१९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले तेंव्हा '४ राजपुताना रायफल्स बटालियन'चे सुभेदार रिछपाल राम दोन महिन्यांच्या रजेवर गावी आलेले होते. गुडगांव जिल्ह्यातल्या त्यांच्या बर्डा गावामध्ये, घरटी किमान एक तरी आजी-माजी सैनिक होताच. बर्डा गावाला 'फौजियों का गांव' म्हणूनच ओळखले जात असे.
युद्ध सुरु होताच, बर्डा गावातल्या जवानांना सुट्टी रद्द झाल्याच्या तारा येऊ लागल्या. एक-एक करून बहुतांश जवान आपापल्या पलटणीसोबत युद्धभूमीकडे रवाना होऊ लागले. काही दिवस गेल्यानंतरही सुभेदार रिछपाल राम यांना त्यांच्या बटालियनकडून बोलावणे आलेले नसल्याने ते अस्वस्थ होते. अखेर एके दिवशी त्यांनी स्वतःच ठरवले की मी बटालियनमध्ये परतणार. त्यांची पत्नी जानकीने त्यांना तार येईपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला, पण ते ऐकेनात. त्यांचे म्हणणे होते की, एकतर पोस्टातून त्यांची तार गहाळ झाली असावी किंवा ती चुकीच्याच पत्त्यावर पाठवली गेली असावी.
त्यांचा हेका एकच होता - "पलटणीच्या आणि देशाच्या मिठाला जागण्याची वेळ आलेली असताना, नुसते वाट पाहत स्वस्थ बसणे हा सैनिकी धर्मच नव्हे!"
टांग्यात बसून पत्नीचा निरोप घेताना सुभेदार रिछपाल राम तिला म्हणाले, "मैं उल्टो आऊँगो, मोर्चो जीत के आऊँगो। और जे उल्टो ना आ पायो तो ऐसो कुछ कर जाऊँगो, के म्हारी पूरी बिरादरी तेरे पे गर्व करेगी।" (मी परत येईन आणि जिंकूनच येईन. पण जर मी परत नाही येऊ शकलो तर असं काहीतरी करेन, ज्यामुळे आपल्या सर्व समाजाला तुझा अभिमान वाटेल!")
दुर्दैवाने, सुभेदार रिछपाल राम युद्धभूमीवरून कधीच परतले नाहीत. परंतु, स्वतःचे प्राण आपल्या पलटणीवरून आणि देशावरून ओवाळून टाकण्यापूर्वी, त्यांनी पत्नीला दिलेले वचनही पाळले होते. मरणोपरांत 'व्हिक्टोरिया क्रॉस' देऊन त्यांच्या शौर्याचा सन्मान केला गेला.
साठ वर्षे लोटली आणि १९९९ साल उजाडले. जम्मू-काश्मीरमध्ये कारगिलवर युद्धाचे ढग दाटून येऊ लागले. '१७ जाट' बटालियनचे काही जवान व अधिकारी रजेवर होते. आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसताच, बटालियनचे अडज्युटन्ट, मेजर एच. एस. मदान यांनी सगळ्यांना तारा पाठवून परत बोलवायला सुरुवात केली.
१७ जाट बटालियनच्या 'डेल्टा' कंपनीचे कमांडर, मेजर दीपक रामपाल हेदेखील दीर्घकालीन रजेवर होते. सप्टेंबर १९९९ मध्ये होणाऱ्या स्टाफ कॉलेज प्रवेश परीक्षेसाठी ते कसून तयारी करत होते. बटालियनचे सीओ, कर्नल यू. एस. बावा यांची अशी इच्छा होती की मेजर दीपकच्या अभ्यासामध्ये शक्यतो व्यत्यय येऊ नये. त्यांनी मेजर मदान यांना सांगितले, "दीपकला इतक्यात तार पाठवू नकोस. जरा चित्र स्पष्ट होऊ दे. गरज पडलीच तर आपण त्याला ऐनवेळी बोलावून घेऊ."
एके दिवशी बटालियनच्या 'ऑप्स रूम'मध्ये बसलेल्या कर्नल बावांना धक्काच बसला. पाठीवर रकसॅक घेतलेले मेजर दीपक रामपाल 'ऑप्स रूम'मध्ये येऊन दाखल झाले.
"अरे दीपक, तुला आम्ही परत बोलावलं नव्हतं. तू कसा काय आलास?" असे सीओ साहेबांनी विचारताच मेजर रामपाल उत्तरले, "सर, पाकिस्तान्यांच्या घुसखोरीची बातमी मी रेडिओवर ऐकली. '४ जाट'चे मेजर सौरभ कालिया आणि त्याच्या गस्ती पथकाला पाक घुसखोरांनी हालहाल करून मारल्याचं वृत्तही मी वर्तमानपत्रात वाचलं. हुतात्मा सैनिकांच्या शवपेट्या त्यांच्या गावापर्यंत आल्याचं दृश्यही टीव्हीवर दिसलं. त्यानंतर मी काय करायला काय हवं होतं असं तुमचं म्हणणं आहे, सर?"
बटालियनमध्ये परतल्यानंतर दोन आठवड्याच्या आतच मेजर दीपक रामपाल आपल्या डेल्टा कंपनीसह अत्यंत दुर्गम अशा 'व्हेल बॅक' टेकडीवर चाल करून गेले. पाक घुसखोरांनी त्या टेकडीवर मजबूत पकड घेतलेली होती. एक रात्रभर चालेल्या हातघाईच्या लढाईनंतर मेजर दीपक आणि त्यांच्या शूरवीर जाटांनी 'व्हेल बॅक' टेकडी काबीज केली. मेजर दीपक रामपाल यांच्या असाधारण शौर्य आणि असामान्य नेतृत्वाबद्दल त्यांना 'वीर चक्र' प्रदान करून सन्मानित केले गेले.
देशाला आपली खरी गरज असताना, हक्काच्या रजेसारख्या मामुली सवलतीचे महत्व ते काय? सुभेदार रिछपाल राम आणि मेजर दीपक रामपाल ही फक्त दोनच नावे आहेत. भारतीय सैन्यदलांमधल्या प्रत्येक जवानांचे जीवनसूत्र 'राष्ट्र सर्वोपरि' हेच असते. पलटणीच्या खाल्लेल्या मिठाला वेळप्रसंगी जागणे हाच खरा धर्म!
मूळ इंग्रजी लेखक : लेफ्टनंट कर्नल दिलबाग सिंग दबास (सेवानिवृत्त)
मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त), ९४२२८७०२९४
Very nice reading .. motivational.. Jai Hind Jai Bharat 🙏🕉️🪯
ReplyDeleteHats off to such soldiers
ReplyDeleteजवान कायम सावधान अवस्थेत म्हणून आपण कायम विश्राम अवस्थेत जिवन जगू शकतो
ReplyDeleteजयहिंद
Great!
ReplyDeleteSuch inspiring stories make us proud of our Army
ReplyDeleteAshok Purohit.
Great 👍
ReplyDeleteमाझा सलाम.
ReplyDeleteThanks a lot Colonel for sharing the heroics of Subedar Richpal Ram and Maj Deepak Rampal. Heroes not just in action but in spirit as well.
ReplyDeleteJai Hind
ReplyDelete