मेरे से ज्यादा कौन जानता होगा?
कदाचित शंभर वेळा जावेदचे आभार मानून झालेले होते, तरीही मी पुन्हा एकदा जावेदजवळ गेलो, त्याला कडकडून मिठी मारली आणि म्हणालो, "थँक्स जावेद! माझे हात तू वाचवलेस!"
सियाचिन ग्लेशियर, या जगातील सर्वाधिक उंचीवरच्या युद्धभूमीवरचा आमचा कार्यकाळ पूर्ण करून, आम्ही नुकतेच ग्लेशियरच्या पायथ्याशी असलेल्या बेस कॅम्पवर पोहोचलो होतो.
"सर, बार-बार थँक्यू बोलके शरमिंदा मत करो!" कसनुसं हसत शिपाई जावेद मला म्हणाला.
"जावेद, तू असं म्हणतोयस कारण, कदाचित तुला कल्पना नाहीये, एखादा हात किंवा पाय गमावणं किती भयानक असू शकतं!"
"साब, इस बात को मेरे से ज्यादा कौन जानता होगा?"
माझ्या चेहऱ्यावर उमटलेले प्रश्नचिन्ह पाहून जावेद पुढे म्हणाला,
"साहेब, १९८९ साली माझे वडील याच सियाचिन ग्लेशियरवर तैनात होते. बर्फाच्छादित पर्वतावरून चालताना, एका घळीत पडून त्यांना गंभीर इजा झाली. त्यांचा जीव कसाबसा वाचला, पण त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले. ते हॉस्पिटलात होते तेंव्हा मीच त्यांची देखभाल करायचो. दोन्ही पाय गमावल्यानंतरच्या त्या भयंकर मानसिक धक्क्यातून सावरायला मीच त्यांना मदत केली. त्यामुळे ते अपंगत्वाच्या भावनेवर मात करून, त्यांचे कोलमडलेले आयुष्य पुन्हा उभे करू शकले."
हे ऐकून, काही क्षण मी स्तब्ध झालो, आणि मग एकदम त्याला म्हणालो, "जावेद, मला सांग, तू सियाचिन ग्लेशियरवरचं हे अवघड फील्ड पोस्टिंग स्वतःहून का मागून घेतलंस? तुझी बटालियन तर सध्या पीस स्टेशनमध्ये आहे. तूही अडीच-तीन वर्षे तिकडेच आरामात राहू शकला असतास!"
"सर, माझे वडील नेहमी म्हणतात की प्रत्येक फौजीने एकदा तरी ग्लेशियरवर नोकरी केली पाहिजे. आमचं संपूर्ण कुटुंबच फौजी आहे सर. मला हे आव्हान स्वीकारायचंच होतं."
"तुझ्या आईने तुला अडवलं नाही?"
"तिनं अडवलं सर. पण माझे वडील म्हणाले, की जर तू व्यवस्थित काळजी घेतलीस तर तुला काहीही होणार नाही. आता तिथली परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. आजकाल नवनवीन साधनं, उपकरणं, आणि पोशाख वापरायला मिळतात. ग्लेशियरवर पुष्कळ सोयीदेखील झालेल्या आहेत."
सहजच, गेल्या तीन महिन्यांमधला एकेक प्रसंग मी आठवू लागलो.
ग्लेशियरवर तैनात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा एकेक जोडीदार (Buddy) ठरलेला असतो. जोडी-जोडीनेच राहायची, आणि सगळीकडे वावरायची पद्धत असते. माझा Buddy जावेदच होता. तो प्रत्येक गोष्ट नेमून दिलेल्या पद्धतीनुसारच करीत असे. मात्र ती त्याच्या वडिलांची शिकवण होती, हे त्याच्याकडून आता नुकतेच मला समजले होते. कधी-कधी तर तो मला सौम्य शब्दात झापायचाही, आणि ग्लेशियरवरचे ठराविक 'ड्रिल' पाळायला लावायचा.
ग्लेशियरवरच्या उणे ३०-४० अंश तापमानामुळे, एकदा माझ्या हातांना 'Chilblain' झाले.
Chilblain, या आजारामध्ये, बोटांतल्या लहान-लहान रक्तवाहिन्या फुटतात आणि बोटांमध्ये रक्त साकळते. बोटे सुजून लाल होतात, असह्य खाज सुटते आणि तीव्र वेदनांमुळे मनुष्य बेजार होतो.
वेळीच त्यावर प्रतिबंधक उपाय किंवा उपचार न केल्यास बोटे सडून, झडून जाऊ शकतात.
आमची एकमेव लाईफलाईन असलेले हेलिकॉप्टर, खराब हवामानामुळे ग्लेशियरवर उतरू शकत नव्हते. त्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये हलवणे लांबणीवर पडत होते.
दहा दिवसांनंतर जेंव्हा हेलिकॉप्टर आले, तोपर्यंत आमच्या एका जवानाला High Altitude Pulmonary Oedema (HAPO) चा त्रास सुरु झालेला होता. या आजारात फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमधून पाणी बाहेर झिरपते आणि फुफ्फुसात भरते. श्वासोच्छ्वास कमी-कमी होत जातो आणि मनुष्य दगावू शकतो. एका जवानाचा जीव वाचवणे किंवा माझ्या हाताची बोटे वाचवणे, यापैकी एकच काहीतरी, एका वेळी करणे शक्य होते. अर्थातच, मला ग्लेशियरवर सोडून, त्या जवानाला हेलिकॉप्टरमधून नेले गेले.
त्या दहा दिवसात जावेदनेच माझी शुश्रूषा केली. स्वहस्तेच करण्याची, माझी अक्षरशः सर्वच्यासर्व कामे, तो आपल्या हाताने करीत असे! माझ्या हातांना ऊब पुरवण्याची आणि कोरडे ठेवण्याची दक्षता तो घेई. हळू-हळू माझ्या बोटांवरची सूज उतरत गेली. जर Chilblain बळावले असते तर गँगरीन होऊन, अगदी माझे हात नाही तरी, दोन्ही हातांची काही बोटे मी निश्चितच गमावली असती.
ही सगळी चित्रमाला माझ्या मनातून सरकत असतानाच, माझ्या दोन्ही हातांची सर्व बोटे मी हलवून पाहत होतो. सियाचिनवरचा कार्यकाळ संपवून, हाती-पायी धडधाकट अवस्थेत मी परत निघालो होतो, आणि याचे श्रेय निःसंशय जावेदलाच होते.
मी बेस कँपच्या ऑफिसर मेसकडे चालत निघालो. सियाचिन ग्लेशियरवरच्या सर्वात दुर्गम पोस्टवर, अतिशय खडतर परिस्थितीत सेवा बजावून मी परतलो होतो. एखाद्या हिरोसारखे माझे स्वागत झाले. CO साहेबांनी अतिशय उत्साहात माझ्यासोबत हस्तांदोलन केले. इतर अधिकारी माझ्यासाठी ड्रिंक हातात घेऊन सरसावले. पण मला मात्र काहीच खायची-प्यायची इच्छा होईना.
माझे मन सारखे जावेदच्या वडिलांकडे धाव घेत होते. स्वतःचे दोन्ही पाय गमावल्यानंतरही आपल्या मुलाला सियाचिनसारख्या ठिकाणी सेवा बजावण्यासाठी प्रोत्साहित करणारा तो सैनिक निश्चितच एक थोर माणूस होता.
माझे अभिनंदन करणाऱ्या अधिकाऱ्यांचे शब्दही माझ्या कानात शिरत नव्हते.
ग्लेशियरवर अधूनमधून हिमप्रपात (Avalanche) होत असत. अशाच एका हिमप्रपातामध्ये, जसबीरसिंग नावाच्या शिपायाने आपला जीव गमावला होता. त्याची आठवण मला अस्वस्थ करीत होती. सदैव उत्साहाने भारलेल्या जसबीरसिंगचा चेहरा राहून-राहून माझ्या डोळ्यांसमोर येत होता.
त्याचे शब्द जणू मला ऐकू येत होते, "साबजी, घरी पोहोचल्या-पोहोचल्या मी पल्सार बाईक विकत घेणार आणि तडक अमृतसरच्या हरमंदिर साहिबपुढे माथा टेकायला जाणार आहे!"
पण आज कुठे होता आमचा जसबीर?
सलग ९० दिवसांनंतर प्रथमच मी दाढी आणि आंघोळ केली! आरश्यात स्वतःचे रूप पाहताना मनात संमिश्र भावना होत्या. ग्लेशियरवरच्या जीवघेण्या हवामानामुळे झालेली त्वचेची अवस्था माझी मलाच बघवत नव्हती. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी, कपाळापासून किमान एक इंच मागेपर्यंतचे केस झडून, मला टक्कल पडू लागले होते. पण, हात-पाय गमावण्याच्या तुलनेत हे काहीच नव्हते!
त्या रात्री जड अंतःकरणानेच मी अंथरुणावर पडलो. थोडाच वेळ झोपलो असेन. पहाटे तीनच्या सुमारास मला कुणीतरी उठवल्यामुळे मी धडपडत उठलो.
मला उठवणाऱ्या जवानाने सांगितले, "सर, जावेदला अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे, त्याला बेस कँपच्या हॉस्पिटलात न्यावे लागले आहे."
मी लगेच हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. रेस्पिरेटर लावलेल्या, आणि अनेक उपकरणे अंगाला जोडलेल्या अवस्थेत, कसाबसा श्वास घेत असलेला जावेद मला दुरूनच पाहता आला.
मला त्याला भेटायचे होते. जरी त्याची शुश्रूषा करता आली नाही तरी, निदान त्याचा हात माझ्या हातात घ्यायचा होता. पण, डॉक्टर मला त्याच्याजवळ जाऊ देईनात. त्यांनी मला इतकेच सांगितले की, जावेदला Cerebral Veinous Thrombosis (मेंदूमधील रक्ताची गुठळी) चा अटॅक आला होता. दुसऱ्याच दिवशी त्याला विमानाने चंडीगढच्या कमांड हॉस्पिटलात हलवले गेले.
दहा दिवसानंतर, जावेद गेल्याची बातमी जेंव्हा मला मिळाली, तेंव्हा मी रजेवर होतो. माझ्या कानावर माझा विश्वासच बसेना. मी आमच्या युनिटच्या डॉक्टरला फोन करून विचारले, "डॉक्, प्रत्येक अन् प्रत्येक गोष्ट अक्षरशः नियमामध्ये लिहिल्याबरहुकूम करणाऱ्या जावेदला मृत्यूने गाठलेच कसे?"
डॉक्टरने मला शांतपणे समजावले.
सियाचिन ग्लेशियर आणि तिथले हवामान, हे एखाद्या कडव्या शत्रूपेक्षाही भयानक असतात. ते कोणाचा, केंव्हा आणि कसा घात करतील ते परमेश्वरच जाणे. समुद्रसपाटीपासून प्रचंड उंचीवर वाहणारे बर्फाळ वारे, जीवघेणी थंडी, प्राणवायूची कमतरता, आणि केवळ डबेबंद अन्न!तेदेखील फक्त शरीराला पोसण्यापुरते!
निसर्गरूपी शत्रूच्या या सैनिकांनी शरीरावर केलेले वार, ग्लेशियरवर असताना काय, किंवा त्यानंतरच्या आयुष्यातही काय, आपल्याला केंव्हा घायाळ करतील याचा काही नेम सांगता येत नाही. हे सर्व आपल्या भौतिक शक्तीपलीकडचेच नव्हे तर आपल्या कल्पनेच्याही पलीकडचे आहे.
मला पूर्ण कल्पना होती की, सख्ख्या भावासारखे प्रेम ज्याच्यावर केले, अश्या आपल्या सोबत्याच्या हौतात्म्याची वार्ता घेऊन, त्याच्या आईवडिलांना भेटणे, ही एखाद्या सैनिकाच्या आयुष्यातली सर्वात मोठी परीक्षा असते. तरीही मी जावेदच्या घरी गेलो.
त्याच्या आईवडिलांसमोर माझ्या अश्रूंचा बांध फुटू नये म्हणून मी उसने अवसान आणले होते.
पण, परतीच्या वाटेवर मात्र, दुःखाने माझा श्वास कोंडतो की काय असे मला वाटू लागले.
पुन्हापुन्हा जावेदचे शब्द माझ्या कानात घुमायला लागले, "साबजी, मेरे रिश्तेमें एक लडकी है जिसको मैं तहेदिल से प्यार करता हूँ । अगली छुट्टीमें पक्का उसको मैं शादी के लिये पूछनेवाला हूँ ।"
एका निर्मनुष्य ठिकाणी मी माझी टॅक्सी थांबवली. ड्रायव्हरला सांगितले, "तू गाडीतून उतरून, दूर कुठेतरी जाऊन, अर्धा तास थांब".
त्या अर्ध्या तासात मी अक्षरशः धाय मोकलून रडलो. अखेर एक सैनिकसुद्धा माणूसच असतो. त्याच्या डोळ्यातून पाणीच नव्हे, तर हृदयातून रक्ताचे अश्रूही वाहत असतात!
_______________________________