१९७१ च्या युद्धात कामगिरी बजावल्यानंतरही आम्ही बराच काळ पाकिस्तान सीमेवरच तैनात राहिलो होतो.
आमचे तोफखाना दळाचे चौदावे फील्ड रेजिमेंट, जून १९७३ मध्ये जमशेदपूरला आले. Adjutant या पदावर मी अजून नवखा होतो. अत्यंत 'कडक' अशी ख्याती असलेले लेफ्टनंट कर्नल रामचंद्र परशुराम सहस्रबुद्धे हे आमचे कमांडिंग ऑफिसर (CO) होते.
जमशेदपूरच्या टेल्को कंपनीमध्ये कामाला असलेला एक माजी सैनिक, गुरबचन सिंग, एके दिवशी सकाळी मला भेटायला आला. तसा तो आमच्या युनिटमध्ये वरचेवर येत असे. माजी सैनिक असल्याने, रेशन, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि दारूच्या बाटल्या आर्मी कॅन्टीनमधून विकत घेण्याचा हक्क त्याला होता. त्याकरिता आवश्यक ती कागदपत्रेही त्याच्याकडे होती. टेल्कोच्या सर्व माजी सैनिकांच्या वतीने त्यांचा कोटाही तोच घेऊन जात असे. पंजाब रेजिमेंटचे, कर्नल ब्रार नावाचे एक सेवानिवृत्त अधिकारी टेल्कोच्या प्रशासन आणि सुरक्षा विभागाचे जनरल मॅनेजर होते. गुरबचन सिंग हा त्यांचा ड्रायव्हर होता. टेल्को व टिस्कोच्या इतरही महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या मोटारीही तो क्वचित चालवीत असे. अर्थातच, एक निष्णात ड्रायव्हर असल्याने, टेल्को (टाटा मोटर्स) आणि टिस्को (टाटा स्टील) अश्या मातबर कंपन्यांसाठी तो एक मोलाचा कर्मचारी होता.
आमच्या युनिटसोबत संलग्न असलेल्या, 'इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनियर्स' (EME) या विभागाच्या सर्व सैनिकांशी गुरबचन सिंगचा परिचय होता. तसेच, आमच्या रेजिमेंटचे नायब सुभेदार/सुभेदार पदावरील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO), आणि नाईक/हवालदार पदावरचे नॉन कमिशन्ड ऑफिसर (NCO), हे सगळेच त्याला ओळखत होते. एरवी त्याचा संबंध मुख्यतः आमच्या युनिटच्या क्वार्टर मास्टर (QM)सोबतच येत असल्याने, मी त्याला पूर्वी कधी पाहिलेले नव्हते. त्या दिवशी मात्र आमच्या QM ने गुरबचन सिंगला माझ्याकडे पाठवले, कारण त्याचे सर्व्हिस बुक एखाद्या सेनाधिकाऱ्याकडून सत्यापित करून घेणे आवश्यक झाले होते.
गुरबचन सिंगची सर्व कागदपत्रे, आणि त्यालाही सोबत घेऊन आमचे हेडक्लार्क माझ्याकडे आले. माझ्या नावाचा व आमच्या युनिटचा शिक्का त्या कागदांवर छापणे आणि मी सही करणे, असे एखाद्या मिनिटात होण्यासारखे काम असल्याने, सर्व सज्जता करूनच हेडक्लार्क माझ्याकडे आले होते. परंतु, निव्वळ 'सह्याजीराव' बनून काम करणे मला मान्य नव्हते. मी गुरबचन सिंगच्या आर्मी सर्व्हिससंबंधी सखोल चौकशी केली. त्याने सांगितले की, तो पूर्वी EME मध्ये व्हेईकल मेकॅनिक (VM) होता. खात्री करून घेण्यासाठी, आमच्या लाईट रिपेअर वर्कशॉप (LRW) मधल्या VM ला बोलावून मी विचारले असता, त्यानेही मला सांगितले की प्रशिक्षणकाळात गुरबचन सिंग त्याचा बॅचमेट होता.
ही सर्व चौकशी चालू असतानाच अचानक, CO साहेबांनी माझ्यासाठी बझर वाजवल्याने मला तातडीने त्यांच्याकडे जावे लागले.
CO साहेबांच्या ऑफिसमधून परतल्यावर माझ्या मनात नेमके काय आले देव जाणे, पण मी गुरबचन सिंगच्या कागदांवर सही करण्यास नकार दिला. आमच्या युनिटचे सुभेदार मेजर आणि हेडक्लार्क हे दोघेही माझ्या निर्णयामुळे थोडेसे नाराज दिसले. त्यानंतर मी हेडक्लार्कना आदेश दिला की, सिकंदराबादजवळील त्रिमुलगेरी येथे असलेल्या EME सेंटरमध्ये, गुरबचन सिंगची सर्व कागदपत्रे पाठवून, त्यांची खातरजमा करून घेण्यात यावी. हे ऐकल्यानंतर मात्र, माझे डोके चांगलेच फिरले आहे, याबद्दल बहुदा आमच्या हेडक्लार्कची खात्रीच पटली असणार! प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव जरी माझ्या गाठीशी असला तरीही, दैनंदिन कार्यालयीन कामात तसा मी नवखाच होतो. त्यामुळे, हे खबरदारीचे पाऊल उचलणे मला आवश्यक वाटले होते.
"Adjutant साहेब सध्या व्यस्त आहेत पण यथावकाश तुझे काम होईल" असे काहीतरी गुरबचन सिंगला तात्पुरते सांगून हेडक्लार्कनी वेळ मारून नेली असावी.
आमच्या युनिटकडून गेलेल्या पत्राला आठवड्याभरातच EME सेंटरमधून तारेने उत्तर आले. त्यामध्ये लिहिले होते,
"चीन सीमेवरील धोला-थागला जवळील चौकीवर तैनात असताना, २१ ऑक्टोबर १९६२ रोजी, चिनी हल्ला होताच, गुरबचन सिंग हा शिपाई शत्रूसमोरून पळून गेला होता. नंतर त्याचा काहीच ठावठिकाणा न समजल्याने, त्याला 'बेपत्ता किंवा मृत' घोषित केले गेले होते. आता तुम्हाला तो जिवंत सापडलेला असल्याने, त्याला त्वरित ताब्यात घेऊन आम्हाला कळवावे. आम्ही आरक्षी दल पाठवून त्याला आमच्या ताब्यात घेऊ"
सोप्या शब्दात सांगायचे तर, आर्मीच्या कायद्यानुसार तो एक पळपुटा किंवा 'भगोडा' शिपाई होता! आता त्याची रीतसर चौकशी होऊन त्याच्यावर यथोचित कायदेशीर कारवाई होणार केली जाणार होती!
ती तार वाचून युनिटमधील आम्हा सर्वच अधिकाऱ्यांना धक्का बसला. आमचे CO, लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धे तर माझ्यावरच भडकले. त्यांना न विचारता, न सांगता, मी अश्या प्रकारचे पाऊल का आणि कसे उचलले याबद्दल CO साहेबांनी मला जाब विचारला.
"सर, EME सेंटरकडे चौकशी करण्याची सणक सहजच माझ्या डोक्यात आली. तोपर्यंत तुम्ही ऑफिसमधून निघूनही गेला होतात. परंतु, तुम्ही दिलेली शिकवण माझ्या चांगली लक्षात होती की, 'कोणत्याही कागदावर डोळे झाकून सही करू नये'."
माझे उत्तर CO साहेबांना नक्कीच आवडले असावे. कारण ते एकदम शांत झाले आणि त्यांनी आमच्या युनिटचे 2IC, मेजर कृष्णा आणि बॅटरी कमांडर, मेजर (पुढे निवृत्त मेजर जनरल) महंती या दोघांनाही बोलावून घेतले. आम्हा सर्वांच्या विचार-विनिमयानंतर, एकमताने असे ठरले की, आम्हाला मिळालेल्या माहितीबद्दल टेल्कोच्या अधिकाऱ्यांना, अगदी निवृत्त कर्नल ब्रार यांनाही, सध्या काहीच कळवायचे नाही. महिन्याभराने सामान घेण्यासाठी गुरबचन सिंग पुन्हा येईल त्यावेळी सापळा लावून त्याला पकडण्याचे आम्ही ठरवले.
पुढच्या महिन्यात, नेहमीप्रमाणे गुरबचन सिंग युनिटमध्ये आला. रेशन व दारूचा कोटा घेतल्यानंतर तो माझ्याकडे आला तेंव्हा, EME सेंटरकडून समजलेल्या माहितीसंबंधी मी त्याला सांगितले. प्रथम त्याने साफ कानावर हात ठेवले. खरा 'भगोडा' तो स्वतः नसून, त्याचा जुळा भाऊ असल्याचा बनावही त्याने केला. गुरबचन सिंगचे बोलणे ऐकल्यानंतर, आमच्या रेजिमेंटचे सुभेदार मेजर आणि हवालदार मेजर त्याला घेऊन काही काळ ऑफिसबाहेर गेले. त्या दोघांनी त्याला खास 'मिलिटरी खाक्या'चा एक डोस दिला असणार. थोड्याच वेळात माझ्या ऑफिसात येऊन गुरबचन सिंगने, तो स्वतःच 'भगोडा' असल्याची कबुली दिली.
लगेच, मेजर महंती यांनी माझ्यासह बसून, गुरबचन सिंगची चौकशी सुरु केली. त्याची इत्थंभूत कहाणी ऐकायला, आम्हा दोघांव्यतिरिक्त, CO साहेब व इतर अधिकारीही हजर होते. त्याने दिलेल्या जबानीप्रमाणे, २१ ऑक्टोबर १९६२ रोजी अचानक चिनी हल्ला येताच, आपल्या सैन्याच्या सर्व तुकड्या इतस्ततः पांगल्या. ज्याने-त्याने आपापल्यापुरते पाहावे अशी स्थिती होती. तश्या विचित्र परिस्थितीत, गुरबचन सिंग कसाबसा जीव वाचवून, प्रथम भूतानमध्ये पळाला आणि नंतर कलकत्त्यात पोहोचला. खोटे नाव धारण करून त्याने एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये नोकरी केली. आधी ट्रकचा क्लीनर, आणि नंतर ड्रायव्हर म्हणून, १९६३ ते १९६७ या काळात त्याने कलकत्ता-मुंबई मार्गावर अनेक फेऱ्या केल्या. अश्याच एका फेरीत, तो जमशेदपूर येथे थांबलेला असताना, त्याच्या एका मित्राने, टेल्कोमध्ये त्याची वर्णी लावून दिली. अत्यंत निष्ठेने आणि उत्तम काम करीत असल्याने १९६८ पासून तो तेथेच नोकरीवर टिकला होता. मात्र, पाच वर्षांनंतर त्याच्या सर्व्हिस बुकाची पडताळणी करणे आवश्यक झाल्याने तो माझ्यापर्यंत पोहोचला होता.
ही संपूर्ण कहाणी ऐकून, निवृत्त कर्नल ब्रार आणि टेल्कोचे इतर सर्व वरिष्ठ अधिकारी अक्षरशः स्तिमित झाले.
गुरबचन सिंगला आर्मीच्या पद्धतीप्रमाणे रीतसर अटक झाली आणि EME सेंटरमधून आलेल्या आरक्षी दलासोबत त्याची त्रिमुलगेरीला रवानगी झाली. तेथे आर्मी कोर्टासमोर चाललेल्या खटल्यात त्याला १८ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेल्याचे समजले.
इकडे माझ्या कानात मात्र, अनेक अधिकाऱ्यांनी धोक्याची घंटा वाजवली. गुरबचन सिंग 'भगोडा' असल्याची वस्तुस्थिती प्रथमतः मीच उघडकीला आणली होती. त्यामुळे, एखाद्या हस्तकाकरवी, अथवा तुरुंगातून सुटल्यावर स्वतःच, गुरबचन सिंग माझ्यावर निश्चित सूड उगवणार हे भाकीत अनेकांनी वर्तवले. मी जेमतेम २३ वर्षांचा आणि अननुभवी अधिकारी होतो. मला भीती वाटणे स्वाभाविक होते. अविचाराने, आणि निष्कारणच आपण या फंदात पडलो असेही मला वाटू लागले. शेवटी, 'जे जे होईल ते ते पाहावे' असे स्वतःशी म्हणून, मी ते सर्व विचार बाजूला सारले.
या घटनेपाठोपाठ आमच्या CO साहेबांनी, म्हणजेच लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धेंनी, गुरबचन सिंग ज्यांचा ड्रायव्हर होता त्या कर्नल ब्रार यांना विनंती करून, त्यांच्यापाशी काही मागण्या केल्या. पहिली मागणी अशी की, शिक्षा संपताच गुरबचन सिंगला पुन्हा टेल्कोमध्ये कामावर रुजू करून घेतले जावे. दुसरे असे की, गुरबचन सिंगची पत्नी आणि मुलांना सध्या टेल्कोच्या आवारातील घरातच राहू द्यावे, त्याच्या मुलांना टेल्कोच्या शाळेतच शिकू द्यावे, आणि टेल्कोतर्फे त्यांना घरखर्चासाठी दरमहा थोडासा भत्ताही दिला जावा.
CO साहेबांच्या विनंतीला मान देऊन, कर्नल ब्रार यांनी, या सर्व गोष्टी अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला. टेल्कोच्या वाहन परीक्षण विभागाचे प्रमुख, निवृत्त मेजर डी. एन. अगरवाल यांचीही या कामी अतिशय मोलाची मदत झाली. मुख्य म्हणजे, चीन युद्धामुळे उद्भवलेल्या विचित्र परिस्थितीचा बळी झालेल्या एक माजी सैनिकाचा, सहानुभूतीपूर्वक विचार केला गेला! एखाद्या कर्मचाऱ्याचे हित जपण्याचे टाटा समूहाचे धोरण आणि एकंदर उदार मनोवृत्ती, याचे हे द्योतकच मानले पाहिजे!
त्याउपर, CO साहेबांनी आम्हाला आदेश दिला की, गुरबचन सिंगच्या परिवाराला दरमहा रेशन आणि जीवनावश्यक वस्तू आमच्या रेजिमेंटच्या कॅन्टीनमधून घरपोच दिल्या जाव्यात. अर्थातच, CO साहेबांच्या या आदेशाची कसून अंमलबजावणी करण्यात मी कमी पडलो नाही. या घटनेनंतर लगेच, म्हणजे ऑक्टोबर १९७३ मध्ये लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धेंची आमच्या युनिटमधून दुसरीकडे बदली झाली. पण, त्यांच्या जागी आलेल्या, लेफ्ट. कर्नल एस. के. अब्रोल या नवीन CO साहेबांनीही या आदेशात काडीचाही बदल केला नाही. ज्या पद्धतीने आम्ही हे संपूर्ण प्रकरण हाताळले त्याबद्दल टेल्को आणि टिस्कोच्या अधिकाऱ्यांनीही आमचे वारेमाप कौतुक केले.
१९७४-७५ मध्ये केंव्हातरी, सक्तमजुरीची शिक्षा भोगून गुरबचन सिंग जमशेदपूरला परतला. मी अजूनही आमच्या युनिटचा Adjutant होतो, आणि अविवाहित असल्याने ऑफिसर्स मेसमधील एका खोलीत राहत होतो. गुरबचन सिंग परतल्याची आणि तो लगोलग मला भेटायला येत असल्याची खबर, निवृत्त कर्नल ब्रार यांच्याकडून समजताच मी तयारीला लागलो. गुरबचन सिंग व त्याच्या पत्नीसाठी चहा-नाश्ता आणि मुलांसाठी चॉकलेट मागवून मी एक छोटेखानी मेजवानीच आयोजित केली. आल्या-आल्या गुरबचन सिंग अक्षरशः माझ्या पायावर कोसळला आणि मनसोक्त रडला. मलाही माझ्या भावना काबूत ठेवणे अवघड झाले.
या सर्व प्रकरणात, लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धे आणि टाटा समूहाचे कर्नल ब्रार व मेजर अगरवाल यांच्याकडून मी नकळतच एक मोलाचा धडा शिकलो. कायदा व नियमांच्या चौकटीत राहूनच, पण सहानुभूति आणि माणुसकी न विसरता आपण काम केले, तर अक्षरशः जादूची कांडी फिरल्यागत अकल्पित परिणाम साधता येतो.
गुरबचन सिंगने कर्नल सहस्रबुद्धेंचे आणि माझे शतशः आभार मानले. त्याने मला प्रांजळपणाने सांगितले की, त्याला पकडून देण्यास जरी मी जबाबदार होतो तरीही, ११ वर्षे त्याच्या मनात डाचत असलेल्या अपराधी भावनेचा निचरा होण्यासाठीही मीच कारणीभूत झालो होतो. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद झळकत होता. मुख्य म्हणजे, शिक्षा भोगून दोषमुक्त झाल्यावर, तो आता स्वच्छंदपणे आपले आयुष्य जगू शकणार होता!
मूळ इंग्रजी अनुभव लेखन:
ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त)
मराठी भावनुवाद:
कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
९४२२८७०२९४