त जमीन आणि समुद्रापर्यंत सीमित असलेले युद्धक्षेत्र आता आसमंतापर्यंत विस्तारणार होते. उंची, वेग आणि पल्ला, या तिन्ही बाबतीत सरस असलेले हे 'हवाई खेळणे' एक अत्यंत प्रभावी हत्यार ठरू शकणार होते! 

शत्रुचे सैन्य किती आहे आणि ते कसे तैनात केलेले आहे ही माहिती अत्यंत महत्वाची असते. म्हणूनच, हवाई टेहळणीसाठी विमानांचा वापर सर्वप्रथम सुरु झाला. अर्थातच, त्या टेहळणी विमानांवर शत्रुसैन्य गोळ्या झाडत असे, पण ते व्यर्थच होते. कारण, वेगवान विमानांना टिपणे सोपे निश्चितच नसते. 

त्या काळच्या, लाकूड आणि कापड वापरून बनवलेल्या नाजूक विमानांतून फक्त छोटे बॉम्ब टाकणे शक्य असल्याने शत्रूचे फारसे नुकसान होत नसे. पण मोठा आवाज करीत विमाने अचानक येत आणि काही कळायच्या आत थोडाफार अग्निवर्षाव करून निघूनही जात. शत्रूच्या मुलखात दूरपर्यंत पोहोचण्याची क्षमता असल्याने, शत्रुसैन्याचे मनोबल खच्ची करण्याचे आणि तेथील जनतेच्या छातीत धडकी भरवण्याचे काम विमाने चोख बजावत असत. 

लवकरच, दोन्ही बाजूंच्या विमानांचे आपसातले हवाई युद्धही सुरु झाले. कारण, सैन्यदलांच्या हे लक्षात आले की 'हवाईक्षमता ज्याची खरी, तोच पृथ्वीवर राज्य करी'!

दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या फौजांनी पश्चिमी युरोप अक्षरशः विजेच्या वेगाने पादाक्रांत करत इंग्लंडची खाडी गाठली होती. पण त्यापुढचे २१ मैल समुद्रमार्गे पार करून इंग्लंडवर हल्ला करण्यासाठी जर्मनीच्या 'लुफ्टवाफ्फ' या हवाईदलाला इंग्लंडच्या 'रॉयल एअर फोर्स' (RAF) ला नमवून 'हवाई वर्चस्व' (Air Superiority) मिळवणे भाग होते, जे त्यांना शेवटपर्यंत जमले नाही. तसे झाले असते तर मात्र दुसऱ्या महायुद्धाचा आणि संपूर्ण जगाचा इतिहास काही वेगळाच झाला असता!

RAF च्या वैमानिकांचे तोंडभरून कौतुक करताना इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणाले होते, "मूठभर लोकांनी, इतक्या मोठ्या जनसमुदायावर एवढे प्रचंड उपकार आजपर्यंत कधीही केले नसतील!" 

हवाईदल म्हणजे जणू पायदळाच्या तोफखान्याचेच एक शेपूट असल्याचा गैरसमज पूर्वी लोकांच्या मनात होता. काही प्रमाणात तो गैरसमज आजही प्रचलित आहे. प्रत्यक्षात मात्र, हवाईदलाच्या कार्याची आणि एकंदर क्षमतेची व्याप्ती खूप मोठी आहे. 

दुसऱ्या महायुद्धात सागरी चकमकींमध्ये हवाईदलांनीही भाग घेऊन मोठीच कामगिरी बजावली. केवळ सागरी सामर्थ्याच्या बळावर आपापल्या देशांचे साम्राज्य जगभर पसरवणाऱ्या युद्धनौका, विमानातून अचूक टाकलेल्या बॉम्बमुळे सागराच्या उदरात गडप होऊ लागल्या! 

युद्धसामग्री तयार करणाऱ्या जर्मन कारखान्यांना वीज पुरवणारी मोठमोठी धरणे RAF च्या वैमानिकांनी उद्ध्वस्त केल्यामुळे दुसऱ्या महायुद्धात जर्मन युद्धक्षमतेचे कंबरडे मोडले होते!

जपानच्या भूमीवर अमेरिकन सैनिकाचे पाऊल पडायच्याही आधी अमेरिकेने विमानातून दोन अणुबॉम्ब टाकून जपानला शरणागती पत्करायला भाग पाडले होते. 

असंख्य सामरिक बलस्थाने असूनही हवाईदलाच्या खऱ्याखुऱ्या क्षमतेबाबत जनमानसामध्ये संदिग्धताच दिसते. विन्स्टन चर्चिल स्वतःच म्हणाले होते, "हवाईदलाच्या युद्धक्षमतेचा नेमका अंदाज बांधणे खूपच कठीण आहे." 

अलीकडेच आणखी कुणीतरी असेही म्हणून ठेवले आहे, "हवाईदलाची युद्धक्षमता म्हणजे, नवीन पिढीच्या प्रणयाराधनेसारखीच आहे... "  

कुणी काहीही म्हणो, पण हवाई ताकद ही एखाद्याला अतिशय गर्भगळित करणारी किंवा अतिशय उल्हसित करणारीही असू शकते. अर्थातच, विमानातून सोडले गेलेले क्षेपणास्त्र तुमच्या दिशेने येत आहे की तुमच्यापासून दूर जाणाऱ्या त्या अस्त्राचे अग्निपुच्छ तुम्ही पाहत आहात, यावर ते अवलंबून असेल! 

१९७१ च्या भारत-पाक युद्धात, पूर्व पाकिस्तानवरील संपूर्ण आकाशावर भारतीय वायुसेनेने वर्चस्व मिळवलेले होते. म्हणूनच भारतीय नौदल आणि पायदळाला चहूबाजूंनी ढाक्यापर्यंत मुसंडी मारता आली. केवळ चौदा दिवसात भारताने पाकिस्तानला सपशेल पराभूत केले, ९०००० पाकिस्तानी युद्धकैदी ताब्यात घेतले आणि बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ते याचमुळे!

भारतीय वायुदलाच्या विजयगाथेची एक लेखमाला आपल्यापुढे सादर होत आहे, त्या मालेतले हे पहिले पुष्प ! 


मूळ इंग्रजी लेखक: विंग कमांडर अविनाश चिकटे (सेवानिवृत्त) www.avinashchikte.com 
'How India Used Air Power In Bangladesh Liberation War In 1971'
हा लेख खालील लिंकवर प्रकाशित झाला आहे. 

मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने)


27 comments:

  1. खूप छान वर्णन केले आहे.

    Waiting for next...

    ReplyDelete
  2. Wah Wah Wah kya Baat hai, salute to the Indian Air Force for their commendable Task, and proud of you my fellow Ajinkyan classmates Avinash and Anand

    ReplyDelete
  3. Good. आनंद एकदा सैन्य दलातील अनुभवावर पण लिहायला हरकत नाही. वाचायला आवडेल.

    ReplyDelete
  4. Graphic description which has been commendably translated by you Colonel. I am eager to read subsequent parts of the narration. Hail Indian Air Force which really touches the sky with glory. Stories of our Gnats killing Pak Sabre jets are folklore of 71 war.
    Milind Ranade

    ReplyDelete
  5. छान अनुवाद केला आहे

    ReplyDelete
  6. Nice narration sir.. After long time🇮🇳👌

    ReplyDelete
  7. उत्तम लेख.. सुगम अनुवाद!

    ReplyDelete
  8. सुरेख आणि सहज अनुवाद. भारतीय वायुदलाची विजयगाथा वाचायला मिळणार याचा आनंद आणि उत्कंठा तर खूपच आहे.
    धन्यवाद सर🙏

    ReplyDelete
  9. खूप छान वर्णन केले व ऐतिहासिक माहिती दिली आहे.

    ReplyDelete
  10. Great presentation,
    This has educational &military value,I wish if this chain of posts is published as tracts & kept for sale at NWM Pune,Bhopal&regimental
    With AF & Naval museums,it will reach to greater diversity,some corporates could fund it through CSR,after sale they could have new edition,profit could go to museum as gift,
    Ajinkyans OBSSA could publish this chain.
    All the best.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks. 🙏
      Your name has not appeared in the comment.
      Would have liked to know who this comment is from.

      Delete
  11. हवाई ताकद ....अतिशय समर्पक वर्णन

    ReplyDelete
  12. बापट साहेब तुमच्या सुरेख अनुवादामुळे राईट बंधूंपासून विमानांचा वापर कसा होत गेला, युद्धातील विमानांचे महत्व या गोष्टी समजल्या. आम्हा सामान्य लोकांना तिन्ही संरक्षण दलांबद्दल खूप कुतूहल असते. तुमच्या लेख माले मुळे ज्ञानात भर पडेल. तुम्हाला पुढील लिखाणासाठी शुभेछ्या! लेख आवडला.

    ReplyDelete
  13. श्री जयंतजी यांना मम ! धन्यवाद कर्नल साहेब .

    ReplyDelete
  14. Very nicely covered sir. Many facts were not known. Thanks for update

    ReplyDelete