१९७१ मध्ये पाकिस्तान शिजवीत असलेला 'खयाली पुलाव' किती 'खमंग' होता याचा विचार आज केला की खूपच करमणूक होते. काही नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एक पाकिस्तानी जनरलसाहेब असे म्हणाले होते की, "आम्ही लोंगेवालामध्ये नाश्ता करू, दुपारचे भोजन रामगढमध्ये घेऊ, आणि रात्रीचा खाना जैसलमेरमध्ये!"
लोंगेवालामध्ये नाश्ता, भोजन रामगढमध्ये, आणि रात्रीचा खाना जैसलमेरमध्ये! |
पाकिस्तानने ३ डिसेंबर १९७१ संध्याकाळच्या हवाई हल्ल्यांसाठी निवडलेल्या ठिकाणांमध्ये जोधपूरचा समावेश होता पण जैसलमेरच्या हवाई तळाकडे पाकिस्तानने लक्षही दिले नव्हते. कदाचित पाकिस्तानी हवाईदलाचा असा कयास असावा की, जैसलमेरला भारताचे एकही फायटर विमान नसणार, आणि म्हणूनच त्यावर शक्ती खर्चण्यात अर्थच नाही. त्यांच्या पायदळाचाही कदाचित तोच अंदाज होता.
पण असे अंदाज बांधताना, हवाई शक्तीचे एक महत्वाचे बलस्थान लक्षात घ्यायला पाकिस्तान विसरला, आणि ते म्हणजे 'वेग'!
कोणत्याही हवाईतळावरून आकाशात झेप घ्यायला आणि इच्छित ठिकाणी पोहोचायला विमानांना कितीसा वेळ लागतो? फक्त काही तास!
पाकिस्तानी हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे ठाऊकच नव्हते असे कसे म्हणायचे? तरीही त्यांनी त्यांच्या पायदळाला योग्य सल्ला का दिला नसावा, हे एक कोडेच आहे.
कदाचित, त्यांच्या योजनेप्रमाणे -नव्हे, स्वप्नरंजनाप्रमाणे- त्यांची फौज एका दिवसातच जैसलमेर काबीज करणार असल्याने, तेथील धावपट्टी त्यांना स्वतःला आयती वापरायला मिळावी म्हणून त्यावर हल्ला केला नसेल!
त्यांच्या विचारांची दिशा काहीही असली तरी वस्तुस्थिती अशी होती की, ४ डिसेंबरच्या रात्री लोंगेवालावर हल्ला करणार असल्याची खबर पाकिस्तानी पायदळाने स्वतःच्याच हवाईदलाला २ डिसेंबरपर्यंत दिली नव्हती!
अर्थातच, २ डिसेंबरला पाकिस्तानी हवाईदलाने कानावर हात ठेवत सांगितले की, तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याने, ४ डिसेंबरच्या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी पायदळाला हवाई सुरक्षा मिळू शकणार नाही!
नोकरशाहीच्या लाल फितीचे यापेक्षा समर्पक उदाहरण आणखी कुठे सापडेल?
पश्चिमेकडची अधिकाधिक जमीन बळकावायची पाक युद्धनीती होती. त्यामागचा हेतू असा, की युद्धानंतर होणाऱ्या तहाच्या वाटाघाटींमध्ये हवी तशी घासाघीस करून, पूर्वेकडे भारताने जिंकलेला भूभाग तो परत मिळवू शकला असता. अशी आक्रमक नीती अवलंबायचे जर ठरलेले होते, तर दोन दिवसांची पूर्वसूचना मिळूनही, पायदळाच्या आक्रमणादरम्यान "हवाई सुरक्षा पुरवण्यास आम्ही असमर्थ आहोत", असे त्यांचे हवाईदल खुशाल कसे सांगते?
आणि इतके सगळे होऊनदेखील, पायदळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठरवलेली योजना - किंवा पाहिलेली स्वप्नसृष्टी - त्यांना इतकी महत्वाची वाटली की त्यांनी चक्क हवाई सुरक्षेविनाच या युद्धात उतरायचे ठरवले!
असे करताना पुन्हा युद्धनीतीचे तेच महत्वाचे सूत्र पाकिस्तानी विसरले,
'हवाई क्षमता ज्याची खरी, तोच पृथ्वीवर राज्य करी!'
पाकिस्तानी सैन्यदलांच्या या अज्ञानाला, किंवा त्यांच्या पोकळ उद्दामपणाला काय म्हणावे हेच समजत नाही.
याउलट, पूर्वेकडच्या आकाशावर भारतीय वायुसेनेने मिळवलेले वर्चस्व लक्षात घेतले तर सहज समजते की, आपल्या पायदळाला, केवळ ११ दिवसात, पूर्व पाकिस्तानाची राजधानी ढाक्यापर्यंत मुसंडी कोणत्या जोरावर मारता आली असेल!
जैसलमेर येथे भारतीय वायुसेनेचा एक सीमावर्ती तळ होता. तेथील धावपट्टी युद्धासाठी सदैव सज्ज ठेवण्याकरता काही संसाधने आणि थोडे वायुसैनिक तेथे तैनात होते.
परंतु, युद्धाला तोंड फुटण्याच्या काही दिवस आधी, वायुदलाने चार हंटर विमानेदेखील जैसलमेरला आणून ठेवलेली होती. हेतू असा की, भविष्यात जमिनीवरील किंवा हवाई हल्ल्याच्या प्रसंगीही ती उपयोगी पडावी.
मुळातच, लवचिकता हा हवाई शक्तीचा एक अंगीभूत गुणआहे. म्हणूनच, जमिनी किंवा हवाई, यापैकी कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यासाठी आवश्यक ते बदल विमानांच्या शस्त्रांमध्ये करणे, म्हणजे अक्षरशः काही मिनिटांचे काम असते.
लोंगेवालाच्या आघाडीवर, २५०० सैनिक आणि ४० रणगाड्यांसह आक्रमण करणाऱ्या पाकिस्तानी पायदळाचा मुकाबला करायला तेथील भारतीय चौकीवर फक्त १२० सैनिक आणि आणि एकमेव रणगाडा-विरोधी तोफ होती!
केवळ संख्याबळाचा विचार केल्यास, ही स्थिती पाकिस्तानसाठी अतिशय अनुकूल होती असे कोणीही म्हणेल. परंतु, पाकिस्तान एक गोष्ट लक्षात घ्यायला विसरला.
ती गोष्ट म्हणजे भारताची हवाई शक्ति, जी युद्धाचे पारडे भारताच्या बाजूला फिरवू शकली असती.
आणि पारडे तसेच फिरले!
लोंगेवाला चौकीवर ४ डिसेंबरच्या संध्याकाळी तैनात असलेल्या आपल्या मूठभर शूर जवानांनी एकीकडे भारतीय वायुसेनेकडे हवाई सुरक्षेची मागणी केली, आणि दुसरीकडे पाकिस्तानी आक्रमणाला मोठया बहादुरीने संपूर्ण रात्रभर थोपवून धरले.
त्या रात्रीच हवाई हल्ले करण्याच्या भारतीय वायुसेनेच्या अक्षमतेबद्दल, त्या लढाईच्या अनुषंगाने पुष्कळ काही लिहिले-बोलले गेले आहे.
१९७१ साली जे तंत्रज्ञान उपलब्ध होते त्याच्या बळावर रात्रीच्या अंधारात हवाई हल्ले करता येत नव्हते. शिवाय, वाळवंटात इतस्ततः विखुरलेल्या रणगाड्यांवर आणि भारतीय जवानांसोबत हातघाईची लढाई लढत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांवर रात्री हवाई हल्ला करण्याचा प्रश्नच नव्हता. एखादा बॉम्ब चुकून-माकून आपल्याच जवानांवर पडला असता तर?
४ डिसेंबरच्या रात्री भारतीय वायुसेनेची हंटर विमाने इंधन भरून, आणि दारूगोळा सोबत घेऊन, उड्डाणाच्या तयारीत जैसलमेरच्या हवाई तळावर उभी होती. ५ डिसेंबरला भल्या पहाटे आपल्या विमानांनी भरारी घेतली आणि ती लोंगेवालाच्या युद्धभूमीवर पोहोचली.
पायदळाच्या तोफखान्याची गोळाबारी अचूक व्हावी म्हणून, 'एयर ऑब्सर्व्हेशन पोस्ट' (Air OP) नावाचा, तोफखान्याचाच एक टेहळणी अधिकारी नेमलेला असतो. एखाद्या उंच ठिकाणावरून, अथवा शक्य तितके शत्रूसैन्याच्या जवळ पोहोचून टेहळणी करीत, शत्रूच्या ठिकाणाचे नेमके दिशानिर्देश तो Air OP आपल्या रेडिओवरून सांगत असतो. प्रत्यक्ष लक्ष्यापासून अनेक मैल लांब असलेल्या तोफा त्या निर्देशांच्या आधारे दिशा ठरवून शत्रूवर अचूक मारा करतात.
विमानातून मारा करणाऱ्या वैमानिकांसाठी नेमके हेच काम फॉरवर्ड एयर कंट्रोलर (FAC) नावाचा एक अधिकारी करीत असतो.
५ डिसेंबरच्या पहाटे, पायदळाच्या Air OP ने आपल्या छोट्या 'कृषक' विमानातून उडत, वायुसेनेच्या विमानांसाठी FAC ची भूमिका बजावली. त्याच्या दिशानिर्देशानुसार उंचावरून सूर मारत, आपल्या हंटर विमानांनी रॉकेट आणि ३० मिलीमीटर बंदुकांनी मारा करीत, पाकिस्तानी रणगाड्यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले.
लोंगेवालाच्या युद्धाचे कल्पनाचित्र [चित्रकार ग्रुप कॅप्टन देब गोहाईन] |
जैसलमेरला एकूण चारच हंटर विमाने तैनात होती. शत्रूवर हल्ले करायचे, जैसलमेरला परतून विमानात पुन्हा इंधन व दारूगोळा भरायचा, आणि पुन्हा युद्धभूमीवर पोहोचायचे, असा क्रम त्या विमानांनी आळीपाळीने चालू ठेवला आणि शत्रूला दिवसभरात अजिबात उसंत मिळू दिली नाही.
'दे माय धरणी ठाय' अशी अवस्था झालेले पाकिस्तानी रणगाडे आणि ट्र्क लोंगेवालाच्या वाळवंटामध्ये दिवसभर सैरावैरा धावत राहिले, पण व्यर्थ. पाकिस्तानी विमाने किंवा विमानवेधी तोफांकडून काहीही प्रतिकार होत नसल्याने, आपल्या 'हंटर' विमानांच्या वैमानिकांनी अक्षरशः तळ्यातली बदके टिपावीत तशी पाकिस्तानी रणगाड्यांची शिकार केली!
'हंटर' विमानाच्या कॅमेरामधून टिपलेली रणगाड्याची 'शिकार'! |
कुठेही न थांबता जैसलमेरला पोहोचायची स्वप्ने पाकिस्तानने पाहिलेली असल्याने त्यांचे रणगाडे आपल्यासोबत जास्तीचा तेलसाठा घेऊन निघालेले होते. त्यामुळे भारतीय विमानांनी त्यांना लावलेल्या आगीत तेल ओतण्याचे काम त्यांनी स्वतःच करून टाकले!
लोंगेवालाच्या लढाईत भारताने दोन सैनिक गमावले. पण, वायुसेना आणि पायदळाने परस्पर समन्वय साधत पाकिस्तानी सैन्याची अक्षरशः ससेहोलपट केली. पाकिस्तानचे ३४ रणगाडे, शंभराहून अधिक वाहने, आणि २०० सैनिक या युद्धात बळी पडले.
वाळवंटात सैरावैरा धावणाऱ्या पाकिस्तानी रणगाड्यांच्या 'पाऊलखुणा' |
त्या दिवशी पाकिस्तानचा एक रेडिओ संदेश आपल्या यंत्रणेने टिपला होता. त्यात म्हटले होते,
"भारतीय विमानांनी थैमान घातले आहे. एक विमान जाते न जाते, तोच दुसरे येते आणि वीसेक मिनिटे आग ओकते. आमचे चाळीस टक्के रणगाडे आणि सैनिक खलास तरी झाले आहेत किंवा जखमी वा निकामी झालेले आहेत. आता आम्हाला पुढे जाणे अतिशय कठीण आहे. आमच्या रक्षणासाठी त्वरित विमाने पाठवा. अन्यथा येथून सुरक्षित माघारी येणेही आम्हाला अशक्य होऊन बसेल."
त्याच रात्री, राजस्थान सेक्टरमधील आपल्या पायदळाच्या जनरलसाहेबांनी जैसलमेर हवाईतळाच्या प्रमुखांना पाठवलेल्या संदेशात म्हटले होते,
"आज आपण एकमेकांना दिलेली साथ अप्रतिम होती. तुमच्या वैमानिकांनी अतिशय अचूक नेमबाजी करून पाकिस्तानी रणगाड्यांना नष्ट केल्यामुळेच त्यांच्या आक्रमणाची धार बोथट झाली. तुमच्या वैमानिकांना माझे आणि माझ्या सैनिकांचे विशेष आभार आणि कौतुक कळवा. हार्दिक अभिनंदन!"
लोंगेवालापासून जैसलमेरचे अंतर, अगदी युद्धकाळातदेखील, एका दिवसात कापणे सहज शक्य आहे. पण, त्या शक्यतेला शेख चिल्लीचे, म्हणजेच पाकिस्तानचे, दिवास्वप्न ठरवू शकणारी एक गोष्ट भारताकडे होती, आणि ती म्हणजे 'हवाई ताकद'!
युद्धशास्त्राचा एक मूलभूत धडा विसरल्याची किंमत पाकिस्तानला मोजावीच लागली.
"लोंगेवालामध्ये नाश्ता, रामगढमध्ये भोजन आणि जैसलमेरमध्ये रात्रीची मेजवानी" चाखायची स्वप्ने पाहणारे पाकिस्तानी स्वतःच्याच जळत्या रणगाड्यांच्या तंदूरमध्ये भाजून निघाले!
त्या आगीत त्यांची मग्रुरी तर खाक झालीच पण भविष्यात ताकदेखील फुंकून पिण्याची अक्कल त्यांना निश्चितच आली असणार!
मला अनेकदा लोक विचारतात, "या युद्धातील भारतीय विजयाचे श्रेय कोणाला द्यावे? पायदळाला की वायुसेनेला?
उत्तर अगदी सोपे आहे.
"भारतीय पायदळ आणि वायुसेना या दोघांमधील परस्पर समन्वयाला!"
जरासा गमतीचा भाग म्हणून, वाळवंटात लढल्या गेलेल्या त्या लढाईचे श्रेय नौसेनेलाही देता येईल, कारण उंटाला वाळवंटातले जहाज मानतातच!
अर्थात, पाकिस्तानच्या लढाऊ सामग्रीच्या अरबी समुद्रातून होणाऱ्या वाहतुकीची भारतीय नौसेनेने जी कोंडी केली त्यामुळे अप्रत्यक्षपणे या लढाईवर प्रभाव पडला असे मात्र निश्चित म्हणता येईल.
त्यामुळे, "भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांनी मिळून भारताला विजय मिळवून दिला", हेच म्हणणे योग्य!
भारतालाच नव्हे, तर बांगलादेशाच्या नागरिकांनादेखील आपल्या सेनादलांनी विजय मिळवून दिला!
कारण पश्चिमेकडील युद्धात जर आपण राजस्थानचा भूभाग गमावला असता तर तहामध्ये त्याच्या बदल्यात आपल्याला कदाचित संपूर्ण बांगलादेश पाकिस्तानला परत द्यावा लागू शकला असता!
मराठी अनुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४
(लेखातील सर्व छायाचित्रे indiatimes.com च्या सौजन्याने)