Thursday, 27 February 2025

महाकुंभमेळा आणि राष्ट्रीय शक्ती

महाकुंभमेळा  आणि राष्ट्रीय शक्ती

मूळ इंग्रजी लेखक: ब्रिगेडियर परमजीत सिंग घोतडा (सेवानिवृत्त)

मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट  (सेवानिवृत्त)

महाकुंभपर्वामध्ये गंगास्नान करण्यासाठी मी अजूनही गेलेलो नाही हे ऐकताच तो म्हणाला, "इतक्या मोठ्या स्तरावर हा महाकुंभमेळा आयोजित करणे म्हणजे पैशांचा आणि संसाधनांचा निव्वळ अपव्यय आहे, दुसरं काय?" तो स्वतः नास्तिक असल्याचे त्याने मला आधीच सांगितले होते. 

मी हसतमुखानेच त्याला म्हणालो, "तुझ्या चष्म्यातून तुला सर्व धर्मांमधल्या केवळ वाईट गोष्टीच दिसत राहणार यात काही नवल नाही. पण एका सैनिकाच्या दृष्टिकोनातून मला तरी असे दिसते की, भारताने आपले शत्रू आणि मित्र या दोघांनाही या कुंभमेळ्याद्वारे एक अतिशय स्पष्ट इशारा दिलेला आहे."

माझे बोलणे ऐकताच त्याने भुवया उंचावून म्हटले, "सैनिकी दृष्टिकोन? पण धर्म आणि सैन्यदलांचा काय संबंध?" 

"अगदी घनिष्ठ संबंध आहे. आता असं पाहा, कोट्यवधी लोक लांबलांबून येऊन प्रयागतीर्थी एकत्र जमले, इथे राहिले आणि सर्वांनी एका सामायिक श्रद्धेने गंगेमध्ये स्नान केले. यामधून किमान चार गोष्टी स्पष्ट होतात: -

१. कोट्यवधी भारतीयांना अशा प्रकारे एकसंध समूहात एकवटता येणे शक्य आहे. 

२. अभूतपूर्व अशा प्रकारचा हा सोहळा घडवून आणण्यासाठी लागणारी योजनक्षमता आपल्यामध्ये आहे. 

३. एखाद्या सांघिक ध्येयावर जर अढळ विश्वास असेल, तर ते उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी, वैयक्तिक स्तरावर अपार कष्ट आणि गैरसोय सहन करण्याचा सोशिकपणा भारतीयांमध्ये आहे. 

४. आपल्या देशाचे नेतृत्व अत्यंत सक्षम आणि कणखर आहे. 

अरे, अवकाशात भ्रमण करणाऱ्या उपग्रहांनाही दिसू शकेल इतका भव्य सोहळा आपल्या देशात आयोजित होतोय ही गोष्ट तुला अभिमानास्पद वाटत नाहीये का? मी तुला सांगतो, आपले शत्रूदेखील या सोहळ्याकडे आज अचंबित होऊनच, पण अतिशय सावधपणे पाहत असतील!"  

त्याने नुसतेच खांदे उडवले आणि म्हणाला, "असेलही. पण माझा प्रश्न पुन्हा तोच आहे. सैनिकी दृष्टीकोनाचा इथे काय संबंध?" 

जरासा पुढे झुकत मी म्हणालो, "कल्पना करून बघ, एखाद्या युद्धाच्या प्रसंगी अशा तऱ्हेने संपूर्ण जनसमूह एकवटून जर देशाच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहिला तर युद्धावर किती जबरदस्त प्रभाव पडेल? पाकव्याप्त काश्मीर किंवा तिबेटला शत्रूच्या जोखडातून मुक्त करायचे ठरवून जर असा जनसमूह उद्या एकवटला तर? देशावर ओढवलेल्या एखाद्या संकटाचा सामना करण्यासाठी जर जनता अशा तऱ्हेने एकत्र आली आणि त्यांनी यथाशक्ती दान केले तर केवढी प्रचंड संपत्ती उपलब्ध होऊ शकेल माहितीये? हे बघ, कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यातून एक गोष्ट ठळकपणे सिद्ध होते - भारताची युद्धक्षमता केवळ सैन्यदलांचे शौर्य आणि त्यांच्या शस्त्रसामर्थ्यावर अवलंबून नव्हे, तर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या जनतेच्या इच्छाशक्तीमध्ये आहे. जगातला कोणीही युद्धनीतिज्ञ माझे हे म्हणणे मान्य करेल."

आता त्याच्या चेहऱ्यावर काहीसे कडवट आणि कठोर भाव दिसू लागले, "या मेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत कित्येक निरपराध लोकांना प्राण गमवावे लागलेत, आणि तू इथे बसून खुशाल राष्ट्रीय शक्तिप्रदर्शनाच्या पोकळ गप्पा मारतोयस? तुझं हे बोलणं तुला विचित्र नाही का वाटत?"

एक सुस्कारा सोडत मी उत्तरलो, "अरे, जरासा व्यापक विचार करून पाहा. ती दुर्घटना घडून गेल्यानंतर तिथे जाणाऱ्या लोकांची संख्या कमी तर झालीच नाही - उलट वाढलीच. शिवाय, प्रशासनानेही तेथील व्यवस्था अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यावर भर दिला. आपली जनता आणि प्रशासन या दोघांचाही निर्धारच यातून ठळकपणे दिसतो. चीनमध्ये जर अशी चेंगराचेंगरीची घटना घडली असती तर काय झालं असतं माहितीये? एकतर त्यांनी हा सोहळाच तातडीने गुंडाळून टाकला असता, किंवा मग गर्दी नियंत्रित करण्यासाठी राक्षसी ताकद वापरली असती - जे त्यांनी कोव्हिडकाळात केलंच होतं. त्यांच्या सैनिकांच्या गोळ्यांनी त्यांचेच नागरिक मृत्युमुखी पडतानाचे व्हिडिओ नाही का पाहिलेस तू?"  

आता मात्र तो उपहासाने हसत म्हणाला, "मग काय? इतकं सगळं झालं तरी आपण आपला आनंदसोहळा साजरा करत राहायचं, असं तुझं म्हणणं आहे का?"

"सोहळा तर साजरा करायचाच. पण ही वेळ अंतर्मुख होऊन गंभीर विचार करण्याचीदेखील आहे." 

"कसला गंभीर विचार?" तो जरा चिडखोरपणेच बोलला. 

मी पुन्हा पुढे झुकत म्हणालो, "अरे, आईचं दूध प्यायलेला कोणीही शत्रू अशा वेळी आपली राष्ट्रीय शक्ती खच्ची करू पाहील, आणि आपण जर गाफील राहिलो तर तो यशस्वी होईलही."

माझी परीक्षा पाहत असल्याच्या अविर्भावात तो म्हणाला, "शत्रू आपली राष्ट्रीय शक्ती खच्ची करू पाहील? ते कसं काय बुवा?"

त्याचा उपहास मला कळत होता, पण माझा प्रयत्न मी सोडला नाही. "हे बघ, कुंभमेळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे लोकांची आस्था, आणि दुसरं, आपलं कार्यक्षम नेतृत्व. आपला शत्रू एकतर लोकांची आस्था डळमळीत करण्याचा प्रयत्न करील, किंवा आपल्या डोक्यावर कमकुवत नेते बसवण्याचा प्रयत्न करेल. भारतातल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल प्रभावित करण्यासाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला गेल्याबद्दल तू वाचलं नाहीस का?"

तो कुत्सितपणे उद्गारला, "ओहहो! आता मला माझ्यासमोर बसलेला 'अंधभक्त' स्पष्ट दिसायला लागला !"

मी नुसतीच मान हलवली. कारण, मुद्देसूद चर्चा सोडून आता तो वैयक्तिक टीका करू लागला होता. स्वतःमधल्या नकारात्मकतेमुळे आंधळा झालेला असूनही, तो मलाच विनाकारण 'अंधभक्त' ठरवू पाहत होता. मी मनातून पुरता चडफडलो होतो. पण शक्य तितक्या शांत स्वरात मी म्हणालो, "माझं दुर्दैव इतकंच की अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन असलेला, माझ्यातला एक सच्चा देशभक्त तुला दिसत तरी नाहीये, किंवा तू पाहूच इच्छित नाहीस. असो."

याउप्पर त्याच्याशी कोणतीच सयुक्तिक चर्चा शक्य नसल्याने, मी तिथून निघून जाणेच श्रेयस्कर होते. 

'गुरुवाणी' मधला एक श्लोक जाता-जाता सहजच माझ्या मनात उमटला, "हम नाहीं चंगे, बुरा नाहीं कोये, प्रणवथ नानक, तारे सोये।" म्हणजेच, "मी चांगला आहे असे नाही, इतर लोक वाईट आहेत असेही नाही, नानक प्रार्थना करतो, तोच (देव) आमचा तारणहार आहे!"


The Maha Kumbh and CNP

Brig PS Gothra (Retd)

"It is a waste of resources to hold the Kumbh Mela on such a massive scale," the man said when I mentioned that I hadn’t taken a dip at the Maha Kumbh. He had told me earlier that he was an atheist.
    I smiled. "With your outlook, you will always see the negatives in religion. But from my military perspective, I see the Kumbh as a powerful demonstration to both our enemies and our allies."
He raised an eyebrow. "Military? What does religion have to do with the military?"
"Everything," I replied.  "Think about it. Crores of people gather, travel, and take a dip in unison. What does that signify?
(a) The ability to mobilize millions at an unprecedented scale.
(b) The administrative strength of the nation to manage such an event efficiently.
(c) The unshakable faith of our people, willing to endure discomfort for a larger cause.
(d) The great capability of our leadership. 
"Isn’t it something to be proud of that this event is visible from space? I assure you, our enemies are watching."
He shrugged. "Fine, but what’s 'military' about it?"
I leaned forward. "Imagine the impact if the entire nation mobilized to support a war. Imagine if such a mass movement was directed towards liberating POK or Tibet. Imagine if people voluntarily contributed their wealth to fund a national cause. Events like the Kumbh Mela make it clear—India’s national power isn’t just about weapons; it’s about the will of its people. And any serious military strategist in the world would take note of that."
His expression hardened. "But people have died in stampede at this gathering, and here you are, calling it an asset to national power. Isn’t that absurd?"
I sighed. "Look at the bigger picture. More people visited after that incident, and the administration only improved its arrangements. That showcases the grit of both our people and our government. Now, compare this to China. If a stampede of this scale had occurred there, they would have either shut down the event completely or controlled the crowds with brutal force—just as they did during COVID. Did you see those videos of people being shot by their forces.  India, in contrast, adapts and strengthens."
   He scoffed. "So, according to you, it’s time to rejoice?"
   "Yes, it’s time to rejoice. But it’s also time to contemplate."
   His curiosity piqued.      "Contemplate? About what?"
    I leaned in. "Any adversary worth its salt will attempt to neutralize this element of our national power. And if we don’t prepare, they will succeed."
   "Neutralize? How?"
    I exhaled. "The key forces behind the Kumbh’s success are faith (aastha) and leadership. Our enemies will attempt to manipulate public perception to divide that faith or install incompetent leaders to mismanage such events. Have you not seen how there were indications of U.S. having allocated funds to influence Indian elections? Similar efforts will be made by others to weaken what makes us strong."
    He smirked. "I see an andhbhakt in you."
    I shook my head. The man has started displaying his ad hominem tendency.  I was getting irritated as he was blinded by negativity and yet called me an andhbakht. But I said, "I’m sorry, you can’t recognize a pragmatic deshbhakt in me."
   And with that, I walked away as I didn’t want to challenge his perspective any further. The Gurbani says:-
   Ham Nahee Changae Buraa Nahee Koe. Pranavath Naanak Thaarae Soe.
  I am not good; no one is bad. Prays Nanak, He (God) alone saves us!

18 comments:

  1. Nicely interpreted.

    ReplyDelete
  2. बापट सर सुप्रभात,
    कुंभमेळा आणि राष्ट्रीय शक्ती
    मी स्वतः वयाच्या पंचाहत्तरी मधे माझ्या दोन्ही मुलांच्या प्रबळ इच्छाशक्ती मुळे १९/२/२०२५ रोजी महाकुंभात स्नान करून सुखरूप नाशिक ला आलो.सामान्य शेतकरी.महाकुंभ ज्याने जसा बघीतला तसा त्याला भावला सैनिकाला वेगळ्या दृष्टीने भावला, वैज्ञानिकाला वेगळ्या दृष्टीने भावला, तसे भाविकांना वेगळा भावला शेवटी एकच कोणत्याही परिस्थितीत देश एक होऊ शकतो हा पुरावा आहे.
    जय हिंद
    जय हिंद की सेना.

    ReplyDelete
  3. Tripti Tushar Bapat28 February 2025 at 07:17

    आपली क्षमता न ओळखता येणे हे दुर्दैव आहे .दुसरं म्हणजे आपला चष्मा किंवा आपली गढुळलेली दृष्टी स्वच्छ करायची या लोकांची इच्छाशक्ती नाही आहे .त्यांचे विचार ,म्हणणे खरे आणि तेच पुढे उच्चारवाने रेटणे यामधे हे लोक माहिर आहेत .पण दुसरी बाजू असू शकते हे यांना अमान्य.
    असो.

    ReplyDelete
  4. Quite True.
    महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने जगाला एक चांगला संदेश आणि धडा मिळाला आहे. देशभक्ती म्हणजे अंधभक्ती नाही. आणि भक्तीने आंधळं असल्याशिवाय देशभक्त होता येत नाही.
    Hats off 🙏
    - विठ्ठल कुलकर्णी

    ReplyDelete
  5. जगभरातील अनेक जणांनी महाकुंभ मेळा जवळून अनुभवला आहे . करोडो भारतीय लोक स्वतः होऊन या ठिकाणी श्रध्देने येऊन गेले . या निमित्ताने राज्य आणि केंद्र सरकार एकत्र येऊन कसे उत्तम काम करत आहेत हे अनुभवता आले .... कर्नल आनंद बापट धन्यवाद

    ReplyDelete
  6. देशाच्या ऐक्याच्या दृष्टिने स्तुत्य कार्यक्रम झाला आहे.

    ReplyDelete
  7. ज्या रंगाच्या चष्म्यातून पाहू तसे जग दिसते.

    ReplyDelete
  8. बापटजी , छान अनुवाद आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आलेला हा जागतिक उच्चांक आहे.आणि भारतीयांच्या ती तकद आहे. हे जगाने पाहिले. आता जग भारतीयांविरूधद कारवाई करताना विचार करेल. हीच आमच्या हिंदू धर्माची ताकद आहे. पुनश्च धन्यवाद.... दातार

    ReplyDelete
  9. Excellently presented different view..!!

    ReplyDelete
  10. The view originally expressed
    about waste of time money
    and energy was held by several
    People.They admitted they were
    totally disillusioned with
    Success of op.MAHAKUMBH
    ASHOK PUROHIT.

    ReplyDelete
  11. The kumbh han been attracting millions of devotees for decades, if not more. Specifically crediting the current administration and leadership for this event is like crediting the government for monsoons.

    ReplyDelete
  12. अप्रतिम लेखन सर!

    ReplyDelete
  13. खूप छान माहिती मिळाली आहे. अनुवाद पण अत्यंत छान रित्या केला आहे, त्यामुळे सर्व स्तरातील लोकांना पुरेपूर माहिती मिळाली. धन्यवाद कॅप्टन साहेब.

    ReplyDelete
  14. अतिशय योग्य विश्लेषण, लेखकाचं
    अनुवाद उत्तमच.
    देशाची सर्व स्तरावरील क्षमता दिसून आली, सर्वांनाच.

    ReplyDelete