Saturday, 17 May 2025
या भारताचं काय करायचं?
Saturday, 12 April 2025
दुश्मनी में भी एक शराफत रखते हैं ...
'लक्ष्य' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या तोंडी असलेला एक संवाद आठवत असेल, "ये इंडियन आर्मी है, हम दुश्मनी में भी एक शराफत रखते हैं... "
आपल्या मायभूमीकडे वक्रदृष्टीने पाहणाऱ्यांचे डोळे फोडायलाच हवेत, आणि भारताविरोधात उठलेला प्रत्येक हात खांद्यापासून कलम केलाच पाहिजे, याबाबत कधीच दुमत असणार नाही. परंतु सच्च्या सैनिकाने आपली नीतिमत्ता आणि माणुसकी विसरणे योग्य नव्हे, हेही तितकेच खरे आहे. वरकरणी ही दोन्ही विधाने परस्परविरोधी वाटू शकतात. पण कारगिल युद्धामधली आणि त्यापूर्वींचीही अनेक उदाहरणे सांगता येतील ज्यामध्ये भारतीय सैनिकांनी पराक्रम गाजवण्यात कधीच कुचराई केली नाही, परंतु, त्याच वेळी आपले माणूसपण हरवले नाही.
आज मी अशीच एक गोष्ट सांगणार आहे.
१९७१ साली बांगलादेश युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानी सैन्यातल्या एका तत्कालीन कॅप्टनने कथन केलेला स्वानुभव त्याच्याच शब्दात...
डुंगरसिंग
१९७२ सालच्या मार्च-एप्रिलच्या दरम्यान आम्हाला आग्र्याहून रांची येथील कॅम्प ९५ मध्ये हलवण्यात आले. त्या प्रवासादरम्यान आमच्यावर पहारा देणाऱ्या एका भारतीय सैनिकाने आमच्यापैकी एका अधिकाऱ्याला गोळी घालून ठार केले. त्याचे कारण काय हे तो पहारेकरीच जाणे! आमचा आणखी एक अधिकारी तर बेपत्ताच झाला. एकूणात, उत्तर हिंदुस्थानातल्या भीषण उकाड्यात आम्ही रेल्वेने केलेला तो प्रवास अक्षरशः जीवघेणाच ठरला होता.
आम्हाला आग्र्याहून तडकफडकी हलवण्याचे कारणही तसे सबळ होते. आग्र्याच्या युद्धकैदी शिबिरातून पळून जाण्याचा आमचा प्रयत्न नुकताच फसला होता. त्यामुळे 'अतिशय डेंजरस कैदी' असा शिक्का आमच्यावर बसलेला होता. त्या घटनेचे कठोर परिणाम होणार याची आम्हाला कल्पना होती आणि होईल ते भोगायची मानसिक तयारी आम्ही ठेवली होती. यात जगावेगळे असे काहीच नव्हते. युद्धात पकडले गेल्यास, शत्रूच्या तावडीतून शिताफीने निसटण्याचा जमेल तितका प्रयत्न करण्याचे बाळकडू प्रत्येक सैनिकाला प्रशिक्षणादरम्यान दिलेलेच असते. परंतु, युद्धकैद्यांचा पलायनाचा बेत फसल्यास, शत्रू काही त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस निश्चित देणार नाही याचीही कल्पना प्रत्येकाला असतेच.
रांचीच्या कॅम्प ९५ मध्ये पोचताच आमची शिरगणती झाली आणि ५-६ जणांच्या गटात आम्हाला एकेका खोलीत डांबले गेले. या नवीन शिबिरामध्ये आमच्या सोबतीला, सरपटणारे, उडणारे नाना प्रकारचे किडे होते. त्याशिवाय उंदीर तर होतेच, पण त्यांचा पाठलाग करत येणारे हिरवट-पिवळे गवती सापदेखील आम्हाला अधूनमधून दर्शन द्यायचे.
रांचीवर निसर्गाची मात्र मेहेरनजर होती. स्वच्छ निळ्या आकाशाला टेकू पाहणारे आणि वाऱ्यासोबत डोलणारे गडद हिरवे माड आम्हाला खिडकीतून दिसायचे. चहाच्या मळ्यांनी तर आसपासच्या टेकड्यांवर जणू सोनहिरवे गालिचेच घातले होते. आमची दृष्टी पोचेल तिथपर्यंत हिरव्या रंगाच्या विविध छटांची नुसती पखरण होती. आसपास उगवलेले गवत तर अक्षरशः शांघायच्या मखमलीसारखे होते - मऊ आणि गुबगुबीत. वाऱ्याच्या झुळकीने गवत हलले की त्यावरची हिरवी छटाही बदलत असे. इथला पावसाळा मार्चमध्ये सुरु होई आणि नोव्हेंबरपर्यंत सुमारे ७५० इंच पाऊस पडे. कधी-कधी तर ठरवून एकत्र आल्यासारखे, तीन बाजूंनी एकाचवेळी ढग दाटून येत आणि पाऊस कोसळू लागे. निसर्गाचा असा अद्भुत आविष्कार मी कधीच कुठे पाहिलेला नव्हता.
इथल्या दमट वातावरणाचे तोटेही खूप होते. धुवून वाळत टाकलेल्या आमच्या कपड्यांवर किंवा टॉवेलवर संध्याकाळपर्यंत बुरशी लागत असे. आल्यानंतर काही दिवसातच आमच्या कातडी बुटांना प्रचंड दुर्गंधी येऊ लागली आणि ते वेडेवाकडे झाल्याने वापरणे अशक्य झाले. त्यामुळे, अंगावर खाकी रंगाच्या अर्ध्या चड्ड्या, बिनबाह्यांचे बनियन आणि पायात साध्या-सुध्या 'हवाई चप्पल' हाच वेष सगळ्यात सोयीस्कर आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगला असल्याचे लक्षात आले. असल्या दमट हवेत शरीराची योग्य काळजी न घेतल्यामुळे आमच्या शरीरावरच्या विविध बेचक्यांमध्ये घाम साठून राही. त्यामुळे, अंगावर उठलेले उन्हाळी फोड, खरूज आणि नायटे यांनी आम्ही अक्षरशः बेजार झालो. त्या जागी लावायला एक गुलाबी रंगाचे मलम आम्हाला दिले गेले होते. शरीराच्या बेचक्यांमध्ये ते मलम लावून, ती जागा उन्हात वाळू देणे हाच एकमेव उपाय होता. सकाळी-सकाळी, खुशाल नग्नावस्थेत उन्हात पहुडलेल्या आम्हा कैद्यांचे ते बीभत्स दृश्य पाहण्याची शिक्षा, कॅम्पच्या वॉचटॉवरवर पहारा देणाऱ्या भारतीय शिपायांना भोगावी लागे! त्याला मात्र आमचा नाईलाज होता.
ब्रिटीशकालीन रांची कॅन्टोन्मेंटच्या एका कोपऱ्यात आमचा युद्धकैदी कॅम्प होता. अगदीच कामचलाऊ अशा बराकींमध्ये आम्हाला मिळालेल्या खोल्या तशा प्रशस्त होत्या. एकेका खोलीला लागूनच संडास-बाथरूम होती. सर्वांसाठी एकच सामायिक स्वयंपाकघर आणि जेवणाचा हॉल होता. खिडक्यांवर गज ठोकून त्या बंदिस्त केलेल्या होत्या आणि बराकीचा दरवाजाही रात्रीच्या हजेरीनंतर बाहेरून कुलूपबंद केला जात असे. आमची खोली बराकीच्या एका टोकाला होती. तिथून अक्षरशः ढांगेच्या अंतरावर असलेले कुंपण आम्हाला सतत भुरळ घालत असे. जवळजवळ त्या कुंपणाला लागूनच दाट जंगल सुरु होत होते आणि त्यापलीकडे पाटण्याला जाणारा रस्ता होता. कॅम्पमध्ये पोचल्यानंतर आमच्यापैकी काहीजण रेडक्रॉसतर्फे मिळालेली पुस्तके वाचण्यात दंग झाले, तर काहीजणांनी धार्मिक वाचन व प्रार्थनेला वाहून घेतले. काही थोडेजण मात्र अगदीच सैरभैर झाले आणि अखेरपर्यंत निराशेच्या गर्तेतच राहिले.
डुंगरसिंग नावाचा एक सुभेदार आमच्या कॅम्पचा प्रमुख जेसीओ (ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर) होता. कॅम्पचे व्यवस्थापन आणि आमच्यामध्ये असलेला तो एकमात्र दुवा होता. सडसडीत बांध्याचा, मध्यम उंचीचा, काळा-सावळा डुंगरसिंग तसा दिसायला सामान्यच होता. मात्र त्याचे अंतरंग हळूहळू उलगडत गेले. तो एक अतिशय कर्तव्यनिष्ठ, सरळसाधा, मनमिळाऊ आणि संवेदनशील माणूस वाटे. प्राप्त परिस्थितीत त्याने आणलेले ते सोंग असू शकेल असे कुणालाही वाटणे साहजिक होते, पण कालांतराने घडलेल्या काही गंभीर प्रसंगातून मला त्याचा खरा स्वभाव कळत गेला.
भारतीय सैन्यातल्या एका इन्फन्ट्री बटालियनमध्ये शिपाई म्हणून भरती होऊन सुभेदार पदापर्यंत पोचलेला डुंगरसिंग रोहतक-हिसार भागातला राहणारा होता. आमच्याकडच्या पंजाबी लोकांप्रमाणेच भारतातले रोहतकी लोकदेखील बोलण्या-वागण्यामुळे काहीसे आडदांड वाटले तरी वृत्तीने साधेसरळ असतात. त्यांची रोखठोक पण काहीशी शिवराळ अशी उर्दूमिश्रित पंजाबी भाषा आणि नर्मविनोदी बोलणेही सहजच मनाला भिडणारे असते.
आम्हाला लागणाऱ्या, साबण, टूथपेस्ट व ब्रश, दाढीचे सामान, अशा दैनंदिन वापराच्या वस्तूंची एक यादी करून महिन्याच्या सुरुवातीला डुंगरसिंगकडे सुपूर्द करणे हे माझे काम होते. दरमहा भत्त्यापोटी मिळणाऱ्या दरडोई ९० रुपयांमधून ही खरेदी केली जाई. या व अशा प्रकारच्या संभाषणातून माझा व डुंगरसिंगचा परिचय वाढत गेला आणि आमच्यादरम्यान एक वेगळेच नाते निर्माण झाले. त्या विलक्षण माणसासोबतच्या नात्याचे स्मरण ठेवूनच आज चाळीसहून अधिक वर्षानंतर माझे हे मनोगत मी लिहितो आहे.
पैसे, घड्याळे, अंगठ्या वगैरे मौल्यवान वस्तू बाळगायला बंदी असल्याने त्या आमच्याकडून आधीच काढून घेतल्या गेल्या होत्या. माझी साखरपुड्याची अंगठी मी मोठ्या हिकमतीने लपवून ठेवलेली होती. एके दिवशी मी ती अंगठी कुरवाळत बसलेलो असताना अचानकच डुंगरसिंगने मला पाहिले. ती अंगठी माझ्या वाग्दत्त वधूने मला दिली असल्याने ती जमा केली नसल्याचे मी त्याला सांगितले. डुंगरसिंगच्या पुढच्या वाक्यामुळे, त्याची संवेदनशीलता आणि त्याच्या मनाच्या मोठेपणाबाबत माझी खात्री झाली, "साहेब, देव तुमचे भले करो. ती मुलगी खरोखरच मोठी भाग्यवान आहे."
काही दिवसातच, आमच्या खोलीतून आम्ही एक भुयार खणायला सुरुवात केली होती. रोज रात्री थोडे-थोडे काम आम्ही करत होतो. आमच्यापैकी एकजण खिडकीशी बसून टेहळणी करत असे. कॅम्पचे एकमेव प्रवेशद्वार तिथून दिसू शकत होते. प्रवेशद्वारापासून आमच्या खोलीपर्यंत पोचायला सहजच पाचेक मिनिटे लागत असत. माझी खणायची पाळी संपवून मी विश्रांती घ्यायला पाठ टेकणारच होतो तेवढ्यात खोलीच्या दरवाज्यावर जोरजोराने थापा पडू लागल्या. आमच्या 'टेहळणी बुरुजा'ला बहुदा मध्येच डुलकी लागली होती. आमची एकच तारांबळ उडाली. कॅम्प व्यवस्थापनाला पक्की खबर मिळाली असणार. म्हणूनच भारतीय शिपाई तडक आमच्या खोलीपर्यंत येऊन पोचले होते. आमच्या बराकीची बित्तंबातमी डुंगरसिंगशिवाय कुणाकडे असणार होती?
आम्ही घाईघाईने सर्व झाकपाक केली आणि दरवाजा उघडण्यापूर्वी झोपेच्या नाटकाचे संपूर्ण नेपथ्य तयार केले. आम्हाला बराकीतून बाहेर काढून उभे केले गेले. खोलीची झाडाझडती सुरु झाली. बाहेर पडण्यापूर्वी, माझी अंगठी मी शिताफीने माझ्या सामानातून काढून माझ्याजवळ ठेवली होती. पण लगेच आमची अंगझडतीही सुरु झाली. अंधारातच माझ्या खांद्यावर कुणीतरी हलकेच थापटल्यासारखे केले आणि एक हात माझ्यापुढे पसरला गेला. तो डुंगरसिंगचा हात होता. मी काय करणे अपेक्षित होते हे मला कळून चुकले. मुकाट्याने त्याच्या हातावर माझी अंगठी मी ठेवली. झडतीची कारवाई संपली आणि डुंगरसिंगासह सगळी पार्टी निघून गेली. आमचा पलायनाचा बेत तर फसलाच होता, पण त्या रात्री मला झोप लागणे तसेही अशक्यच होते. त्या अंगठीतल्या सोन्याचे वजन आणि त्याच्या किंमतीची मला पर्वा नव्हती. पण ज्या प्रतिकूल परिस्थितीत मी होतो त्या काळातला माझा एकमेव भावनिक आधार मी गमावला होता!
दुसऱ्या दिवशी मंद हसत आणि डोळे मिचकावत सुभेदार डुंगरसिंग माझ्यापाशी येऊन म्हणाला, "तुम्ही लोक काहीनाकाही 'चमत्कार' दाखवण्याच्या तयारीत असणार याची कल्पना मला होतीच. इतर बराकीतल्या लोकांपेक्षा अधिक लाल दिसणारे तुमचे डोळेच सर्व काही सांगत होते!" हे बोलत असतानाच डुंगरसिंगने खिशातून एक कागद काढून गुपचूप माझ्या हातात कोंबला. त्या कागदामध्ये माझी अंगठी गुंडाळलेली होती!
डुंगरसिंगच्या माणुसकीचा मला त्या दिवशी आलेला प्रत्यय मोठा विलक्षण होता.
आमच्या प्रियजनांकडून आलेली पत्रे रेड क्रॉसतर्फे आम्हाला मिळत असत. अर्थातच ती कॅम्प व्यवस्थापनाद्वारे उघडून, वाचून, सेन्सॉर केली जात. सुभेदार डुंगरसिंग ती पत्रे आमच्यापर्यंत पोचवत असे. आमच्यापैकी विवाहित आणि मुलेबाळे असलेल्या अधिकाऱ्यांच्या मुलांची नावे, इयत्ता, त्यांचे छंद अशा गोष्टीही हळूहळू डुंगरसिंगला पाठ झाल्या होत्या. त्या अधिकाऱ्यांशी तो त्याविषयी चर्चा करत असताना असे वाटे की जणू तो स्वतःच्याच कुटुंबाविषयी बोलत असावा. डाक येण्याच्या दिवशी एखाद्या अधिकाऱ्याच्या नावे एकही पत्र न आल्यास, डुंगरसिंग अगदी आत्मीयतेने त्या अधिकाऱ्याची समजूतही काढत असे.
डुंगरसिंगच्या चांगुलपणाची परतफेड करण्याची संधी एके दिवशी मला मिळाली. आमच्या बराकीच्या कोपऱ्यातल्या त्याच्या ठराविक जागी बसून तो हळूहळू हुंदके देत असल्याचे मला दुरूनच जाणवले. मी त्याच्या जवळ पोचेपर्यंत, आपले अश्रू पुसून शांत दिसण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. परंतु, मी त्याच्या खांद्यावर हात ठेवताक्षणी मात्र त्याचा बांध फुटला. सुभेदार डुंगरसिंग हमसून-हमसून रडू लागला. १५-१६ वर्षांची त्याची मुलगी अचानकच वारल्याचे त्याला नुकतेच पत्राद्वारे समजले होते. तिच्या अंत्यसंस्कारालाही तो जाऊ शकला नव्हता!
युद्धात जिंकलेला सैनिक असो किंवा पराभूत सैन्यातील एखादा युद्धकैदी असो, दोघेही मनुष्येच तर असतात. त्यांच्या भावभावनाही एकसारख्याच असतात. त्यांना आपापली दुःखे एकाच तीव्रतेने टोचतात किंवा आनंदही सारख्याच उत्कटतेने होत असतो!
कालांतराने, कैदेतून आमची सुटका होण्याची वेळ आली. सुभेदार डुंगरसिंग काहीशा विमनस्क अवस्थेत होता. त्याच्या मनात दोन परस्परविरोधी भावना उचंबळत असाव्यात असे जाणवले. परंतु, त्या दोन्ही भावना त्याच्या नैसर्गिक स्वभावधर्माला अनुसरूनच होत्या. युद्धकैद्यांची पहिली तुकडी रवाना झाली तेंव्हा त्याचे डोळे भरून आले होते. डोळ्यातले अश्रू कसेबसे मागे सारत तो चेहऱ्यावर उसने हसू आणू पाहत होता, पण त्याचे थरथरणारे ओठ सत्य सांगून गेले. आम्ही मायदेशी परतणार म्हणून तो आमच्या आनंदात सहभागी होता, पण आमच्या जाण्याचे दुःखही तो लपवू शकत नव्हता.
मनाने पर्वताएवढ्या विशाल अशा डुंगरसिंग नावाच्या माणसाचा अल्प सहवास मला लाभला हे माझे थोर भाग्यच म्हणायचे. तो जिथे असेल तिथे परमेश्वराने त्याला सर्व सुखे द्यावीत इतकीच माझी प्रार्थना आहे. त्या कठीण काळातले आमचे दिवस त्याच्यामुळे अविस्मरणीय होऊन गेले!
[ब्रिगेडियर मेहबूब कादिर (सेवानिवृत्त) यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा त्यांच्या पूर्वानुमतीसह केलेला भावानुवाद]
© कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
Thursday, 27 February 2025
महाकुंभमेळा आणि राष्ट्रीय शक्ती
महाकुंभमेळा आणि राष्ट्रीय शक्ती
मूळ इंग्रजी लेखक: ब्रिगेडियर परमजीत सिंग घोतडा (सेवानिवृत्त)
मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
महाकुंभपर्वामध्ये गंगास्नान करण्यासाठी मी अजूनही गेलेलो नाही हे ऐकताच तो म्हणाला, "इतक्या मोठ्या स्तरावर हा महाकुंभमेळा आयोजित करणे म्हणजे पैशांचा आणि संसाधनांचा निव्वळ अपव्यय आहे, दुसरं काय?" तो स्वतः नास्तिक असल्याचे त्याने मला आधीच सांगितले होते.
मी हसतमुखानेच त्याला म्हणालो, "तुझ्या चष्म्यातून तुला सर्व धर्मांमधल्या केवळ वाईट गोष्टीच दिसत राहणार यात काही नवल नाही. पण एका सैनिकाच्या दृष्टिकोनातून मला तरी असे दिसते की, भारताने आपले शत्रू आणि मित्र या दोघांनाही या कुंभमेळ्याद्वारे एक अतिशय स्पष्ट इशारा दिलेला आहे."
माझे बोलणे ऐकताच त्याने भुवया उंचावून म्हटले, "सैनिकी दृष्टिकोन? पण धर्म आणि सैन्यदलांचा काय संबंध?"
"अगदी घनिष्ठ संबंध आहे. आता असं पाहा, कोट्यवधी लोक लांबलांबून येऊन प्रयागतीर्थी एकत्र जमले, इथे राहिले आणि सर्वांनी एका सामायिक श्रद्धेने गंगेमध्ये स्नान केले. यामधून किमान चार गोष्टी स्पष्ट होतात: -
१. कोट्यवधी भारतीयांना अशा प्रकारे एकसंध समूहात एकवटता येणे शक्य आहे.
२. अभूतपूर्व अशा प्रकारचा हा सोहळा घडवून आणण्यासाठी लागणारी योजनक्षमता आपल्यामध्ये आहे.
३. एखाद्या सांघिक ध्येयावर जर अढळ विश्वास असेल, तर ते उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी, वैयक्तिक स्तरावर अपार कष्ट आणि गैरसोय सहन करण्याचा सोशिकपणा भारतीयांमध्ये आहे.
४. आपल्या देशाचे नेतृत्व अत्यंत सक्षम आणि कणखर आहे.
अरे, अवकाशात भ्रमण करणाऱ्या उपग्रहांनाही दिसू शकेल इतका भव्य सोहळा आपल्या देशात आयोजित होतोय ही गोष्ट तुला अभिमानास्पद वाटत नाहीये का? मी तुला सांगतो, आपले शत्रूदेखील या सोहळ्याकडे आज अचंबित होऊनच, पण अतिशय सावधपणे पाहत असतील!"
त्याने नुसतेच खांदे उडवले आणि म्हणाला, "असेलही. पण माझा प्रश्न पुन्हा तोच आहे. सैनिकी दृष्टीकोनाचा इथे काय संबंध?"
जरासा पुढे झुकत मी म्हणालो, "कल्पना करून बघ, एखाद्या युद्धाच्या प्रसंगी अशा तऱ्हेने संपूर्ण जनसमूह एकवटून जर देशाच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहिला तर युद्धावर किती जबरदस्त प्रभाव पडेल? पाकव्याप्त काश्मीर किंवा तिबेटला शत्रूच्या जोखडातून मुक्त करायचे ठरवून जर असा जनसमूह उद्या एकवटला तर? देशावर ओढवलेल्या एखाद्या संकटाचा सामना करण्यासाठी जर जनता अशा तऱ्हेने एकत्र आली आणि त्यांनी यथाशक्ती दान केले तर केवढी प्रचंड संपत्ती उपलब्ध होऊ शकेल माहितीये? हे बघ, कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यातून एक गोष्ट ठळकपणे सिद्ध होते - भारताची युद्धक्षमता केवळ सैन्यदलांचे शौर्य आणि त्यांच्या शस्त्रसामर्थ्यावर अवलंबून नव्हे, तर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या जनतेच्या इच्छाशक्तीमध्ये आहे. जगातला कोणीही युद्धनीतिज्ञ माझे हे म्हणणे मान्य करेल."
आता त्याच्या चेहऱ्यावर काहीसे कडवट आणि कठोर भाव दिसू लागले, "या मेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत कित्येक निरपराध लोकांना प्राण गमवावे लागलेत, आणि तू इथे बसून खुशाल राष्ट्रीय शक्तिप्रदर्शनाच्या पोकळ गप्पा मारतोयस? तुझं हे बोलणं तुला विचित्र नाही का वाटत?"
एक सुस्कारा सोडत मी उत्तरलो, "अरे, जरासा व्यापक विचार करून पाहा. ती दुर्घटना घडून गेल्यानंतर तिथे जाणाऱ्या लोकांची संख्या कमी तर झालीच नाही - उलट वाढलीच. शिवाय, प्रशासनानेही तेथील व्यवस्था अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यावर भर दिला. आपली जनता आणि प्रशासन या दोघांचाही निर्धारच यातून ठळकपणे दिसतो. चीनमध्ये जर अशी चेंगराचेंगरीची घटना घडली असती तर काय झालं असतं माहितीये? एकतर त्यांनी हा सोहळाच तातडीने गुंडाळून टाकला असता, किंवा मग गर्दी नियंत्रित करण्यासाठी राक्षसी ताकद वापरली असती - जे त्यांनी कोव्हिडकाळात केलंच होतं. त्यांच्या सैनिकांच्या गोळ्यांनी त्यांचेच नागरिक मृत्युमुखी पडतानाचे व्हिडिओ नाही का पाहिलेस तू?"
आता मात्र तो उपहासाने हसत म्हणाला, "मग काय? इतकं सगळं झालं तरी आपण आपला आनंदसोहळा साजरा करत राहायचं, असं तुझं म्हणणं आहे का?"
"सोहळा तर साजरा करायचाच. पण ही वेळ अंतर्मुख होऊन गंभीर विचार करण्याचीदेखील आहे."
"कसला गंभीर विचार?" तो जरा चिडखोरपणेच बोलला.
मी पुन्हा पुढे झुकत म्हणालो, "अरे, आईचं दूध प्यायलेला कोणीही शत्रू अशा वेळी आपली राष्ट्रीय शक्ती खच्ची करू पाहील, आणि आपण जर गाफील राहिलो तर तो यशस्वी होईलही."
माझी परीक्षा पाहत असल्याच्या अविर्भावात तो म्हणाला, "शत्रू आपली राष्ट्रीय शक्ती खच्ची करू पाहील? ते कसं काय बुवा?"
त्याचा उपहास मला कळत होता, पण माझा प्रयत्न मी सोडला नाही. "हे बघ, कुंभमेळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे लोकांची आस्था, आणि दुसरं, आपलं कार्यक्षम नेतृत्व. आपला शत्रू एकतर लोकांची आस्था डळमळीत करण्याचा प्रयत्न करील, किंवा आपल्या डोक्यावर कमकुवत नेते बसवण्याचा प्रयत्न करेल. भारतातल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल प्रभावित करण्यासाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर पैसा ओतला गेल्याबद्दल तू वाचलं नाहीस का?"
तो कुत्सितपणे उद्गारला, "ओहहो! आता मला माझ्यासमोर बसलेला 'अंधभक्त' स्पष्ट दिसायला लागला !"
मी नुसतीच मान हलवली. कारण, मुद्देसूद चर्चा सोडून आता तो वैयक्तिक टीका करू लागला होता. स्वतःमधल्या नकारात्मकतेमुळे आंधळा झालेला असूनही, तो मलाच विनाकारण 'अंधभक्त' ठरवू पाहत होता. मी मनातून पुरता चडफडलो होतो. पण शक्य तितक्या शांत स्वरात मी म्हणालो, "माझं दुर्दैव इतकंच की अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन असलेला, माझ्यातला एक सच्चा देशभक्त तुला दिसत तरी नाहीये, किंवा तू पाहूच इच्छित नाहीस. असो."
याउप्पर त्याच्याशी कोणतीच सयुक्तिक चर्चा शक्य नसल्याने, मी तिथून निघून जाणेच श्रेयस्कर होते.
'गुरुवाणी' मधला एक श्लोक जाता-जाता सहजच माझ्या मनात उमटला, "हम नाहीं चंगे, बुरा नाहीं कोये, प्रणवथ नानक, तारे सोये।" म्हणजेच, "मी चांगला आहे असे नाही, इतर लोक वाईट आहेत असेही नाही, नानक प्रार्थना करतो, तोच (देव) आमचा तारणहार आहे!"