कर्तव्य की धर्मनिष्ठा?
एक सेनाधिकारी म्हणून मी ४० वर्षांत काय शिकलो?
लेखक: लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन (सेवानिवृत्त)
[२७ नोव्हेंबर २०२५ रोजी इंडियन एक्स्प्रेसमधे प्रकाशित झालेल्या मूळ इंग्रजी लेखाचा कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)© यांनी लेखकाच्या पूर्वानुमतीसह केलेला मराठी भावानुवाद]
"लेफ्टनंट सॅम्युअल कमलेशन विरुद्ध भारत सरकार" या खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालामुळे एका संवेदनशील पण अत्यंत महत्त्वाच्या विषयाला तोंड फुटले आहे. तो विषय म्हणजे - सैन्यदलातील व्यक्तींच्या वैयक्तिक धार्मिक आस्था व त्यांची व्यावसायिक जबाबदारी, या दोन्हींमधला परस्परसंबंध.
लेफ्टनंट सॅम्युअल कमलेशन हा ख्रिश्चन तरुण एक भारतीय सेनाधिकारी होता. त्याच्या रेजिमेंटच्या मंदिर व गुरुद्वाऱ्यांमधल्या धार्मिक कार्यक्रमांमधे (सैन्यदलात या कार्यक्रमांनाही 'धार्मिक परेड' असेच संबोधले जाते) सहभागी होण्यास किंवा त्या परिसरातही येण्यास त्याने सातत्याने नकार दिल्याच्या कारणावरून त्याला सैन्यदलातून बडतर्फ करण्यात आले.
त्या बडतर्फीविरुद्ध त्याचा युक्तिवाद एकच होता की, "जे कृत्य माझ्या धार्मिक आस्थेशी विसंगत आहे ते मी करणार नाही."
सन्माननीय न्यायालयाने आपल्या निकालात असे सुनावले की या अधिकाऱ्याचे वर्तन म्हणजे त्याची धार्मिक आस्था नव्हे तर, सैन्यदलाच्या एकसंधतेला आणि नेतृत्वालाच खिळखिळे करू पाहणारे कृत्य आहे. न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दात त्या अधिकाऱ्याची बडतर्फी योग्य असल्याचे सांगितले इतकेच नव्हे तर, हे "शिस्तभंगाचे अत्यंत टोकाचे उदाहरण" असल्याचेही नमूद केले.
सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने या निकालाद्वारे कोणत्याही धर्मावर टीका केलेली आहे असे समजणे चुकीचे ठरेल. प्रत्यक्षात, सैन्यदलांशी निगडित असलेल्या एका मूलभूत तत्त्वाचेच न्यायालयाने पुष्टीकरण केले आहे असे म्हणता येईल. ते तत्व म्हणजे - एकदा का सैन्याचा गणवेष अंगावर चढवला की सैनिकाने स्वतःच्या वैयक्तिक आस्था आणि इच्छा आपल्या कर्तव्याच्या आड कधीही येऊ द्यायच्या नसतात.
भारतीय सेना ही धर्मनिरपेक्षतेच्या भक्कम पायावर निर्विवादपणे उभी असलेली देशातली कदाचित एकमेव संस्था असेल. आणि विशेष म्हणजे, धर्माविषयीच्या अनास्थेतून नव्हे तर सर्वसमावेशकतेच्या संकल्पनेतून ही धर्मनिरपेक्षता जन्मलेली आहे.
सैन्यदलातील मंदिरे, गुरुद्वारे, 'सर्वधर्मस्थळे' आणि चर्चेस ही धर्मसक्तीची किंवा धर्मपरिवर्तनाची ठिकाणे नसून त्या-त्या रेजिमेंटची परंपरा, एकता, सामूहिक मनोबल आणि सामूहिक ध्येयाची द्योतके असतात. ती केवळ पूजा-अर्चा-प्रार्थनेची ठिकाणे नव्हेत तर सर्वांच्याच मनात एक आपलेपणाची भावना निर्माण करणारी पवित्र स्थळे मानली जातात.
मी कुणी कायदेपंडित किंवा विश्लेषक नाही. धर्म आणि कर्तव्य यांच्यातल्या विरोधाभासातूनच जडत-घडत गेलेला एक सैनिक, या नात्याने मी हे लिहितो आहे. आधी एका रोमन कॅथॉलिक संस्थेत आणि नंतर एका प्रोटेस्टंट ख्रिश्चन संस्थेत माझे शिक्षण झाले. सैन्यदलातच नोकरी करणारे माझे वडील आणि त्यांच्यासोबत माझी आईदेखील, रेजिमेंटची मंदिरे, गुरुद्वारे, चर्चेस या ठिकाणी अगदी सहजतेने वावरत असत. मी एक मुस्लिम म्हणूनच वाढलो, परंतु जे संस्कार माझ्यात मुरले त्यातून मला हे उमजत गेले की धर्म ही सैन्यदलातल्या लोकांना एकत्र आणणारी शक्ती आहे, त्यांच्यात फूट पाडणारी नव्हे. पुढे सैन्यदलातल्या माझ्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत मी हेच सूत्र अंगिकारले.
एक तरुण कंपनी कमांडर म्हणून किंवा नंतर माझ्या बटालियनचा कमांडिंग ऑफिसर असतानाही मी एक गोष्ट आवर्जून करत आलो. कोणतीही सैनिकी कारवाई सुरू करण्यापूर्वी आणि ती यशस्वीपणे पार पाडल्यानंतर, आमच्या जवानांनी तिथेच तात्पुरत्या उभारलेल्या 'मंदिरात' मी एक सभा घेत असे. ती काही 'माझी' धार्मिक प्रथा नव्हती. पण ते 'आमच्या' सामूहिक आस्थेचे मूर्त रूप होते.
सैन्यदलाचे हेच वैशिष्ट्य आहे - कुणीही आपल्या धर्माचा त्याग करत नाही, फक्त स्वधर्मपालनाचे रूप बदलतो. प्रत्येकाच्या मनात स्वतःची एक आंतरिक आस्था आणि स्वधर्माचे एक पूज्य स्थानही असतेच. पण ती आस्था त्याला इतरांपासून वेगळे काढत नाही. उलट सगळ्यांनाच एक सांघिक शक्ती देणारे आणि एकत्र बांधणारे ते एक अदृश्य सूत्र असते. अधिकाऱ्याने त्याच्या सैनिकांची आस्था योग्य की अयोग्य याचा निवाडा कधीच करायचा नसतो. त्यांचा एक विश्वासू साथीदार या नात्याने त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहायचे असते. त्या अधिकाऱ्याची प्रार्थना नव्हे, धार्मिक कार्यातला त्याचा सहभागही नव्हे, तर फक्त त्याचे भक्कम आणि आश्वासक अस्तित्वच कित्येक वेळा सैनिकांचे मनोबल शाबूत ठेवण्यासाठी पुरेसे असते.
त्या क्षणी तो अधिकारी ख्रिश्चन, शीख, मुसलमान, हिंदू, पारशी, जैन यापैकी कोणीच नसतो. तो असतो केवळ एक नेता, ज्याला सैनिक आपणहून जीव लावतात आणि ज्याच्या एका शब्दाखातर आपले प्राण पणाला लावायला तयार होतात.
सन्माननीय न्यायालयाने आपल्या निकालात एक योग्य निरीक्षण नोंदवले आहे. भारताचे संविधान प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्याची हमी अवश्य देते. परंतु, सैनिकी जीवनाच्या केंदस्थानी असलेले अनुशासन आणि सैन्यदलांची संस्कृती झुगारून वरिष्ठांची आज्ञा मोडण्याचे स्वातंत्र्य संविधानाने सैनिकाला दिलेले नाही. संविधानाच्या २५व्या अनुच्छेदानुसार आपली धर्मनिष्ठा अबाधित ठेवली गेली असली तरी आपल्या वैयक्तिक आवडी-निवडींना अमर्याद स्वातंत्र्य संविधानाने दिलेले नाही.
शिस्त आणि एकजूट ही केवळ सैनिकांची गुणवैशिष्ट्ये नसून त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारे घटक असतात. अधिकाऱ्याने कधीकधी आपल्या सैनिकांच्या आसपास वावरणे इतकेच पुरेसे नसते. त्याने सदैवच तन-मनाने आपल्या सैनिकांजवळ असणे हेच त्यांची एकजूट टिकवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. अर्थातच त्या सैनिकांसाठी पवित्र असलेल्या धार्मिक कार्यांमध्ये त्यांच्यासोबत नसणे हे कोणत्याही अधिकाऱ्याला शोभणारे वर्तन नाही.
हे जे मी लिहितो आहे त्याची अनेक उदाहरणे स्वतंत्र भारताच्या सैनिकी इतिहासात सापडतात.
ब्रिगेडियर डेस्मंड हेड या ख्रिश्चन अधिकाऱ्याने १९६५ च्या भारत-पाक युद्धात, '३ जाट' या बटालियनचे नेतृत्व करत असताना, आपल्या सैनिकांसह तुंबळ युद्ध करून डोगराईच्या लढाईत विजय प्राप्त केला होता. ते या युद्धात एक महावीरचक्रविजेते तर ठरलेच पण त्यांनी
आपल्या जवानांची असीम श्रद्धाही स्वतःसाठी कमावली. ते स्वतः त्यांच्या जवानांपेक्षाही सरस आणि सुरेल भजने गाऊ शकायचे.
'पूना हॉर्स' या रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल आर्देशीर तारापोर हे मरणोपरांत परमवीरचक्रविजेते पारशी अधिकारी, त्यांच्या धर्मामुळे नव्हे तर रणगाड्यांच्या युद्धात गिरवण्याचा एक आदर्श म्हणून आजही ओळखले जातात.
कित्येक ख्रिश्चन आणि मुस्लिम अधिकाऱ्यांनी अतिशय सक्षमपणे शीख रेजिमेंटचे नेतृत्व केलेले आहे.
मी स्वतः ज्या गढवाल रेजिमेंटमध्ये होतो त्याच्या कितीतरी बटालियन्सचे नेतृत्व भारतीय भूतलावरच्या एकन्एक धर्माच्या अधिकाऱ्यांनी केलेले आहे.
भारतीय सेनेच्या असंख्य कर्तबगार अधिकाऱ्यांनी आपल्या जवानांच्या धर्माचा नुसता आदरच केला असे नाही तर एका सच्च्या नेत्याच्या नात्याने आपल्या जवानांचे धर्मही त्यांनी शिरोधार्य मानले.
मुळात सैन्यदलामध्ये प्रश्न धर्माचा नाहीच - इथे परस्परविश्वास हाच परमधर्म मानला जातो. एक जवान केवळ अधिकाऱ्याच्या पदाला मान देऊन त्यांचा आदेश मानत नाही. त्याच्या मनात हा विश्वास असावा लागतो की, "माझा वरिष्ठ अधिकारी सदैव माझ्यासोबत आहे - धोक्याच्या क्षणी, अडीअडचणीच्या प्रसंगी, आणि हो, माझ्या प्रार्थनेमध्येसुद्धा!"
अधिकाऱ्याने आपल्या जवानांसोबत असणे हेच नेता म्हणून त्याचे कर्तव्य असते, आणि परस्परविश्वास व सैनिकांना दिलेली भक्कम साथ हेच त्याच्या नेतृत्वाचे खरे लक्षण!
याच कारणामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा निकाल धर्म किंवा धर्मनिष्ठेला नाकारत नाही, तर सैन्यदलातील एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करतो. हा निकाल आपल्याला पुन्हा एकदा हे लक्षात आणून देतो की, सैन्यदलांमधली धर्मनिरपेक्षता म्हणजे एखादी अमूर्त संकल्पना नसून, एका चिरंतन आणि सामूहिक श्रद्धेचे जागृत प्रतीक असते. प्रत्येक सैनिकाचा धर्म ही केवळ त्याची स्वतःपुरती मर्यादित आस्था नव्हे तर त्याला इतर सर्वांशी जोडणारा एक दुवा असतो.
मला प्रकर्षाने असे वाटते की केवळ न्यायालयाच्या या निकालापुरता हा मुद्दा सीमीत राहू नये. या निमित्ताने सामान्य भारतीय नागरिकांच्या लक्षात हे आणून द्यायला हवे की जेंव्हा मंदिरे किंवा 'सर्वधर्मस्थळ' या ठिकाणी सैनिक जाऊन उभे राहतात तेंव्हा ते एखाद्या विशिष्ट धर्माचे अनुयायी नव्हे, तर बंधुभावनेने एकत्र काम करणाऱ्या एका गटाचे सदस्य असतात. हे जर सर्वच भारतीयांनी समजून घेतले तर त्यांना हेही उमगेल की सैनिक जेंव्हा एखाद्या धोकादायक किंवा अगदी प्राणघातक परिस्थितीशी सामना करायला आपल्या पायांनी चालत जातात तेंव्हा त्यांना त्यांचा वैयक्तिक धर्म नव्हे तर त्यांचा परस्परविश्वास आणि सांघिक शक्तीच बळ देत असते.
सैनिकी सेवा हे कदाचित एकमेव असे कार्यक्षेत्र असेल जिथे व्यक्ती आपल्या संस्थेसाठी काम करीत नाहीत, तर प्रत्येक सैनिक स्वतःच त्या संस्थेचे 'व्यक्तिरूप' होऊन जातो!
सैनिकाचा धर्म, एक व्यक्ती म्हणून असलेली स्वतःची ओळख व स्वाभिमान, आणि स्वतःच्या आवडी-निवडी हे सगळे त्याच्या कर्तव्याच्या पायी समर्पित होऊन जाते.
गणवेष धारण केलेला सैनिक आपला धर्म बदलत नाही, फक्त तो धर्माचे स्वरूप काहीसे बदलतो. तो आपला धर्म त्यागत तर नाहीच, उलट धर्मालाच तो एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो.
शेवटी मला इतकेच सांगावेसे वाटते की सन्माननीय न्यायालयाचा निकाल हा न्यायसंगत आहेच, पण तो सैन्यदलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या निकालाने सैन्यदलातील अनुशासन अबाधित ठेवलेच आहे, शिवाय अधिकारी आणि सैनिकांमधील परस्परसंबंध सदैव सुदृढच राहतील हेही सुनिश्चित केले आहे. सैन्यदलांमध्ये सर्व धर्मांना उचित मान दिला जात असला तरी कर्तव्य हेच परमोच्च मानले जाते.
अधिकाऱ्याने एकदा का भारतीय सेनेचा गणवेष अंगावर चढवला की, "मी ज्यांचे नेतृत्व करणार आहे ते कोण आहेत?" आणि "आमच्यावर सोपवलेली जबाबदारी काय आहे?" इतकेच प्रश्न त्याच्या मनात येतात.
"माझा धर्म कोणता?" या प्रश्नाला जागाच उरत नाही!
answer to the deepest question in heart with sole hindu and fair equality for all
ReplyDeleteअत्यंत परखड असा निकाल न्यायालयाने दिलेला आहे. जय हिंद
ReplyDeleteContent छान, मांडणी व लेखन खूपच छान
ReplyDeleteसैन्य दलात धर्म महत्वाचा नाही तर राष्ट्र कर्तव्य महत्वाचे आहे, व न्यायालयाने दिलेला परखड निकाल सर्वात महत्त्वाचा आहे. जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳👌👌👍👍
ReplyDeleteThis patriotic writing is very very nice and sentimental for All of the Indians 🇮🇳
ReplyDeleteat least in the current situation of bad politics in our country. I don’t point a finger towards any person/cast/religion/gender etc.but everyone in the country.Likewise our Doctors,whenever they are treating any patients never think of any religion or caste But only a Suffering of that human being. This is called Hippocrates Oath which we honour whole life as a Doctor.
So I think the Verdict given by ANY court is correct by default.
Every person living in the country is having his/her own patriotic spirit and responsibility. So our farmers are doing always they grow the crops for every person in the country.
“I like to remember the Oath taken in the School “
**All the Indians 🇮🇳 are my brothers and sisters because India 🇮🇳 is my country 👍🇮🇳🇮🇳✌️💪🇮🇳
True. Thanks 🙏
Deleteकर्नल आनंद बापट, मित्रा, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे अत्यंत सुरेख व सखोल विश्लेषण केले आहे. तसेच सैन्य दलातील कर्तव्य यापैकी नमूद धार्मिक परेड हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बाब असून सर्व संबंधितांना लागू बाब आहे जी की सर्व कर्तव्यात मध्ये महत्वाची कडी आहे. मी पुर्णतः सहमत आहे, हि गोष्ट वास्तव्यास धरून उत्तमरीत्या लिहिली आहेस, याबद्दल तुझे अभिनंदन... 🙏😇🇮🇳
ReplyDeleteकर्तव्य आणि धर्म या दोन गोष्टीची गल्लत करायला सैनिक स्वतंत्र नाही. पुर्ण सैन्यदलाचे मानसिक बळ सांभाळण्यासाठी काही नियम अपरिहार्य असतील , तर त्याचा आदर करायला प्रत्येक सैनिक बांधिलच आहे. राष्ट्र प्रथम!
ReplyDeleteदेशसेवा हाच सैनिकाचा एकमेव धर्म.
ReplyDeleteमहत्वाच्या विषयावर विचार प्रवर्तक लिहिले आहेत.
मेघा