बारा-चौदा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. इंदौरमधल्या एका नामवंत शाळेत, आठवड्याभराची कार्यशाळा संपवून मी रेल्वेने मुंबईला परत निघाले होते.
एसी २-टियरच्या डब्यात, पॅसेजमधला खालचा बर्थ मला मिळाला होता. सूटकेस बर्थखाली ठेवून आणि हँडबॅग खुंटीला लटकावून, हुश्श म्हणत मी बसले. रात्रभराच्या शांत झोपेची मला नितांत गरज होती.
आतील बाजूच्या कूपेमधले चारही प्रवासी आधीच आलेले होते. दोन पुरुष आणि दोन स्त्रिया. एकंदर सोबत तर ठीकठाक वाटत होती. त्या दोन पुरुषांपैकी, वयाने लहान असलेल्या पुरुषाचा चेहरा एका बाजूने वाकडा आणि ओबडधोबड होता. केसही अगदी बारीक कापलेले होते. एकंदरीत, तो दिसायला जरा विचित्रच होता. पण त्याच्याकडे फार काळ रोखून पाहणे वाईट दिसेल, म्हणून मी नजर वळवली.एकदाची गाडीत बसून स्थिरावल्यावर, मी मोबाईल बाहेर काढला. नौदल अधिकारी असलेल्या माझ्या नवऱ्याला, माझी हालहवाल, (म्हणजे नौदलाच्या भाषेत, SITREP किंवा Situation Report) कळवणे आवश्यक होते. माझे वडील, सासरे, आणि नवरा अशा तीन 'फौजी' लोकांसोबत अनेक वर्षे राहिल्यामुळे, सैन्यदलात वापरले जाणारे कित्येक शब्द माझ्या बोलण्यात आपसूकच येतात!
मी फोनवर बोलत असताना, दणकट शरीरयष्टीचे तीन तरुण आले आणि काहीही न बोलता-विचारता खुशाल माझ्या बर्थवर बसले. नवऱ्याला फोन चालू ठेवायला सांगून मी त्या तरुणांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. त्यांच्यापैकी एकाने वरच्या बर्थकडे बोट करून, तो बर्थ त्याचा असल्याचे मला खुणेनेच सांगितले. तात्पुरते समाधान झाल्याने मी पुन्हा नवऱ्यासोबत बोलू लागले.
त्या तिघांनी, आपसात गप्पा आणि हास्यविनोद करत-करत, हळू-हळू माझ्या बर्थवरची बरीच जागा बळकवायला सुरुवात केली. अंग चोरून बसता-बसता, शेवटी बर्थच्या एका कोपऱ्यात माझे मुटकुळे झाले. मग मात्र मी फोन बंद केला आणि त्या तिघांना उद्देशून सांगितले की मला आडवे पडायचे असल्याने त्यांनी आता माझ्या बर्थवरून उठावे. त्यांच्यापैकी एकाने, बर्थच्या वर लिहिलेली नोटीस बोटानेच मला दाखवली आणि म्हणाला, "रात्री नऊनंतरच बर्थ झोपण्यासाठी वापरता येतो. तोपर्यंत त्यावर बसूनच राहावे असा नियम आहे."
त्याला चांगले खरमरीत उत्तर मी देणारच होते. पण कुणाला काही कळायच्या आत, कूपेमधला तो विचित्र चेहऱ्याचा मनुष्य उठून माझ्या शेजारी येऊन उभा राहिला. कमालीच्या थंड नजरेने त्या तिघांकडे पाहत, अतिशय मृदू आवाजात, व सौम्य शब्दात, त्याने त्या तिघांनाही दुसऱ्या डब्यात निघून जाण्यास सांगितले. त्यांपैकी एकजण उलटून त्याला काही बोलण्याच्या तयारीत होता. पण माझ्या त्या 'रक्षणकर्त्या' च्या थंड नजरेतली जरब त्याला जाणवली असावी. तिघेही मुकाट्याने उठून चालते झाले.
मी "थँक यू" म्हणताक्षणी त्याच्या तोंडून आलेल्या, "Not at all, Ma'am" या वाक्यामुळे, तो फौजी असणार हे मी बरोबर ताडले. तरीही खात्री करून घेण्यासाठी मी विचारले, "तुम्ही सैन्यदलात आहात का?"
"होय, मॅडम. मी इन्फन्ट्री ऑफिसर आहे. महूला एका छोट्या ट्रेनिंग कोर्सकरिता आलो होतो."
"अच्छा. माझे मिस्टर नौदलात आहेत. माझे वडील आणि सासरे आर्मीमध्ये होते."
सहजपणे आमच्या गप्पा सुरु झाल्या. देशातील एकंदर वातावरण, आणि विशेषतः काश्मीरमधल्या परिस्थितीकडे आपसूकच बोलण्याचा ओघ वळला. एक-एक करीत इतर सहप्रवासीदेखील आमच्या गप्पात सहभागी झाले. त्या सगळ्यांपैकी कोणीही दिल्लीच्या पुढे उत्तरेला कधीच गेलेले नसल्याने, माझ्यापेक्षा त्यांनाच काश्मीर खोऱ्यातील 'आँखोंदेखी' ऐकण्यात अधिक रस होता. पुढचे दोन-तीन तास, अक्षरशः आपापल्या जागेवर खिळून, आम्ही त्या मेजरचे एकेक थरारक अनुभव ऐकत राहिलो. (त्या मेजरचे नाव मी सांगू इच्छित नाही).
ट्रेनिंग संपवून ज्या दिवशी तो युनिटमध्ये अधिकारी म्हणून दाखल झाला, त्याच दिवशी त्याच्या हातून एक मनुष्य (अर्थातच पाकिस्तानी अतिरेकी) मारला गेला होता, आणि तोही अगदी काही फुटांच्या अंतरावरून!
ती कारवाई संपल्यानंतर मात्र, जेमतेम २०-२२ वर्षांच्या त्या तरुण अधिकाऱ्याचे मन अक्षरशः सैरभैर होऊन गेले होते. युनिटमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची अवस्था ओळखून, त्याची काळजी घेतली आणि योग्य शब्दात त्याची समजूत घातली. एक सेनाधिकारी म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडताना, त्याला अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे याची त्याला जाणीव करून दिली. जणू काही अर्जुनाला भगवान श्रीकृष्णच भेटले!
युनिटमधल्या सर्व अधिकारी व जवानांमध्ये असणारा बंधुभाव आणि एकमेकांवरचा विश्वास लाखमोलाचा असतो हे त्या मेजरने आम्हाला आवर्जून सांगितले. कारण, याच भावना आणि हेच घनिष्ट परस्परसंबंध, अनेक वेळा जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये अभेद्य भिंत बनून उभे राहतात!
मला जाणवले की तो मेजर खराखुरा हाडाचा सैनिक होता. "सैनिकाने लढताना नीतिमत्ता विसरता कामा नये" हे वाक्य बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. उदाहरण म्हणून, कारगिल युद्धातली एक सत्य घटना त्यानेे सांगितली.
चौकीवर विजय मिळवल्यानंतर या भारतीय मेजरने सर्वप्रथम, पाकिस्तानी सैनिकांच्या ओळखपत्रांवरून प्रत्येकाची ओळख पटवली. एका पत्राद्वारे त्या नावांची यादी पाकिस्तानी सेनेकडे पाठवून, त्या सर्व मृत सैनिकांचा यथोचित सन्मान व्हावा अशी इच्छा त्याने व्यक्त केली!
काही काळानंतर त्याला समजले की त्याच्या विनंतीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून त्या शहीदांचा सन्मान केला गेला होता!
त्याच युद्धात, बॉम्बचा तुकडा गालफडात घुसल्यामुळे त्याचा चेहरा असा विचित्र, आणि ओबड-धोबड झालेला होता, हेही सहजच बोलल्यासारखे त्याने सांगितले. इतकेच नव्हे तर, त्याच्या मणक्यांमध्ये आणि पायांमध्ये शस्त्रक्रियेद्वारे रॉड बसवलेले होते. म्हणूनच, सोबतच्या महिला सहप्रवाश्यांना तो स्वतःचा खालचा बर्थ देऊ शकला नव्हता हेही त्याने काहीश्या दिलगिरीच्या स्वरातच सांगितले!
आर्मीच्या डॉक्टरांचे तो तोंड भरून कौतुक करीत होता. "माझे फाटलेले थोबाड छान शिवून मला एक नवीन चेहरा त्यांनीच तर दिला ना!" हे म्हणताना त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. त्याउलट, एक मिश्किल भावच मला जाणवला! मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहत होते. त्याच्या त्या बदललेल्या चेहऱ्याबद्दल घरच्या मंडळींना काय वाटले? असे आम्ही विचारताच तो हसून म्हणाला, "माझी बायको, आणि आमची सहा वर्षांची मुलगी म्हणतात, आता मी पहिल्यापेक्षा जास्त देखणा दिसतो!"
काश्मिरातल्या खेड्या-पाड्यांमधल्या घरात लपून बसलेले अतिरेकी शोधणे आणि त्यांना ठार करणे, हे त्याच्या मते सगळ्यात अवघड काम होते. (त्यावेळी नुकताच मुंबईवर अतिरेकी हल्ला होऊन गेला होता. सैन्यदलाच्या आणि नौदलाच्या कमांडो सैनिकांनी 'ताज' हॉटेलमध्ये आणि इतरत्र केलेली कारवाई माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली).
"Cordon & Search कारवाई म्हणजे एक जीवघेणा लपंडावाचा खेळ असतो. त्यामध्ये आमच्या सतर्कतेची आणि संयमाची अक्षरशः अग्निपरीक्षाच असते. अशा कारवाया बहुदा रात्रीच्या अंधारातच होतात. संपूर्ण खेड्याला आम्ही वेढा घालतो आणि एकेक घर तपासत जातो. अतिरेकी नेमका कुठे लपला असेल याचा पत्ता लावायचा असतो. त्याला बेसावध गाठून आम्ही ठार करणार, की तोच आधी आमचा वेध घेणार हे मात्र 'काळ'च ठरवतो!"
मेजर शांतपणे बोलत राहिला, "आम्ही आता पूर्वीपेक्षा अधिक अनुभवी झालो आहोत. पण, अतिरेकीसुद्धा अधिक शहाणे झाले आहेत. ते आता आमच्या डोक्यावर किंवा छातीवर नेम धरत नाहीत. मांड्यांवर गोळ्या झाडतात. मांडीमधली रक्ताची धमनी फुटलेल्या सैनिकाला तातडीने हॉस्पिटलात न्यावेच लागते. नाही तर अत्यधिक रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्या जवानाला सुखरूपपणे हलवण्यात आमचे मनुष्यबळ आणि वेळ खर्च होतो आणि अतिरेक्यांना नेमके तेच हवे असते."
ऐकता-ऐकता आमच्या डोळ्यावरची झोप केंव्हाच उडून गेली होती. मी आणि इतर सहप्रवासी अचंबित होऊन, जणू तो थरार प्रत्यक्ष अनुभवत होतो.
मी सहज त्याला विचारले, "अतिरेक्यांविरुद्धच्या तुझ्या कामगिरीबद्दल तुला एखादे शौर्यपदक मिळाले असेल ना?"
"नाही, मॅडम."
मी आश्चर्यानेच विचारले, "का बरं? का नाही मिळालं?"
"मॅडम, मी जे केलं, ते करणाऱ्या प्रत्येकाला जर आर्मीने शौर्यपदक देणं सुरु केलं, तर पदकांचा स्टॉकच संपून जाईल!" तो हसत-हसत म्हणाला.
त्याच्या या अनपेक्षित उत्तराने आम्ही सगळेच अवाक झालो होतो. आमच्या मते जे अतुलनीय शौर्य होते, ती त्याच्या दृष्टीने जणू एखादी सामान्य घटनाच होती.
कदाचित, जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांसोबत लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाचे आणि अधिकाऱ्याचे तेच दैनंदिन जीवन असेल!
निःस्वार्थ सेवा म्हणजे काय, ते मला माझ्या डोळ्यासमोर, मूर्तस्वरूपात दिसत होते, आणि मी ते रूप मनात साठवून घेत होते.
एका सहप्रवाशाने अचानकच विचारले, "कुठून येते ही एवढी प्रेरणा तुम्हा लोकांमध्ये?"
"या देशावर, देशवासीयांवर असलेले प्रेम, आणि मी एक भारतीय असल्याचा सार्थ अभिमान. आणखी काय?"
अगदी सहजपणे त्याने उच्चारलेले ते वाक्य ऐकून माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. मला माझे लहानपण आठवले. त्या काळी, सिनेमा संपल्यावर राष्ट्रगीत वाजत असे. आम्ही सगळे उठून उभे राहायचो. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे निव्वळ मौजमजा करण्याचे, सुट्टीचे दिवस नव्हते. आम्ही सकाळी आनंदाने घराबाहेर पडायचो, आणि अभिमानाने ध्वजवंदन करायचो. "जय जवान, जय किसान" हे वाक्य उच्चारत, मातृभूमीच्या त्या दोन सच्च्या सेवकांना मनापासून अभिवादन करायचो.
आजदेखील जवानांची आणि किसानांची आपल्या देशाला पूर्वीइतकीच नितांत गरज आहे. मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या मनात, खोल कुठेतरी, त्यांच्याबद्दलचा आदर आणि अभिमान दडलेलाही आहे. मात्र, तो मनातच न ठेवता, बाहेर काढून, झाडून, झटकून, छातीवर मिरवायची आज गरज आहे. आपल्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबत त्याची जाणीव आपल्याला होत राहिली तरच आपल्या वागण्या-बोलण्यातही तो आदर दिसत राहील.
"... मी एक भारतीय असल्याचा सार्थ अभिमान. आणखी काय?"
"जय हिंद"
___________________________________________________________________________________
मूळ इंग्रजी अनुभवलेखिका : सौ. स्मिता (भटनागर) सहाय. [भारतीय नौदलातील कॅप्टन सहाय यांच्या पत्नी]
मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त]
As always a nice article.. Jai Hind.. Col Mukund Pandit
ReplyDelete🙂Thank you, sir!
Deleteखूप छान लेखन व तितकेच उत्तम भाषांतर मूळ लेखनाचा ओघ भाषांतरात गमावलेला नाही. मन गुंगून नाक्तरे
ReplyDelete🙂धन्यवाद, मंदार!
DeleteYup... Appreciated.Nice experience as usual👌👌👌⚔️
ReplyDeleteThanks! 🙂🙏
DeleteVery good
ReplyDeleteGirish Deshmukh
Thank you! 🙂🙏
Deleteअनुभवकथन व अनुवाद फारच छान.
ReplyDeleteThanks! 🙂🙏
DeleteNice one Anand.
ReplyDeleteThanks buddy & namesake! 😊
Deleteओघवती भाषा आहे अनुवाद असला तरी. खूपच छान 👌
ReplyDeleteवंदे मातरम 🙏
Thanks, Jyotsna! 🙂🙏
DeleteVery nice translation col sir. Very much touching story
ReplyDeleteThanks, Satyajit! 🙂👍
Deleteउत्तम, साहेब
ReplyDeleteधन्यवाद!🙏
DeleteWhat a riveting account, translated so accurately. As always, it was a pleasure to read this blog Anand !!
ReplyDelete- Sumant
Thanks, Sumant! 🙂
DeleteA beautiful story, well told. My salute.
ReplyDeleteThanks, Avi! 🙂
DeleteExcellent translation/narration, sir. You have captured the aura of the original completely! Thanks for bringing to the fore such stories which pumps in respect & pride in every reader's heart & mind! Keep up your good work!
ReplyDeleteHey! Thanks, JN! 👍
Delete👌👌👌
ReplyDeleteBRAVO ZULU
ReplyDelete🙂🙏
Deleteअसाही सुखाद अनुभव.पण त्यांची काश्मिरमधिल अनुभव वाचताना जिव कासाविस होतो.पाकीस्तानी मृत सैनिकांबद्दल जे केले तिथेही आपले सःस्कार दिसून येतात.
ReplyDelete🙂👍
ReplyDelete