कमिशन घेऊन ज्या बटालियनमध्ये मी नुकताच रुजू झालो होतो ती, मराठा लाईट इन्फंट्रीची पहिली बटालियन, (1 MLI) "जंगी पलटण" या टोपण नावानेच अधिक ओळखली जाते. जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागात भारत-पाक सीमेवर खडतर सेवा बजावल्यानंतर आमची बटालियन पुणे येथे नुकतीच बदलीवर आलेली होती. सीमेवरील "फील्ड पोस्टिंग" करून आल्यानंतर आम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी "पीस पोस्टिंग" मिळणे स्वाभाविकच होते. परंतु, आम्हाला लवकरच पुन्हा फील्डवर जावे लागले.
'जंगी पलटण'चा सर्वात कनिष्ठ अधिकारी म्हणून, मला युद्धकैद्यांच्या शिबिराचा मुख्य अधिकारी (पी.ओ.डब्ल्यू. कॅंप कमांडंट) नेमण्यात आले. आमच्या कैदेत असलेले बहुसंख्य पोर्तुगीज सैनिक निव्वळ सक्तीच्या भरतीमुळे सैन्यात दाखल झालेले होते. कदाचित त्यामुळेच, ते बऱ्यापैकी मवाळ प्रवृत्तीचे होते. परंतु, त्यांनी काहीही गडबड करू पाहिल्यास त्यांना रोखण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ते राहत असलेल्या बॅरॅकसमोर एक मोकळी जागा होती जिथे त्यांना दैनंदिन हजेरीसाठी (रोलकॉल मस्टर) उभे केले जाई. त्या मैदानामागेच त्यांचे भोजनगृह व भटारखाना होता आणि त्यांची राहण्याची व्यवस्था समोरील बाजूस होती.
दमणच्या यशस्वी मोहिमेनंतर, आमचे अभिनंदन करण्यासाठी, आणि ही कामगिरी आम्ही कशी पार पाडली ते जाणून घेण्यासाठी पाहुण्यांचा ओघ आमच्या बटालियनमध्ये सुरू झाला.
त्या महिन्याच्या अखेरीस, एका महत्वाच्या व्यक्तीने आमच्या बटालियनला भेट दिली. त्या अधिकाऱ्याची, भारत सरकारच्या त्या काळच्या सर्वोच्च सत्ताकेंद्राशी, (पंतप्रधानांशी) असलेली 'विशेष जवळीक', आणि कदाचित त्यामुळेच झालेली त्यांची नेत्रदीपक, पण अनपेक्षित पदोन्नती, हा एकंदर लष्करी वर्तुळात मोठाच चर्चेचा विषय होता. ती व्यक्ती होती, 'चीफ ऑफ जनरल स्टाफ' (सी.जी.एस) लेफ्टनंट जनरल ब्रिजमोहन उर्फ 'बिज्जी' कौल!
जनरल कौलसाहेबांच्या सैनिकी कारकीर्दीचा आलेख त्याकाळी अतिशय चढता होता. पण, पुढे वर्षभराच्या आत ते भलतेच कुप्रसिद्ध होणार होते याची कल्पना त्यावेळी कोणालाही असणे अशक्य होते.
१९६२ साली, चीनच्या हातून झालेल्या, भारताच्या दारुण पराभवाकरता जी चांडाळचौकडी जबाबदार होती त्यापैकी एक, हे कौलसाहेब होते!
जनरल कौलसाहेबांच्या आग्रहाखातर, त्या दिवशीच्या एकूण कार्यक्रमातील शेवटचा भाग म्हणून, पी.ओ.डब्ल्यू. कॅंपला त्यांची भेट ठरवली गेली होती. त्यानुसार, सर्व कैद्यांना 'व्हीआयपी'ला भेटण्यासाठी एका रांगेत उभे केलेले होते. पाहुण्यांचा संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतरच कैद्यांना जेवण दिले जाणार होते. एकूण कार्यक्रम लांबत गेल्याने कैद्यांना जेवणासाठी तिष्ठत ठेवणे भाग होते. अखेर, पाहुणे कैद्यांच्या भेटीसाठी आले आणि सर्व कैद्यांनी त्यांना सलामी दिली. रिवाजाप्रमाणे, कैद्यांना उद्देशून जनरलसाहेब चार शब्द बोलले. परंतु, बहुसंख्य कैद्यांना इंग्रजी समजत नसल्यामुळे ते भाषण त्यांच्या डोक्यावरूनच गेले असावे.
भाषण संपताच जनरल कौल आपल्या जीपच्या दिशेने निघाले. पण, जीपमध्ये बसण्यापूर्वी ते किंचित थबकले व सर्व अधिकाऱ्यांशी हस्तांदोलन करू लागले. तेवढ्यात, रस्त्यावरचे एक भटके कुत्रे अचानकच आले आणि कुणाला काही कळण्याच्या आत जनरलसाहेबांच्या पायाचा चावा घेऊन पळून गेले. चावा तसा काही फार मोठा नव्हता, पण त्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. प्रत्येकजण जाऊन जनरलसाहेबांभोवती जणू पिंगा घालू लागला. कारण, इथे कुणा 'समर्थाघरचे श्वान' नव्हे तर, एक साधे, भटके श्वान येऊन, प्रत्यक्ष 'समर्थां'नाच चावले होते!
आमच्या कमांडिंग ऑफिसर साहेबांनी कसनुसं होऊन दिलगिरी व्यक्त केली. पुढे त्यांनी जनरलसाहेबांना हेही आश्वासन दिले की त्या भटक्या कुत्र्यावर नजर ठेवली जाईल आणि जर त्या कुत्र्याच्या हालचाली विचित्र वाटल्या तर ती खबर तातडीने जनरलसाहेबांना दिली जाईल!
जनरलसाहेब निघून जाताच, बटालियनच्या सर्व अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावली गेली.
अचानक ते कुत्रे तिथे कसे काय घुसले आणि दुर्दैवाने, नेमके जनरलसाहेबांनाच का चावले असावे, याचा उहापोह सुरु झाला. सर्वात ज्युनियर अधिकारी असलो तरी चर्चेत माझेही योगदान असावे असे मला वाटले. म्हणून मग दोन आण्याचे का असेनात, पण माझे दोन मुद्दे मी मांडलेच.
माझा पहिला मुद्दा असा होता की, कुत्र्यांच्या घ्राणेंद्रियांची शक्ती मनुष्याहून अधिक तीक्ष्ण असते. म्हणूनच, एखाद्या वाईट माणसाचा विशिष्ट वास कुत्र्यांच्या नाकाला आपसूक जाणवतो. जनरल कौलसाहेब कसे आहेत हे त्या कुत्र्याने बरोब्बर ओळखल्यानेच कुत्रे त्यांना चावले असावे!
माझा दुसरा मुद्दा असा होता की, त्या दिवशी कैद्यांच्या जेवणाला खूपच उशीर झालेला होता. रोज जेवताना कैदी त्या कुत्र्यासमोर पावाचे तुकडे टाकत, हेही मी पूर्वी पाहिले होते. आज ज्या माणसामुळे आपल्या जेवणाला उशीर झाला त्याला कडकडून चावावे असे त्या कुत्र्याला वाटणे स्वाभाविक होते!
जेमतेम विशीतला माझ्यासारखा कोवळा सेकंड लेफ्टनंट असलीच काहीतरी बालिश बडबड करणार, हे सगळ्यांनी गृहीत धरलेले असल्याने, माझे मुद्दे त्वरित केरात टाकण्यात आले.
मात्र, अशी घटना पुन्हा घडू नये याची खबरदारी घेण्याचा हुकूम मला देण्यात आला. शिवाय, त्या कुत्र्याच्या हालचालींचे निरीक्षण करून, त्यासंबंधीचा अहवाल जनरल कौलसाहेबांच्या मुख्यालयात दररोज सिग्नलने (तारेने) पाठवायचे कामही माझ्याकडेच आले!
मी त्या कुत्र्यावर बारीक लक्ष ठेवून होतो. कुत्रा पिसाळलेला नाही याची खात्री करूनच, "कुत्रा ठीक आहे" असा सिग्नल पुढचे ४-५ दिवस मी नित्यनेमाने दिल्लीला पाठवीत राहिलो. आठवड्याच्या शेवटी मात्र, जरा खोडसाळपणेच, परंतु, वरकरणी अजिबात आक्षेपार्ह वाटणार नाही असा एक सिग्नल मी तयार केला,
"कुत्रा अजूनही ठीक आहे. जनरलसाहेब कसे आहेत?"
मी धाडून दिलेल्या सिग्नलची कार्यालयीन प्रत जेंव्हा माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पाहिली तेंव्हा बटालियनमध्ये एकच हलकल्लोळ माजला. माझ्या या जादा शहाणपणाचा आता काय परिणाम भोगावा लागणार? असा प्रश्न साहजिकच सगळ्यांना पडला. प्रत्यक्षात मात्र, मी मारलेली 'चावी' दिल्लीत अगदी नेमक्या कुलुपाला लागली असावी असे दिसले.
उत्तरादाखल एकाच ओळीचा एक त्रोटक सिग्नल दिल्लीहून आला.
"याउपर याविषयी कोणताही अहवाल आमच्याकडे पाठविण्याची गरज नाही!"
बटालियनमधल्या सगळ्यांचा जीव तर भांड्यात पडलाच, पण माझी टेहळणी आणि ससेमिरा थांबल्याने, त्या कुत्र्यानेही हुश्श्श म्हटले असणार यात शंका नाही!
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मूळ इंग्रजी अनुभवलेखक : लेफ्टनंट जनरल विजय ओबेरॉय [सेवानिवृत्त]
मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त]
मोबाईल व व्हॉट्सऍप क्रमांकः ९४२२८७०२९४
ईमेल : abbapat@gmail.com