Saturday, 5 August 2023

असाही एक सफाई कामगार!

  असाही एक सफाई कामगार!

१९९८ सालची गोष्ट. क्षेपणास्त्रे (मिसाईल) बनवण्यासाठी भारताचे जोरदार प्रयत्न चालू होते. अमेरिकेच्या उपग्रहांना सुगावा लागू नये म्हणून क्षेपणास्त्रांच्या प्रकल्पाबाबत कमालीची गुप्तता राखली जात होती. क्षेपणास्त्रांकरिता आवश्यक असलेली क्रायोजेनिक इंजिन्स गुप्तपणे चेन्नई बंदरामध्ये आणली जात होती. तेथून ती इंजिन्स हवाई मार्गाने पुढे नेण्याची योजना होती. त्यासाठी भारतीय वायुसेनेची हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्स वापरली जाणार होती.


चेन्नई बंदरापासून क्षेपणास्त्रांच्या लॉंच पॅडपर्यंत पोहोचण्याकरता हेलिकॉप्टरला दोन तास पुरेसे होते. परंतु, अमेरिकेच्या उपग्रहांना चकवण्यासाठी, नागमोडी मार्गाने उडत, आणि चार वेगवेगळ्या ठिकाणी दोन-दोन तास थांबे घेत जाण्याचे आदेश हेलिकॉप्टर्सच्या वैमानिकांना दिले गेले होते. त्यामुळे, प्रत्यक्षात दोन तासांचा असलेला प्रवास आम्ही सोळा तासांमध्ये पूर्ण करणार होतो. अर्थात, आपल्या राष्ट्रीय उद्दिष्टांबाबत गुप्तता राखण्यासाठी मोजली जाणारी ही किंमत अगदीच नगण्य होती. 

हेलिकॉप्टरमध्ये वजनदार क्रायोजेनिक इंजिने ठेवलेली असल्याने, प्रवासी क्षमतेवर खूपच मर्यादा आली होती. क्षेपणास्त्र प्रकल्पाचे फक्त १२ कर्मचारीच एकावेळी इंजिनसोबत प्रवास करू शकणार होते. या १२ कर्मचाऱ्यांमध्ये दोन सफाई कामगारांचाही समावेश होता. त्याचे कारण असे की, क्रायोजेनिक इंजिनमधून सतत गळून  हेलिकॉप्टरमध्ये सांडणारे तेल व क्रायोजेनिक इंधन वेळोवेळी स्वच्छ करत राहणे आवश्यक होते. 

भारत सरकारच्या सर्वोच्च पातळीवर ज्यांची नावे मंजूर झालेली होती अशा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही हेलिकॉप्टरमध्ये प्रवेश देऊ नये असे स्पष्ट आदेश आम्हाला होते. परंतु, सफाई कामगारांपैकी एखादा कामगार बदलून त्याच्या जागी ऐनवेळी दुसरा कामगार नेमण्याचे अपवादात्मक विशेषाधिकार क्षेपणास्त्र प्रकल्प निदेशकांना दिलेले होते. मात्र त्यासाठी प्रकल्प निदेशकांची लेखी परवानगी त्या कामगाराच्या हातात असणे आवश्यक होते. 

चेन्नईहून आम्ही निघण्याच्या तयारीत होतो. इतक्यात, भुरकट लांब केस असलेला एक माणूस आमच्यापाशी येऊन म्हणाला, "मला लॉंच साईटवर पोहोचणं अत्यावश्यक आहे, पण माझी फ्लाईट चुकलीय. मला तुमच्यासोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. प्लीज मला घेऊन चला."  

आमच्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एकही जादा मनुष्य आम्ही सोबत नेऊ शकणार नव्हतो. त्यामुळे आमच्यापाशीही त्याला नकार देण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.

आम्ही अगदी उड्डाण करण्याच्या तयारीत असताना तो मनुष्य पुन्हा आमच्यापाशी धावत-धावत आला आणि म्हणाला, "हे पहा, माझ्यापाशी प्रकल्प निदेशकांचे लेखी परवानापत्र आहे. अमुक-अमुक सफाई कामगाराच्या ऐवजी मला जागा दिली गेली आहे." 

आता काहीच हरकत नसल्यामुळे, मुख्य वैमानिकाने त्याला चढायची परवानगी दिली. एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदाने उडी मारून तो मनुष्य हेलिकॉप्टरमध्ये चढला. 

आमच्या प्रवासाचा एक टप्पा पूर्ण करून आम्ही एके ठिकाणी थांबलो होतो. चार तासांचा हॉल्ट होता. आम्ही निवांत चहा पीत बसलो होतो. तिथूनच आम्हाला दिसले की तो मनुष्य हेलिकॉप्टरचा अंतर्भाग अगदी काळजीपूर्वक पुसून काढत होता. आमच्यासोबतच्या कर्मचारीवर्गात काही वरिष्ठ शास्त्रज्ञ देखील होते. ते त्या माणसाशी काहीतरी बोलत असल्याचे आम्हाला दिसले. 

इतक्यातच एक शास्त्रज्ञ धावत आमच्यापाशी आला आणि म्हणाला, "अहो, ते जे हेलिकॉप्टर स्वच्छ करतायत त्यांना प्लीज थांबवा. ते आमचं ऐकत नाहीयेत. ते स्वतःच आमच्या क्षेपणास्त्र प्रकल्पाचे निदेशक आहेत, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम!"

हे ऐकून आम्हाला धक्काच बसला. आमच्या मुख्य वैमानिकाने लगेच जाऊन त्यांना ते काम थांबवण्याची विनंती केली. त्यावर हसून ते इतकेच म्हणाले, "मी या हेलिकॉप्टरमध्ये एक सफाई कामगार म्हणून प्रवास करत आहे. माझे कर्तव्य बजावण्यापासून तुम्ही कृपया मला रोखू नका."

आमचा नाईलाज झाला. त्यापुढच्या हॉल्टमध्येही या सद्गृहस्थांची कर्तव्यपूर्ती अव्याहत चालू राहिली. अक्षरशः हतबुद्ध होऊन पाहत राहण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. 

गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतर आम्ही या अजब प्रकल्प निदेशकाचा आणि त्याच्या टीमचा हसतमुखाने निरोप घेतला. 

या घटनेनंतर बऱ्याच वर्षांनी मला राष्ट्रपती भवनातून एक निमंत्रणपत्र आले. राष्ट्रपतींनी तेथील 'मुघल गार्डन्स' चा केलेला कायापालट मी पाहावा आणि राष्ट्रपती एक सफाई कामगार म्हणून चांगले आहेत की ते त्याहून अधिक चांगले माळी आहेत हे मी सांगावे, असे त्या पत्रात लिहिले होते! 

त्या काळी मी परदेशात असल्याने, आमंत्रण स्वीकारू शकत नसल्याचे मी विनम्रतापूर्वक कळवले. 

कालांतराने, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची मी आवर्जून भेट घेतली. तेंव्हाही त्यांनी खळखळून हसत त्या जुन्या प्रसंगाची आठवण जागवली. 

एका असामान्य भारतीयाला माझा सॅल्यूट !


मूळ इंग्रजी अनुभवलेखक: विंग कमांडर अब्दुल नासिर हनफी, वीर चक्र, [सेवानिवृत्त]

मराठी भावानुवाद  : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त] ९४२२८७०२९४

No comments:

Post a Comment