Thursday 6 August 2020

वाहे गुरू दा खालसा...

गेल्या नोव्हेंबरमध्ये मी देहरादूनहून चंडीगढला कार चालवत निघालो होतो. हा चार तासांचा प्रवास माझ्यासाठी नेहमीच एक सुखद अनुभव असतो. वाटेत गाडीला आराम देण्यासाठी माझं ठरलेलं ठिकाण म्हणजे पौंटा साहिब गुरुद्वारा. गुुुरुद्वाऱ्यात शांत बसून 'शबद कीर्तन' ऐकणे, गुरूंना मनोमन स्मरून त्यांचे आशिर्वाद घेणेे आणि 'गुरू दा लंगर' मध्ये सर्व स्तरातील भाविकांसोबत जमिनीवर मांडी ठोकून प्रसाद ग्रहण करणे ही एक पर्वणी असते. हा अनुभव अमुक एका धर्मातील व्यक्तींनाच येतो असे मुळीच नव्हे. मला मात्र पौंटा साहिब गुरुद्वाऱ्यात घालवलेला हा अर्धा-पाऊण तास नवी ऊर्जा देऊन जातो.
 
जेवून उठलो आणि बाहेर छोट्यामोठ्या गोष्टींच्या एका दुकानासमोर जरा रेंगाळलो. तिथे एक गुज्जर परिवार माझ्या दृष्टीस पडला. डोंगरांवर आणि दऱ्याखोऱ्यांमधून पशू घेऊन फिरणारी आणि दूधविक्री करणारी गुज्जर ही एक मुस्लिम जमात आहे. एका चहाच्या टपरीसमोर या गुज्जर परिवाराची काही गंभीर चर्चा सुरू होती. मळकट कपडे घातलेलं एक वयस्कर जोडपं, दोन मध्यमवयीन जोडपी आणि चार लहान मुलं असं ते कुटुंब होतं. त्यातील सर्वात वयस्कर पुरुष हातावर काही नाणी आणि चुरगळलेल्या एक-दोन नोटा मोजीत होता. माझ्या अंदाजाप्रमाणे काय आणि किती विकत घ्यावे अशी चर्चा सुरू होती.

शेवटी सगळ्यांमध्ये मिळून तीन चहा आणि चार सामोसे अशी 'भक्कम' ऑर्डर दिली गेली. 
त्यांच्या गरीबीचा अंदाज आला असला तरी मी जरा दबकतच पुढे होऊन विचारले, "तुम्हा सर्वांना जेवायचंय कां"? 
त्या सगळ्यांनी माझ्याकडे, एकमेकांकडे आणि मग पुन्हा माझ्याकडे पाहिले. आश्चर्य, भीति आणि दुखावलेला स्वाभिमान यांचे एक अजब मिश्रण त्यांच्या नजरेत होते. काही क्षण शांततेतच गेले. शांतता किती बोलकी असू शकते ते मला नव्याने जाणवले. मुलांच्या निरागस नजरेत दिसणारा आशाळभूत भावच माझ्या प्रश्नाचे उत्तर होते. 
कुटुंबप्रमुख मात्र निग्रहाने म्हणाला, 
"आम्ही जेवलोय". 
मी काही बोलणार इतक्यात त्या चार लहान मुलांपैकी एक मुलगा काकुळतीला येऊन म्हणाला, "सकाळपासून कुठे काय खाल्लंय, बडे अब्बू?" 
त्या लहानग्याची अजीजी पाहून माझ्या छातीत उठलेली कळ मलाच आश्चर्यचकित करून गेली.
 
त्या वृध्दाला आणि त्या लहान मुलाला मी हाताला धरले आणि लंगरच्या दिशेने निघालो, 
"ईश्वराच्या प्रसादाला नाही म्हणू नका" असे मी म्हणताच त्यांच्या चेहऱ्यावरचा कसनुसा भाव कमी झाला पण एक अनामिक भीति मात्र होतीच. आयुष्यात प्रथमच एका इस्लामेतर देवालयात आल्यामुळे तसे असणार हा माझा अंदाज चुकीचा नव्हता.
 
त्या सर्वांची पादत्राणे मी स्वतः उचलून रॅकवर ठेवली. गुरुद्वाऱ्यात आज मी दिलेली ती पहिलीच 'कारसेवा' होती. अंतर्यामी दाटलेले समाधान माझ्या चेहर्‍यावर झळकले असावे. ती माणसे मात्र बरीचशी ओशाळून पण काहीशा अविश्वासाने माझ्याकडे पाहत होती. 
मी हसून त्यांना म्हटले, "ही आमची अल्पशी सेवा. चला, गुरूचरणी माथा टेकवू आणि प्रसाद घेऊया." तिन्ही जोडपी माना डोलावून माझ्यासोबत निघाली. 
चारही मुले मात्र साहजिकच अन्नछत्राच्या दिशेने टक लावून पाहत उभी होती.

येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांपैकी काही आमच्या दिशेने चोरटे कटाक्ष टाकताना मला दिसत होते. त्यामुळे मनात येऊ लागलेली अस्वस्थता झटकून मी त्या चार मुलांकडे लक्ष वळवले. बालसुलभ उत्साहात त्यांनी वेगवेगळ्या रंगाचे पटके निवडले. गुरुद्वाऱ्यात शिरण्यापूर्वी डोक्याला पटका बांधायची रीत त्यांनी बरोबर हेरली होती. गुरू ग्रंथसाहेबांच्या देव्हाऱ्यासमोर माथा टेकताना त्या चार मुलांच्या चेहऱ्यावरचा अपार भक्तिभाव कुणाच्याच नजरेतून सुटला नाही. भाईजींनी मुलांना 'कडा प्रसाद' दिला आणि हसून म्हटले, "आणखी हवाय?" मुलांनीही अत्यानंदाने हात पुढे केला.

लंगरमध्ये रांगेत मुलांच्या मागेच मी उभा होतो. कमालीच्या उत्साहाने त्यांनी थाळ्या उचलल्या, आणि सतरंजीवर मांड ठोकली. आमच्या समोरच्या रांगेत एक नुकतेच लग्न झालेले आणि पहिल्या दर्शनाला आलेले जोडपे जेवत बसले होते. अंगात लाल जोडा आणि हातात किणकिणणाऱ्या लाल बांगड्या घातलेली ती नववधू त्या मुलांना पाहून खुदकन हसली आणि तिने खुणेनेच त्या मुलांना जवळ बोलावले. सगळ्यात धाकटी दोन मुले लगबगीने जाऊन त्या जोडप्याच्या मधेच बसली. त्या वधूने मोठ्या लाडाने त्यांना दोन-दोन घास भरवले. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच मी मनाशी म्हटले की, "भविष्यात ही एक चांगली, कर्तव्यदक्ष आणि प्रेमळ आई होणार नक्कीच. "

आम्हालाही भोजन वाढले गेले. माझे जेवण आधीच झाले असले तरी माझ्या पाहुण्यांसोबत मीही दोन घास जेवलो. आधी मनात असलेला संकोच आणि भीति विसरून ते कुटुंब चवीने आणि भरपेट जेवले. त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडणारा समाधानाचा भाव पाहताना मला आतून जो आनंद होत होता तो मी शब्दात सांगू शकणार नाही. आम्ही जेवून उठणार तेवढ्यात, गुरुद्वाऱ्याच्या मुख्य ग्रंथींना घेऊन, एक तरुण सेवादार माझ्यापाशी आला आणि माझ्याकडे बोट दाखवून ग्रंथींच्या कानात काहीतरी पुटपुटला. 

मी पुढे झालो आणि अदबीने नमस्कार करीत प्रमुख ग्रंथींसमोर उभा राहिलो. गुरुद्वाऱ्यात शिरताना माझ्या मनात येऊ पाहत असलेल्या अस्वस्थतेची जागा आता भीतिने घेतली होती. माझे पाहुणे तर आणखीच घाबरून अंग चोरत उभे राहिले. त्यांच्याकडे इशारा करीत ग्रंथी म्हणाले, "यांना तुम्हीच इथे घेऊन आलात?"
 
मी नुसतीच मान डोलावली. त्यांचा पुढचा प्रश्न ऐकताच माझ्या मनातली भीति अधिकच गडद झाली. "तुम्ही रोज ग्रंथाचा पाठ म्हणता?" 
मी अनवधानाने "हो" असे उत्तर देणार होतो पण तेवढ्यात, माझ्या मनावर लहानपणापासून झालेल्या संस्कारांनी माझ्या जिभेचा ताबा घेतला. मी अत्यंत नम्रपणे उत्तरलो, "नाही, मी रोज पाठ करीत नाही". 

ग्रंथी शांतपणे म्हणाले, "तुम्हाला यापुढे पाठ म्हणायची गरजही नाही. आज तुम्ही जे केलं आहे..." 

पुढे ऐकाव्या लागणाऱ्या शाब्दिक फटकाऱ्यांचा अंदाज आल्याने मी मनाची तयारी करू लागलो. पण जे ऐकू आले त्याने मात्र मी पुरता गोंधळलो. 
"आज तुम्ही जे केलं आहे त्यामुळे तुम्हाला सर्व काही मिळाले आहे. यांना गुरूच्या चरणी आणून, तुम्ही त्यांची सेवा केलीत. त्यांना गुरूंचा प्रसाद ग्रहण करायला दिलात. मी तुम्हाला शतशः धन्यवाद देतो. आम्ही आपले ऋणी आहोत." 

मला कळेचना की हा उपहास होता की कानउघाडणी होती. 

तेवढ्यात ते ग्रंथी हात जोडून त्या कुटुंबासमोर गेले आणि म्हणाले, "यापुढेदेखील कधी या रस्त्याने आलात तर गुरूचरणी माथा टेकवून, प्रसाद ग्रहण करा आणि लंगरमध्ये जेवल्याशिवाय जाऊ नका. अहो, ही देवाची देणगी आहे. आपण भरभरून घ्यायची आणि हात जोडून माथा टेकायचा. बस्स." 
एवढं बोलून ग्रंथींनी पुन्हा त्या कुटुंबाला आणि मला हात जोडून नमस्कार केला आणि एक स्मितहास्य करून निघूनही गेले. 

माझ्या सर्वांगावर अक्षरशः रोमांच उठले होते.

आम्ही बाहेर आलो आणि ती सर्व मंडळी भारावल्यागत मला नमस्कार करून जाऊ लागली. पण तेवढ्यात त्यातली वृध्दा आपल्या नवऱ्याच्या कानात काहीतरी पुटपुटली. 
मी म्हणालो, "काय झालं मियाँ? काही राहिलं का?" 
तो वृध्द काहीशा विनवणीच्या स्वरात म्हणाला, "साहेब, ही म्हणते, आपली हरकत नसेल तर हिला आपल्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. माफ करा पण..." 

मी हसत पुढे झालो आणि त्या वृध्देपुढे वाकलो. तिने एका हाताने डोळ्यातले पाणी पुसत दुसरा हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि काहीतरी पुटपुटली. काही क्षण मी डोळे मिटून आणि मान खाली ठेवूनच उभा होतो. हळू-हळू मान वर केली आणि हळूहळू चालत दूर जाणाऱ्या त्या पाठमोऱ्या कुटुंबाकडे डबडबत्या डोळ्यांनी पाहत राहिलो.  

कदाचित हा माझ्या मनाचा खेळच असेल, पण आजही मी जेंव्हा-जेंव्हा नतमस्तक होतो तेंव्हा एका मुसलमान स्त्रीचा सुरकुतलेला हात माझ्या मस्तकावर वात्सल्याने फिरत असल्याचा भास मला होतो.  

-----------------------------------------------------------------
मूळ इंग्रजी स्वानुभवलेखन:
मेजर जनरल एस पी एस नारंग (सेवानिवृत्त)

मराठी भावानुवाद:
कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

32 comments:

  1. अप्रतिम शब्दांकन

    ReplyDelete
  2. Very nicely translated
    No doubt its appealing
    Even it gives a feel that you yourself are going through this incidence

    ReplyDelete
  3. सुरेख लेखन...

    ReplyDelete
  4. Sir, I had read this story long ago on some WhatsApp group wall. It gives more happiness to read a well written translation. As usual you have written it with emotions and feel. Enjoyed thoroughly, Sir.

    ReplyDelete
  5. Again, another fabulous narration Anand!
    - Sumant

    ReplyDelete
  6. Beautifully translated Colonel. Though I haven't read the original version but am sure you generate the same feelings in the reader as the narrative must have done the first time. Its very difficult to retain the subtlety and emotion while translating but you have done that so well !!
    Milind Ranade

    ReplyDelete
  7. आनंद दादा परत गोष्ट एकतानता डोळ्यात पाणी आले

    ReplyDelete
  8. Very best narration Col. Saheb..W

    ReplyDelete
  9. Very nicely translated. Excellent choice of words.
    Sanjay Joshi.

    ReplyDelete
  10. I salute you both General Narang and Colonel Anand.Superbly captures human emotions.

    ReplyDelete
  11. हृदय स्पर्शी

    ReplyDelete
  12. SUNTE PUNIT KAHTE PAVIT
    MAJ.GEN.NARANG,PRATYAKSH KRUTIT OOTRAVAT ASLYANE TE "BEANT"AAHET,HEEH PANTH KI JEET AANI GURUJEE KI JEET FATTE FATTE.

    ReplyDelete
  13. देवापुढे सगळेच समान असतात.हृदयस्पर्शि आहे.भुकेल्याला खाऊ घालणे ही आपली संस्कृती आहे.खूपच मोठ काम केल.आणि मोठ्या मनानी सर्वानिच ते स्विकारले.देवाचरणी सेवा रुजू झाली.

    ReplyDelete
  14. मूळ लेख कुठे वाचता येईल? एखादे भाषांतर वाचून मूळ कलाकृती वाचण्याची इच्छा होणे, हे उत्तम भाषांतराचे लक्षण असते. खूप छान सर!!

    ReplyDelete
    Replies
    1. Col. Anand Bapat (Retd)18 August 2022 at 11:50

      Thanks and sorry for the late reply.
      Read the original article here
      https://www.google.com/amp/s/www.thecitizen.in/amp/index.php/en/NewsDetail/index/9/17075/A-Meal-in-a-Gurudwara----A-Tale-of-Sheer-Love-and-Compassion

      Delete