काल अचानकच मला १९९०च्या दशकातील एका गोकुळाष्टमीची आठवण झाली. आमची गोरखा बटालियन त्या काळी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील लष्करी छावणीमध्ये तैनात होती.
गोरखा सैनिकाला प्रेमाने 'कांछा' (मुलगा) असे म्हटले जाते. हे सैनिक मनाने अतिशय निर्मळ, आणि देवभक्त असतात. त्यांच्या भाबड्या बाह्य रूपामुळे, ते किंचित मंदबुद्धी असावेत असा अनेकांचा गैरसमज होतो, परंतु, तसे अजिबात नाही. गोरखा सैनिक अतिशय कडवे लढवय्ये, आणि कमालीचे आज्ञाधारक म्हणून जगप्रसिद्ध आहेत.
आमच्या बटालियनमध्ये सर्वच धार्मिक सण अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरे होत असत. सर्व धर्मांचे शिक्षण घेऊन सैन्यदलात भरती झालेले, व 'पंडितजी', 'मौलवी', 'ग्रंथी' किंवा 'पाद्री' अशा नावाने ओळखले जाणारे जवान प्रत्येक युनिटमध्ये असतात. त्या काळी आमच्या बटालियनचे 'पंडितजी' रक्ताच्या कर्करोगाने आजारी होते. अर्थातच, पारंपरिक गोकुळाष्टमीचे आयोजन करण्यासाठी त्या वर्षी पंडितजी असणार नव्हते.सैन्यदलाचे कोणतेच काम कुणा एकावाचून कधीच अडत नाही. अर्थातच गोकुळाष्टमीची 'मंदिर परेड' देखील पंडितजीविनाच पार पाडणे क्रमप्राप्त होते. (मंदिरातील कोणत्याही उत्सव किंवा एकत्रित धार्मिक कार्यक्रमांना बोली भाषेत 'मंदिर परेड' असेच म्हटले जाते!) त्यामुळे, एक 'कामचलाऊ पंडितजी' निवडण्याची जबाबदारी कमांडिंग ऑफिसरसाहेबांनी माझ्यावर सोपवली. पूजापाठ आणि मंत्रोच्चारणाचे जुजबी ज्ञान असलेला एखादा सैनिक त्या कामासाठी पुरेसा होता.
आमच्या बटालियनमध्ये जरा चौकशी केल्यावर मला एक एक छेत्री (ब्राह्मण) नेपाळी मुलगा सापडला. थोडेफार संस्कृत श्लोक, आणि पूजा-अर्चा यांची जाण असलेला व बऱ्यापैकी धार्मिक वृत्तीचा असा तो जवान, दिसायला अगदीच पोरगेला होता. मी त्याची चौकशी करायला सुरुवात केली. जेमतेम १-२ वर्षे लष्करी सेवा केलेला तो मुलगा थोडा घाबरला. पण, जी जबाबदारी सोपवण्याकरिता मी त्याची चौकशी करीत होतो ते समजताच, त्याने खास 'कांछा स्टाईल' ने मला उत्तर दिले "हुंछा शाब"!
त्याउप्पर त्या कांछाने मला सांगितले की स्वतःच्या घरी आणि आमच्या युनिटच्या मंदिरात विविध पूजा-अर्चा होताना त्याने अनेक वेळा पाहिल्या होत्या आणि तो ही गोकुळाष्टमीची पूजा सुरळीत पार पाडू शकेल. तो नेमके कोणकोणते विधी, आणि कसेकसे करणार याविषयी आणखी चार प्रश्न विचारून मी खात्री करून घेतली आणि निश्चिन्त झालो. शंख वाजवणे, भगवान श्रीकृष्णाच्या पाळण्याची दोरी हळूहळू खाली सोडणे, जन्मोत्सवानंतर प्रसाद वितरण करणे, अशी व यासारखी इतरही कामे करण्यासाठी, मी आणखी दोन जवान त्याच्यासोबत नेमले.
गोकुळाष्टमीच्या रात्री, सर्व अधिकारी, जवान आणि त्यांचे परिवार मंदिरात एकत्र जमले. कमांडिंग ऑफिसरही पोहोचले. सुमारे साडेअकरा वाजल्यापासून, अत्यंत जोशात आणि भक्तिभावाने आमचे 'कामचलाऊ पंडितजी' संस्कृत मंत्रोच्चार करू लागले. अधून-मधून भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील कथाही त्याने सांगितल्यावर, मी सुखावलो. मी केलेली निवड अजिबात चुकली नसल्याचे मला जाणवले. सर्वजण तल्लीन होऊन कथा ऐकत होते व भजने म्हणण्यात सहभागी होत होते.
पण, कृष्णजन्माची घटिका जसजशी जवळ येऊ लागली तसे मला जाणवले की आमचा 'कामचलाऊ पंडितजी' काहीसा अस्वस्थ होता. जणू तो त्याच्या दोन साथीदारांना गुपचूप काहीतरी सांगण्याचा किंवा विचारण्याचा प्रयत्न करीत होता.
बरोबर अकरा वाजून एकोणसाठ मिनिटे होताच तो उठून उभा राहिला. रेशमी कुडता, आणि सोनेरी काठाचे धोतर, अशा वेषातच, पाय आपटून त्याने कडक 'सावधान पोझिशन' घेतली. ताडताड पावले टाकीत त्याने कमांडिंग ऑफिसरसाहेबांच्या दिशेने कूच केले. मला अनपेक्षित असलेल्या त्याच्या या हालचाली पाहून मी पूर्णपणे बावचळून गेलो होतो.
त्या कांछाने कमांडिंग ऑफिसरसाहेबांना कडक सलाम ठोकला, आणि एखाद्या ड्रिल परेडमध्ये शोभेल असा आवाज लावत तो ओरडला, "श्रीमान, श्रीकृष्ण भगवान को जन्म करने की अनुमती चाहता हूँ!"
त्या भाबड्या आणि पोरसवद्या कांछाची चूक म्हणावी, तर ती चूकही नव्हती. युनिटमध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात कमांडिंग ऑफिसरसाहेबांची परवानगी घेतल्यानंतरच केली जाते, हे त्याने अनेकदा पाहिले असणार. ऐन कृष्णजन्माचा सोहळा होण्यापूर्वी अशी परवानगी घेणे आवश्यक आहे की नाही याच संभ्रमात पाच मिनिटे काढल्यानंतर ऐनवेळी, 'It is better to err on the safer side' असा विचार त्याने केला असणार!
परंतु, काहीही पूर्वकल्पना नसताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे माझ्या तोंडाचा भलामोठा 'आ' वासलेला होता. सगळीकडे अक्षरशः नीरव शांतता पसरली होती. युनिटमधील सर्वच अधिकारी आळीपाळीने माझ्याकडे आणि कमांडिंग ऑफिसरसाहेबांकडे पाहू लागले होते. जवान तर अगदीच घाबरून गेलेले होते. "आता पुढे काय होणार?" हाच प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर होता.
झालेली गडबड आमच्या कमांडिंग ऑफिसरसाहेबांनी एका निमिषार्धात जाणली. त्यांनी शांतपणे एक नजर सर्वत्र फिरवली आणि त्या कांछाकडे पाहत अत्यंत धीरगंभीर स्वरात ते म्हणाले, "पंडितजी, भगवान श्रीकृष्ण जी को पैदा करें"
त्या क्षणी, भगवान श्रीकृष्णाचा पाळणा खाली सोडला गेला आणि ढोलक-झान्जाच्या नादात, सर्वांनी एकमुखाने जयजयकार सुरु केला. अर्थात, त्याआधी संपूर्ण मंदिर परेडने सुटकेचा नि:श्वास सोडला असणार यात शंका नाही.
नेहमीच असे म्हटले जाते की, "सैन्यात प्रत्येक कामासाठी एक ठराविक पद्धत, किंवा 'ड्रिल' असते".
त्याचा प्रत्यय आम्हा सर्वांना त्या दिवशी आला. त्या अपरिपक्व आणि अननुभवी कांछाने, नेमून दिली गेलेली ठराविक पद्धत मंदिरातदेखील अवलंबली, आणि प्रत्यक्ष भगवंताच्या जन्मासाठी कमांडिंग ऑफिसरसाहेबांची अनुमती मागितली.
एखाद्याने ती चूक हसण्यावारी तरी नेली असती किंवा त्या सैनिकाला जागच्याजागी धारेवरच धरले असते.
परंतु, असेही म्हटले जाते की, "सैन्यदल कोणताही प्रसंग सूज्ञपणे आणि खंबीरपणे हाताळते."
आमच्या कमांडिंग ऑफिसरसाहेबांनी ती परिस्थिती अतिशय धीरोदात्तपणे निभावून नेली आणि त्या सोहळ्याचे पावित्र्य अबाधित ठेवले. नेतृत्त्वकौशल्य या विषयात, आम्हा सर्वांसाठीच तो एक मोलाचा धडा होता.
युद्ध असो किंवा मंदिरांतील धार्मिक सोहळा असो, आपल्या बटालियनचे नेतृत्व करणाऱ्या कमांडिंग ऑफिसरची भूमिका अतिशय महत्वाची आणि निर्णायक ठरते हेच खरे!
जय हिंद!
_________________________________________________________________________________
मराठी भावानुवाद: कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
९४२२८७०२९४