Thursday, 27 February 2025

महाकुंभमेळा आणि राष्ट्रीय शक्ती

महाकुंभमेळा  आणि राष्ट्रीय शक्ती

मूळ इंग्रजी लेखक: ब्रिगेडियर परमजीत सिंग घोतडा (सेवानिवृत्त)

मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट  (सेवानिवृत्त)

महाकुंभपर्वामध्ये गंगास्नान करण्यासाठी मी अजूनही गेलेलो नाही हे ऐकताच तो म्हणाला, "इतक्या मोठ्या स्तरावर हा महाकुंभमेळा आयोजित करणे म्हणजे पैशांचा आणि संसाधनांचा निव्वळ अपव्यय आहे, दुसरं काय?" तो स्वतः नास्तिक असल्याचे त्याने मला आधीच सांगितले होते. 

मी हसतमुखानेच त्याला म्हणालो, "तुझ्या चष्म्यातून तुला सर्व धर्मांमधल्या केवळ वाईट गोष्टीच दिसत राहणार यात काही नवल नाही. पण एका सैनिकाच्या दृष्टिकोनातून मला तरी असे दिसते की, भारताने आपले शत्रू आणि मित्र या दोघांनाही या कुंभमेळ्याद्वारे एक अतिशय स्पष्ट इशारा दिलेला आहे."

माझे बोलणे ऐकताच त्याने भुवया उंचावून म्हटले, "सैनिकी दृष्टिकोन? पण धर्म आणि सैन्यदलांचा काय संबंध?" 

"अगदी घनिष्ठ संबंध आहे. आता असं पाहा, कोट्यवधी लोक लांबलांबून येऊन प्रयागतीर्थी एकत्र जमले, इथे राहिले आणि सर्वांनी एका सामायिक श्रद्धेने गंगेमध्ये स्नान केले. यामधून किमान चार गोष्टी स्पष्ट होतात: -

१. कोट्यवधी भारतीयांना अशा प्रकारे एकसंध समूहात एकवटता येणे शक्य आहे. 

२. अभूतपूर्व अशा प्रकारचा हा सोहळा घडवून आणण्यासाठी लागणारी योजनक्षमता आपल्यामध्ये आहे. 

३. एखाद्या सांघिक ध्येयावर जर अढळ विश्वास असेल, तर ते उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी, वैयक्तिक स्तरावर अपार कष्ट आणि गैरसोय सहन करण्याचा सोशिकपणा भारतीयांमध्ये आहे. 

४. आपल्या देशाचे नेतृत्व अत्यंत सक्षम आणि कणखर आहे. 

अरे, अवकाशात भ्रमण करणाऱ्या उपग्रहांनाही दिसू शकेल इतका भव्य सोहळा आपल्या देशात आयोजित होतोय ही गोष्ट तुला अभिमानास्पद वाटत नाहीये का? मी तुला सांगतो, आपले शत्रूदेखील या सोहळ्याकडे आज अचंबित होऊनच, पण अतिशय सावधपणे पाहत असतील!"  

त्याने नुसतेच खांदे उडवले आणि म्हणाला, "असेलही. पण माझा प्रश्न पुन्हा तोच आहे. सैनिकी दृष्टीकोनाचा इथे काय संबंध?" 

जरासा पुढे झुकत मी म्हणालो, "कल्पना करून बघ, एखाद्या युद्धाच्या प्रसंगी अशा तऱ्हेने संपूर्ण जनसमूह एकवटून जर देशाच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहिला तर युद्धावर किती जबरदस्त प्रभाव पडेल? पाकव्याप्त काश्मीर किंवा तिबेटला शत्रूच्या जोखडातून मुक्त करायचे ठरवून जर असा जनसमूह उद्या एकवटला तर? देशावर ओढवलेल्या एखाद्या संकटाचा सामना करण्यासाठी जर जनता अशा तऱ्हेने एकत्र आली आणि त्यांनी यथाशक्ती दान केले तर केवढी प्रचंड संपत्ती उपलब्ध होऊ शकेल माहितीये? हे बघ, कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यातून एक गोष्ट ठळकपणे सिद्ध होते - भारताची युद्धक्षमता केवळ सैन्यदलांचे शौर्य आणि त्यांच्या शस्त्रसामर्थ्यावर अवलंबून नव्हे, तर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या जनतेच्या इच्छाशक्तीमध्ये आहे. जगातला कोणीही युद्धनीतिज्ञ माझे हे म्हणणे मान्य करेल."

आता त्याच्या चेहऱ्यावर काहीसे कडवट आणि कठोर भाव दिसू लागले, "या मेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत कित्येक निरपराध लोकांना प्राण गमवावे लागलेत, आणि तू इथे बसून खुशाल राष्ट्रीय शक्तिप्रदर्शनाच्या पोकळ गप्पा मारतोयस? तुझं हे बोलणं तुला विचित्र नाही का वाटत?"

एक सुस्कारा सोडत मी उत्तरलो, "अरे, जरासा व्यापक विचार करून पाहा. ती दुर्घटना घडून गेल्यानंतर तिथे जाणाऱ्या लोकांची संख्या कमी तर झालीच नाही - उलट वाढलीच. शिवाय, प्रशासनानेही तेथील व्यवस्था अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यावर भर दिला. आपली जनता आणि प्रशासन या दोघांचाही निर्धारच यातून ठळकपणे दिसतो. चीनमध्ये जर अशी चेंगराचेंगरीची घटना घडली असती तर काय झालं असतं माहितीये? एकतर त्यांनी हा सोहळाच तातडीने गुंडाळून टाकला असता, किंवा मग गर्दी नियंत्रित करण्यासाठी राक्षसी ताकद वापरली असती - जे त्यांनी कोव्हिडकाळात केलंच होतं. त्यांच्या सैनिकांच्या गोळ्यांनी त्यांचेच नागरिक मृत्युमुखी पडतानाचे व्हिडिओ नाही का पाहिलेस तू?"  

आता मात्र तो उपहासाने हसत म्हणाला, "मग काय? इतकं सगळं झालं तरी आपण आपला आनंदसोहळा साजरा करत राहायचं, असं तुझं म्हणणं आहे का?"

"सोहळा तर साजरा करायचाच. पण ही वेळ अंतर्मुख होऊन गंभीर विचार करण्याचीदेखील आहे." 

"कसला गंभीर विचार?" तो जरा चिडखोरपणेच बोलला. 

मी पुन्हा पुढे झुकत म्हणालो, "अरे, आईचं दूध प्यायलेला कोणीही शत्रू अशा वेळी आपली राष्ट्रीय शक्ती खच्ची करू पाहील, आणि आपण जर गाफील राहिलो तर तो यशस्वी होईलही."

माझी परीक्षा पाहत असल्याच्या अविर्भावात तो म्हणाला, "शत्रू आपली राष्ट्रीय शक्ती खच्ची करू पाहील? ते कसं काय बुवा?"

त्याचा उपहास मला कळत होता, पण माझा प्रयत्न मी सोडला नाही. "हे बघ, कुंभमेळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे लोकांची आस्था, आणि दुसरं, आपलं कार्यक्षम नेतृत्व. आपला शत्रू एकतर लोकांची आस्था डळमळीत करण्याचा प्रयत्न करील, किंवा आपल्या डोक्यावर कमकुवत नेते बसवण्याचा प्रयत्न करेल. भारतातल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल प्रभावित करण्यासाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला गेल्याबद्दल तू वाचलं नाहीस का?"

तो कुत्सितपणे उद्गारला, "ओहहो! आता मला माझ्यासमोर बसलेला 'अंधभक्त' स्पष्ट दिसायला लागला !"

मी नुसतीच मान हलवली. कारण, मुद्देसूद चर्चा सोडून आता तो वैयक्तिक टीका करू लागला होता. स्वतःमधल्या नकारात्मकतेमुळे आंधळा झालेला असूनही, तो मलाच विनाकारण 'अंधभक्त' ठरवू पाहत होता. मी मनातून पुरता चडफडलो होतो. पण शक्य तितक्या शांत स्वरात मी म्हणालो, "माझं दुर्दैव इतकंच की अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन असलेला, माझ्यातला एक सच्चा देशभक्त तुला दिसत तरी नाहीये, किंवा तू पाहूच इच्छित नाहीस. असो."

याउप्पर त्याच्याशी कोणतीच सयुक्तिक चर्चा शक्य नसल्याने, मी तिथून निघून जाणेच श्रेयस्कर होते. 

'गुरुवाणी' मधला एक श्लोक जाता-जाता सहजच माझ्या मनात उमटला, "हम नाहीं चंगे, बुरा नाहीं कोये, प्रणवथ नानक, तारे सोये।" म्हणजेच, "मी चांगला आहे असे नाही, इतर लोक वाईट आहेत असेही नाही, नानक प्रार्थना करतो, तोच (देव) आमचा तारणहार आहे!"


The Maha Kumbh and CNP

Brig PS Gothra (Retd)

"It is a waste of resources to hold the Kumbh Mela on such a massive scale," the man said when I mentioned that I hadn’t taken a dip at the Maha Kumbh. He had told me earlier that he was an atheist.
    I smiled. "With your outlook, you will always see the negatives in religion. But from my military perspective, I see the Kumbh as a powerful demonstration to both our enemies and our allies."
He raised an eyebrow. "Military? What does religion have to do with the military?"
"Everything," I replied.  "Think about it. Crores of people gather, travel, and take a dip in unison. What does that signify?
(a) The ability to mobilize millions at an unprecedented scale.
(b) The administrative strength of the nation to manage such an event efficiently.
(c) The unshakable faith of our people, willing to endure discomfort for a larger cause.
(d) The great capability of our leadership. 
"Isn’t it something to be proud of that this event is visible from space? I assure you, our enemies are watching."
He shrugged. "Fine, but what’s 'military' about it?"
I leaned forward. "Imagine the impact if the entire nation mobilized to support a war. Imagine if such a mass movement was directed towards liberating POK or Tibet. Imagine if people voluntarily contributed their wealth to fund a national cause. Events like the Kumbh Mela make it clear—India’s national power isn’t just about weapons; it’s about the will of its people. And any serious military strategist in the world would take note of that."
His expression hardened. "But people have died in stampede at this gathering, and here you are, calling it an asset to national power. Isn’t that absurd?"
I sighed. "Look at the bigger picture. More people visited after that incident, and the administration only improved its arrangements. That showcases the grit of both our people and our government. Now, compare this to China. If a stampede of this scale had occurred there, they would have either shut down the event completely or controlled the crowds with brutal force—just as they did during COVID. Did you see those videos of people being shot by their forces.  India, in contrast, adapts and strengthens."
   He scoffed. "So, according to you, it’s time to rejoice?"
   "Yes, it’s time to rejoice. But it’s also time to contemplate."
   His curiosity piqued.      "Contemplate? About what?"
    I leaned in. "Any adversary worth its salt will attempt to neutralize this element of our national power. And if we don’t prepare, they will succeed."
   "Neutralize? How?"
    I exhaled. "The key forces behind the Kumbh’s success are faith (aastha) and leadership. Our enemies will attempt to manipulate public perception to divide that faith or install incompetent leaders to mismanage such events. Have you not seen how there were indications of U.S. having allocated funds to influence Indian elections? Similar efforts will be made by others to weaken what makes us strong."
    He smirked. "I see an andhbhakt in you."
    I shook my head. The man has started displaying his ad hominem tendency.  I was getting irritated as he was blinded by negativity and yet called me an andhbakht. But I said, "I’m sorry, you can’t recognize a pragmatic deshbhakt in me."
   And with that, I walked away as I didn’t want to challenge his perspective any further. The Gurbani says:-
   Ham Nahee Changae Buraa Nahee Koe. Pranavath Naanak Thaarae Soe.
  I am not good; no one is bad. Prays Nanak, He (God) alone saves us!

Friday, 10 January 2025

सैनिकांचा धर्म!

 
१९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले तेंव्हा '४ राजपुताना रायफल्स बटालियन'चे सुभेदार रिछपाल राम दोन महिन्यांच्या रजेवर गावी आलेले होते. गुडगांव जिल्ह्यातल्या त्यांच्या बर्डा गावामध्ये, घरटी किमान एक तरी आजी-माजी सैनिक होताच. बर्डा गावाला 'फौजियों का गांव' म्हणूनच ओळखले जात असे.
युद्ध सुरु होताच, बर्डा गावातल्या जवानांना सुट्टी रद्द झाल्याच्या तारा येऊ लागल्या. एक-एक करून बहुतांश जवान आपापल्या पलटणीसोबत युद्धभूमीकडे रवाना होऊ लागले. काही दिवस गेल्यानंतरही सुभेदार रिछपाल राम यांना त्यांच्या बटालियनकडून बोलावणे आलेले नसल्याने ते अस्वस्थ होते. अखेर एके दिवशी त्यांनी स्वतःच ठरवले की मी बटालियनमध्ये परतणार. त्यांची पत्नी जानकीने त्यांना तार येईपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला, पण ते ऐकेनात. त्यांचे म्हणणे होते की, एकतर पोस्टातून त्यांची तार गहाळ झाली असावी किंवा ती चुकीच्याच पत्त्यावर पाठवली गेली असावी.
 
त्यांचा हेका एकच होता - "पलटणीच्या आणि देशाच्या मिठाला जागण्याची वेळ आलेली असताना, नुसते वाट पाहत स्वस्थ बसणे हा सैनिकी धर्मच नव्हे!"
टांग्यात बसून पत्नीचा निरोप घेताना सुभेदार रिछपाल राम तिला म्हणाले, "मैं उल्टो आऊँगो, मोर्चो जीत के आऊँगो। और जे उल्टो ना आ पायो तो ऐसो कुछ कर जाऊँगो, के म्हारी पूरी बिरादरी तेरे पे गर्व करेगी।" (मी परत येईन आणि जिंकूनच येईन. पण जर मी परत नाही येऊ शकलो तर असं काहीतरी करेन, ज्यामुळे आपल्या सर्व समाजाला तुझा अभिमान वाटेल!")
दुर्दैवाने, सुभेदार रिछपाल राम युद्धभूमीवरून कधीच परतले नाहीत. परंतु, स्वतःचे प्राण आपल्या पलटणीवरून आणि देशावरून ओवाळून टाकण्यापूर्वी, त्यांनी पत्नीला दिलेले वचनही पाळले होते. मरणोपरांत 'व्हिक्टोरिया क्रॉस' देऊन त्यांच्या शौर्याचा सन्मान केला गेला.
 
साठ वर्षे लोटली आणि १९९९ साल उजाडले. जम्मू-काश्मीरमध्ये कारगिलवर युद्धाचे ढग दाटून येऊ लागले. '१७ जाट' बटालियनचे काही जवान व अधिकारी रजेवर होते. आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसताच, बटालियनचे अडज्युटन्ट, मेजर एच. एस. मदान यांनी सगळ्यांना तारा पाठवून परत बोलवायला सुरुवात केली. 
१७ जाट बटालियनच्या 'डेल्टा' कंपनीचे कमांडर, मेजर दीपक रामपाल हेदेखील दीर्घकालीन रजेवर होते. सप्टेंबर १९९९ मध्ये होणाऱ्या स्टाफ कॉलेज प्रवेश परीक्षेसाठी ते कसून तयारी करत होते. बटालियनचे सीओ, कर्नल यू. एस. बावा यांची अशी इच्छा होती की मेजर दीपकच्या अभ्यासामध्ये शक्यतो व्यत्यय येऊ नये. त्यांनी मेजर मदान यांना सांगितले, "दीपकला इतक्यात तार पाठवू नकोस. जरा चित्र स्पष्ट होऊ दे. गरज पडलीच तर आपण त्याला ऐनवेळी बोलावून घेऊ."
एके दिवशी बटालियनच्या 'ऑप्स रूम'मध्ये बसलेल्या कर्नल बावांना धक्काच बसला. पाठीवर रकसॅक घेतलेले मेजर दीपक रामपाल 'ऑप्स रूम'मध्ये येऊन दाखल झाले. 
"अरे दीपक, तुला आम्ही परत बोलावलं नव्हतं. तू कसा काय आलास?" असे सीओ साहेबांनी विचारताच मेजर रामपाल उत्तरले, "सर, पाकिस्तान्यांच्या घुसखोरीची बातमी मी रेडिओवर ऐकली.  '४ जाट'चे मेजर सौरभ कालिया आणि त्याच्या गस्ती पथकाला पाक घुसखोरांनी हालहाल करून मारल्याचं वृत्तही मी वर्तमानपत्रात वाचलं. हुतात्मा सैनिकांच्या शवपेट्या त्यांच्या गावापर्यंत आल्याचं दृश्यही टीव्हीवर दिसलं. त्यानंतर मी काय करायला काय हवं होतं असं तुमचं म्हणणं आहे, सर?"
बटालियनमध्ये परतल्यानंतर दोन आठवड्याच्या आतच मेजर दीपक रामपाल आपल्या डेल्टा कंपनीसह अत्यंत दुर्गम अशा 'व्हेल बॅक' टेकडीवर चाल करून गेले. पाक घुसखोरांनी त्या टेकडीवर मजबूत पकड घेतलेली होती. एक रात्रभर चालेल्या हातघाईच्या लढाईनंतर मेजर दीपक आणि त्यांच्या शूरवीर जाटांनी 'व्हेल बॅक' टेकडी काबीज केली. मेजर दीपक रामपाल यांच्या असाधारण शौर्य आणि असामान्य नेतृत्वाबद्दल त्यांना 'वीर चक्र' प्रदान करून सन्मानित केले गेले. 
देशाला आपली खरी गरज असताना, हक्काच्या रजेसारख्या मामुली सवलतीचे महत्व ते काय? सुभेदार रिछपाल राम आणि मेजर दीपक रामपाल ही फक्त दोनच नावे आहेत. भारतीय सैन्यदलांमधल्या प्रत्येक जवानांचे जीवनसूत्र  'राष्ट्र सर्वोपरि' हेच असते. पलटणीच्या खाल्लेल्या मिठाला वेळप्रसंगी जागणे हाच खरा धर्म! 

मूळ इंग्रजी लेखक : लेफ्टनंट कर्नल दिलबाग सिंग दबास (सेवानिवृत्त)
मराठी अनुवाद :  कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त), ९४२२८७०२९४ 

Saturday, 31 August 2024

बांगलादेश अस्थिर का आहे?

बांगलादेश अस्थिर का आहे?

मूळ इंग्रजी लेखक : लेफ्टनंट जनरल सतींद्र कुमार सैनी (सेवानिवृत्त)
मराठी अनुवाद :  कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 
[लेफ्टनंट जनरल सतींद्र कुमार सैनी हे भारतीय सेनेचे माजी उपसेनाध्यक्ष असून, हा लेख त्यांच्या व्यक्तिगत विचारांवर आधारित आहे.]


गेल्या काही आठवड्यांमध्ये बांगलादेशात घडलेल्या उलथापालथीची कारणे अनेक आहेत. परंतु, "पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांची एकाधिकारशाही" हेच एक मुख्य कारण सातत्याने पुढे केले जात आहे. प्राप्त परिस्थितीकडे  इतक्या संकुचित दृष्टीकोनातूनच जर पाहिले गेले तर, बांगलादेशाच्या जन्मापासून तेथील सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये असलेले अनेक विरोधाभास आणि विसंगती दुर्लक्षितच राहतील. 


गेल्या अनेक शतकांपासून तेथील समाजाची नाळ बंगाली संस्कृतीशी जोडलेली आहे. परंतु, बंगाली अस्मिता आणि 'जमात-ए-इस्लामी' या संघटनेने चालवलेले इस्लाम धर्माचे पुनरुथ्थान या दोहोंच्या कात्रीमध्ये बांगलादेशचा समाज सापडलेला आहे. शेख हसीना यांनी 'जमात-ए-इस्लामी' वर घातलेली बंदी मुहम्मद युनूस यांच्या नवनियुक्त सरकारने सत्तेत येताच उठवलेली आहे. 

तसे पाहता, बांगलादेशात तीन वेगवेगळ्या विचारधारा आपल्या अस्तित्वासाठी एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात. त्यापैकी, 'धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद', आणि 'इस्लाम धर्माधिष्ठित राष्ट्रवाद' या दोन्ही विचारधारांपेक्षा 'बंगाली संस्कृती' ची विचारधारा अधिक उदार आणि सर्वसमावेशक आहे. 
सुमारे ९०% बांगलादेशी नागरिक इस्लामचे अनुयायी आहेत. मूळ राज्यघटनेनुसार बांगलादेश हे आजही एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असले, आणि सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य असले तरीही १९८८ सालच्या घटनादुरुस्तीनंतर इस्लामला राष्ट्रीय धर्माचा दर्जा देण्यात आलेला आहे. 

ढाक्यामध्ये मी 'नॅशनल डिफेन्स कोर्स'चे प्रशिक्षण घेत असताना, बांगलादेशी लष्करी व मुलकी अधिकाऱ्यांसोबत अनेक विषयांवर चर्चा करण्याची संधी मला मिळाली होती. देशाच्या शासनामध्ये इस्लामचे महत्व सर्वोपरि  असल्याची भूमिका काही लष्करी अधिकारीदेखील घेत असल्याचे पाहून मला नवल वाटले होते. इतकेच नव्हे तर, राज्यघटनेमधून धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख १९७५ साली काढून टाकला गेलेला असताना, तो २०१० साली पुन्हा समाविष्ट केला गेला, हेही त्यांना रुचले नव्हते!

देशाच्या इतिहासाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनांतदेखील सामान्य बांगलादेशीयांमध्ये प्रचंड विसंगती असल्याचे दिसून येते. आपापल्या राजकीय विचारधारा, आणि सिद्धांतांनुसार दोन प्रमुख गट तिथे दिसतात - एक म्हणजे  स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतलेले लोक, आणि दुसरा गट म्हणजे त्या युद्धापासून दूर राहिलेले लोक. बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धात भारताचा जो मोठ्या प्रमाणावर सहभाग होता, त्याकडे पाहण्याचे दृष्टीकोनही वेगवेगळे आहेत.

राष्ट्रवादाच्या पुरस्कर्त्यांची अशी समजूत आहे की, स्वतंत्र बांगलादेशाला आपल्या अंगठ्याखाली दाबून ठेवणे आणि ईशान्य भारतात जाण्यायेण्याचा मार्ग प्रशस्त ठेवणे, हे दोनच संकुचित उद्देश मनात ठेवून भारताने या युद्धात भाग घेतला होता. 
चीनसमर्थक वामपंथी लोकांना असे वाटते की पश्चिम बंगालच्या ज्यूट कारखान्यांना लागणारा कच्चा माल भविष्यात सहजी उपलब्ध व्हावा इतकाच भारताचा हेतू होता. कट्टर वामपंथी लोक तर भारताला एक साम्राज्यवादी राष्ट्र मानतात आणि त्यांच्या मते बांगलादेशाचा मुक्तिसंग्राम म्हणजे एक अपूर्णच राहिलेली क्रांति आहे! 
बांगलादेशातल्या इस्लामच्या पुरस्कर्त्यांचा हा ठाम समज आहे की, पाकिस्तानचे तुकडे करणे हाच भारताचा एकमेव हेतू होता, कारण शेजारीच जन्माला आलेले मुस्लिम राष्ट्र हिंदूच्या डोळ्यात सदैव खुपत होते!

सर्वसामान्य भारतीयांना कदाचित कल्पनाही नसेल, पण विविध विचारधारेच्या लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या 'मुक्ती बाहिनी' या बांगलादेशी स्वातंत्र्यसेनेलाही भारतीय सैन्याबद्दल फारशी आत्मीयता नव्हती. त्यांच्या स्वातंत्र्ययुद्धात भारतीय सेनेची प्रमुख भूमिका असणे त्यांना पसंत नव्हते. काहीश्या अनिच्छेनेच ते भारतीय सेनेच्या अधिपत्याखाली लढले होते. पाकिस्तानी सैन्याच्या जाहीर शरणागती कार्यक्रमामध्ये बांगलादेशाचे भावी हवाईदल प्रमुख, (तत्कालीन ग्रुप कॅप्टन)  एयर व्हाईस मार्शल अब्दुल करीम खांडकर हेही सहभागी झाले होते. परंतु, तो कार्यक्रम म्हणजे भारतीय सेनेने स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासाठी आयोजित केलेला एक सोहळा होता असेच बहुतांश लोकांचे मत आहे! इतकेच नव्हे तर, १९७१च्या स्वातंत्र्यसंग्रामाला 'भारत-पाक युद्ध' म्हटल्यास बांगलादेशी लोक नाक मुरडतात हेही माझ्या पाहण्यात आले! त्यामुळे, ढाक्यामधील राष्ट्रीय संग्रहालयात स्वातंत्र्ययुद्धातला भारताचा सहभाग दर्शवणाऱ्या काही मोजक्याच वस्तू ठेवल्या आहेत हे ऐकून कुणाला आश्चर्य वाटायचे कारण नाही. 

"भारताने स्वातंत्र्ययुद्धात केलेल्या मदतीची मोठी किंमत आपल्याला भरावी लागलेली आहे" अशा स्वरूपाचा दुष्प्रचार अनेक वर्षे बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर होत आलेला आहे. तसेच, स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच देशाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांसाठी भारताला जबाबदार धरणे, ही अनेक बांगलादेशीयांची राजकीय निकड होऊन बसली आहे. दोन्ही देशांच्या इतिहासातल्या काही घटनांमुळे, परस्परांबाबतच्या अविश्वासाला एक धार्मिक कंगोरादेखील जोडला गेलेला आहे. एकूण काय तर, भारत हा एक वर्चस्ववादी देश असल्याचा समज बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. 

सामान्य बांगलादेशीयांचा भारताकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टीकोन तयार करण्यामागे बांगलादेशी माध्यमांचा मोठा हात आहे. काही तांत्रिक कारणांमुळे भारताचा व्हिसा मिळायला होणारा उशीर, आंतरराष्ट्रीय सीमेवर घडणाऱ्या बारीकसारीक घटना, यासारख्या बातम्यांना एकीकडे अवास्तव महत्व देणे, आणि परस्परसहयोगामुळे  होणाऱ्या दोन्ही देशांच्या फायद्याकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करणे असा खोडसाळपणा तेथील माध्यमे करत असतात. त्यामुळे भारताबद्दल विविध गैरसमज तेथील लोकांमध्ये प्रचलित आहेत. "बांगलादेशी टीव्ही चॅनल्सचे प्रसारण विशेषतः पश्चिम बंगालमध्ये दाबून टाकून, आणि मोठ्या प्रमाणावर भारतीय चॅनल्स बांगलादेशात प्रसारित करून, बांगलादेशाच्या संस्कृतीवर भारत घाला घालत आहे" हा असाच एक गैरसमज आहे. "भारतामध्ये प्रसारण  करू देण्याच्या बदल्यात योग्य तो मोबदला द्यायला बांगलादेशी चॅनल्स तयार नसतात", इतके साधे व्यावसायिक कारण अनेकदा समजावून सांगूनदेखील हा गैरसमज दूर तर होत नाहीच. उलट तोच-तोच मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. असे असल्याने, भारत हा बांगलादेशचा हितशत्रू आहे, आणि चीन मात्र अतिशय भरवशाचा मित्र देश आहे असे सामान्य माणसाचे मत न झाले तरच नवल.  

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, गेल्या अनेक वर्षांच्या लोकशाही राजवटीनंतरही बांगलादेशी लष्कर आणि तेथील जनता यांच्यामध्ये परस्परविश्वासाचे नाते निर्माण होऊ शकलेले नाही. तेथील दोन प्रमुख राजकीय पक्षांचा एकमेकांना असलेला अत्यंत कट्टर आणि हिंसक विरोध हेच त्यामागचे मुख्य कारण म्हणता येईल. सत्तेसाठी रस्सीखेच करताना दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध सूडबुद्धीने वागत आल्याने, तेथील राजकीय वातावरण लोकशाहीसाठी पोषक न होता सदैव गढूळलेलेच राहिले आहे. अर्थातच, सशक्त लोकशाहीसाठी आवश्यक असलेल्या संस्थांना विश्वासार्हता कमावता आलेली नाही. एकमेकांविरुद्धच्या डावपेचांसाठीची गरज म्हणून त्या-त्या वेळच्या सत्तारूढ पक्षाने सेनादलांना चुचकारत राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सैन्यदलाचे अप्रत्यक्ष समर्थन अनिवार्य असल्याचा समज बांगलादेशात आता खोल रुजला आहे. संरक्षण मंत्रालयाचे विभाजन करून, सेनादलांना थेट पंतप्रधानांच्या अधिपत्याखाली ठेवले गेले आहे. इतर लोकशाही राष्ट्रांच्या सेनादलांमध्ये परंपरेने प्रचलित असलेल्या नियंत्रण प्रणालीला बांगलादेशात अशी तिलांजली मिळाल्यामुळे सेनादलांमध्येही राजकीय ध्रुवीकरण बोकाळले आहे. पाकिस्तानी सेनेप्रमाणेच बांगलादेशी सैन्याचेही हितसंबंध  मोठमोठ्या औद्योगिक उपक्रमांमध्ये गुंतलेले आहेत. सैन्यदलांकडे असलेली अवैध संपत्ती आणि त्यायोगे उकळल्या जाणाऱ्या छुप्या फायद्यांची उदाहरणे जागोजाग दिसतात.  

सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनातही सैन्यदलांचा संबंध अंमळ जास्तच येत असल्यामुळे, देशाच्या सुरक्षेसाठी काम करणारी संस्था इतकीच त्यांची ओळख आता राहिलेली नाही. राजधानी ढाक्यातील रहदारीचे नियंत्रण करणे, राष्ट्रीय ओळखपत्रे आणि मतदारयाद्या बनवणे, अशा मुलकी प्रशासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या कित्येक कामांसाठी सेनेला सर्रास वापरले जाते. 

इतर बाह्य कारणांपेक्षाही, देशाच्या राज्यकारभारामध्ये आलेल्या अशा अनेक विसंगतींच बांगलादेशातील वातावरण अस्थिर करत आहेत. अलीकडेच अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांवर त्या देशात झालेले हल्ले, किंवा शेख हसीना यांच्याविरुद्ध उसळलेला हिंसक लोकक्षोभ, यांच्याविरुद्ध कारवाई करायला सेनेने सुरुवातीला नकार का दिला होता हे कळणे फारसे अवघड नाही.

वर नमूद केलेल्या सर्व विसंगती ओळखून त्यांवर मात केल्याशिवाय बांगलादेशातील सध्याची परिस्थिती बदलता येणे नजीकच्या भविष्यात तरी अवघड आहे असे दिसते.   

['हिंदुस्थान टाइम्स' मध्ये छापून आलेल्या मूळ इंग्रजी लेखाचा स्वैर अनुवाद ]

Saturday, 5 August 2023

असाही एक सफाई कामगार!

  असाही एक सफाई कामगार!

१९९८ सालची गोष्ट. क्षेपणास्त्रे (मिसाईल) बनवण्यासाठी भारताचे जोरदार प्रयत्न चालू होते. अमेरिकेच्या उपग्रहांना सुगावा लागू नये म्हणून क्षेपणास्त्रांच्या प्रकल्पाबाबत कमालीची गुप्तता राखली जात होती. क्षेपणास्त्रांकरिता आवश्यक असलेली क्रायोजेनिक इंजिन्स गुप्तपणे चेन्नई बंदरामध्ये आणली जात होती. तेथून ती इंजिन्स हवाई मार्गाने पुढे नेण्याची योजना होती. त्यासाठी भारतीय वायुसेनेची हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्स वापरली जाणार होती.


चेन्नई बंदरापासून क्षेपणास्त्रांच्या लॉंच पॅडपर्यंत पोहोचण्याकरता हेलिकॉप्टरला दोन तास पुरेसे होते. परंतु, अमेरिकेच्या उपग्रहांना चकवण्यासाठी, नागमोडी मार्गाने उडत, आणि चार वेगवेगळ्या ठिकाणी दोन-दोन तास थांबे घेत जाण्याचे आदेश हेलिकॉप्टर्सच्या वैमानिकांना दिले गेले होते. त्यामुळे, प्रत्यक्षात दोन तासांचा असलेला प्रवास आम्ही सोळा तासांमध्ये पूर्ण करणार होतो. अर्थात, आपल्या राष्ट्रीय उद्दिष्टांबाबत गुप्तता राखण्यासाठी मोजली जाणारी ही किंमत अगदीच नगण्य होती. 

हेलिकॉप्टरमध्ये वजनदार क्रायोजेनिक इंजिने ठेवलेली असल्याने, प्रवासी क्षमतेवर खूपच मर्यादा आली होती. क्षेपणास्त्र प्रकल्पाचे फक्त १२ कर्मचारीच एकावेळी इंजिनसोबत प्रवास करू शकणार होते. या १२ कर्मचाऱ्यांमध्ये दोन सफाई कामगारांचाही समावेश होता. त्याचे कारण असे की, क्रायोजेनिक इंजिनमधून सतत गळून  हेलिकॉप्टरमध्ये सांडणारे तेल व क्रायोजेनिक इंधन वेळोवेळी स्वच्छ करत राहणे आवश्यक होते. 

भारत सरकारच्या सर्वोच्च पातळीवर ज्यांची नावे मंजूर झालेली होती अशा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही हेलिकॉप्टरमध्ये प्रवेश देऊ नये असे स्पष्ट आदेश आम्हाला होते. परंतु, सफाई कामगारांपैकी एखादा कामगार बदलून त्याच्या जागी ऐनवेळी दुसरा कामगार नेमण्याचे अपवादात्मक विशेषाधिकार क्षेपणास्त्र प्रकल्प निदेशकांना दिलेले होते. मात्र त्यासाठी प्रकल्प निदेशकांची लेखी परवानगी त्या कामगाराच्या हातात असणे आवश्यक होते. 

चेन्नईहून आम्ही निघण्याच्या तयारीत होतो. इतक्यात, भुरकट लांब केस असलेला एक माणूस आमच्यापाशी येऊन म्हणाला, "मला लॉंच साईटवर पोहोचणं अत्यावश्यक आहे, पण माझी फ्लाईट चुकलीय. मला तुमच्यासोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. प्लीज मला घेऊन चला."  

आमच्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एकही जादा मनुष्य आम्ही सोबत नेऊ शकणार नव्हतो. त्यामुळे आमच्यापाशीही त्याला नकार देण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.

आम्ही अगदी उड्डाण करण्याच्या तयारीत असताना तो मनुष्य पुन्हा आमच्यापाशी धावत-धावत आला आणि म्हणाला, "हे पहा, माझ्यापाशी प्रकल्प निदेशकांचे लेखी परवानापत्र आहे. अमुक-अमुक सफाई कामगाराच्या ऐवजी मला जागा दिली गेली आहे." 

आता काहीच हरकत नसल्यामुळे, मुख्य वैमानिकाने त्याला चढायची परवानगी दिली. एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदाने उडी मारून तो मनुष्य हेलिकॉप्टरमध्ये चढला. 

आमच्या प्रवासाचा एक टप्पा पूर्ण करून आम्ही एके ठिकाणी थांबलो होतो. चार तासांचा हॉल्ट होता. आम्ही निवांत चहा पीत बसलो होतो. तिथूनच आम्हाला दिसले की तो मनुष्य हेलिकॉप्टरचा अंतर्भाग अगदी काळजीपूर्वक पुसून काढत होता. आमच्यासोबतच्या कर्मचारीवर्गात काही वरिष्ठ शास्त्रज्ञ देखील होते. ते त्या माणसाशी काहीतरी बोलत असल्याचे आम्हाला दिसले. 

इतक्यातच एक शास्त्रज्ञ धावत आमच्यापाशी आला आणि म्हणाला, "अहो, ते जे हेलिकॉप्टर स्वच्छ करतायत त्यांना प्लीज थांबवा. ते आमचं ऐकत नाहीयेत. ते स्वतःच आमच्या क्षेपणास्त्र प्रकल्पाचे निदेशक आहेत, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम!"

हे ऐकून आम्हाला धक्काच बसला. आमच्या मुख्य वैमानिकाने लगेच जाऊन त्यांना ते काम थांबवण्याची विनंती केली. त्यावर हसून ते इतकेच म्हणाले, "मी या हेलिकॉप्टरमध्ये एक सफाई कामगार म्हणून प्रवास करत आहे. माझे कर्तव्य बजावण्यापासून तुम्ही कृपया मला रोखू नका."

आमचा नाईलाज झाला. त्यापुढच्या हॉल्टमध्येही या सद्गृहस्थांची कर्तव्यपूर्ती अव्याहत चालू राहिली. अक्षरशः हतबुद्ध होऊन पाहत राहण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. 

गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतर आम्ही या अजब प्रकल्प निदेशकाचा आणि त्याच्या टीमचा हसतमुखाने निरोप घेतला. 

या घटनेनंतर बऱ्याच वर्षांनी मला राष्ट्रपती भवनातून एक निमंत्रणपत्र आले. राष्ट्रपतींनी तेथील 'मुघल गार्डन्स' चा केलेला कायापालट मी पाहावा आणि राष्ट्रपती एक सफाई कामगार म्हणून चांगले आहेत की ते त्याहून अधिक चांगले माळी आहेत हे मी सांगावे, असे त्या पत्रात लिहिले होते! 

त्या काळी मी परदेशात असल्याने, आमंत्रण स्वीकारू शकत नसल्याचे मी विनम्रतापूर्वक कळवले. 

कालांतराने, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची मी आवर्जून भेट घेतली. तेंव्हाही त्यांनी खळखळून हसत त्या जुन्या प्रसंगाची आठवण जागवली. 

एका असामान्य भारतीयाला माझा सॅल्यूट !


मूळ इंग्रजी अनुभवलेखक: विंग कमांडर अब्दुल नासिर हनफी, वीर चक्र, [सेवानिवृत्त]

मराठी भावानुवाद  : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त] ९४२२८७०२९४

Saturday, 10 June 2023

'१ डोग्रा' पलटणीचा वाघ


भारतीय सेनाधिकाऱ्यांच्या ट्रेनिंग अकादमीमध्ये कॅडेट्सना कवायत शिकविण्यासाठी जे हवालदार आणि सुभेदार हुद्द्यावरचे ड्रिल उस्ताद असतात त्यांच्याबद्दल कोणाही अधिकाऱ्याला विचारा. तुम्हाला भरभरून प्रशंसाच ऐकायला मिळेल. 

अकादमीत कॅडेट म्हणून दाखल झालेल्या सिव्हिलियन 'पोराटोरांचे' रूपांतर, सक्षम सेनाधिकाऱ्यांमध्ये करण्याची किमया, हेच उस्ताद ‘ड्रिल, शिस्त आणि दंडुका’ या त्रिसूत्रीच्या आधारे लीलया करत असतात!

सगळेच ड्रिल उस्ताद 'एक से बढकर एक' असले तरी काही-काही उस्ताद आपली एक विशेष छाप ठेवून जातात. सुभेदार रघुनाथ सिंह हे तशा नामांकित उस्तादांपैकीच एक!

'इन्फंट्री स्कूल' या सैन्य प्रशिक्षण संस्थेतला कामाचा अनुभव गाठीशी असलेले, आणि १९६५च्या भारत-पाक युद्धात पराक्रम गाजवलेले सुभेदार रघुनाथ सिंह, १९६८ साली राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये बदलीवर आले. त्यानंतर पुढील अडीच-तीन वर्षे, 'E' स्क्वाड्रनमध्ये ट्रेनिंग घेत असलेल्या आम्हा कॅडेट्सचे ते ड्रिल उस्ताद होते.

सुभेदार रघुनाथ सिंहांना सैनिकी पेशाची पार्श्वभूमी होती. स्वतःच्या लढवय्या पूर्वजांविषयी त्यांना रास्त अभिमानही होता. आपली सुप्रसिद्ध '१ डोगरा बटालियन', आणि १९६५च्या युद्धात पाक सैन्याशी लढताना स्वतः कमावलेले 'वीर चक्र', याविषयी सुभेदार रघुनाथ सिंह साहेब बोलू लागले की, त्यांच्या डोळ्यात आम्हाला एक विशेष चमक जाणवत असे.
त्यांच्या शिकवणीचा आम्हा सर्वांवर जबरदस्त प्रभाव पडला. ‘इज्जत, नाम, नमक, निशान’ ही मूल्ये त्यांनीच आम्हाला शिकवली!

१९६५च्या युद्धात  रघुनाथ सिंहांनी केलेल्या कामगिरीची कहाणी मोठी विलक्षण आणि आश्चर्यकारक होती. 
११ सप्टेंबर १९६५ रोजी, 'असल उत्तर'च्या युद्धभूमीवर झालेल्या लढाईदरम्यान, तत्कालीन हवालदार रघुनाथ सिंह आपल्या प्लाटूनच्या एकूण ३५-४० जवानांपैकी जिवंत उरलेल्या १८ जवानांचे नेतृत्व करीत पुढे निघाले होते. जवळच एका ऊसाच्या शेतामध्ये, एक मोठी आणि शस्त्रसज्ज पाकिस्तानी तुकडी लपली असल्याची माहिती त्यांना मिळाली. आपल्यापेक्षा खूपच बलाढ्य शत्रूशी आता काही मिनिटांतच आपली गाठ पडणार हे हवालदार रघुनाथ सिंहानी ओळखले. पण विलक्षण प्रसंगावधान आणि प्रचंड आत्मविश्वास या त्यांच्या गुणांची प्रचिती त्यांच्या हाताखालच्या जवानांना तात्काळ आली.
 
जणू काही हाताखाली २-३ प्लाटून आहेत अशा थाटात, हवालदार रघुनाथ सिंहांनी मोठ्याने ओरडत आदेश द्यायला सुरू केले. "नंबर १ प्लाटून, बाएँ से घेरा डालो, नंबर २ प्लाटून दाहिने से आगे बढ़ो, बाकी जवान मेरे साथ हमले के लिए तैयार हो जाओ..."  
त्यापाठोपाठच, "जीव वाचवण्यासाठी शरण यायचे असेल तर हीच शेवटची संधी आहे" असे आवाहन, शेतात लपलेल्या शत्रूला त्यांनी केले!
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हवालदार रघुनाथ सिंहांची ती युक्ती यशस्वी झाली. शेतात लपलेली पाकिस्तानी टोळी आपले अवसान गमावून, हात वर करत आत्मसमर्पणासाठी बाहेर आली!

एकही गोळी न झाडता, हवालदार रघुनाथ सिंहानी पाकिस्तानच्या रणगाडा दळाच्या चौथ्या कॅव्हलरी (4th Cavalry) चे कमांडिंग ऑफिसर, लेफ्टनंट कर्नल नाझीर अहमद, त्यांच्या खालोखालचे तीन अधिकारी आणि एकूण १७ पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेतले. पाकिस्तानच्या 4th Cavalry युनिटचे संपूर्ण वरिष्ठ नेतृत्वच अशा प्रकारे भारतीय सैन्याच्या ताब्यात आल्यामुळे ती पलटण पूर्णपणे सैरभैर झाली आणि एक मोठाच विजय भारताला मिळाला. याच कामगिरीसाठी (तत्कालीन) हवालदार रघुनाथ सिंह यांना 'वीर चक्र' देऊन सन्मानित करण्यात आले. 

आम्ही तरुण कॅडेट्स, या शौर्यगाथेने मोहित होऊन सुभेदार रघुनाथ सिंहांचे अक्षरशः 'फॅन' झालो होतो. रघुनाथ सिंह हा एक साधा-सरळ सैनिक होता. त्यांनी हा प्रसंग काहीही तिखट-मीठ न लावता, जसा घडला तसाच आम्हाला सांगितला होता. आम्हाला मात्र हे भान निश्चितच होते की आम्ही एका खऱ्या-खुऱ्या योद्ध्याने रचलेला इतिहास त्याच्याच तोंडून ऐकत होतो! आमच्या संस्कारक्षम मनांवर या प्रसंगाचा काय परिणाम झाला असेल याची कल्पना करता येऊ शकेल. 

आम्ही ट्रेनिंग संपवून आपापल्या बटालियनमध्ये दाखल झालो आणि जवळजवळ लगेच, १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात रणांगणावर उतरलो. सुभेदार रघुनाथ सिंह यांनाही NDA मधून पुन्हा त्यांच्या बटालियनमध्ये पोस्टिंगवर पाठवले गेले.

रघुनाथ सिंहांची '१ डोगरा' ही पलटण त्यावेळी शकरगढ सेक्टरमध्ये तैनात होती. १५ डिसेंबर रोजी, भारतीय रणगाडा दलाच्या सातव्या कॅव्हलरी (7th Cavalry) या पलटणीने पाकिस्तानच्या एका मजबूत ठाण्यावर हल्ला चढवला. रणगाड्यांपाठोपाठ चाल करून जाणाऱ्या इन्फंट्रीच्या तुकड्यांमध्ये सुभेदार रघुनाथ सिंहांच्या '१ डोग्रा' ची चार्ली कंपनीदेखील होती. त्या घमासान युद्धात, पाकिस्तानी विमाने युद्धभूमीवर झेपावली. खुल्या मैदानात शत्रूला भिडू पाहणाऱ्या भारतीय सैनिकांवर पाकिस्तानी विमानातून मशीनगनच्या गोळ्यांचा अक्षरशः वर्षाव झाला. त्यातल्याच काही गोळ्या सुभेदार रघुनाथ सिंहांनी आपल्या छातीवर झेलल्या.   

१९६५ मध्ये वीर चक्र प्राप्त करणारा '१ डोगरा' चा वाघ, “ज्वाला माता की जय”,  हा आपल्या पलटणीचा जयघोष ओठांवर घेऊन जो कोसळला तो पुन्हा कधीही न उठण्यासाठीच! 

आमचा 'आदर्श ड्रिल उस्ताद'आम्हाला परत भेटणार नव्हता! 

"जरी धारातीर्थी पडलो शर्थ करोनी,
हे दृश्य अलौकिक जातो घेऊन नयनी,
गगनास भिडविला आम्ही आज तिरंगा 
'व्यर्थ न हे बलिदान',आईला सांगा.”

जय हिंद! 
-----------------------------------------------------

मूळ इंग्रजी अनुभवलेखक: लेफ्टनंट जनरल शंकर रंजन घोष [सेवानिवृत्त]

मराठी भावानुवाद आणि समारोपाची काव्यरचना : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त] ९४२२८७०२९४

Sunday, 13 March 2022

रात्र सरता सरत नाही...

रात्र सरता सरत नाही… 



प्रसूतीगृहातून सकाळी घरी आणता इवल्याशा गोड बाळाला, 
त्या रात्री ते बाळ जेंव्हा रडत असतं, तुम्ही होता पुरते हवालदिल.
सुचेल ते सगळं करून झालं तरी रडं काही थांबत नाही.
सकाळच्या आनंदाश्रूंच्या जागी आता 
असहायतेचं पाणी वाहत असतं.

ती रात्र सरता सरत नाही…
 
बाळाला खांद्यावर घेऊन थोपटत, अंगाई म्हणत, 
रात्रभर येरझाऱ्या घालत राहता, डोळ्याला डोळा लागत नाही. 
तापानं अंग फणफणलेलं, नेहमी लुकलुकणारे डोळे निस्तेज, चेहरा मलूल, 
काय झालं असेल म्हणून तुम्ही इंटरनेट धुंडाळत बसता,
अवेळी डॉक्टरांना फोन करताना अवघडूनही जाता…

रात्र सरता सरत नाही…

बाळं जेंव्हा शाळेत जायला लागतात,
तुम्ही रात्री विचार करत बसता, 
मुलं शाळेत रुळतील नां? चांगले मित्र जोडतील नां?
मोठेपणी काय होतील? आपण त्यांना सगळं काही देऊ शकू नां? 
शरीर थकलेलं असलं तरी भुंगा मनाला पोखरतच राहतो…

रात्र सरता सरत नाही…

गाडीत मागच्या सीटवर नाचत, गाणी म्हणत, चिवचिवाट करणारी मुलं,
स्मार्टफोनमध्ये डोकं खुपसून बसतात. 
पूर्वी साध्या साध्या गोष्टींसाठी प्रश्न विचारून भंडावून सोडणारी मुलं,
आजकाल आपल्या प्रश्नांना उत्तरंही देत नाहीत. 
‘त्यांचं सगळं ठीक चाललं असेल नां? काही प्रॉब्लेम तर नसेल नां?’ 
तुमची झोप पार उडते, विचार पिच्छा सोडत नाहीत…
 
रात्र काही केल्या सरत नाही…

ती म्हणते, ‘मैत्रिणीकडे चाललेय, उद्या सकाळी येईन’. 
तो सांगून जातो, “रात्री यायला उशीर होईल, जेवायला वाट पाहू नका”. 
तुमचं विचारचक्र चालूच असतं, 
ती नक्की मैत्रिणीकडेच गेली असेल नां? 
तो इतक्या उशीरापर्यंत बाहेर काय करतोय?

रात्र सरतच नाही…


खरंय नां? अक्षरशः अनंत असतात या रात्री…
 
मग वर्षं? वर्षांचं काय? 

दुपट्यात गुरफटलेल्या छकुलीला 
पाळणाही अपुरा कधी पडायला लागला ते कळतच नाही…

वर्षं भुर्रकन उडून जातात…


तुमचं घट्ट पकडलेलं बोट सोडून चिमुकला 
जेंव्हा शाळेकडे पावलं टाकत निघतो तेंव्हा कळतं,

वर्षं भुर्रकन उडून जातात…

बोबडे बोल बोलत, आणि तुमचे केस ओढत कुशीत पहुडलेली मुलं,
स्वतःच्या केसांच्या स्टायली केंव्हा करायला लागतात ते कळतही नाही…
 
वर्षं कशी भुर्रकन उडून जातात…

नेमका सुट्टीच्या दिवशी पहाटेच उठून तुमची साखरझोप मोडणारा बाब्या, 
सकाळचे दहा वाजले तरी उठता उठत नाही तेंव्हा जाणवतं…

वर्षं किती भुर्रकन उडून जातात…

जिचा हात पकडून तुम्ही तिला टाटा करायला शिकवलंत,
ती जेंव्हा तुम्हालाच टाटा करून नवर्‍यासोबत निघून जाते तेंव्हा प्रकर्षानं जाणवतं…

वर्षं फारच भुर्रकन उडून जातात…

जेंव्हा आपली बाळं आपल्याच पालकांसारखे वागायला लागतात, 
ज्या रस्त्यांवर आपण चाचपडत, अडखळत चाललो त्याच रस्त्यांवर ती आज धावत निघालेली असतात,
जेंव्हा आपलं हळवं प्रेम आपल्याच काळजात कळ आणतं…
तेंव्हा आपल्याला पक्कं समजलेलं असतं की…

रात्री सरता सरत नाहीत, 

पण वर्षं मात्र भुर्रकन उडून जातात.

__________________________________________

मूळ इंग्रजी लेखिका : जिंजर ह्यूझ
स्वैर अनुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 
९४२२८७०२९४

Sunday, 20 February 2022

१९४२: एका 'असीम' मैत्रीची कथा

व्हॉट्सअप हे एक विलक्षण माध्यम आहे. त्यावर कधी-कधी अशी काही माहिती मिळून जाते ज्याबद्दल आपण कधी स्वप्नातही विचार केलेला नसतो. गेल्या आठवड्यात माझं काहीसं तसंच झालं. 

ही गोष्ट एका वेगळ्याच काळातली नव्हे, तर एखाद्या निराळ्याच विश्वातली वाटावी अशी आहे. मला मिळालेली माहिती दोन-दोनदा तपासून, खात्री केल्यानंतरच मी ती सत्यकथा लिहिण्याचा निर्णय घेतला. ती वाचून झाल्यावर वाचकांच्या चेहऱ्यावर, कदाचित थोडी विषादाची किनार असलेल्या, पण निर्मळ अशा स्मितहास्याची एक लकेर उत्स्फूर्तपणे उमटेल अशी अशा मला आहे.

१९४२ साली, उत्तर आफ्रिकेतील गझालाच्या युद्धभूमीवर, फील्ड मार्शल एर्विन रोमेलच्या जर्मन फौजांनी दोस्त राष्ट्रांतर्फे लढणाऱ्या ब्रिटिश सेनेच्या 'तिसऱ्या भारतीय मोटर ब्रिगेड' या तुकडीचा पराभव केला. एकूण १७ भारतीय अधिकाऱ्यांना जर्मनांनी कैद केले आणि इटलीच्या अव्हर्सा शहरातील युद्धकैदी शिबिरात डांबले. ते सर्व अधिकारी तत्कालीन भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातले, निरनिराळ्या वंशाचे आणि भिन्न धर्मांचे होते. 

त्या युद्धकैद्यांपैकी काही नावे अशी होती ... 

मेजर पी. पी. कुमारमंगलम, कॅप्टन आगा मुहम्मद याह्याखान, कॅप्टन ए. एस. नरवणे, लेफ्टनंट टिक्काखान, आणि लेफ्टनंट साहबझादा याकूब खान.

तत्कालीन कॅप्टन ए. एस. नरवणे पुढे मेजर जनरल पदावरून १९७०च्या दशकात निवृत्त झाले. त्यांनी "A Soldier's Life in War and Peace" या आपल्या पुस्तकात, अव्हर्साच्या  युद्धकैदी शिबिरातील आठवणी नमूद करून ठेवल्या आहेत. त्यातील संदर्भानुसार, युद्धकैदी अधिकाऱ्यांपैकी मेजर कुमारमंगलम हे सर्वात वरिष्ठ असल्याने त्यांना कॅम्प प्रमुख नेमले गेले होते. कॅप्टन याह्याखान हे कॅम्प अडज्युटन्ट होते, तर लेफ्टनंट टिक्काखान हे कॅम्प क्वार्टरमास्टरचे काम पाहत होते. 

वर नमूद केलेली थोडीशीच माहिती मला व्हॉट्सअपवर मिळाली होती. परंतु, जर्मनांच्या कैदेत असलेल्या या भारतीय अधिकाऱ्यांचे पुढे काय झाले याचा मागोवा मला घ्यावासा वाटला. पाकिस्तानी सेनेचे मेजर जनरल सय्यद अली हमीद यांनी लिहिलेले एक वृत्त 'फ्रायडे टाइम्स' नावाच्या पाकिस्तानमधील साप्ताहिकात फेब्रुवारी २०१९मध्ये प्रसिद्ध झाले होते. मी त्या वृत्ताचाही अभ्यास केला. त्यातून जी कथा समोर आली ती अशी...  

१९४३ साली युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने फिरले. मुसोलिनीच्या अधिपत्याखाली जर्मनीला साथ देणाऱ्या इटलीचा पाडाव झाला. तेथे चाललेल्या धुमश्चक्रीचा फायदा उठवत, कुमारमंगलम, याह्याखान, याकूबखान आणि इतर अधिकारी कैदेतून पळून जाण्यात यशस्वी झाले. जर्मन गस्ती तुकड्यांच्या हाती सापडू नये यासाठी, इटलीचा समुद्रकिनारा आणि अपेनाइन पर्वतराजी यादरम्यानच्या भागात बरेच दिवस ते अक्षरशः रानोमाळ पायी भटकत राहिले. लेफ्टनंट याकूबखानला इटालियन भाषा अवगत असल्याने, काही स्थानिक शेतकऱ्यांच्या वस्तीवर त्यांना आसरा मिळवता आला. 

काही दिवसांनंतर कॅप्टन याह्याखानची मात्र इतरांपासून ताटातूट झाली. जवळजवळ ४०० किलोमीटर पायी भटकल्यानंतर, अखेर सुदैवाने तो एका भारतीय पलटणीजवळ पोहोचला. मात्र त्यावेळी त्याच्या फक्त एकाच पायातला बूट शाबूत होता!

दरम्यान, मेजर कुमारमंगलम, लेफ्टनंट याकूब खान आणि इतर अधिकारी त्या शेतकऱ्यांच्या वस्त्यांवर काही महिने लपून राहू शकले. तेथून निघण्याचा निर्णय त्यांनी घेतला तेंव्हा मेजर कुमारमंगलम यांच्यावर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केलेल्या एका इटालियन माउलीने स्वतःच्या गळ्यात घातलेला कंठा कुमारमंगलम यांना भेट दिला - वर 'इडापिडा टळो' असा भरघोस आशीर्वादही दिला! 

पण विधिलिखितच असे होते की, ते शुभचिन्ह आणि त्या माउलीचे आशीर्वाद मेजर कुमारमंगलमना फळणार नव्हते!

एका काळोख्या रात्री चालत असताना, अचानक पाय घसरून पडल्याने, कुमारमंगलम यांच्या पायाचा घोटा फ्रॅक्चर झाला. त्यांनी लेफ्टनंट याकूबखानला पदोपदी सांगितले की, "तू मला इथेच सोडून पळून जा, माझे मी बघेन". पण याकूब खानाने त्यांचे अजिबात ऐकले नाही. 

साहजिकच, ते दोघेही एका जर्मन गस्ती पथकाच्या तावडीत सापडले आणि 'स्टॅलाग लुफ्ट ३' नावाच्या तुरुंगात त्यांची रवानगी झाली. हाच तुरुंग पुढे "Great Escape" नावाच्या हॉलिवूड सिनेमामुळे प्रकाशझोतात आला. 

भारतीय सेनेचे हे शिलेदार भविष्यकाळात अमाप प्रसिद्धी पावतील अशी सुतराम कल्पनादेखील त्यांच्यापैकी कोणालाच तेंव्हा असण्याची शक्यता नव्हती.

पी. पी. कुमारमंगलम भारताचे सेनाध्यक्ष झाले (१९६६-६९), याह्याखान पाकिस्तानचे सेनाध्यक्ष आणि लष्करी हुकूमशहा झाले (१९६६-१९७१), टिक्काखानदेखील पाकिस्तानचे सेनाध्यक्ष होते (१९७२-१९७६) आणि साहबजादा याकूब खान यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्रीपद भूषवले (१९९६-१९९७).

सर्वात वर डावीकडून: कुमारमंगलम, नरवणे, याह्याखान व याकूबखान 

पाकिस्तानचे सेनाध्यक्ष बनण्यापूर्वी १९६६ साली जेंव्हा जनरल याह्याखान दिल्ली भेटीवर आले तेंव्हा विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी तत्कालीन भारतीय सेनाध्यक्ष जनरल कुमारमंगलम हजर होते!

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री असताना जेंव्हा साहबझादा याकूब खान इटली दौऱ्यावर गेले तेंव्हा त्यांनी त्या कुटुंबाला आवर्जून भेट दिली ज्यांच्या घरी त्यांच्यासह इतर भारतीय अधिकाऱ्यांनी काही महिने आश्रय घेतला होता!

तसे पाहता, ही गोष्ट वाचून "त्यात काय मोठेसे?" असा प्रश्न काही वाचकांना पडू शकेल. तरीदेखील ही गोष्ट लिहावी असे मला का वाटले असेल?

ही गोष्ट त्या काळातली आहे जेंव्हा हे सर्व सेनाधिकारी केवळ भारतीय किंवा पाकिस्तानी, हिंदू वा मुसलमान, पठाण किंवा तामिळी नव्हते. ते फक्त एकमेकांचे मित्रच नव्हे, तर जीवाला जीव द्यायला मागे-पुढे न पाहणारे आणि एकसारखाच गणवेश घालून लढणारे सैनिक होते!

भारताच्या फाळणीने या मैत्रीभावाची, परस्परप्रेमाची आणि एकोप्याची अक्षरशः राख केली. या राखेवर वेळोवेळी फुंकर मारून त्याखालची आग धगधगत ठेवण्याचे काम सीमेच्या अल्याड-पल्याडची राजकारणी मंडळी चोख बजावत असतात. आणि त्याहूनही मोठे दुर्दैव असे की, दोन्हीकडच्या काही पिढ्या एकमेकांसंबंधी नुसत्या अनभिज्ञ राहिल्या असे नव्हे, तर त्यांना पद्धतशीरपणे एकमेकांचा द्वेष करायला शिकवले गेले आणि आजही शिकवले जाते. 

पण एक काळ असा निश्चितच होता जेंव्हा दोन्हीकडचे सैनिक खांद्याला खांदा लावून एकत्र लढले होते आणि त्यांनी आपला सैनिकधर्म जपला होता!

'ते हि नो दिवसा गतः' इतकेच आज विषण्णपणे म्हणावे लागते.

___________________________________________________________________________________

मूळ इंग्रजी लेखात नसलेली काही माहिती

१. १९७१ साली जेंव्हा भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभूत करून बांगलादेशाची निर्मिती केली तेंव्हा हेच याह्याखान पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा होते. 

२. लेखात उल्लेखलेले मेजर जनरल ए. एस. नरवणे हे सध्याचे भारतीय सेनाध्यक्ष जनरल मनोज नरवणे यांचे काका होते. जनरल मनोज नरवणे इटली भेटीवर गेले असता, मुद्दाम त्या गावी जाऊन आले जेथे त्यांचे काका व इतर अधिकारी आश्रयाला राहिले होते. 

___________________________________________________________________________

मूळ इंग्रजी लेखक : श्री. करण थापर  

स्वैर मराठी रूपांतर: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४