भारतीय सेनाधिकाऱ्यांच्या ट्रेनिंग अकादमीमध्ये कॅडेट्सना कवायत शिकविण्यासाठी जे हवालदार आणि सुभेदार हुद्द्यावरचे ड्रिल उस्ताद असतात त्यांच्याबद्दल कोणाही अधिकाऱ्याला विचारा. तुम्हाला भरभरून प्रशंसाच ऐकायला मिळेल.
आर्मीच्या सर्वच रेजिमेंट्समधून ड्रिल उस्तादांची निवड होत असते. परंतु, प्रामुख्याने इन्फंट्री बटालियन्समधून येणारे उस्ताद अधिक असतात. कित्येक महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर आणि अतिशय कठीण अशा निवडप्रक्रियेतून पार पडलेले उस्तादच अकादमींमध्ये पाठवले जातात. 'सुभेदार मेजर' हुद्द्यावरच्या, आणि जबरदस्त व्यक्तिमत्त्व असलेल्या एका व्यक्तीच्या हाताखाली हे सगळे ड्रिल उस्ताद काम करतात. उस्तादांचा कॅडेट्सवर असलेला प्रभाव पाहता, असेही म्हणता येईल की अकादमीचे सर्व कामकाज या लोकांमुळेच सुरळीत चालते. अकादमीत कॅडेट म्हणून दाखल झालेल्या सिव्हिलियन 'पोराटोरांचे' रूपांतर, सक्षम सेनाधिकाऱ्यांमध्ये करण्याची किमया, हे उस्ताद ‘ड्रिल, शिस्त आणि दंडुका’ या त्रिसूत्रीचा आधारे लीलया करतात! त्यांच्या योगदानाचे महत्व पटवण्यासाठी एकच गोष्ट सांगणे पुरेसे आहे - कालची 'पोरेटोरे' जेंव्हा प्रशिक्षित अधिकारी बनून अकादमीतून बाहेर पडतात, तेंव्हा त्यांच्यावर विसंबून, आणि त्यांनी दिलेल्या आदेशाबरहुकूम, अनेक जवान आपल्या प्राणांची बाजी लावायला तयार असतात!
सगळेच ड्रिल उस्ताद 'एक से बढकर एक' असले तरी काही-काही उस्ताद विशेष छाप सोडून जातात. सुभेदार रघुनाथ सिंह हे तशा नामांकित उस्तादांपैकीच एक!
'इन्फंट्री स्कूल' या अधिकारी प्रशिक्षण संस्थेतला कामाचा अनुभव गाठीशी असलेले एक अनुभवी ट्रेनर, आणि १९६५च्या भारत-पाक युद्धात पराक्रम गाजवलेले सुभेदार रघुनाथ सिंह, १९६८ साली राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये बदलीवर आले. त्यानंतर पुढील अडीच-तीन वर्षे, 'E' स्क्वाड्रनमध्ये ट्रेनिंग घेत असलेल्या आम्हा कॅडेट्सचे ते ड्रिल उस्ताद होते.
सुभेदार रघुनाथ सिंहांना सैनिकी पेशाची पार्श्वभूमी होती. स्वतःच्या पूर्वजांविषयी त्यांना रास्त अभिमानही होता. सुप्रसिद्ध '१ डोगरा बटालियन', आणि १९६५च्या युद्धात त्या पलटणीतील आपल्या सहकाऱ्यांसह पाक सैन्याशी लढताना रघुनाथ सिंहांनी कमावलेले 'वीर चक्र', याविषयी ते बोलू लागले की, त्यांच्या डोळ्यात आम्हाला एक विशेष चमक जाणवत असे.
सुभेदार रघुनाथ सिंहांच्या ट्रेनिंगचा आम्हा सर्वांवर जबरदस्त प्रभाव पडला. ‘इज्जत, नाम, नमक, निशान’ ही मूल्ये त्यांनीच आम्हाला शिकवली!
१९६५च्या युद्धात रघुनाथ सिंहांनी केलेल्या कामगिरीची कहाणीही मोठी विलक्षण आणि आश्चर्यकारक होती. ११ सप्टेंबर १९६५ रोजी, 'असल उत्तर'च्या युद्धभूमीवर झालेल्या लढाईदरम्यान, तत्कालीन हवालदार रघुनाथ सिंह आपल्या प्लाटूनच्या एकूण ३५-४० जवानांपैकी जिवंत राहिलेल्या १८ जवानांचे नेतृत्व करीत पुढे निघाले होते. जवळच एका ऊसाच्या शेतामध्ये, एक मोठी आणि शस्त्रसज्ज पाकिस्तानी तुकडी लपली असल्याची माहिती त्यांना मिळाली. आपल्यापेक्षा खूपच बलाढ्य शत्रूशी आता गाठ पडणार हे हवालदार रघुनाथ सिंहानी ओळखले. पण विलक्षण प्रसंगावधान आणि प्रचंड आत्मविश्वास या त्यांच्या गुणांची प्रचिती त्यांच्या हाताखालच्या जवानांना तात्काळ आली.
जणू काही हाताखाली २-३ प्लाटून आहेत अशा थाटात, हवालदार रघुनाथ सिंहांनी मोठ्याने ओरडत आदेश द्यायला सुरू केले. "नंबर १ प्लाटून, बाएँ से घेरा डालो, नंबर २ प्लाटून दाहिने से आगे बढ़ो, बाकी जवान मेरे साथ हमले के लिए तैयार हो जाओ..."
त्यापाठोपाठच, शेतात लपलेल्या शत्रूला जीव वाचवण्यासाठी शरण येण्याचे आवाहन करत, एक 'शेवटची संधी'ही त्यांनी दिली!
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हवालदार रघुनाथ सिंहांची ती युक्ती यशस्वी झाली. शेतात लपलेली पाकिस्तानी टोळी आपले अवसान गमावून, हात वर करत आत्मसमर्पणासाठी बाहेर आली!
एकही गोळी न झाडता, हवालदार रघुनाथ सिंहानी पाकिस्तानच्या रणगाडा दळाच्या चौथ्या कॅव्हलरी (4th Cavalry) बटालियनचे कमांडिंग ऑफिसर, लेफ्टनंट कर्नल नाझीर अहमद, त्यांच्या खालोखाल असलेले तीन अधिकारी आणि एकूण १७ पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेतले. त्या पाकिस्तानी युनिटचे संपूर्ण वरिष्ठ नेतृत्वच अशा पद्धतीने भारतीय सैन्याच्या ताब्यात आल्यामुळे ती पलटण पूर्णपणे सैरभैर झाली आणि एक मोठाच विजय भारताला मिळाला.
आम्ही तरुण कॅडेट्स, या शौर्यगाथेने मोहित होऊन सुभेदार रघुनाथ सिंहांचे अक्षरशः 'फॅन' झालो होतो. रघुनाथ सिंह हा एक साधा-सरळ सैनिक होता. त्यांनी हा प्रसंग काहीही तिखट-मीठ न लावता, जसा घडला तसाच आम्हाला सांगितला होता. आम्हाला मात्र हे भान निश्चितच होते की आम्ही एका खऱ्या-खुऱ्या योद्ध्याने रचलेला इतिहास त्याच्याच तोंडून ऐकत होतो! आमच्या संस्कारक्षम मनांवर या प्रसंगाचा काय परिणाम झाला असेल याची कल्पना इतरांना येणे कठीण आहे.
काही वर्षांनंतर, आम्ही ट्रेनिंग संपवून आपापल्या बटालियनमध्ये दाखल झालो आणि जवळजवळ लगेच, १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या रणांगणात उतरलो. सुभेदार रघुनाथ सिंह यांनाही NDA मधून पुन्हा त्यांच्या बटालियनमध्ये पोस्टिंगवर पाठवले गेले.
रघुनाथ सिंहांची '१ डोगरा' ही पलटण त्यावेळी शकरगड सेक्टरमध्ये तैनात होती. १५ डिसेंबर रोजी, सातव्या कॅव्हलरी (7th Cavalry) या आपल्या रणगाडा दलाच्या पलटणीने पाकिस्तानच्या एका मजबूत तळावर हल्ला चढवला. सुभेदार रघुनाथ सिंह, हे देखील त्यांच्या चार्ली कंपनीसह, या हल्ल्यात सामील होते. त्यानंतर झालेल्या घमासान युद्धात, पाकिस्तानी विमाने युद्धभूमीवर झेपावली. उघड्या मैदानात शत्रूला भिडू पाहणाऱ्या आपल्या सैनिकांवर पाकिस्तानी विमानातून मशीनगनच्या गोळ्यांचा अक्षरशः वर्षाव झाला. त्यातल्याच काही गोळ्या सुभेदार रघुनाथ सिंहांनी आपल्या छातीवर झेलल्या.
१९६५ मध्ये वीर चक्र प्राप्त करणारा '१ डोगरा' चा वाघ, “ज्वाला माता की जय”, हा आपल्या पलटणीचा जयघोष ओठांवर घेऊन जो कोसळला तो पुन्हा कधीही न उठण्यासाठीच!
आमचा 'आदर्श ड्रिल उस्ताद'आम्हाला परत भेटणार नव्हता!
"जरी रणांगणावर पडलो शर्थ करोनी,
हे दृश्य विलक्षण जातो घेऊन नयनी,
गगनास भिडविला आम्ही आज तिरंगा
'व्यर्थ न हे बलिदान',आईला सांगा ”
-----------------------------------------------------------------------------------------
मूळ इंग्रजी अनुभव : लेफ्टनंट जनरल शंकर रंजन घोष [सेवानिवृत्त]
मराठी भावानुवाद आणि समारोपाची काव्यरचना : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त] ९४२२८७०२९४
Great Bapat sir
ReplyDeleteVery nice and inspiring translation
अलौकिक माणसाचं यथार्थ वर्णन. शेवटची कविता खासच. वैभव जोगळेकर
ReplyDeleteअलौकिक माणसाचं यथार्थ वर्णन. शेवटची कविता खासच. वैभव जोगळेकर
ReplyDelete🙏🙂
Delete🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
ReplyDelete🙏☺️
Deleteखूपच सुंदर अनुभव व तितकेच सुंदर शब्द कथन.सगळा प्रसंगसमोर उभा राहिला. मनःपूर्वक धन्यवाद सर.
ReplyDelete🙏🙂धन्यवाद!
DeleteInspiring example of strategy and courage. Thanks for sharing this story of real hero.
ReplyDelete🙂🙏
DeleteCourageous Indian Army
ReplyDeleteDrilling Ustaad. Touching and inspiring story. Nicely narrated sir
Delete🙏🙂
Deleteअमर शौर्य गाथेच सुंदर निरूपण .
ReplyDeleteधन्यवाद, आनंद! 🙂🙏
DeleteColonel thanks so much for the story of the hero that Subedar Raghunath Singh was. The story of his bravery, incredible cool shown at the time of crisis and his sacrifice should be told to all Indians. And you've brought it to many of us.
ReplyDeleteArent Dogras called Gentlemen Warriors? This regiment has given the Army two Chief of Army Staff, if I have it correct.
Milind Ranade
कमाल केली. कधी कधी असे वाटते की do we deserve it?
ReplyDeleteTrue.
DeleteSomebody has rightly said, "if you really want to do something for our soldiers, then try to be the citizens worth dying for!"
Inspirational story... Hats off...
ReplyDeleteIndeed an inspiring account of a true braveheart. Beautifully translated in your inimitable style Anand !
ReplyDelete- Sumant Khare
🙂Thanks Sumant!
DeleteKarnal saheb,baryach varsha nantar Marathi madhe kahi vachun dole panavle.JAY DEVA.
ReplyDelete🙂🙏
Deleteरघुनाथाची शौर्य गाथा तशिच विरश्रीपूर्ण लिहिली आहे.जसेच्या तसे डोळ्यापुढे उभे रहाते.खूप सुदर लिखिण
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Delete